भीमरूपी स्तोत्र सहावे

भीमरूपी स्तोत्र सहावे
सौ. अचला कवठेकर
  • September 26, 2026
  • 1 min read

समर्थांचे सहाव्या क्रमांकाचे स्तोत्र म्हणजे भक्तीची आणि शक्तीची सुरेख पायवाट आहे. भारतभ्रमणाच्या काळात देशाची दयनीय अवस्था पाहून व्याकुळलेल्या समर्थांनी अकरा मारुतीच्या स्थापनेपासून समाजाचे, संप्रदायाचे संघटन करायला सुरुवात केली.

“मुख्य हरिकथा निरूपण । दुसरें तें राजकरण ।

तिसरें तें सावधपण । सर्वविषईं ।।११-५-४।।”     

ही त्रयी समोर ठेवून समर्थांनी शहापूरला पहिला मारुती स्थापन केला. शहापूरला मारुती स्थापन करण्यासाठी एक फार मोठे कारण घडले. असे सांगतात की, शहापूर हे गाव आदिलशाही अमलाखाली होते. तेथील बाजीपंत कुलकर्णी खूप धार्मिक प्रवृत्तीचे होते. त्यांचा व्यवहार अत्यंत चोख आणि कर्तव्यदक्ष होता. त्यावेळी समर्थांचा मुक्काम शहापूरपासून जवळ असलेल्या ‘चंद्रगिरी‘च्या घळीत असायचा. तिथून ते शहापूरला भिक्षेसाठी येत असत. कुलकर्ण्यांच्या घरी भिक्षेला आले की बाजीपंतांची पत्नी सतीबाई हिला ते आवडत नसे. ती समर्थांना गोसावड्या, ऐदी, धट्टाकट्टा असे म्हणून त्यांचा अपमान करत असे. पण समर्थांनी आपला संयम कधीही सोडला नाही, आणि भिक्षेला येण्याचा नियमही सोडला नाही.

एकदा समर्थ भिक्षेला आले असताना त्यांना त्यांच्या घरातील वातावरण काळजीचे वाटू लागले. चौकशी केल्यावर त्यांना समजले, की बाजीपंतांना गावकीच्या हिशोबाच्या संदर्भात घोटाळा झाल्याने मोगल सरदारांनी विजापूरदरबारी नेले आहे. त्यामुळे घरातील लोक काळजीत आहेत.

समर्थांनी त्यांच्या घरासमोर नेहमीप्रमाणे “जय जय रघुवीर समर्थ” अशी घोषणा दिली. सतीबाईंना बोलवले आणि म्हणाले, “आजपासून अकराव्या दिवसापर्यंत बाजीपंत सुखरूप परत आले तर तुम्ही रामनामाचा जप कराल का?” तेव्हा सतीबाई म्हणाल्या, “बाबारे, तसेच झाले तर मी रामनामाचा जप एकदाच काय हजारदा करेन.”

समर्थांनी कारकूनाच्या वेषात आदिलशहाकडे जाऊन ‘दासोपंत‘ असे नाव सांगितले. “बाजीपंतांच्या सासऱ्याने मला हिशोब पूर्ण करायला पाठवले”, असे सांगून हिशोब पूर्ण केला आणि बाजीपंतांची सुटका केली. बाजीपंतांना शहापूरला सोडून समर्थ अदृश्य झाले.

आपल्याला संकटातून सोडवणारे कोण आहेत ? ते समजल्याशिवाय दोघांनी अन्नग्रहण करायचे नाही हे ठरवले. समर्थ अंतर्ज्ञानी होते, समर्थांना दया आली आणि चौथ्या दिवशी त्यांच्या घरासमोर येऊन “जय जय रघुवीर समर्थ” असा घोष केला. सतीबाई आणि बाजीपंत दोघेही बाहेर आले. सतीबाईंनी पायावर लोटांगण घातले आणि क्षमा मागितली. त्यांच्याकडून अनुग्रह घेतला. दर्शनाशिवाय भोजन करायचे नाही हा नियम केला. समर्थांच्या भ्रमंतीमुळे सतीबाईंना सतत उपवास घडू लागला. तेव्हा समर्थांनी त्यांना एक चुन्याची मूर्ती तयार करून शहापूरला त्याची स्थापना केली. “याचे दर्शन घेऊन भोजन करा. माझे दर्शन झाले नाही म्हणून उपवास करू नका”, असे सांगितले. तोच हा मारुती आहे. 

ही मूर्ती संपूर्ण चुन्यापासून बनवली आहे. म्हणून याला ‘शहापूरचा चुन्याचा मारुती‘ असे सुद्धा म्हणतात. मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव उग्र वाटतात. तरीसुद्धा मनाला अल्हाद देतात. शहापूरचा हा मारुती सहा फूट उंचीचा आहे. या हनुमंताच्या डोक्यावर सुंदर गोंड्याची टोपी आहे. कमरेला घट्ट लंगोट असून पायाखाली राक्षस आहे. त्याला मारोतीराय चिरडत आहेत असे वाटते.

या राक्षसाचे नाव ‘जंबुमाली‘ आहे. ज्या पुष्पवाटिकेत रावणाने सीतेला कैद करून ठेवले होते त्या वाटिकेचा रखवालदार म्हणून हा राक्षस काम करत होता. हा मारुती समर्थांचे ‘आत्मरुप‘ आहे. या मारुतीची मूर्ती आणि मंदिर पूर्वाभिमुख आहे. या मारुतीची प्रतिकृती म्हणून या मंदिरात एक पितळेची मूर्ती आहे. ही समर्थकालीन मूर्ती रामनवमी उत्सवात चाफळला नेतात. त्याशिवाय चाफळचा रामनवमी उत्सव सुरू होत नाही. या मूर्तीच्या रूपाने समर्थ आजही चाफळला रामनवमी उत्सवात असतात.

हे स्तोत्र समर्थांना सुचले तेव्हा समर्थांना कफाच्या व्यथेचा खूप त्रास होत होता. कदाचित टाकळीला गोदावरीच्या पाण्यात उभे राहून केलेल्या तपस्येमुळे त्यांना कफाचा त्रास होत असावा. या तपस्येनंतर समर्थांनी भारतभ्रमण केले. त्यानंतर महाबळेश्वर मसूर मार्गे ते शहापूरला आले, तेव्हा समर्थांचा कफाचा त्रास खूप वाढला होता.

हे स्तोत्र म्हणजे समर्थांनी आपला स्वामी ‘हनुमंत‘ याला केलेले आरोग्याचे मागणे आहे. ‘ईश्वरोपासना करणाऱ्या साधकाला शारीरिक व्यथा जर अडथळा आणत असतील तर त्याचे निरसन व्हावे‘ यासाठी केलेले हे स्तोत्र आहे. समर्थांचे हृदय हे माऊलीचे आहे. कफामुळे काय त्रास होतो याचा समर्थांना अनुभव आला होता, म्हणूनच या माऊलीच्या भावनेतून त्यांनी हनुमंताची आर्त भावनेने स्तुती केली आणि कफाची व्यथा दूर करण्याचे साकडे हनुमंताला घातले, म्हणूनच कफाची व्यथा असलेल्यांनी हे स्तोत्र नित्यपठण करावे असे म्हणतात. अकरा कडव्यांचे हे स्तोत्र अत्यंत भावमय आहे. ‘परमेश्वर हा भक्ताच्या श्रद्धेची कसोटी पाहत असतो आणि त्याच्या कसोटीला उतरले, की तो भक्ताचे मनोरथ पूर्ण करतो’, हाच गर्भित अर्थ या स्तोत्रात आहे. 

सख्यत्वाच्या नात्यातून समर्थांनी मारुतीसाठी केलेल्या या स्तवनात त्याच्या गुणाचे पराक्रमाचे यथार्थ वर्णन केले आहे. पहिल्या दोन श्लोकांमध्ये रामायणातील एक प्रसंग आणि हनुमंताचा पराक्रम याचे वर्णन केले आहे.

“मृतिविरहित ठेले मोकळें सीध झाले । 

सकळ जन निवाले धन्य सामर्थ्य चाले ।। ३ ।।”

तिसऱ्या श्लोकात हनुमंताने रणांगणावरील मृत्यू पावलेल्या सैन्याला जिवंत केल्याचे वर्णन आहे. चौथ्या श्लोकापासून समर्थांनी मारुतीरायाची स्तुती करायला सुरुवात केली आहे.

“बहुप्रिय रघुनाथा मुख्य तूं प्राणनाथा । 

उठविं मज अनाथा दूर सारूनि वेथा ।। 

झडकरि भिमराया तूं करी दृढ काया । 

रघुविरभजना या लागवेगेंचि जाया ।। ४ ।।”

बहुप्रिया रघुनाथा हे विशेषण हनुमंतासाठी समर्थांनी वापरले आहे. रघुनाथ म्हणजे प्रभूरामचंद्र आणि रामचंद्राला सगळ्यात जास्त प्रिय कोण ? तर हनुमंत! म्हणून ते हनुमंताला ‘बहुप्रियरघुनाथ‘ म्हणतात.          पुढे ‘मुख्यप्राणनाथ‘ असे सुद्धा म्हणतात. दोघांचेही एकमेकांवर तेवढेच प्रेम आहे. आपली व्यथा दूर करण्यासाठी ते हनुमंताला म्हणतात की, “मी अनाथ आहे, पोरका आहे आणि त्यात कफाच्या व्यथेने त्रासून गेलो आहे. त्यामुळे झडकरी म्हणजे लवकरात लवकर माझी काया दृढ कर, म्हणजे हे रघुराया, मी तुझे भजन करू शकेन.” समर्थ हनुमंताला म्हणतात की, “तुझ्याशिवाय मी कोणाचाच विचार करत नाही. त्यामुळे मी तुझी वाट बघत आहे. तू या तुझ्या दासाचा सांभाळ कर.” एवढेच नाही तर समर्थ म्हणतात,     

“उचित हित करावें उद्धरावें धरावें । 

अनहित न करावें त्वां जनीं येश घ्यावें ।।

अघटित घडवावें सेवकां सोडवावे । 

हरिभजन घडावें दुःख तें वीघडावें ।। ६ ।।”

समर्थांना हरीभजनाचे वेड आहे. म्हणूनच ते म्हणतात, “माझ्याकडून हरीभजन घडावे. तू असे अघटीत घडव आणि तुझ्या या सेवकाला या व्याधीतून सोडव. जळधराप्रमाणे म्हणजे मेघाप्रमाणे माझ्या अंत:करणात करुणेचा वर्षावकर.” पुढे ते हनुमंताला म्हणतात की, 

“वडिलपण करावें सेवकां सावरावें । 

अनहित न करावें तूर्त हातीं धरावें ।।

निपटचि हटवादें प्रार्थिला शब्दभेदें ।

कपि घन करुणेचा वोळला रामवेधें ।। १० ।।”

समर्थ हनुमंताला वडिलांची उपमा देतात आणि म्हणतात की, “माझे वज्रासारखी काया कफामुळे त्रस्त झाली आहे. मला परमसुख मिळावे म्हणून हे ‘पवनतनुजा‘ म्हणजे हनुमंता, मी तुला वंदन करतो.”

।।  जय जय रघुवीर समर्थ ।।

 

2.7 3 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
5 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Madhavi Panse
Madhavi Panse
1 month ago

समर्थानी आपल्याला होत असलेल्या व्यथे मुळे रामनाम घेण्यास त्रास होत असल्याचे हनुमंतास सांगितले आहे. छान माहिती 💐.

Shubhada Thite
Shubhada Thite
1 month ago

जय श्रीराम
फार सुंदर कथानक आणि थोडक्यात गर्भित अर्थ सांगितला आहे… खूप छान…

सुनिता बिवलकर
सुनिता बिवलकर
1 month ago

खूप सुंदर वर्णन

surekha mahajan
surekha mahajan
1 month ago

खूप छान अर्थ सांगितला 🙏🙏

Nayana Soman
Nayana Soman
29 days ago

खूपच छान अर्थ सांगितला
जय जय रघुवीर समर्थ

Language