आध्यात्मिक संवाद

आध्यात्मिक संवाद
श्रीमती. सीमाताई रिसबूड
  • March 14, 2025
  • 1 min read

व्यक्तीच्या भावना, कल्पना, त्यांचे विचार जाणून घेण्याचे महत्त्वाचे माध्यम  म्हणजे संवाद! संवाद दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये घडतो. आध्यात्मिक संवाद सद्गुरू व सत्शिष्यात होतो. त्यात सद्गुरूंचा अनुभव व उपदेशाचे, शिष्य श्रवण; मनन; चिंतन करतो व त्यामुळे तत्वज्ञानाची उकल होते. आध्यात्मिक संवादात सत्य विचार, विवेक, ज्ञानप्राप्ती, मूळ तत्वांचा शोध, त्या परब्रह्मापर्यंत पोहोचण्याची साधना या गोष्टींचा समावेश असतो. 

संवादात सद्गुरू ज्ञानी, अनुभवी, दयाळू असतो तर शिष्य तत्पर अनुतापी विरक्त, साक्षेपी, दक्ष, बुद्धीमान, श्रद्धावान असतो. गुरु अहंकारी व शिष्य अनाधिकारी असला तर संवाद न होता विसंवाद होतो. संवादात सद्गुरू व सत्शिष्यात प्रेमाचे, सख्यत्वाचे नाते असावे. श्रीकृष्ण व अर्जुनाचे सख्यत्वाचे नाते होते त्यातून गीतेचे तत्वज्ञान आपल्याला मिळाले. आत्मारामात “तूवा आशंका नाही घेतली | परी मज तुझी चिंता लागली” असे शिष्याचे हित करण्याच्या तळमळीचे नाते आहे. उपनिषदात यमदेव-नचिकेत, याज्ञवल्क्य-गार्गी, आरुणी-श्वेतकेतू , पिप्पलाद मुनि व जिज्ञासू शिष्य, नारद – सनद् कुमार असे संवाद आहेत. महाभारतात यक्ष व युधिष्ठिर, युधिष्ठिर व भीष्माचार्य यांचेही संवाद आहेत. 

आद्य शंकराचार्य व मंडन मिश्रांचा संवाद वादातून आहे. यात प्रमाणे व तर्क शास्त्राचा उपयोग होतो. या वादात स्पर्धा, ईर्ष्या, नव्हती त्यामुळेच मंडनमिश्र पुढे सुरेश्वराचार्य म्हणून आद्य शंकराचार्यांच्या मठाचे प्रमुख झाले. दासबोधाची सुरुवातच शिष्याने विचारलेल्या प्रश्नाने झाली आहे. “श्रोते पुसती कोण ग्रंथ | काय बोलिलें जी येथ | श्रवण केलियाने प्राप्त | काय आहे”? हे तीन प्रश्न व त्यावर समर्थांचे उत्तर हा गुरु-शिष्य संवाद आहे व इथे भक्तिमार्गाचे विवेचन आहे अशी झाली. श्रोते एकाग्र मनाने ऐकत होते. पहिल्या दशकात नित्य विचार, दुसर्‍या दशकात अनित्य विचार (ज्याचा आपण त्याग करायचा) तिसऱ्या दशकात प्रपंच परमार्थातील विविध ताप व त्यातील कष्ट यांनी गांजलेला संसारीक माणूस याचे विवेचन समर्थ करतात. 

आपल्या सारख्या अभ्यासार्थींनी हे सर्व अनुभवलेले असते पण त्याची रचनात्मक उकल या तीन दशकांच्या अभ्यासाने होते. मृत्युचा तर इतका सखोल विचार आपण केलेलाच नसतो, तो इथे होतो. विवेक-वैराग्य या शब्दाचा अर्थ, गुढार्थ याची जिज्ञासा आपल्यात निर्माण होते.  दशक ३ समास १० ओवी ६९ मध्ये आपल्यातील श्रोता जागृत होऊन विचारतो “देवासी वास्तव्य कोठे | तो मज कैसेनि भेटे | दू:खमूळ संसार तुटे | कोणे परी स्वामी ||” या प्रश्नांनी आपले व समर्थांचे नाते सुरू होते. अगोदरच मंगलाचरणात केलेली “तुझ्या दासबोधासी त्वां बोधवावे” ही प्रार्थना आपण नम्रपणे करू या. 

समर्थ म्हणतात, भगवद्भजन करावें | तेणें होईल स्वभावें | समाधान || (३-१०-७१).. आता आमची जिज्ञासा स्वस्थ बसू देत नाही म्हणून आम्ही विचारतो 

कैसें करावें भगवत् भजन | कोठें ठेवावें हें मन |

भगवद्भजनाचें लक्षण | मज निरोपावें || (३-१०-७२)

म्हणून नवविधा भक्तीच्या ४थ्या दशकात षट्संपत्तीचा विचार व भक्तीचे ९ प्रकार समर्थ सांगतात. १ ते ४ दशकाच्या अभ्यासाने आपण आत्मानात्मविवेक, प्रपंचातील वैराग्य, षट्संपत्ती व मुमुक्षुत्व हा प्रवास करून “साधन चतुष्ट्य संपन्न होतो.” दासबोधात असे संवाद व त्यातून मिळालेली ज्ञानतत्वे आहेत. संवादामुळे समर्थांशी सद्गुरू म्हणून नाते दृढ व्हावे व त्यांचे बोट धरून आपला श्रीराम व आत्मारामापर्यंतचा आनंदाचा प्रवास घडावा. आत्माराम व मनाच्या श्लोकातील संवादाचा ही असाच विचार व्हावा. समर्थांशी असा संवाद साधला तर अभ्यासातील रुक्षपणा कमी होतो,   प्रेम-आपुलकीचे नाते वाढते, एकाकीपणा नाहीसा होतो व आपोआप प्रश्नांची उकल होते व नंतर “फोडूनी शब्दाचे अंतर | वस्तू दाखवी निजसार” या समर्थ वचनाचा अनुभव येतो.

अशा संवादाने आपण अभ्यासार्थी व समर्थ रामदास यांच्या मधील नात्याचा विकास होणार आहे. त्यामुळे आपण करतो ती साधना अर्थपूर्ण होणार आहे. साधनेने अनुभवाचा विकास होणार आहे व गुरु शिष्याचे नाते दृढ, अपरिवर्तनीय होऊन “खरा साधक” होण्याचा आनंद मिळणार आहे.            

|| जय जय रघुवीर समर्थ ||

Language