सोहं सुखाची अविरत साधना – भाग पहिला

सोहं सुखाची अविरत साधना – भाग पहिला
सौ. अपर्णा वांगीकर
  • October 3, 2026
  • 1 min read

सोहं साधना हा विषय खूप व्यापक असून ही साधना वैयक्तिक पातळीवर करावयाची साधना आहे. प्रथम दर्शनी हा विषय गूढ किंवा अवघड वाटू शकतो, कारण यामध्ये कुंडलिनी शक्ती, षट्चक्रे, योगाभ्यास, साधना पद्धती, सद्गुरू, अनुग्रह इत्यादी अनेक विषयांचा अभ्यास अंतर्भूत आहे. 

सोहं साधना/सोहं बोध याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपल्या अध्यात्मिक ग्रंथांची म्हणजे श्रीमद्भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, श्रीमद ग्रंथराज दासबोध यांची मूळ बैठक किंवा ज्याला आपण गुह्य/मूळ गाभा म्हणू; तो हा सोहं बोधच आहे. सोहं म्हणजेच अहं ब्रह्मास्मि. याचा अर्थ, मीच तो की; जो या संपूर्ण चराचरात दशांगुळे व्यापून उरला आहे; म्हणजे मी ईश्वराचा एक अंश आहे. 

दासबोधातील काही समास प्रत्यक्ष साधन प्रक्रियेचे समास आहेत. दशक १७ समास ५ हा अजपा निरूपणाचा समास त्यापैकी एक आहे. सोहंला अजपा तसेच गायत्रीही म्हणतात. कोणतेही इंद्रिय किंवा कोणतीही माला वगैरे स्थूल साधन यांचा उपयोग न करता नैसर्गिक श्वासोच्छ्वासाबरोबर जे जपाचे मानसिक अनुसंधान रहाते त्यास अजपा/गायत्री असे म्हणतात. हा जप करायचा नसतो तर तो चाललेलाच असतो. आपण फक्त तो ऐकायचा आहे. तो ऐकायचा, याचा अर्थ त्याकडे फक्त लक्ष द्यायचे; म्हणजे त्याचा अनुभव येतो. अजपा, ही म्हटले तर प्रक्रिया आहे व म्हटले तर सहज साधना आहे. अजपाचे नाते श्वास आणि उच्छश्वास याच्याशी आहे. साधकाने एका जागी आसनावर ताठ बसावे, आपले सर्व लक्ष श्वासावर केंद्रित करावे, श्वास अत्यंत सूक्ष्म आणि खोलवर घ्यावा, वृत्ती शांत असावी म्हणजे श्वास घेताना ‘सो‘ असा ध्वनी आणि श्वास बाहेर सोडताना ‘हं‘ असा ध्वनी सहजपणे चालू असल्याचा भास होईल. मन जितके शांत असेल तितका हा सोहं ध्वनी स्पष्टपणे ऐकू येईल. 

“गर्भी असता सोहं सोहं । बाहेर येता कोहं कोहं” मनाच्या श्लोकांमध्ये समर्थ म्हणतात, “बहु हिंपुटी होईजे मायपोटी । नको रे मना यातना तेचि मोठी ।  निरोधे पचे कोंडीले गर्भवासी । अधोमुख रे दुःख त्या बाळकासी ।।”  गर्भात असलेले बालक खाली तोंड करून असते, जणू काही ते भगवंताला शरण गेलेले असते, अतिशय दुःखी, कष्टी असलेला हा जीव भगवंताचे स्मरण करत असतो. हा जीव आईच्या गर्भात असताना सोहं सोहं असा श्वास जपत असतो, व परमेश्वराला म्हणत असतो की; माझी या यातनातून सुटका कर; मी तुझे स्मरण करेन. परंतु एकदा का हा जीव बाहेर आला की तो कोहं कोहं करून रडू लागतो. बाहेर आल्यावर गर्भात झालेल्या यातनांचा त्याला विसर पडतो व पुढे देहबुद्धीत अडकल्याने नाना दु:खे जन्मभर भोगत रहातो. 

कोहं चा अर्थ मी कोण असा आहे. आपल्या स्वरूप ज्ञानाचे विस्मरण झाल्यामुळेच, देहबुद्धीची जाणीव होते आणि यामुळेच जीवाला ‘एका एका योनी प्रती कोटी कोटी फेरे होती‘ असे जन्म मरणाचे फेरे फिरावे लागतात. जीवाला अनंत जन्मापासून मी देह, म्हणण्याची जी सवय लागली आहे; ती नाहीशी करण्याकरता सोहं भावाचा अभ्यास केला पाहिजे. आपले मन बहिर्मुखपणामुळे सतत बाहेरच्या गोष्टींचा विचार करीत असते, देहाकार होत असते; हा देह तादात्म्य भाव नाहीसा करण्याकरता सोहं भावाच्या अनेक आवृत्त्या केल्या पाहिजेत. अशा स्मरणाच्या संततधारेला जप म्हणतात. उच्चारण हा वाचेचा धर्म व स्मरण हा मनाचा धर्म आहे. नुसत्या वाचेने जप म्हणजे, उच्चारण चालले असता उच्चाराबरोबर स्मरण चालले नाही तर तो जप व्यर्थ होतो. उच्चाराची संततधारा, ही स्मरणाच्या म्हणजे ध्यानाच्या उपयोगी पडते म्हणून वारंवार उच्चार केला पाहिजे. सोहं हा नुसता मंत्र नाही तर सोहं हा भाव आहे. योगमार्गी योगाभ्यासाने कुंडलिनी शक्ती जागृत करून सुषुम्नेच्याद्वारे ब्रह्मरंध्रात प्रवेश करून सोहं भावाने परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतात. पण हा योगाचा अभ्यास साधणे फारच कठीण आहे. म्हणून सहज सोपे साधन म्हणजे सोहंचा जप करणे होय. तथापि मंत्र गुरूमुखाने विधीपूर्वक ग्रहण केल्यानंतरच तो कार्यरत होतो. पण गुरूने मंत्र दिला म्हणजे तेवढ्याने काम भागत नाही, तर मंत्राबरोबरच गुरू संप्रदायाच्या काही गुप्त खुणा अथवा विशिष्ट मुद्रा वगैरे असतात त्या शिष्याचा अधिकार पाहून ते गुरू त्यांना देत असतात. श्रीसमर्थ संप्रदायाचा उघड मंत्र ‘श्रीराम जय राम जय जय राम‘ हा असला तरी सोहं मंत्राची धारणा ही त्यांची गुप्तखूण आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. 

“धरिता सो सांडिता हं | अखंड चाले सोहं सोहं ।”

सोहं हे नाकातील श्वासाचे वर्णन आहे. नाकातील श्वास हा प्राकृत म्हणजे भौतिक वायू नव्हे. भौतिक वायूचा धर्म असा की तो निघून जातो, परंतु या शरीराला नऊ मोठी छिद्रे असूनही तो त्यातून निघून जात नाही. नाकातील वायूला प्रभंजन असे म्हणतात. मारुती स्तोत्रात समर्थ म्हणतात, “रामदूता प्रभंजना.” हृदयस्थ आत्मारामाचा दूत मारुती तो हाच. मारुतीच्या कृपेशिवाय रामरायाचे दर्शन होत नसते. सहज सिंहासनस्थ चैतन्यरूपी आत्मारामाच्या सन्मुख हा सोहंरूपी मारुती नाचत आहे. पण चैतन्यरूपी राम दिसण्याकरिता किंवा ज्याला आत्मारामाचा साक्षात्कार व्हावा असे वाटते, त्याने या सोहं मारुतीरायाचे शेपूट धरले पाहिजे. सोहं जपणे म्हणजे सतत आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अनुसंधान राखणे. आत्मस्वरूप म्हणजेच परमात्मस्वरूप होय. आपण परमात्मस्वरूप आहोत ही जाणीव साधकाला फक्त सद्गुरू करून देतात. साधकाच्या प्रयत्नास यश येण्यास गुरूकृपा आवश्यक असते. गुरूकृपेवाचून परमार्थात शेवटची पायरी गाठता येणार नाही आणि गुरूकृपेबरोबर ईश्वरकृपाही पाहिजे.

साधना आणि अनुग्रह या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. साधना करण्यासाठी विशिष्ट असे आराध्य दैवत किंवा आलंबन हवे, आणि अनुग्रह यासाठी तर सद्गुरूंची नितांत आवश्यकता आहे. साधना करण्यासाठी सद्गुरू साधकाला मंत्र देतात. दासबोधातील दशक ५ समास ४ उपदेशलक्षण यामध्ये समासाच्या प्रारंभी समर्थांनी वेगवेगळ्या मंत्रांची यादी दिलेली आहे. साधारणतः घरामध्ये परंपरेने ज्या दैवताची उपासना चालत आलेली असते किंवा साधकाला विशिष्ट दैवताबद्दल प्रेम, श्रद्धा असते; त्या दैवताचा मंत्र साधकाला दिला जातो. मंत्रामध्ये महान शक्ती असते. अशा शक्तिमान मंत्राचे आवर्तन पुन्हा पुन्हा करीत राहिल्यास त्याची स्पंदने निर्माण होतात आणि ही स्पंदने अत्यंत प्रभावी असतात. त्यामुळे आपल्या वासना आणि विकार हे नष्ट होतात. मंत्रांच्या उच्चाराने नाभीजवळ आघात होतो, त्यामुळे कुंडलिनी शक्ती जागृत होण्यास मदत होते. पण केवळ मंत्र घेणे म्हणजेच अनुग्रह घेणे, असे नाही कारण कर्मयोग; भक्तीयोग; ज्ञानयोग आणि ध्यानयोग हे भिन्नभिन्न उपासना मार्ग समर्थांनी सांगितले आहेत. नुसता ध्यानमार्ग म्हटला तरी ध्यानाचे विविध प्रकार आहेत. सगुण, निर्गुण, अजपाजप, मूर्तीपूजा, तीर्थयात्रा असे विविध साधनमार्ग आहेत. साधारणत: शिष्य ज्या तयारीचा असेल, त्या तयारीनुसार त्या त्या अधिकारानुसार साधनमार्गाचा उपदेश सद्गुरू शिष्याला करतात. उपदेश कोणताही असला तरी त्याचे पर्यवसान शेवटी आत्मज्ञानामध्येच होते. आत्मज्ञान साधण्यासाठी सद्गुरू कृपा आवश्यक आहे. परमार्थ साधनेचा मार्ग खडतर आहे, प्रयत्नपूर्वक देहबुद्धीचा त्याग करून आत्मबुद्धीची दृढ धारणा करावी लागते. साधनेच्या मार्गात फक्त आणि फक्त सद्गुरूंची साथ, मार्गदर्शन, सहवास, सेवा या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. साधनमार्ग म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासारखे आहे. नवविधा भक्तीच्या मार्गाने साधन केल्यास तसेच ध्यान, जप, वाचन, मनन, चिंतन आणि सत्संग या मार्गाने साधना केल्यास साधकाला आत्मज्ञानाचे फळ मिळते. 

क्रमशः 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

4.7 9 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
16 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
anand joglekar
anand joglekar
25 days ago

कठीण विषयाची बेसिक माहिती सोपी करून सांगितली आहे.

Shubhada phanse
Shubhada phanse
24 days ago

खूप छान विषय मांडणी आहे. समजले तर कृती करता येते. धन्यवाद

विनय ayachit
विनय ayachit
24 days ago

अपर्ण ताई तुमचा अभ्यास किती सखोल आहे याची जाणीव झाली,ज्याला सोहम कळला तिला जीवन जगण्याची कला समजली असे रविशंकर गुरुजी तर सांगतातच,पण आपल्या दैनदिन जीवनात सुद्धा अजपाजप ,,प्रत्येक श्वासाबरोबर सोहम कसे आपण जागवितो,मारुतिरायची कृपेशिवाय सद्गुरू रामरायाचे दार उघडणे शकत नाही,,रामदुता प्रभंजना खूप छान समजले, आपले गरुड पुराण सुद्धा सांगते या वैतरिणी नदीत डुंबायचे नसेल ,आपला प्रवास नर से नारायण करायचे असेल तर माझ नाम घे,श्वासाबरीबरोबर अखंड मला स्मर,खूप छान अपर्णा ताई 🙏🏼🙏🏼

Shubhada Thite
Shubhada Thite
24 days ago

जय श्रीराम
अतिशय महत्त्वाचा आणि अवघड विषय खूप सोप्या पद्धतीने सांगितला आहे.
उत्तम

Medha Kulkarni
Medha Kulkarni
24 days ago

सुरेख विवरण 🙏🌹
ही सद्गुरू कृपा आहे 🙏🙏

मीरा इनामदार
मीरा इनामदार
24 days ago

अपर्णाताई,सविस्तर व सुरेख विवेचन.
अभ्यासास उपयुक्त.

Sunanda Shamrao Kshirsagar
Sunanda Shamrao Kshirsagar
24 days ago

जय श्रीराम
अपर्णाताई,आपला ब्लॉग खुप खुप सुंदर.

Swati Sudhakar Sawant
Swati Sudhakar Sawant
24 days ago

अतिशय सोप्या शब्दात सोहं साधना समजावून सांगितलीत. धन्यवाद 🙏🙏

Sanjay Dattatraya Wangikar
Sanjay Dattatraya Wangikar
24 days ago

खूप छान व सोप्या पद्धतीने विस्तृत विश्लेषण करून सोहम बद्दल माहिती मिळाली याचा आनंद तसेच समाधान आहे…

रेणुका देऊळगावकर
रेणुका देऊळगावकर
24 days ago

खूप छान सांगितले अपर्णा ताई…सोहम हा मंत्र नाही तर सोहम हा भाव आहे…हा भाव महत्वाचा आहे…कारण जिथे भाव असेल तिथेच देवत्व असते…

SEEMA SARDESHPANDE
SEEMA SARDESHPANDE

खुपच छान लिहीला आहे लेख अपर्णा.सखोल चा छान अभ्यास चालू आहे. सोप्या भाषेत अवघड विषय छान मांडला.
.

सुरेंद्र संगमनेरकर
सुरेंद्र संगमनेरकर
24 days ago

खूप सोप्या शब्दात समजावून सांगितले आहे

Joshi prakash ramrao
Joshi prakash ramrao
24 days ago

खूप अभ्यासपूर्ण व सोप्या भाषेत सोहम साधने बद्धल माहिती दिली आहे! जय श्रीराम!🙏🙏

dr. sadanand chavare
dr. sadanand chavare
22 days ago

खूप छान सोपं करून,समजावून सांगितले आहे.धन्यवाद ताई.जय जय रघुवीर समर्थ.

Minal Patwardhan
Minal Patwardhan
20 days ago

खूपच छान माहितीपूर्ण लेख आहे 👌🙏🌹

Ranjana Patil
Ranjana Patil
17 days ago

अतिशय सुरेख!

Language