भीमरूपी स्तोत्र २ – अपूर्व बाळलीला

भीमरूपी स्तोत्र २ – अपूर्व बाळलीला
डॉ. सदानंद चावरे
  • October 26, 2025
  • 1 min read

या स्तोत्रात मारुतीच्या बाळ लीलांचे वर्णन आले आहे. त्यामुळे या स्तोत्राला मारुतीच्या जन्मा आधी
घडलेल्या घटनांचा संदर्भ आहे. इंद्र दरबारातील अतिशय सुंदर अप्सरा (पुंजीकस्थला) ही एका तापसाला
हसल्यामुळे शापग्रस्त होते व हसण्यामागे असलेल्या चंचलता या स्वभाव दोषाचा दंड म्हणून वानरी होऊन
तिला मर्त्य लोकात यावे लागते. तिला हवी ती रूपे धारण करता येतील व पोटी महा पराक्रमी व चिरंजीव पुत्र
जन्म घेईल असा उ:शाप तिला प्राप्त झाला. यथायोग्य वेळी सुमेरू पर्वताचा राजा केसरी या वानराशी विवाह
झाला. बराच काळ प्रतीक्षा करूनही अपत्य प्राप्ती न झाल्याने तिने वृषभाचल पर्वतावर तप केल्यावर पवन देव
प्रसन्न झाले व त्यांच्या कृपेने तिला पुत्र प्राप्तीचा वर मिळाला. दशरथ राजाच्या पुत्र व्हावा या इच्छेने केलेल्या
यज्ञाच्या  पायसातील थोडा भाग एका घारीने पळवला आणि तो पर्वतावर बसलेल्या अंजनी मातेच्या ओंजळीत
तिने टाकला. त्या पायसाचे फळ म्हणून अंजनी मातेने चैत्र पौर्णिमा सूर्योदय काळी मारुतीला जन्म दिला. मरुत
म्हणजे वायू. त्याच्या आशीर्वादाने पुत्र प्राप्ती झाली म्हणून मारुती.

जनीं ते अंजनी माता । जन्मली ईश्वरी तनु ।
तनु मनु तो पवनु । येकची पाहतां दिसे ।। १ ।।
त्रिलोकी पाहाता बाळे । ऐसे तो पाहता नसे ।
आतुळ तुळणा नाही । मारुती वात नंदनु ।। २ ।।

मारुतीचा देह दैवी गुणांनी युक्त होता. पवनाचा अंश असल्याने त्याचे मन व शरीर अद्वितीय असे होते.
वायूचा वेग आणि सामर्थ्य दोन्ही त्याच्यात एकवटले होते. ‘येकची’; म्हणजे एकमेवाद्वितीय. अद्वैत दर्शवते. वायू
हे पंच भूतातले महा शक्तीशाली भूत आहे. ब्रह्मांडात घडणाऱ्या अति प्रचंड हालचाली यांना हे तत्त्व जबाबदार
असते. सोसाट्याचा वारा, वादळ हे मोठ-मोठे वृक्ष उन्मळून टाकतातच. असे हे पवनाचे कर्तृत्व आहे व मारुती
अवतारात हे सारे सामर्थ्य प्रगट झाले म्हणून ईश्वरी तनु. हनुमानाचे जाणे येणे हे झंझावातासम होते. ही त्याची
अंगभूत शक्ती होती. श्रीसमर्थ म्हणतात की, त्रैलोक्यात शोधून सुद्धा असे तेजस्वी सामर्थ्यशाली बालक
सापडणार नाही..

चळे ते चंचळे नेटे । बाळ  मोवाळ साजिरे ।
चळवळी चळवळीताहे । बाळ लोवाळ गोजिरे ।। ३ ।।

स्पर्शाला मृदू, मुलायम लव असलेले ते बाळ त्वरेने क्षुब्ध झाले. का तर त्याला भूक लागली व आई तर
वनात त्याच्यासाठी फळे, कंद आणायला गेली होती. भुकेने कासावीस होणे म्हणजे क्षुब्ध होणे. इथे क्रोध नाही

तर क्षोभ आहे. भूक लागणे ही अपेक्षित अशी भावना आहे व तिचे शमन, तिची तृप्ती वेळेत व्हायला हवी. बाल
मारुतीची हालचाल श्रीसमर्थ चळवळी चळवळीताहे यातून व्यक्त करतात. द्विरुक्तीमुळे वर्णन प्रत्ययकारी होते.
नवजात बालकाचे हात-पाय, नखे, बोटे या साऱ्यांचे मातेला कोण कौतुक व किती कौतुकाने ती हे सारे
न्याहळते, त्याच ममतेने कौतुकाने श्रीसमर्थांचे शब्द येतात..

हात की पाय सांगावे । नखें बोटे परोपरी ।
दृष्टीचे देखणे मोठे । लांगूल लळलळीतसे ।। ४ ।।

मारुतीचे शेपूट/पुच्छ,  यालाच श्रीसमर्थ इथे लांगूल म्हणतात. लळलळीतसे म्हणजे मोठे असल्याने पीळ
किंवा वेटोळे दिलेले. ते देखणे आहेच पण अत्यंत सामर्थ्यशाली असल्याने त्याचे मोठे कौतुक आहे. ते शक्ती
स्वरूप आहे. आकार बदलण्याची सिद्धी हनुमानाला उपजत होती. मारुतीरायांच्या पराक्रमात या लांगूलाचे
मोठे योगदान आहे.

खडी खारी दडे तैसा । पीळ पेंच परोपरी ।
उड्डाण पाहातां मोठे । झेंपावे रविमंडळा ।। ५ ।।

भुकेने क्षुब्ध होऊन बाल मारुतीने आकाशातील लाल बुंद सूर्य बिंबाला फळ समजून झेप घेतली. तो
दिवस सूर्य ग्रहणाचा होता. आकाशात ‘खारी’; म्हणजे ढग होते व त्यामुळे मारुतीचे वेढा घातलेले शेपूट कधी
दिसत होते तर कधी दिसत नव्हते. श्रीसमर्थ तो प्रसंग किती बारकाव्याने आपल्या समोर मांडतात ते
अभ्यासण्या सारखे आहे. प्रत्यक्षदर्शी अनुभव असावा असे ते वाटते.

बाळाने गिळिला बाळू । स्वभावे खेळतां पहा ।
आरक्त पीत वाटोळे । देखिले धरणी वरी ।। ६ ।।

बाल हनुमान आणि आकाशात उगवणारा बाल सूर्य. त्याचे मनोहर स्वरूप-पिवळसर आणि थोडा
तांबूस असा तो सूर्य मारुतीस हवासा वाटला.. उगवतीचा सूर्य लोभस असतो खरा, पण तो म्हणजे फळ आहे
असे वाटून खाण्यास घ्यावे असे वाटणे हेच विशेष आहे. अप्राप्य, अति भव्य हवेसे वाटणे हेच थोर असल्याचे
निदर्शक लक्षण; इतक्या बाल्य अवस्थेत दिसून येणे हा या कथेचा गाभा आहे. अवतार असतात त्यांच्यापाशी
विशेष सामर्थ्य असते असे श्रीसमर्थ दासबोधात म्हणतात.

पूर्वेसी देखतां तेथे । उडाले पावले बळे ।
पाहिले घेतले हाती । गिळिले जाळिले बहु ।। ७ ।।
थुंकुनी टाकितां तेथे । युद्ध जाले परोपरी ।
उपरी ताडिला तेणे । येक नामची पावला ।। ८ ।।

मारुतीने विशाल होऊन सूर्य बिंब हाती घेतले आणि खाण्यासाठी गिळले पण त्याच्या तेजाने दाह
झाल्याने ते त्याने थुंकले. सूर्य हा ज्ञानाचा प्रतीक. त्याचे मंडळ ग्रासले म्हणजे सारे ज्ञान आत्मसात केले आणि
त्यानंतर जे व्यापले होते त्याचा त्याग केला असाही एक अर्थ वाचण्यात आला. कथेनुसार ग्रहण काल असल्याने
सूर्याला गिळायला आलेल्या राहू बरोबर मारुतीचे युद्ध झाले व त्याच्या मदतीसाठी येऊन इंद्राने वज्रप्रहार
केल्याने मारुतीची हनुवटी विद्ध झाली. हा वायुसुत आहे हे, वायूने त्रिलोकाचे प्राण रोधल्यावर इंद्राच्या ध्यानी
आले. त्याने वर देऊन मारुतीची हनुवटी पूर्ववत केलीच पण हनुवटी आणि सर्व शरीर वज्रासमान कठीण केले.
असा कथाभाग आहे. यावरून त्याचे हनुमान (भंग पावलेली हनुवटी) नाव पडले.
बाल अवस्थेत राहूला म्हणजे बलिष्ठ अप प्रवृत्तीला आव्हान देणे व त्यासाठी युद्ध करणे हा उपजत गुण
दिसून येतो. यात धैर्य आहे आणि वीरता सुद्धा आहे. परिणामाची पर्वा नाही असे म्हणणे कठिण आहे कारण ते
नुकतेच जन्म झालेले बालक आहे. उत्सुकता , धाडस या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात.

हा गिरी तो गिरी पाहे । गुप्त राहे तरुवरी ।
मागुता प्रगटे धावे । झेपांवे गगनोदरी ।। ९ ।।
पळही न राहे कोठे । बळेची घालितो झडा ।
कडाडा मोडती झाडे । वाडे वाडें उलांडती ।। १० ।।
पावनासारीखा धावे । वावरें विवरे बहु ।
अपूर्व बाळलीला हे । रामदास्य करी पुढे ।। ११ ।।

मारुतीचे बालपण, त्याच्या खोड्या व उद्यामशीलते मुळे विशेष जाणवतात. या पर्वतावरून त्या
पर्वतावर उड्या मारणे, झाडांवरून उड्या मारताना झाडे मोडून पडणे आणि एक क्षण सुद्धा स्थिर न राहणे हे
वायुतत्वाच्या प्रभावामुळे होते असे श्रीसमर्थ सांगतात. असा हा प्रचंड उपद्व्यापी बालक पुढे रामाचा दास झाला
आणि त्याच्या समोर अत्यंत स्थिर उभा राहिला. कोणत्याही प्रसंगात आवश्यक ते कृत्य करताना अत्यंत स्थिर
चित्ताने अत्यंत विवेकाने वागला. हे रूपांतर खूप महत्त्वाचे आहे.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।
संदर्भ :- सार्थ व सविवरण भीमरूपी स्तोत्रे (डॉ. सौ. सुनीती विजय सहस्रबुद्धे)

Language