अभयम्

अभयम्
श्रीमती. सीमाताई रिसबूड
  • March 28, 2025
  • 1 min read

भगवद्गीतेत  पुरुषोत्तम योग हा पूर्ण योग १५ व्या अध्यायात सांगितला व त्याला पूर्णता येण्यासाठी १६ व्या अध्यायात दैवी संपत्तीचे २६ गुण व आसुरी संपत्तीचे ६ अवगुण सांगितले आहेत. “अभयम” हा पहिला गुण इतर गुणांचा मुकुटमणी किंवा पाया आहे. “मला काही गमवावे लागेल, माझ्यावर काही संकट येईल.यामुळे अंत:करणात जी घालमेल होते, तिला “भय” म्हणतात. जन्मापासून मृत्यू पर्यंत प्रत्येकजण भयाच्या दडपणाखाली वावरत असतो. भर्तृहरी वैराग्य शतकात भोगाला रोगाचे, द्रव्याला कर आकारण्याचे, रूपाला वार्धक्याचे. शास्त्राला वादाचे, शरीराला मृत्यू व व्याधीचे, बलाला शत्रूचे भय असते,असे भयाचे प्रगट वर्णन करतात. 

महाभारतात सद्गुणांची दैवी सेना व दुर्गुणांची आसुरी सेना यांच्यातील संघर्षाचे वर्णन 

आहे. चांगल्या व वाईटाचा संघर्ष अनादि काळापासून चालू आहे.२६ गुणांपैकी निर्भयता प्रथम व नम्रता अखेर ठेवली तर मध्ये २४ गुणांचा विकास व्हायला मदत होते. या सेनेचा सेनापति “अभय” हा गुण आहे. 

सत-प्रवृत्तीला निर्भयता लागते. ढोंग, घमेंड अभिमान, राग, कठोरपणा, अज्ञान ही आसुरी संपत्ती आहे. या ६ पैकी काम, क्रोध, व लोभ या तीन गुणांचे वर्णन नरकाच्या द्वाराची कमान असे भगवंत करतात. हे सहा दोष बलवान आहेत व एका पाठोपाठ एक प्रवेश करतात.त्यांच्या निवृत्तीसाठी मात्र वेगवेगळे प्रयत्न करावे लागतात. क्रोधामुळे दुर्वास ऋषींना त्रास झाला. विश्वामित्रांची तपश्चर्या मेनकेच्या कामवासनेमुळे व रंभेवरील क्रोधामुळे भंग पावली. सद्गुण मात्र प्रयत्नपूर्वक स्विकारून वाढवावे लागतात. समर्थ यालाच “अवगुण सोडिता जाती उत्तम गुण अभ्यासिता येती| कुविद्या सांडून सिकती शहाणे विद्या |दा. १४.६.५ असे म्हणतात. सद्गुण अंगिकारण्याचे प्रयत्न बालपणा पासूनच व्हावेत. भय हा अवगुण जन्मत: नसतो पण आई मुलाला बागुलबुवाची भीती दाखवते, मुलाला खरे वाटते.पण मोठा झाल्यावर बागुल बुवा नसतोच हे ज्ञान होते व भय नष्ट होते. 

परमार्थातील प्रवेशाची पहिली पायरी निर्भयता ही आहे. प्रतिकूलता, संकट, मृत्यू, यांच्या कल्पनेमुळे भय निर्माण होते. अज्ञान व मायेमुळे कल्पना निर्माण होतात. सृष्टीच्या नियमनासाठी माया लागतेच पण माया ईश्वराच्या आधीन असते व जीव मायेच्या आधीन असतो. म्हणून जीव अशुद्ध कल्पना करतो. मनाचा श्लोक १७२ मध्ये “स्फुरे, विषयी कल्पना ते अविद्या” असे समर्थ याचसाठी म्हणतात. कल्पनेचा सविस्तर विचार दासबोध दशक ७-३ व ७-५ मध्ये आहे. ११व्या अध्यायात विश्वरूप पाहून अर्जुन घाबरतो. भीतीने व्याकूळ होतो व मला तुझे चतुर्भुज रूप दाखव. असे भगवंताला म्हणतो . भगवंताने परम तेजोमय, सर्वांचे आदि, विराटरूप अर्जुनाला दिव्य दृष्टी प्रदान करून,हे रूप दाखवले. ते त्याने या पूर्वी कुणालाच दाखवले नव्हते . पण ते पाहायला अर्जुन घाबरला . समर्थ मनाचा श्लोक १३६ मध्ये”भये व्यापिले सर्व ब्रम्हाण्ड आहे” असे म्हणतात. विश्वातील अनेकपणामुळे एक वस्तु दुसरीला मर्यादा घालते व मर्यादेतून भय निर्माण होते. आज तर साध्या शिंकण्याचे, खोकण्याचे सुद्धा भय वाटत आहे. देहसुखा साठी झटणे मृत्यूच्या भयामुळेच असते. अर्जुन मोह, शोक,पाप,या कल्पनांमुळे भयग्रस्त झाला व त्याने धनुष्य खाली टाकले. लोकांना लुबाडणे,मारणे हे पाप करताना वाल्या कोळ्याला भय वाटत होते,कारण भयरहित, स्वानंदात भगवंताचे नाम घेणार्‍या नारद महर्षिना पाहून त्याला आश्चर्य वाटले. 

निर्भयता आली की भय जाते, शांत रसात क्रोध नष्ट होतो, विवेक, वैराग्य, अनात्म गोष्टींचा त्याग करून, नित्य आत्मवस्तूचा स्वीकार केल्याने निर्भयता येते. अलिप्तपणा, अनासक्ती वाढली, ममत्व नष्ट झाले, की भय जाते. परब्रह्म भयाच्या पलीकडे आहे तेथे व्दैत नसते. गुरुकृपेच्या एका कटाक्षाने भय  जाते. 

आत्मज्ञान, निष्काम कर्म भक्ति व उपासना करण्यासाठी निर्भयता लागते. कर्मयोगी कर्माच्या फळाची आशा न करता शांत, स्थिरवृत्तीने कर्तेपणाचा त्याग करून कर्म करतो व इतरांना अनंत शक्ति व प्रेरणा देतो. निर्भयतेमुळे आत्मज्ञानासाठी लागणारी एकाग्रता, समदृष्टी, विश्वाकडे पाहण्याचे व्यापक मन तयार होते. ११वा अध्याय विश्वातील अनेकत्वाकडे एकत्वाने कसे पहावे हे शिकवतो. पवित्र नद्या, विशाल पर्वत, गंभीर सागर, वत्सल गाय, वनराज सिंह, मधुर कोकिळा, एकांतप्रिय सर्पातही ईश्वरीस्वरूप पाहावे. परमात्मा मुंगी पासून  ते ब्रह्मांडापर्यंत अणुरेणूत आहे. या जाणीवेमुळे अनेकत्वातील भय नष्ट होते.’विभक्त नाही तो भक्त’  अशी भक्तीची व्याख्या समर्थ करतात. प्रल्हादासारखा भक्त संकटाला घाबरत नाही. कल्याणस्वामी, निर्भयपणे समर्थांची सेवा अनेक कठीण प्रसंगात करतात. अर्जुनाचा मोह, ममत्व, आसक्ती, व त्याच्या मनातील पापाचे भय भगवंतांनी नष्ट केले. “करिष्ये वचनं तव”या त्याच्या वचनात निर्भयता व ईश्वरार्पणता दिसते. हे निर्भयतेचे सामर्थ्य आहे. 

नि:शंक हो निर्भय हो मना रे|

प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे |

अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी |

अशक्य ही शक्य करतील स्वामी ||

|| जय जय रघुवीर समर्थ ||

Language