बुद्धी दे रघुनायका

बुद्धी दे रघुनायका
श्रीमती. सीमाताई रिसबूड
  • November 29, 2025
  • 1 min read

समर्थांच्या करुणाष्टकातील या करुणाष्टकात “बुद्धी दे रघुनायका” हा चरण २० वेळा आला आहे व यावरून बुद्धी शब्दाच्या अंतरंगात शिरण्याचा मी प्रयत्न केला. समर्थ घर सोडून टाकळीला लहान वयात आले. त्या काळात लग्न, संसार, व्यवसाय ही चाकोरी सोडून जनप्रवाहाच्या विरुद्ध दिशेला त्यांचा प्रवास होता. लोक निंदा करत, हसत त्यांच्या संसार व्यथा सांगत, त्यांचे दारिद्र्य पाहून समर्थांना वाईट वाटत असे. स्वत: वैयक्तिकदृष्ट्या समर्थांना युक्ती, बुद्धी, विद्या नाही, नेटके लिहिता, वाचता येत नाही, उदास वाटते. मन व चित्त एकाग्र होत नाही याबद्दल दु:ख होत होते. स्वतःची व्यथा एका रामाशिवाय कोणाला सांगावी ? त्यामुळे, “मी काया, वाचा व मनाने तुझा झालो आहे. तू अनेक देवांना आपत्तीतून सोडवलेस, मला ही सोडवशील; तू दयाळू; कीर्तिमान आहेस; मी तूझाच आहे या बद्दल संशय वाटत आहे का ?” असा समर्थांनी आत्मारामाशी संबंध साधला व ‘बुद्धी दे’ असा प्रेमळ आग्रह केला.

अंत:करण पंचकात अंत:करण जेव्हा संकल्प विकल्प करते त्याला मन म्हणतात. संकल्प पक्का झाला की निश्चय होतो ती बुद्धी, निश्चयाचे चिंतनात रूपांतर होते ते चित्त, हा संकल्प पूर्ण करण्यासाठी ‘मी करेन’ हा अहंकार ठरवतो. दासबोध किंवा आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास सुरू करण्याअगोदर अनेक विकल्प येतात. त्यात मैत्रिणी, नातेवाईक भर टाकतात. इतक्या वर्षानी लिहिणे जमेल का ? सातत्य राहील का ? एक नाही अनेक विकल्प येतात. ‘बरा निश्चयो शाश्वताचा करावा’ असा निश्चय असेल तर ‘ऐकावे जनाचे’ या न्यायाने आपण स्वत:च निश्चय करतो. विकल्प जातात मन संकल्प करते, बुद्धी निश्चय करते, चित्त चिंतन करते व आपला अहंकार ‘मी करेन’ असा आतून निर्णय देतो. बुद्धीने निश्चय नाही केला तर मन बुद्धीला कुठेही फरफटत नेते व आयुष्य वाया जाते पदरी काहीच पडत नाही. 

भगवत्गीतेत ‘सांख्य बुद्धी’ चा विचार आहे. सांख्य म्हणजे ‘ब्रह्म’. ते जाणणारी बुद्धी म्हणजे ‘सांख्य बुद्धी’ सत् म्हणजेही ब्रह्म, ते जाणणारी बुद्धी म्हणजे सद्बुद्धी. ती दुर्लभ असते. व्यवसायात्मिका बुद्धी ‘ईश्वर निष्ठच’ असते. तिला ईश्वरावाचून दुसरे आधिष्ठानच नसते. सत्वगुणी बुद्धीने आत्म्याचे शुद्ध स्वरूप जाणता येते. ज्ञानेश्वरी २-२७३ मध्ये ज्ञानदेव मन व बुद्धीच्या ऐक्याचा विचार मांडतात. या ऐक्याने निष्काम कर्म होते. त्यातील अहंकार ‘मी केले’ न म्हणता ‘राम कर्ता’ या भावनेत कर्म करतो. निश्चयात्मक बुद्धी, मी म्हणजे देह; देहसुख हे खरे सुख; मी कर्ता; मी भोक्ता; जग सत्य आहे; हे भ्रम नष्ट करते आणि साधकाला मी म्हणजे आत्मा, आत्मसुख हे खरे सुख, राम कर्ता, राम भोक्ता, जग नष्ट होणारे व अनित्य आहे अशा निश्चयाचा विचार करायला शिकवते. बुद्धीचे भ्रम नाहीसे करून अहंकाराचा लय करण्याची कला आत्मसात करण्याच्या प्रयत्नांनाच साधना म्हणतात. शुद्ध मन व शुद्ध बुद्धी अंगी बाणली की सोsहं साधना सोपी होते आणि जागेपणीच मन, बुद्धी, चित्त, अहंकाराचा लय होतो.

दासबोधात द.१ स. १ मध्ये १५ बुद्धी निश्चय करते. निश्चय म्हणजे ‘संशयरहित ज्ञान’. १५ विषयांचे ज्ञान मिळवण्यासाठी बुद्धी कार्यरत रहाते. त्यासाठी आपण ‘बरा निश्चयो शाश्वतचा करावा’ हे समर्थ वचन लक्षात ठेवावे लागते. १५ विषयांचे ज्ञान मिळवण्यासाठी मायोद्भव उपासना, पंचभूतांचे लक्षण अशी ६ लक्षणे मदत करतात. आत्मानात्म विचाराने बुद्धी स्थिर, निश्चळ व शांतपणे विचार करते. समर्थ १५-१०-२९ मध्ये म्हणतात, 

“विचारे निश्चळ झाली बुद्धी । बुद्धीपाशी कार्यसिद्धी ।

पाहातां वडिलांची बुद्धी । निश्चली गेली ।।”

अशी निश्चयात्मक ‘बुद्धी हे देणे भगवंताचे’ असेही समर्थ म्हणतात. 

बुद्धी जेव्हा अहंकाराचा लय करून कर्म करण्याचा निश्चय करते तेव्हा फलाशारहित निष्काम कर्म होते. निष्काम कर्मामुळे कर्माचे कष्ट वाटत नाहीत व चांगलेच कर्म होते. सर्वांच्या हृदयात अंतरात्मा आहे या भावनेत कर्म केले तर ते समत्वबुद्धीने होते व अशा समत्व बुद्धियोगाने सर्वत्र ईश्वरी सत्ता अनुभवता येते. भगवत्गीतेच्या दुसर्‍या अध्यायात हा विचार सविस्तरपणे मांडला आहे. आसक्ती, काम, क्रोध, मत्सर, अविवेक, स्मरणनाश व अखेर बुद्धी नाश असे अध:पतन एका आसक्तीमुळे होते. म्हणून साधकाने या बाबत फार सावध असावे. 

समर्थ रामदासांनी लोक संघटन व लोकसंग्रह केला. अज्ञानी लोकांच्या श्रद्धांना त्यांनी कधीच धक्का लावला नाही. स्थानिक देवतांनाही योग्य स्थान उपासनेत दिले. त्यांची खंडोबाची सवाई व आरती प्रसिद्धच आहे. त्यांनी बुद्धीचे वैभव संपादन केले पण नि:स्पृह वृत्तीने अनुभवाचे ब्रह्मज्ञान सामान्यांना दिले. आत्मज्ञान, पाठांतर, देहातील तत्वांचे विवरण याची तर्कसंगत मांडणी करून लोकांच्या मनातील वैचारिक गोंधळ नष्ट केला. त्यासाठी ‘बुद्धी दे रघुनायका’ असे मागणे मागितले. 

दृढ होता अनुसंधान । मन झाले उन्मन ।

पाहो जाता माया नासे । द्वैत गेले अनायासे ।

होता बोधाचा प्रबोध । झाला शब्दाचा नि:शब्द ।

ज्ञान विज्ञान झाले । वृत्ती निवृत्ती पाहिले ।

ध्यान धारणेची बुद्धी । झाली सहज समाधी ।

रामी रामदास वाच्य । पुढे झाले अनिर्वाच्य ।। उन्मत पंचक  ४ ।।

 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Language