अनुग्रह

अनुग्रह
श्रीमती. सीमाताई रिसबूड
  • May 1, 2026
  • 1 min read

अनुग्रह म्हणजे कृपा करणे, स्वीकार करणे, आश्रम व आधार देणे. ग्रहण करणे म्हणजे स्वीकारणे, यात पारमार्थिक अर्थ आहे. ‘आत्मबोधासाठी स्वीकारणे’, हाताशी धरणे, म्हणजे त्याच्याकडून योग्य पद्धतीने योग्यकाळ साधना करून घेणे….. असा त्याचा निश्चय आहे का हे ही सद्गुरू पहातात. कृपा म्हणजे ‘दया’. ही व्यावहारिक ‘दया’ नाही. जेव्हा जीवाला कळते की माझे जन्म मरण, माझ्या हातात नाही, आयुष्य किती माहित नाही, शरीराची व्याधी निवडणे माझ्या हातात नाही….. तेव्हा तो सद्गुरूची किंवा ईश्वरीकृपेची याचना करतो. असा दयेमागील विचार आहे. त्याच्या एकट्याच्या प्रयत्नाने ती त्याला मिळणार नाही, हे सत्य त्याला कळते. त्यासाठी शास्त्र अभ्यास, साधना करणे, मी व माझे याचा त्याग करणे, मनातील  षड्रिपू काढणे असे स्वत: स्वत:शीच युद्ध त्याला करावे लागते. हा त्याचा नविन जन्म आयुष्याच्या वेगळ्या दालनात प्रवेश करतो. दासबोधातील शिष्य लक्षणनाम समासातील सर्व लक्षणे अंगी बाणावी लागतात. ही मोठी जबाबदारी तो स्वत:च्या इच्छेने स्वीकारतो. गुरूकृपेचे बी अशा मशागत केलेल्या शरीर व मनातच रुजते नाहीतर ते वाहून जाते. अनुग्रहामध्ये, सद्गुरू जी शक्ती देतात ती स्विकारणे, सांभाळणे, त्याच्या बंधनात रहाणे जमले पाहिजे. तत्त्वज्ञानाच्या ग्रंथाचा अभ्यास, त्यातील तत्त्वांचा अनुभव घेण्याची शारीरिक व मानसिक साधना, नाम साधना, सद्गुरूंविषयी श्रद्धा, साधनचतुष्टय संपन्न या सर्व गोष्टी लागतात. जीव एकदेशी, संकुचित व अहंकारी असतो त्यातून सुटण्याची त्याची तयारी हवी.

अनुग्रह ज्यांच्याकडून घ्यायचा ते सद्गुरू गीता, उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, किंवा दासबोध, मनोबोध आत्माराम किंवा ज्ञानेश्वरी अमृतानुभव, हरिपाठ, इ.  पैंकी कोणत्याही ग्रंथांचा पूर्ण अभ्यास केलेले असावेत. शिष्याने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याची क्षमता त्यांच्यात हवी. त्यांना आत्मा नावाच्या तत्त्वाचा अखंड अनुभव आलेला असला पाहिजे व शिष्य ज्या पातळीवर आहे, त्या पातळीपर्यंत जाऊन त्याला प्रबोधन करून आत्मानुभव देण्याची क्षमता त्यांच्यात हवी. इतके देऊन त्यांच्यात ‘मी काही दिलं’ हा अहंकार नसावा. परंपरेने जे चाललं, माझ्या गुरूकडून जे मिळालं, ते मी दिलं हा भाव त्यात असावा. 

अनुग्रह, शब्दज्ञानाने; स्पर्शाने; साधनेची प्रक्रिया करवून घेऊन दिला जातो. मनाच्या श्लोकात ‘तया दर्शनें स्पर्शनें पुण्य जोडे’ असे चरण आहे. यात सहजता असावी. मोठी दक्षिणा, पूजेचे साहित्य हा बडीवार नसावा ‘मी, माझे, देहसुख हे खरे सुख’ हे भ्रम काढून टाकावे लागतात. गुरू वाक्याने मन निर्मळ, निश्चल, शांत होते. नंतर ‘तत् त्वम असि” हा अनुभव सद्गुरू देतात. हा क्षण येण्यासाठी फार तयारी लागते. तो क्षण आला की गुरु शिष्य एकरूप होतात. शब्दांनी कोणीच कोणाशी बोलत नाहीत. म्हणून समर्थ ८-७-५९ मध्ये म्हणतात, 

जेचि क्षणी अनुग्रह केला।तेचि क्षणीं मोक्ष जाला।

बंधन कांहीं आत्मयाला।बोलोंचि नये।।”   किंवा

सावध साक्षपी आणी दक्ष।तयास तत्काळचि मोक्ष।

आपल्या सारख्या सामान्य अभ्यासकांना मात्र भरपूर प्रयत्न करावे लागतात. जनक राजा रात्री राजवाड्याच्या गच्चीवर बसले होते. त्यांनी आकाशातील गंधर्वाची आत्मचर्चा ऐकली. त्यांना आत्मज्ञान झाले. श्रीगुरू म्हणून त्यांनी गंधर्वांना स्वीकारले. तुकाराम महाराजांना स्वप्नात अनुग्रह दिला गेला. विठ्ठल ज्यांच्याशी बोलत असे त्या नामदेवांना मात्र विसोबा खेचरांकडे जावे लागले.  अनुग्रहानंतर अभ्यास, साधनेचे सातत्य ठेवणे गरजेचे असते. दासबोध लिहिल्यावर समर्थ आत्मारामात म्हणतात,

तुवां आशंका नाहीं घेतली।परंतु मज तुझी चिंता लागली।

दासबोधीचे समासीं।निर्मूळ केलें मीपणासी।

तया निरूपणें वृत्तीसी।पालट दिसेना।।

या ओव्यामध्ये सद्गुरू “शिष्य आडरानात शिरत नाही ना? मार्गावरून बाजूला जात नाही ना?”  इथे लक्ष ठेवतात. अनुग्रहा विषयी स्वच्छ कल्पना प्रत्येक साधकाच्या मनात असाव्यात म्हणून हा लेखन प्रपंच.

सद्गुरूची कृपा जेणे दाखविले स्वरुपा।।धृ.।।

तो हा सद्गुरू परब्रह्म।जेणे केले स्वयं ब्रह्म।

धरा सद्गुरू चरण।तेणे चुकती जन्ममरण।

सद्गुरू तो चि देव।दास म्हणे धरा भाव।।


।। जय जय रघुवीर समर्थ ।।

5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Language