आल्हाददायक आषाढ

आल्हाददायक आषाढ
सौ. सुगंधा गद्रे
  • November 8, 2025
  • 1 min read

विषय वाचल्यावर काय लिहावे ? असे विचारमंथन चालू होते. हिंदू पंचांगानुसार चौथा महिना पहिले सगळे उत्सव हे शुक्ल पक्षातील आणि दिव्याची आवस म्हणजे दीप पूजन ही कृष्ण पक्षातील आहे. आषाढातील पहिला दिवस कालिदास जयंती. नंतर कांदे नवमी – ४ महिने कांदा लसूण वर्ज्य. नंतर येते देवशयनी एकादशी. अवघ्या महाराष्ट्राची पाऊले पंढरीकडे लावणारी. महाराष्ट्राच्या या पंढरी क्षेत्रात सर्वजण धर्म, जात, पंथ, संप्रदाय हे सारं विसरून एकत्र येतात. येथे खरी एकात्मता व समानता अनुभवाला येते. ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ ! या पंढरीच्या राउळात सर्व संत मांदियाळीची भेट होते. काही दिवसांपूर्वी गोव्यात शंखनाद ऐकला होता ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवले ते भाग्यवान ! ‘सुखी संसाराची सोडूनिया वाट‘ ! ही वाट संसार सुखाच्या त्यागाने मळलेली आहे. समर्थ रामदासांनीही पंढरीची वाट धरली होती, म्हणून तर समर्थ म्हणाले, 

“आम्ही देखिली पंढरी । सच्चिदानंद पैलतीरी ।।”

असा हा पंढरीत सर्व संतांचा मेळावा भरतो.समर्थांनी संतांचे अचूक वर्णन केले आहे. ते अत्यंत लक्षणीय व बोधप्रद आहे.

“संत आनंदाचें स्थळ । संत सुखचि केवळ ।

नाना संतोषाचें मूळ । ते हे संत ।। १-५-१६ ।।”

समर्थ संतांचे वर्णन असे करतात की, संत आनंदाचे स्थान आहे. संत हे अनेक प्रकारच्या संतोषाचे मूळ आहे. संत केवळ सुखरुप आहेत. संतांचे सान्निध्य हेच विश्रांती स्थान आहे. संतांमुळे निजरूपाचे ज्ञान होते. संत केवळ धर्माचे धर्मक्षेत्र आहेत. असे हे सर्व संत पंढरीत येतात, त्यामुळे पंढरी क्षेत्र ही पुण्यभूमी झाली आहे. हे क्षेत्र समाधानाचे मंदिर बनले आहे. संत संगतीत विवेकाचा खजिना प्राप्त होतो. तेच साधकाला आत्मस्वरूपाचे दान करु शकतात. संत संगतीतच साधकाच्या अंत:करणात परमात्मा प्रकट होतो. समर्थ रामदासांनी एक स्फुट अभंग पण विठ्ठलावर रचला आहे.

“आम्ही देखिला विठोबा । आनंदे विटेवरी उभा ।। १ ।।

तेथे दृश्यांची जे दाटी । तेचि रुक्मिणी गोमटी ।। २ ।।

रामी रामदास म्हणे । जो ओळखे तो चि धन्य ।। ३ ।।”

प्रत्येक देवतेच्या आरत्या समर्थ रामदासांनी रचिल्या आहेत. विठ्ठलावर तीन आरत्या रचलेल्या आहेत. समर्थ रामदासांना विठ्ठल व प्रभूरामचंद्र यांच्यात भेद वाटत नाही. समर्थ म्हणतात,  

“धन्य धन्य पांडुरंग । अखंड कथेचा होतो धिंग ।

तानमानें रागरंग । नाना प्रकारीं ।। १८-१-१३ ।।”

तसेच ‘येथे का रे उभा श्रीरामा’ हा अभंग सर्वश्रुत आहे. पंढरपूरला विठ्ठलाच्या प्रथम दर्शनाचे वेळी रामदासांनी रचलेला हा अभंग.

“येथे कां रे उभा श्रीरामा । मनमोहन मेघश्यामा ।।

चाप बाण काय केलें । कर कटावरी ठेविले ।।

कां बा धरिला अबोला । दिसे वेष पालटला ।।

काय जाली अयोध्यापुरी । येथे वसविली पंढरी ।।

शरयूगंगा काय केली । कैची भीमा मेळविली ।।

किल्किलाट वानरांचे । थवे न दिसती तयांचे ।।

दिसे हनुमंत येकला । हा कां सैन्यातून फुटला ।।

काय जाली सीतासति । येथे बहुत जन दिसती ।।

रामदासीं सद्भाव जाणा । राम जाला पंढरीराणा ।।”

समर्थ रचीत हा अभंग म्हणजे आपल्या आराध्य देव किंवा देवतेचा किती ध्यास लागायला हवा याचे उत्तम उदाहरण आहे. पंढरपुरात पांडुरंगाची मूर्ती पाहुन त्यात देखील समर्थांनी राम पाहिला आणि रामाचे बदललेले हे रूप पाहून समर्थ पांडुरंगरुपी श्रीरामाला अनेक प्रश्न विचारतात. आणि अखेरीस शेवटच्या दोन ओळीत समर्थ सांगतात खरा रामदासी तोच ज्याच्या अंतरी सद़्भाव आहे. तेव्हा खरा दास तोच जो बाहेर रुप कोणतेही असले तरी त्या रुपात समर्थांना पहातो आणि त्या रुपाच्या चरणी नम्र होतो, नतमस्तक होतो, त्या नवीन रुपाचा देखील आदर करतो. हनुमंताला प्रत्येक ठिकाणी राम दिसत असे. तोच ध्यास, तोच भाव समर्थांमध्ये होता. एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी की, एखाद्या गोष्टीचा ध्यास लागला ना की; ती गोष्ट जेव्हा मिळते; होते तेव्हा ती सर्वोत्तम असते. जगात ज्या ज्या लोकांनी काही भव्य दिव्य करुन दाखवले त्यांना त्या गोष्टींचा ध्यास लागला होता म्हणूनच ते या गोष्टी करु शकले. आता आपण आत्मपरिक्षण करायला हवे ना ? की, आपल्याला असा समर्थांचा ध्यास लागला आहे का ? की नुसते आपण तसे दाखवतो. उत्तर जे काही असेल ते इतरांना सांगायची गरज नाही. फ़क्त जर काही सुधारणा गरजेची असेल तर ती मात्र अवश्य करायलाच हवी. समर्थांना नेमके हेच तर हवे आहे. तसेच समर्थ संप्रदायात दर बुधवारी विठ्ठलपर सवाई म्हटली जाते.

“नाम विठ्ठल सुंदर । ब्रह्मा विष्णु आणि हर ।

गुणातीत निर्विकार । शुकादिकी गायला ।।

चंद्रभागा रम्यतीर । तेथे उभा कटिकर ।

दिंड्या पताका अपार । यात्रा घोष जाहला ।।

तेथे येतां रामदास । दृढ श्रीरामीं विश्वास ।

रुप पालटोनी त्यास । रामरूपीं भेटला ।।

पुन्हा विठ्ठलस्वरूप । रामविठ्ठल एकरुप ।

पूर्वपुण्य हे अमूप । लक्ष पायीं ठेविला ।।”

असा एकात्मतेचा भाव समर्थांचे मनात होता. तुकोबांनीही झेंडा असा उभा केला की,

“विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला ।

वाळवंटी चंद्रभागेच्या तीरी डाव मांडला॥”

आणखी एके ठिकाणी तुकोबा म्हणतात, “खेळ मांडियेला वाळवंटी घाई । नाचती वैष्णव भाई रे ।।” पंढरीचे वर्णन करताना जनाबाई म्हणतात, “संतभार पंढरीत । कीर्तनाचा गजर होत ।।” तुकाराम महाराज हे विठ्ठल भक्त असूनही त्यांना श्रीरामही तितकेच प्रिय होते. समर्थ रामभक्त असून विठ्ठलही त्यांना तितकेच प्रिय होते. संताना जात, धर्म, सांप्रदायिक भेद नसतो हे यातून स्पष्ट होते. एका अभंगात त्यांनी देहावर पंढरीचे रुपक केले आहे. देह हीच पंढरी आणि आत्मा हा पंढरीनाथ आहे. आमच्या येथे यात्रा आणि महोत्सव नेहमीच घडत असतात. यात भक्ती ही वीट आहे आणि या विटेवर आत्मरुपी विठ्ठल उभा आहे. वैराग्य ही भीमा नदी आणि आत्मज्ञान हा पुंडलिक आहे. 

नंतर पौर्णिमा- व्यासपौर्णिमा-गुरुपौर्णिमा. खरचंच आल्हाददायक. कारण गुरु हे शिष्याला योग्य वेळ आली की शोधत येतात. अनुग्रह हा द्यायचा किंवा घ्यायचा नसतो तर तो व्हायचा असतो. अनुग्रह होणे म्हणजे वासना कमी होणे, विकार कमी होणे, भगवंताचे प्रेम वाढीला लागणे. 

सद्गुरूंची परमकृपा होणे म्हणजे ‘अनुग्रह’. अनेक जन्मांच्या पुण्यसंचयामुळे आत्मज्ञानी सद्गुरूंकडून कडकडीत वैराग्यशील मुमुक्षु साधकास अनुग्रह प्राप्त होतो. जीवाचे शिवरूपात होणारे रूपांतर म्हणजे अनुग्रह. संत एकनाथ महाराज म्हणतात, सद्गुरु ओंकार स्वरूप असतात. संत तुकाराम महाराज म्हणतात, “सद्गुरुवाचोनि सापडेना सोय । धरावे तें पाय आधी आधी ।। ‘ज्ञानदेव म्हणतात, “ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो । आता उध्दरिलो गुरुकृपे ।।” समर्थ रामदास स्वामी सद्गुरुंबद्दल म्हणतात की, मी सद्गुरुंचे वर्णन करु शकत नाही. वास्तविक समर्थ सद्गुरु स्तवनात म्हणतात,  

“आतां सद्गुरु वर्णवेना । जेथें माया स्पर्शों सकेना ।

तें स्वरूप हे अज्ञाना । काये कळे ।।  १-४-१ ।।”

आता सद्गुरू वर्णवेना म्हणजे ज्याचे वर्णन होऊ शकत नाही, हेच गुरुंचे वर्णन. ज्या गुरूरुपाला माया स्पर्श करु शकत नाही, परंतु मायेशिवाय वर्णन होणे शक्य नाही म्हणून गुरुकृपेची खूण म्हणजे काय तर, जेथे माया नाही ते सद्गुरुंचे रूप होय. अज्ञान्याला ज्ञान झाल्यावर ज्ञानानेच सद्गुरुंचा अनुभव होईल, पण अज्ञानातून सद्गगुरूरुप कोणासही जाणता येणार नाही. संत-सद्गुरु हे भगवंताचे चालते-बोलते रुप आहेत. त्यांना वंदन करून इथेच थांबते.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Language