अखंड ध्यान निरूपण

अखंड ध्यान निरूपण
सौ. पुष्पाताई कदम
  • July 27, 2025
  • 1 min read

अखंड ध्यानाचें लक्षण । अखंड देवाचें स्मरण ।

याचें कळतां विवरण । सहजचि घडे ।। दासबोध १४-८-२४।।

श्रीरामाचे अखंड ध्यान धरावे. अखंड ध्यानाचे लक्षण म्ह‌णजे देवाचे अखंड स्मरण होय. ध्यान आणि स्मरण याचा परस्पर संबंध लक्षात आला की, अखंड स्मरण सहज घडते.

सर्व साधारणपणे समाजात ज्याच्याकडे भरपूर संपत्ती असते, तो भाग्यवान मानतात. पण समर्थांची भाग्यवानाची व्याख्या वेगळी आहे. ज्याच्या अंतः‌करणात भगवंताला स्थान तोच खरा भाग्यवान अशी समर्थांची व्याख्या आहे. भगवंत शुद्ध जाणिवरूप आहे. जगातील  यच्चयावत प्राण्यांच्या अंतर्यामी तो वावरतो. जो शुद्ध जाणिवेला वश करून घेतो, त्याला सगळे प्राणी आपोआप वश होतात. मग त्या व्यक्तिला काही कमी पडत नाही. तोच खरा भाग्यवंत ! हृदयांत असणारी अखंड जाणिव म्हणजेच आत्मस्वरूप.

स्मरण देवाचें करावें । अखंड नाम जपत जावें ।

नामस्मरणें पावावें । समाधान ।। दासबोध ४-३-२।।

अखंड नामस्मरणाने अखंड ध्यान लागते. “पापाचे कळप पळती पुढें । हरिपाठ १४-२ ।।” ज्यावेळी आपण ध्यानाला बसतो, तेव्हा ज्याचे ध्यान करायचे ती मूर्ती व आपण वेगळे असतो. म्हणजेच त्या ठिकाणी द्वैत असते.  “ऐशिया आपुलियाची सह‌जस्थिती । जया ब्रह्माची नित्यता असती । तया नाम सुभद्रापती । अध्यात्म गा ।। ज्ञानेश्वरी ८-१९।।” जीव आणि शिव यांची गाठ आपल्या अंत:करणात आधीच आहे. पण मायेमुळे व मल विक्षेप आवरणामुळे आपणास परब्रह्म दिसू शकत नाही. देहबुद्धि जात नाही. मी देह आहे इथ पासून मी आत्मा आहे इथ पर्यतचा मार्ग म्हणजे परमार्थ. समर्थ या समासात म्हणतात,

देव पुजावा विमळहस्तीं । तेणें भाग्य पाविजे समस्तीं ।

मूर्ख अभक्त वेस्तीं । दरिद्र भोगिजे ।। दासबोध १४-८-२।।

विमळहस्ते देव पूजायचा म्हणजे काय करायचे? आपण स्नान करूनच देवपूजा करतो, यात वाद नाही. समर्थाना विमळहस्ती म्हणजे सत्य मार्गाने मिळवलेली संपत्तीच प्रपंचासाठी वापरायची आहे. टेबलाखालू‌न घेतलेली नाही. दुसऱ्याचे लुबाडून आपले कल्याण होत नाही. स्वच्छ कर्म हीच भगवंताची पूजा व त्याला नामाची जोड दिली की, दुधात साखर !

आधीं देवास वोळखावे । मग अनन्यभावें भजावें ।

अखंड ध्यानचि धरावें । सर्वोत्तमाचें ।। दासबोध १४-८-३ ।।

देवाला ओळखायचे म्हणजे काय करायचे ? आपल्याकडे तेहतीस कोटी देव मानतात. राम, कृष्ण, देवी, दत्त, शंकर असे अनेक देव आहेत. समर्थांना अभिप्रेत आहे तो आत्माराम ! म्हणजे थोरला देव. तोच सर्व विश्व चालवतो. तीच जाणिव विशाल बनवावी लागते. कुणालाही अंत:करणाने दुखवू नये.

देखें ऋद्धिसिद्धि तयापरी । आली गेली से न करी ।

तो विगुंतला असे अंतरीं । महासुखीं ।। ज्ञानेश्वरी २-३६२ ।।”

ज्याचे अंत:करण महासुखात निमग्न असते, त्याला रिध्दिसिद्धी आल्या काय नि गेल्या काय त्याचे त्याला भान नसते. अगदी याच अर्थाची ओवी आत्माराम ग्रंथात आहे.

“मायेकरितां देव आणि भक्त । मायेकरितां ज्ञाते विरक्त ।

मायेकरितां जीवन्मुक्त । होती स्वानुभवें ।। आत्माराम २-३२ ।।”

माया म्हणजे मूळ जाणिव शक्ती. या मायेमुळे देव आणि भक्त होतात. ज्ञाते विरक्त होतात आणि मायेमुळेच स्वानुभवाने (साधक) जीवन्मुक्त होतात. अंत:करण स्वस्थ झाले असता सर्व दुःख नाश होतो व त्या प्रसन्न चित्त पुरुषाची ब्रह्मदर्शिनी प्रज्ञा प्रतिष्ठीत होते.

जैसा अमृताचा निर्झरु । प्रसवे जयाचा जठरु ।

तया क्षुधेतृषेचा अडदरु । कहींचि नाहीं ।।

तैसैं हृदय प्रसन्न होये । तरी दु:ख कैचें कें आहे ।

तेथ आपैसी बुद्धि राहे । परमात्मरूपीं ।। ज्ञानेश्वरी २-३३९, ४०।।

ज्याच्या जठरातून पित्ता ऐवजी अमृतच स्त्रवत असते, त्याला तहान भुकेची  पर्वा कशी असेल ? त्याप्रमाणे अंत:करण प्रसन्न झाल्यावर मग दुःख कसले ? त्याची बुद्धि परमात्म स्वरूपाचे ठिकाणी सहजच स्थिर होते.

“यथा दीपो निवातस्थो  नेङ्गते सोपमा स्मृता ।

योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः ।। भ.गीता ६-१९ ।।”

निर्वात ठिकाणी ठेवलेला दिवा, ज्योत जशी हालत नाही त्याप्रमाणे योगाभ्यासी पुरुषाच्या चित्ताचा मनोनिग्रह झालेला असतो. अग्नीत टाकलेले बीज जसे उगवत नाही, तसे अशांत माणसाचे चित्त चंचल असते. मनाची चंचलता हेच दुःखाचे बीज असते. जो आपल्या ऐश्वर्यापुढे इंद्रसुखही तुच्छ लेखतो, तो भिल्लाच्या झोपडीवर कसा खुश होईल ? जेथे स्वर्गसुखाची पर्वा नाही, तेथे कवडीमोल रिद्धि-सिद्धिची काय किंमत ?

सांगोपांग घडे ध्यान । त्यास साक्ष आपुलें मन ।

मनामध्यें विकल्पदर्शन । होऊंच नये ।। दासबोध १४-८-३५ ।।”

ध्यान योग्य लागले याची साक्ष आपले मनच देत असते.

सर्व साभिमान सांडावा । प्रत्ययें विवेक मांडावा ।

माया पूर्वपक्ष खंडावा । विवेकबळें ।। दासबोध १४-८-४९ ।।

खऱ्या साधकाने सर्व संप्रदायाचा अभिमान सोडून अनुभव घ्यावा व मग विवेक मांडावा. त्या विवेकाच्या बळावर मायेचा पूर्वपक्ष खंडून टाकावा, मायेचा निरास झाला की, परब्रह्माला स्पर्श होतो.

मनीं धरावें तें होतें । विघ्न अवघेंचि  नासोन  जातें ।

कृपा केलियां रघुनाथें । प्रचित येते ।। दासबोध ६-७-३०।।”

श्रीरामांच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित घडते. भगवंताचे ध्यान अखंड असणे हेच त्याचे दर्शन होय. त्याच्या अस्तित्वाची जाणिव रहाणे हेच त्याचे दर्शन. सतराव्या दशकात समर्थ म्हणतात, सोहंला ध्वनी नाही, म्हणूनच तो सहज शब्द आहे. हा शब्द मागे टाकून सूक्ष्मात जाणारा खरा मौनी होय. आपल्या मधील अजपा सहज बघावी. गुप्त द्रव्य जसे शोधतो त्याप्रमाणे आपल्या अंतर्यामी भरलेली अजपा आपणच ओळखावी.  

शिवधरघळीत साधना सप्ताह सुरु करणाऱ्या वंदनीय अक्का ! त्यांची भागवत कथा सातारा येथे एकजणांच्या घरी चालू होती. त्यांचे बंधू त्यांच्याबरोबर कथेला जात असत. वंदनीय अक्का राममंदिरात रिक्षेने दर्शनाला गेल्या. तेथे काही माळा व जप लिहून ठेवण्यासाठी वही, पेन आणि आसने पण ठेवली होती. म्हणजे येथे जपाची गरज आहे, असे समजून वंदनीय अक्कांनी नळावर हात-पाय धुतले व आसन घालून माळ हातात घेतली. रामाचे दर्शन घेतले. राम, लक्ष्मण, सीता तसेच रामचरणीं हनुमंत अशा मुर्ती तेथे होत्या. जप सुरू करताच, माळ सारखी हातातून पडत होती. तीन तीन वेळा पडली. वंदनीय अक्कांचे गुडघे दुखावले होते. त्यावेळी त्यांनी ११ कोटी ॐ नमो भगवते वासुदेवाय या जपाचा संकल्प केला होता. गुडघे दुखत असतांनाच त्यांनी दासबोधाच्या २०० समासावर २०० प्रश्नपत्रिका काढल्या. त्यांच्या सद्‌गुरू जिजी महाराज त्यांना म्हणाल्या, ‘गुडघे दुखावलेत ! हात नाही ? घे दासबोध आणि अभ्यासाला लाग.’

जप करताना माळ पडत होती म्हणून त्यांनी रामाकडे पाहिले तर हनुमंताची मूर्ति दुभंगली व त्यातून समर्थ प्रकट झाले. तुझा सव्वा कोटी जप झाला आहे. उचल माळ आणि समर्थांनी त्यांना श्रीराम जयराम जय जय राम हा मंत्र तेरा वेळा सांगितला. व त्यांनी म्हटले २० च्या दशकातील घडलेला दृष्टांत ! नामाने इतके साधले जाते. घरी येऊन पहातात, तो सव्वा कोटी जप झाला होता. अक्कांचे डोळे झिरपत होते. अक्कांना जसे समर्थ भेटले तसे आपणा सर्वांना समर्थांचे दर्शन व्हावे हीच अपेक्षा.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Language