दिनांक ६ जून, २०२३ ला तारखेने श्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याने ३५० व्या वर्षात पदार्पण केले. शालिवाहन शके १५९६ ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, सन १६७४ प्रात:समयी ५ वाजून ४० मिनिटांनी राजे अर्थात सकल जनांचा लाडका शिवाजीराजा सिंहासनाधीश्वर होणार होता. असे ठरले होते की, प्रात:समयी ५ वाजून ४० मिनिटांनी स्वराज्यातील प्रत्येक किल्ल्यावर तोफांचे आवाज दिले जातील आणि शिवाजीमहाराजांनी राज्याभिषेक समयी जी पदवी धारण केली होती तिचा प्रत्येक किल्ल्यावर जयघोष होईल. समर्थ आणि गिरिधरस्वामी प्रात:समयी ५ वाजता तुळजाभवानी मंदिरात आले. त्यांनी भवानी मातेचे पूजन केले. सर्वांगाचे कान करून तोफांचे आवाज आणि छत्रपतींचा जयघोष ऐकण्यासाठी समर्थ आणि स्वतः तुळजाभवानी उत्सुक होती. ‘तुझा तू वाढवी राजा ! शीघ्र आम्हांस देखता !’ ही समर्थांची प्रार्थना भवानी मातेने पूर्ण केली होती. प्रात:समयी पाच वाजून चाळीस मिनिटे झाली. राजे सिंहासनारूढ झाले. एक-दोन नाही तर तब्बल ३६० गडांवरून तोफा कडाडल्या. समर्थांच्या कानावर ललकारी पडली. “महाराज….सिंहासनाधीश्वर…प्रौढ प्रताप पुरंदर… क्षत्रिय कुलावतंस…. राजा श्रीछत्रपती शिवाजी महाराज !” सर्वांगाचे कान करून समर्थ ऐकत होते त्याचे अंतःकरण उचंबळून आले आणि त्यांना काव्य स्फुरले..
स्वप्नी जे देखिले रात्री । ते ते तैसेची होतसे ।।
हिंडता फिरता गेलो । आनंदवनभुवनी ।।७।।
बुडाले सर्वही पापी । हिंदुस्थान बळावले ।।
अभक्तांचा क्षयो झाला । आनंदवनभुवनी ।।२८।।
हे काव्य ५९ कडव्यांचे आहे. “आनंदवनभुवनी” हे काशीचे पौराणिक नाव आहे. सातव्या कडव्यांत जे वर लिहिले आहे, त्यात काशीच्या स्वप्नाचा उल्लेख आहे. काशीला पडलेले स्वप्न खरे झाले म्हणून झालेला आनंद तो “आनंदवनभुवन” होय.
खरं सांगायचं तर या राज्याभिषेकानंतर ६ जून २०२३ ला साडेतीनशे वर्षे झाली, आणि राज्याभिषेक झाला त्यावेळी ३५० वर्षांचं पारतंत्र्याचं सुतक फिटलं होतं. सारी दु:खं, विषण्णता, नैराश्य लयाला गेलं होतं. हिंदुहृदयांना एक सम्राट मिळाला होता. नव्या जीवनाचा साक्षात्कार सर्वांना झाला होता. न्यायासाठी, संरक्षणासाठी, सुखदुःखे सांगण्यासाठी, हवे ते हक्काने मागण्यासाठी, ममतेचे, समतचे, उदार आणि बलाढ्य सिंहासन निर्माण झाले. सावलीसाठी विशाल क्षेत्र उघडले गेले. महाराष्ट्रात आनंद संवत्सर उगवले. सृष्टीही आनंदाने डोलली. सह्याद्रीला हर्षवायू झाला. तर असा हा ‘स्वर्गालाही गवसणी घालणारा प्रसंग’! त्या प्रसंगाला ३५० वर्षे झाली आहेत. हा राज्याभिषेकाचा प्रसंग तनामनात रुजलाय.
त्या प्रसंगात सहभाग कोणाचा? फक्त राजांचा? फक्त समर्थांचा? फक्त मावळ्यांचा? फक्त मठाधिपतींचा? नक्की कोणाचा कसं सांगावं? अर्जुन पात्र होता म्हणून गीता सांगितली गेली. तसंच काहीसं हे! राजा शिवाजी वेगळ्या मुशीतला होता. ज्याला समर्थांनी पैलू पाडले. घडवले….. तसं पाहिले तर समर्थांचा शिष्य होणं सोपं नाही. मठाधिपती होणंही सोपं नाही. मावळा होणं त्याहूनही सोपं नाही. एका लहानश्या मुलाला हिंदु राष्ट्राचं स्वप्नं दाखवून तयार करणं, लढायला प्रवृत्त करणं, सोपं काम नक्कीच नव्हतं. समर्थांनी रामरायाची भक्ती जनमानसात भिनवून भोंदूगिरी-बुवाबाजी तुडवली. ‘देवकारण’ केलं. हिंदु राष्ट्रासाठी प्रचंड लोकसंग्रह केला. जनमानसात राजांप्रती विश्वास निर्माण करून “राष्ट्र माझे आहे ते मीच राखेन” हा आत्मविश्वास जागवला. प्रत्येक माणसाकडून, भले तो दुर्जनही का असेना त्याच्यातलं चांगलं शोधून काढत काम करून घेण्याचं राजकारण केलं. सदैव “सावधपण” समर्थांनी राजेंना शिकवलं. योजकत्व आणि उत्तम नेतृत्व समर्थांनी राजांकडून करवून घेतलं.
राजा एका दिवसांत उभा राहिलेला नाही. त्याला क्षात्रधर्म , राजधर्म शिकवत समर्थांनी उत्तुंग यशशिखरावर पोहोचवलं आहे. हे करताना राजांचं गर्वहरण करण्याचं कामही समर्थ समर्थपणे करतात. तसेच “हे तुझे गुण ईश्वरी देणे आहे” हेही ते राजांना परखडपणे सांगतात. समर्थांचे परस्त्री, परद्रव्याबद्दलचे नियम अत्यंत कठोर होते. त्यात केलेल्या गैरवर्तनासाठी कठोर शासन दिले जात असे. समर्थांचा शिष्य अभ्यासू, विवेकी आणि निस्पृहतेने काम करणाराच असायला हवा हे ठरलेले असे. या नियमांमध्ये स्वतः शिवाजी राजालाही सूट नव्हती हे नक्की!
समर्थांच्या शिकवणीचा पाया अशा विचारांवर होता. कष्ट करणे आपणाकडे, कृपा करणे त्याच्याकडे…..अर्थात रामरायाकडे. तो कृपा करेलच असा विश्वास त्यांना होताच. समर्थ आपल्या शिष्यांना तुम्ही सिंहाचे बच्चे आहात असं म्हणून धीर देत आणि कर्मप्रवृत्त करत. राम आपलासा करवून घ्या. यश निश्चित आहे असं ते सांगत. आकाश कोसळून पडले तरी मार्गापासून ढळू नका. या संप्रदायाचे, हिंदुराष्ट्राचे कैवारी राम आहेत, सहाय्यकर्ते हनुमंत आहेत ते चिंता वाहतील असे समर्थ सतत सांगत.
“आधी केले मग सांगितले” या न्यायाने स्वतः निस्पृहतेने अनासक्त होऊन समर्थ संप्रदाय उभा केल्यावर राष्ट्र उभारणीसाठी त्यांनी राजांना सर्वतोपरी राष्ट्र उभारणीसाठी मदत केली. या सर्वतोपरी राष्ट्र उभारणीच्या कार्याचा पाया विवेकाधिष्ठित होता हे सर्वश्रुत आहे. समर्थांच्या इतका विवेकाचा पुरस्कार कोणीही केलेला नाही. साडेतीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतर भारतवर्षाने “आनंदवनभुवन” या अनमोल राष्ट्रसंतामुळे अनुभवले. आता या वर्षी ३५० वर्षे राज्याभिषेक सोहळ्याला होतील. आता आपण तपासून पहायला हवं की, मी या सोहोळ्यातून, त्या आधीच्या साडेतीनशे वर्षांमधून काय शिकले/शिकलो? त्या राजा शिवाजी ‘शिष्याने’ मला काय शिकवलं? आणि समर्थ रामदास या त्यांच्या गुरूकडून आपण काय शिकलो? हे जरा आत डोकावून पहायलाच हवं. एक छोटं उदाहरण देते. समर्थांची शिस्त अति कडक असे. महंतांचीही समर्थांच्या ठायी इतकी प्रखर निष्ठा असे की ते ती शिस्त धर्म समजून पाळत. ज्याला ही शिस्त पाळायची नसेल त्याने महंत होऊ नये हा समर्थांचा दंडक होता. समर्थांनी एका महंताला त्याच्या अपराधाबद्दल वेताने फोडून काढले आहे. त्यामुळे समर्थ भक्त होणे सोपे नव्हते.
समर्थाच्या प्रत्येक कसोटीला राजा विश्वासी उतरत गेला आणि म्हणूनच आनंदवनभुवन निर्माण होऊ शकलं, जे आजही ३५० वर्षानंतर आपल्या ध्यानी मनी रुंजी घाललंय. खूप उपदेशपर लिहावं असं मला वाटत नाही. कारण ही दोन व्यक्तीमत्वंच इतकी स्फूर्तिदायी आहेत की तुम्ही जितकं घ्याल तितकं कमी आहे. आयुष्य उध्दरून जाईल इतकी मोठी शिकवण या गुरुशिष्यांनी आपल्याला दिलेली आहे. हे आपल्यापाशी आहे. आपण काय घ्यायचं आणि त्याच काय करायचं? नुसताच उत्सव? का राष्ट्र उभारणीसाठी काही भरीव कार्य? समर्थांनी लिहून ठेवलंय…
त्रैलोक्य गांजिले मागे । विवेकी ठाउके जना ।
कैपक्ष घेतला रामे । आनंदवनभुवनी ।। ३० ।।
येथुनि वाढिला धर्मू । रमाधर्म समागमे ।
संतोष मांडिला मोठा । आनंदवनभुवनी ।। ३१ ।।
त्या भयाण ३५० वर्षानंतर उभ्या राहिलेल्या हिंदुराष्ट्राचं आज पुन्हा ३५० व्या वर्षी आपण सुजलाम सुफलाम हिंदु राष्ट्र निर्माण करायला हवं ना? हा प्रश्न ज्याने त्याने स्वत:ला विचारत ६ जून २०२३ चा पावन मंगल दिवस मनीध्यानी आठवू या!
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥