उपरती म्हणजे बाह्य विषयांपासून सुटण्याची धडपड होय. ही धडपड त्रिविध तापाने पोळल्यावर, संसार दु:खाने दुखावल्यावर सुरू होते. आपले गेले ते आयुष्य अज्ञानामुळे वाया गेले असे साधकाला मनोमनी वाटते. आता नव्या जीवनाची सुरुवात विवेक, विचार, वैराग्याने करावी असेही वाटत असते. अनुताप व पश्चाताप होणे ही साधकावस्थेची पहिली पायरी आहे. समर्थ करुणाष्टकात “अनुदिन अनुतापे तापलो रामराया” असे कळकळीने म्हणतात. समर्थांनी दृढ निश्चयाने घराचा त्याग केला होता, तो ही लहानपणीच; म्हणून त्यांना स्वत:ला पश्चात्ताप होत नव्हता, पण लोकांचे अज्ञान; लोकांची व्यथा त्यांना स्वत:चीच वाटे त्या भावनेत त्यांनी करुणाष्टके लिहिली.
१. भूमीभार झाल्याची भावना – सक्षम, दुर्लभ नरदेह मिळून सुद्धा स्वत:मधील ईश्वरी स्वरूप ओळखले नाही, देहाचा उपयोग साधनेसाठी न करता भोग भोगण्यासाठी केला, भक्ती; आत्मज्ञान; ध्यान न करता; दीन दुबळा, खचलेला झालो म्हणून अनुताप होतो.
२. मन आवरत नाही – मन अतिशय चपळ, आवरता आवरत नाही. भगवत् गीतेत अर्जुनानेही ही व्यथा बोलून दाखवली. गीता अ. ६ श्लोक ३४ मध्ये अर्जुन म्हणतो “मन मोठे चंचल, क्षोभ निर्माण करणारे दृढ व बलवान आहे त्यामुळे त्याला वश करणे म्हणजे वार्याला अडवण्यासारखे कठीण आहे.” मन माणसाला विकल्पात गुंतवते व कोणताच अभ्यास, कोणतीच साधना पूर्ण होत नाही. ते सतत भूतकाळ, भविष्यकाळात रमते व वर्तमानात जे करायला हवे ते करू देत नाही. समर्थ म्हणतात “मन हे आवरेना की, वासना वावडे सदा | कल्पना धावते सैरा | बुद्धी दे रघुनायका ||”
३. व्यर्थ स्वार्थ साधण्याची वृत्ती – मी व माझे हे दोन शब्द साधकाला स्वजन, जन, धन या साखळीत अडकवतात. स्वार्थ हवेपणा वाढवतो, नेहमीच अपूर्णच असतो. विषय वासना नेहमीच अतृप्त असतात. त्या जीवाला दु:ख देतात व जन्म मृत्यू चक्रात अडकवतात. या गोष्टी टोकाच्या झाल्यावर त्यांचा पश्चात्ताप होतो.
४. स्वजन माया – आई-वडील, बहीण, भाऊ, पत्नी, मुले काही काळापुरते सोबती असतात. त्यांच्यापासून मनाने अलिप्त होऊन ते ईश्वर चरणी समर्पित करावे लागते. पण समर्थ म्हणतात, “सकळ स्वजन माया तोडीता तोडवेना” तसे हे कठीण आहे. “जीवलग जीव घेती | प्रेत सांडोनी जाती” हे कटू सत्य पचवावे लागते. अनुताप झाला तर “घडी घडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा” असे होत नाही.
५. देशाटनातील निरीक्षण – समर्थांनी देशाटनात अनेक साधू, तपस्वी, हटयोगी पाहिले. देवालयांमधील भव्य पूजा पाहिली. तशीच काशी, अयोध्या येथील भग्न मंदिरे पाहिली. लोकांमधील अज्ञान, अंधश्रद्धा पाहिली. हिंदूंमधील उदासिनता पाहून त्यांना, या लोकांना इतिहासाचे विस्मरण कसे झाले? त्यांना मागील गोष्टींचा पश्चात्ताप का होत नाही? असे वाटे.
६. अज्ञानाची जाणीव – सुखाच्या धडपडीत दु:खच वाढते हे कळल्यावर आपलं काहीतरी चुकत आहे, खरा शाश्वताचा मार्ग वेगळाच आहे, त्या बाबत आपण अज्ञानी आहोत, याचे वाईट वाटणे म्हणजे अनुताप. अनुतापानंतर ज्ञानाची जिज्ञासा निर्माण होते. ग्रंथाचा अभ्यास, सत्संगतीत आपल्यामधील अपूर्णतेची; न्यूनतेची; दु:खभोगाची; आयुष्य वाया गेल्याची तीव्र जाणीव होऊन पश्चात्ताप होतो व पुढील जीवन बदलण्याची तीव्र इच्छा होते.
वाल्मिकी ऋषींचा अनुताप – वाल्मिकींचा अनुताप अत्यंत उद्बोधक आहे. नारदां सारख्या संताची गाठ पडली व त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. हे मला पाहून घाबरत कसे नाहीत? त्यांच्या जवळ काहीही नाही तरी समाधानी कसे? नाम स्मरणात हे निर्भयपणे या अरण्यात कसे हिंडत आहेत? या प्रश्नांची उत्तरे त्यांना हवी होती. स्वत: करत असलेले वाईट कर्म पत्नी-मुलांसाठी करतो हा त्यांचा भ्रम पत्नी-मुलांनीच घालवला. आपल्या पापात कोणी वाटेकरी नाही व आपण घर सोडत असताना कुणाला वाईटही वाटत नाही हे सत्य कळल्यावर त्यांना पश्चात्ताप झाला. त्यांच्या समग्र जीवनात मोठी क्रांती घडली, धगधगीत वैराग्याचा उदय झाला. राम नाम घेण्याची सवय नाही म्हणून “मरा मरा” जप सुरू केला. देहबुद्धी व देहाहंकार नष्ट झाला. अंगाभोवती वारूळ निर्माण झाले. नाम निष्ठेनी समाधीमग्न झाले. त्यांना शरीर, प्राणांचे विस्मरण झाले. ब्रह्मदेव प्रसन्न झाले व त्यांनी “रामकथा” लिही असे संगितले. वाल्मिकींनी २४००० श्लोकांचे रामायण लिहिले.
समर्थ म्हणतात,
वाल्मीक ऋषी बोलिला नसता | तरी आम्हांसी कैंची रामकथा |
म्हणोनियां समर्था | काय म्हणोनी वर्णावें?
रामनाम कथा श्रवणी पडता | होये सार्थकता श्रवणाची |
मुखें नाम घेतां रूप आठवले | प्रेम उणावले पाहावया |
राम माझे मनी शोभे सिंह्यासनी | येकायेकी ध्यानी सांपडला |
रामदास म्हणे विश्रांती मागेन | जीवीचे सांगेन राघवासी ||
|| जय जय रघुवीर समर्थ ||