आपले पूर्ण जीवन द्वैताने भरलेले आहे. “द्वितीयात भयं भवति” असे उपनिषदे सांगतात. द्वैत म्हणजे दोन मी-तो, गरीब–श्रीमंत, सुंदर-कुरूप, श्रेष्ठ-कनिष्ठ, ज्ञानी-अज्ञानी हे भेद किंवा अनेकत्व मायेच्या शक्तीमुळे निर्माण होते. आपल्या शरीरातही हाताच्या बोटांची लांबी वेगळी असते. द्वैतामुळे भय निर्माण होते. श्रीमंताला चोराचे, सौंदर्याला वृद्धपणाचे, जन्मानंतर मृत्युचे भय असते. भयामुळे अशांती, बेचैनी, गैरसमज, असुरक्षितता वाढते. द्वैतामुळे पैसा,विद्या, रूप, गुण, यश, बळ याची तुलना होते. तुलनेमुळे द्वेष, मत्सर, आसक्ती, क्रोध, हिंसेचे विचार निर्माण होतात, देह सुखाची आसक्ती, कर्तेपणा, भोक्तेपणा या क्रमांमुळे खर्या परमार्थ साधनेपासून माणूस दूर जातो. गणितातील १ ते ९ आकड्यात अद्वैत आहे १० आकड्यापासून पुढे द्वैतच सुरू होते. मी म्हणजे देह, देह सुख हे खरे सुख, मी कर्ता, मी भोक्ता, या भ्रमांमुळे द्वैत विचार वाढतो, तुलना व स्पर्धा होते व मनाची शांती बिघडते.
भारतीय संस्कृतीत उत्तुंग, भव्य अद्वैत दर्शन आहे. प्राचीन ऋषी एकांतात अरण्यात राहात, निसर्ग व चराचर सृष्टीशी एकरूप होत असत. त्यामुळे अद्वैत तत्वज्ञानात त्यांनी वेद वाङ्मय लिहिले. सृष्टी अद्वैतविचार शिकवते. मेघ सर्वांना पाणी देतात. झाडे सावली व फळे देतात, पृथ्वीमाता पेरल्यापेक्षा अनेक पटींनी ज्यास्त धान्य देते, फुले सुगंध देतात, सूर्याचा तेजस्वी प्रकाश उष्णता देतो, चंद्र शीतलता व प्रकाश सर्वांना देतो. नदी म्हणजे लहान-मोठ्या नद्यांचा संगम होय. गंगेचे पाणी शुद्ध व शुभ्र, यमुनेचे पाणी काळे पण दोघी प्रेमाने मिठी मारतात. एकरूप होतात संगमानंतर कुठले गंगेचे, कुठले यमुनेचे पाणी कळत नाही. नदी समुद्रात एकरूप होऊन मिळते म्हणून ती अद्वैताची युती आहे. गंगा, यमुना, सरस्वती म्हणजे कर्म, ज्ञान, भक्तीचा सुरेख संगम आहे.
समर्थांना विश्वाची चिंता होती. त्यांची देहबुद्धी नष्ट झाल्यामुळे ते वाङ्मयरूपात अमर झाले. त्यांनी नाम व रूपाचा, स्वजनांचा त्याग केला व निर्गुण रूपात आत्मस्वरुपात राहून देहाने लोककल्याणाचे कार्य अविरत केले. भिक्षा मागताना टोपले भरून पीठ आणले तरी ५ मुठीच ते घेत. इतरांच्या भुकेचा विचार करत म्हणून त्यांच्या भिक्षेला “पावन भिक्षा” म्हणतात. समर्थ अद्वैत तत्वज्ञानाचे खंदे पुरस्कर्ते होते. अद्वैत व मोक्ष या दोन्हीचा अर्थ एकच असे ते म्हणतात. समर्थांनी समाजाचा प्रपंच श्रीरामाच्या साक्षीत्वात केला. त्यांच्या अंत:करणात निर्गुण आत्माराम स्थिर होता व त्यांचे जीवन श्रीरामाच्या दिव्य प्रेरणेनेच चालत होते.
ज्ञानदेवादी संतांनी १८ पगड जातींना भागवत धर्माखाली एकत्र आणले. सुतार, कुंभार, चांभार, सोनार, विणकर या सर्वांची गरज समाजाला असते, ते स्वत:च्या कर्माने समाज पुरुषाची सेवा करतात. त्यात श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद नाही. “सारे सुखी व निरोगी असोत हा अद्वैताचा मंत्र त्यांनी आपल्याला दिला. संत तुकाराम म्हणतात “संकोचूनि काय झालासी लहान ? घेई आपोषण ब्रह्मांडाचे” अद्वैत विचारात आपले मन ब्रह्मांडाहून व्यापक होते.
दासबोध दशक ७ समास ९ मध्ये अद्वैत वेदान्तशास्त्र ज्यात सांगितले आहे. अशाच ग्रंथाची निवड करण्यास समर्थ सांगतात. भयमुक्त जीवनासाठी अद्वैतचा अनुभव आवश्यक आहे. अद्वैत विचाराच्या ग्रंथाच्या श्रवणाने मोक्षाचा विचार पक्का होतो. समर्थ म्हणतात “जयास स्वहित करणे | तेणे सदा विचरणे, अद्वैत ग्रंथी |” द्वैतामुळे आत्मसुखाची कपाटे बंद होतात पण सद्गुरू कृपेच्या किल्लीने उघडतात, बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश पडतो व एकाग्र चित्ताने आत्म्याच्या अनुसंधानाचा अनुभव येतो. मन व बुद्धी च्या ऐक्याने चित्ताची समता होते व जीव –आत्म्याच्या ऐक्याचा अनुभव येतो.
समर्थ मनाच्या श्लोकातही अद्वैत विचार मांडतात. श्लोक १३६ मध्ये अनेकत्वामुळे भय निर्माण होते, परब्रह्माशी एकरूप झाल्यावर भय नष्ट होते व जगातील सर्व व्यवहारांकडे साक्षीत्वाने पाहाता येते, असे समर्थ म्हणतात. उपनिषदे ब्रह्मस्वरूपाला सत्य अथवा भूमा म्हणतात. हे ब्रह्मस्वरूप अत्यंत पुरातन, विशाल, आपल्या तर्काच्या पलीकडे, गुप्त, स्थिर, व रहस्यमय आहे. त्याच्या ठिकाणी दुजेपण नाही कारण ते एकच एक आहे. विश्वामध्ये अनेकपणा अथवा द्वैत असते. अनेकपणात भय असते पण दृश्याचा भेद करून आपण परब्रह्मापर्यंत पोहोचलो तर भय मुक्त होतो व ईश्वरापासून विभक्त नाही असा भक्त होतो.
आपल्या देशात भाषा चालीरीती, पोशाख, जीवनपद्धती, हवामान यात भिन्नता आहे. अद्वैत तत्वज्ञान हा भारतीय तत्वज्ञानाचा गाभा आहे म्हणून इथे अनेकात एकत्व आहे. भय मुक्त जीवनासाठी एकत्व विचार आपण सांभाळायला हवा. आपल्या अंत:र्बाह्य कृतीतून त्याचा सुगंध बाहेर यावा.
अवघे ब्रह्ममय रिता नाही ठाव | प्रतिमा तो देव नोहे कैसा ?
सगुण हे ब्रह्म निर्गुण हे ब्रह्म | पाहाता मुख्य वर्म ब्रह्ममय |
नाही द्वैत भेद मिथ्या का भ्रमसी | सत्य माया ऐसे मानू नये |
मृगजळ डोळा दिसे परी नासे | तैसा हा विलास दिसताहे|
दास म्हणे देह बुद्धी हे त्यागावी | एकत्वे रंगावी मनोवृत्ती ||
|| जय जय रघुवीर समर्थ ||