समर्थांचे रक्षाबंधन नक्कीच आगळे वेगळे असेच आहे. “रक्षाबंधन” या शब्दामुळे एकंदरच स्त्रीविषयक उहापोह करणे गरजेचे ठरते. कारण संत रामदास स्वामींनी ४०० वर्षापूर्वीच्या पुरुषप्रधान समाजात स्त्रियांना अत्यंत आदराचे, समानतेचे आणि गौरवाचे स्थान दिले. समर्थांनी “स्त्री” ही केवळ “चूल आणि मूल” यात अडकलेली नसून ती कुटुंबाची आधारस्तंभ आणि सृजनाची शक्ती असल्याचे स्पष्ट केले. समर्थांनी सांगितलेले स्त्रियांचे महत्त्व खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते.
मूळमाया जगदेश्वरी| परमविद्या परमेश्वरी |
विश्ववंद्या विश्वेश्वरी| त्रैलोक्यजननी ||१०-१०-२३||
या ओवीत समर्थांनी स्त्रीचे दैवी स्वरूप मूलमाया, जगदीश्वरी, परमविद्या, परमेश्वरी, विश्ववंद्या, विश्वेश्वरी, त्रैलोक्यजननी अशा उच्च नावांनी गौरवले आहे. ही नावे शक्तीच्या विविध रूपांना दर्शवितात — मूळमाया म्हणजे सर्व सृष्टीची मूळ, जगदीश्वरी म्हणजे जगाची ईश्वरी, परमविद्या म्हणजे सर्वोच्च ज्ञान, परमेश्वरी म्हणजे सर्वोच्च शक्ती, विश्ववंद्या म्हणजे सर्व विश्वाने वंदनीय, विश्वेश्वरी म्हणजे विश्वाची स्वामिनी, आणि त्रैलोक्यजननी म्हणजे तिन्ही लोकांची जननी. या नावांमधून स्त्रीशक्तीचे सर्वव्यापी, सृष्टीचे मूळ असणारे स्वरूप प्रकट होते.
१ . ) मातृत्वाचा गौरव – आदर : समर्थांनी आईला प्रथम गुरू मानले आहे. त्यांनी “दासबोध” ग्रंथात सांगितले आहे की, आईने मुलांसाठी घेतलेले कष्ट आणि सहन केलेल्या वेदनांची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. स्त्रीचा किंवा आईचा अपमान करणे म्हणजे स्वतःच्या कुळाची आणि मातृत्वाची निंदा करणे होय.
जन्मला जयाचे उदरी| तयासी जो विरोधकरी||
तया जननीच्या कुळा निंदितोशी| वृथापृष्ट तू मानवामांजि होसी||
बहुजननीने तुझे कष्ट केले| बरे ओखटे सर्व साहोनी नेले||
यामधून “स्त्री विषय” जितका स्वतंत्र तितकाच मातृत्वाचे महत्त्व पटविणारा आहे. अपार मातृवात्सल्याने ओथंबलेला दिसून येतो.
बालकास वाढवी जननी| हे तो नव्हे पुरुषांचे नी|
वीट नाही कंटाळा नाही| आलस्य नाही त्रास नाही|
इतकी माया कोठेही नाही| माते वेगळी ||
अशी गौरवपुष्पे स्त्री जातीवर समर्थांनी उधळली आहेत.
१.) प्रपंचात – नवनिर्मितीत समान भागीदारी : समर्थांच्या मते यशस्वी प्रपंच (संसार) चालवण्यासाठी स्त्री आणि पुरुष या दोघांचीही भूमिका समान आणि मोलाची असते. नवनिर्मिती आणि सुव्यवस्थेसाठी स्त्रीशक्ती ही कारणीभूत असते.
२.) सती प्रथेला विरोध : पतीच्या निधनानंतर स्त्रीने स्वतःला चितेत जाळून घेणे (सती जाणे) ही अमानुष आणि राक्षसी प्रथा असल्याचे समर्थांनी स्पष्ट केले. पतीच्या मृत्यूनंतरही स्त्रीला सन्मानाने आणि स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे, हा पुरोगामी विचार त्यांनी त्या काळातील समाजात मांडला. हे महत्त्वपूर्ण “संरक्षण कवच” स्त्रियांना समर्थांनी त्या काळात दिलेले आहे.
३. ) स्त्रियांना आध्यात्मिक – संघटनात्मक अधिकार : फक्त स्त्रीच्या सुरक्षेचाच विचार न करता समर्थ संप्रदायात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचा अधिकार होता. समर्थांच्या शिष्या वेण्णास्वामी आणि आक्कास्वामी यांनी समर्थांच्या शिकवणीचा आणि विचारांचा प्रसार अत्यंत समर्थपणे केला. वेणाबाई, आक्काबाई, बहिणाबाई, सतीबाई, नबाबाई, मंदाबाई, लखाबाई, अन्नपूर्णाबाई, गंगाबाई, कृपामाई, गिरीबाई , अनिताबाई, गोदाबाई, भिमाबाई अशा कितीतरी सुप्रसिद्ध स्त्री वर्गाची यादी यामध्ये देता येईल. वेणाबाईंनी मिरज येथे मठस्थापना केली तर बहिणाबाईंनी सिऊर येथे आणि अंबिकाबाईंनी करवीर आणि राशीवडे येथे केली. स्त्री वर्गात चाफळ येथील रुद्राजीपंत देशपांडे यांची बालविधवा कन्या आक्का या फार कर्तबगार होत्या. त्यांनी चाफळ येथील मठाची व्यवस्था ३७वर्षे अतिशय उत्तम रीतीने ठेवली होती. मठपती होण्यासाठी आवश्यक ती सर्व पात्रता स्त्रियात आढळली तर त्यांनाही दीक्षा देऊन पुरुषांप्रमाणे समर्थ “मठपती आणि महंत” करत. स्त्रियांना कीर्तन सांगण्यासही समर्थ परवानगी देत. यावरून समर्थांनी स्त्रियांच्या कर्तृत्वावर आणि बुद्धिमत्तेवर दाखवलेला गाढा विश्वास दिसून येतो. समर्थांनी आपल्या लिखाणामध्ये कौसल्या, दोन मुलांचा समर्थपणे सांभाळ करणारी सीता, अंजनी, तुळजाभवानी अशा विविध स्त्रियांची रूपे चित्रित केलेली आहेत. विविध दर्शन घडविणारी ही प्रातिनिधिक रूपे आहेत. या पौराणिक देवतांच्या कार्यामधून स्त्रीचे एक संपन्न आदर्श व्यक्तिमत्व जनमानसावर ठसविण्याचा प्रयत्न प्रथम समर्थांनीच केला. समर्थांनी आपल्या कथा, कीर्तनांमधून धनुर्धारी प्रजापालक रामातील “परस्त्री सहोदरता” या त्यांच्या गुणांचे कौतुक केले आहे. सीतेसाठी वने उपवने शोधीत असतात एका अरण्यात तुळजाभवानीने अतिशय सुंदर वेशात त्यांना दर्शन दिले तेव्हा हा सूर्यवंशीचा राजा विचलित झाला नाही. तसेच इंद्रजिताचा वध झाल्यावर त्याच्या लावण्यवती पत्नीस माता मंदोदरीने वानरांच्या गोटात पाठवले तेव्हा दाक्षिण्य पाठवून तिची पाठविणे केली.
ऐसा दुसरा देव आढळेना| राघव हा परस्त्रीचा सहोदर|
ऐसा नाही कोठे नीतीचा| विचारवो साजणी||
अशी स्त्रियांची शब्दातून प्रशंसा करण्यात समर्थांची मोठी मार्मिकता आणि औचित्य प्रकट झालेले दिसून येते. परस्त्रीच्या बाबतीत न्याय आणि निती गुंडाळून ठेवणाऱ्या तत्कालीन परकीय शासन सत्ताच्या तुलनेने समर्थांचा हा गुण लोकांना लाखमोलाचा वाटावा असे वर्णन समर्थांनी केलेले आहे. तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा विचार केला असता देशामध्ये चाललेली स्त्रियांची विटंबना समर्थांना सहन होत नव्हती असे दिसून येते. गुंतागुंतीच्या परकीय आक्रमणांनी घेरलेल्या समाजातील विघटन करणाऱ्या प्रवृत्ती आणि संघटन घडणाऱ्या शक्ती या दोघांचा विचार समर्थांनी केला.
थोडक्यात सांगायचे तर समर्थ रामदास स्वामींनी स्त्रियांना केवळ आदराची वस्तू न मानता त्यांना कुटुंबाचे केंद्र मार्गदर्शक आणि निर्णय प्रक्रियेत समान भागीदार मानले आहे हे त्यांचे “रक्षाबंधन” त्या काळामध्ये नक्कीच आगळे वेगळे वैशिष्ट्यपूर्ण असे आहे. याला अनुसरूनच समर्थांनी रक्षाबंधनाचा (राखी पौर्णिमा) उल्लेख थेट “धर्मबंधन” असा केला आहे समर्थांच्या मते, रक्षाबंधन म्हणजे केवळ एक धागा नसून ती परस्परांच्या रक्षणाची आणि संकटात एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याची एक सामाजिक व आध्यात्मिक प्रतिज्ञा आहे.
धर्मबंधन आणि संघटन : समर्थ रामदास स्वामींच्या शिकवणीनुसार रक्षाबंधन हा सण समाज बांधणी राष्ट्रभिमान आणि ऐक्याचे प्रतीक आहे. या दिवशी बांधला जाणारा राखीचा धागा प्रत्येकाला आपल्या धर्माचे आणि समाजाचे रक्षण करण्यासाठी बांधून ठेवतो. त्याचे महत्त्व फक्त बहीण-भावापुरते मर्यादित नाही.
अखंड संरक्षणाचा संकल्प : हा सण केवळ बाहेर भाऊ-बहिणी पुरता मर्यादित नसून तो संकटाच्या काळात एकमेकांच्या कल्याणासाठी झटण्याची आणि समाजातील दुर्बल घटकांचे रक्षण करण्याची शिकवण देतो.
आत्मबळ आणि पराक्रम : समर्थांच्या मते हा पवित्र धागा धारण करणाऱ्या व्यक्तीमध्ये दृष्टांचा नाश करण्याचे आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ निर्माण होते.
समर्थांना जाऊन चारशे वर्षे झालीत. आजच्या काळात शिक्षित-अशिक्षित, मध्यम-गरीब तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक प्रकारच्या स्त्रिया आपल्याला आजूबाजूला वावरताना दिसून येतात. आजच्या काळातील स्त्री जीवनाच्या समस्यांचे संदर्भ, प्रमाण, प्रकार, खोली त्यांच्या सामाजिक जीवनाची चौकट आता फार झपाट्याने बदलत आहे. परंतु तरीसुद्धा धर्मनिती, संस्कार यांचा विचार समर्थांच्या काळात डोकावून जर त्याचा मागवा घेतला तर असे वाटते की स्त्रियांकडे उदात्त्व मानवतावादी दृष्टिकोनातून एक सर्वांगीण सहस्रदलाप्रमाणे विकसन पावणारे व्यक्तिमत्व म्हणून समतेने पाहणारा आणि स्वतःच्या वृत्तीने, कृतीने तसे प्रत्यक्षात सिद्ध करणारा हा उत्तम पुरुषोत्तम म्हणजे समर्थच होत.
भारतीय इतिहासाच्या अत्यंत भयावह कालखंडात स्त्रियांच्या उद्धाराचा समर्थांनी केलेला विचार आणि तो विचार कृतीत आणण्यासाठी केलेला आचार याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. स्त्रियांच्या उद्धाराचा, प्रगतीचा विचार करणारे संत म्हणून ते नेहमीच महान ठरतात. अशा प्रकारे स्त्रियां संदर्भात अत्यंत विशाल दृष्टिकोन ठेवून समर्थांनी राष्ट्र उभारणीच्या कार्यात, धर्मजाग्रणात त्यांना सामावून घेतले. असे आहे समर्थांचे आगळे वेगळे “रक्षाबंधन”!
|| जय जय रघुवीर समर्थ ||
व्वा… अप्रतिम झाले आजचे विवरण….विषय एकदम नाविन्यपूर्ण आणि प्रबोधनात्मक….सुरेख…. अभिनंदन
जय श्रीराम
कल्पनाताई समर्थांच्या दृष्टिकोनातून रक्षाबंधनाचे महत्त्व हे खूपच छान समजावून सांगितले आहे, समर्थांच्या दृष्टिकोनातून रक्षाबंधन हे धर्मबंधन आहे, या दिवशी बांधला जाणारा राखीचा धागा प्रत्येकाला आपल्या धर्माचे आणि समाजाचे रक्षण करण्यासाठी बांधून ठेवतो, म्हणजेच त्याचे महत्त्व फक्त बहिण-भावा पुरते मर्यादित नाही, हा उदात्त विचार मनाला भारावून टाकणार आहे.
राष्ट्राच्या कल्याणार्थ
जय जय रघुवीर समर्थ
समर्थानी स्त्री चे माता, , शिष्या, व स्त्री शक्तीचे अनेक रूपे सांगितले वर्णन खूपच छान
श्रीराम
फार सुंदर वेगळ्याच पद्धतीचे विवेचन, मांडणी आणि विषय मना पासुन नमस्कार ताई
खुपच छान विवरण ,प्रबोधनात्मक आहे.
आजचे विवरण अप्रतिम प्रसंगाला साजेसे 🙏
खूप खूप अभिनंदन ताई 🌹🌹
कल्पनाताई आपण समर्थांचे रक्षाबंधन या विषयावर अतिशय मुद्देसूद, स्त्रियांचे महत्त्व व महात्म्य, त्यांच्या ठिकाणी असणारी सुप्त शक्ती, त्या शक्तीला प्रेरणा मिळाल्यावर त्या काय करू शकतात. हे समर्थांनी दाखवून दिलेले आहे आपण खूप सुंदर ब्लॉग लिहिला आहे.
जय जय रघुवीर समर्थ
खूप छान समजावून सांगितले आहे.समर्थांचे स्त्री दाक्षिण्य आदर आणि विश्वास लेखातून प्रभावीपणे आले आहेत.हा दृष्टिकोन समाजात रुजला तर सध्याची विकार ग्रस्त पुरुषमानसिकता बदलली जाऊ शकेल.
जय जय रघुवीर समर्थ
व्वा खूप छान माहिती
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली आहे! रक्षाबंधन म्हणजे धर्मबंधन हा खूप चांगला विचार आहे! खूप नवीन माहिती मिळाली. धन्यवाद!!🙏🙏
लेख खूपच सुंदर झाला आहे…👌👌👌🙏🏻
अतिशय सुंदर लेख, अभिनंदन 💐
कल्पनाताई, आजचा लेख खूपच सुंदर दिनाचे औचित्य साधून, समाजातील स्त्रीचे महत्व दासबोधाच्या साह्याने विशद केले.
जय जय रघुवीर समर्थ
खूप छान प्रबोधनात्मक लेख
खूप छान समर्थांचे आगळे वेगळे रक्षाबंधन 🙏प्रतिकूल काळात स्त्रीयांना योग्य न्याय मिळवून स्त्री जातीचा सन्मान करणारे समर्थ रामदास स्वामी. उत्तम उदाहरणं म्हणजे वेण्णास्वामी. जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
अतिशय सुंदर लेख. स्त्रियांना सन्मान, आदर देणारे समर्थ रामदास स्वामी. आजच्या.दिवशी त्यांचे विचार वाचायला मिळाले.खूप खूप धन्यवाद.
कल्पना ताई,खूप छान!
समर्थांच्या संपूर्ण स्री दाक्षिण्य कार्याचा यथोचित आढावा तुम्ही घेतलात!
खुप सुंदर अप्रतिम लेख सामाजिक क्षेत्रात धर्मबंधन हा विषय फार मोलाचा आहे.
कल्पना ताई, खूपच सुरेख!समर्थांच्या समग्र स्री दाक्षिण्य कार्याचा यथोचित आढावा तुम्ही घेतलात.
रक्षाबंधनाचे विराट दृष्टिकोनातून समर्थन ज्यांना सांगितला हीच विशालता आपल्या लेखांमध्ये दिसते आपण असेच लिहीत राहावे..
जय जय रघुवीर समर्थ.., 🟪🟥🟦
समर्थांनी अक्षरलेखन यावर लेख असला तर पाठवा…
श्रीराम,
प्रभु श्रीरामांच्या चरित्राचा मागोवा घेत ते कसे *परस्त्री सहोदर* होते ह्याचे छान उद्बोधन केले आहे. समर्थांनी तोच आदर्श समोर ठेवून महिला उद्धाराचे महान कार्य केले आणि चूल आणि मूल इतकेच कार्यक्षेत्र स्त्रियांसाठी मानणाऱ्या रुढीवादी काळात स्त्रियांना अध्यात्मिक क्षेत्रात स्थान देऊन आणि त्यांच्या योग्यतेनुसार जबाबदार्या सोपवून मठपतीपद देखील देवून त्यांना प्रतिष्ठा, स्वातंत्र्य प्रदान केले. सामाजिक राजकिय अधपतनाच्या काळात रक्षाबंधन म्हणजे केवळ भाऊ बहिणीच्या नात्याचा उत्सव नाही तर दुर्बल,पीडित समाजाच्या रक्षणासाठी कृतनिश्चय होण्याचा दिवस आहे आणि रक्षाबंधन हे धर्मबंधन आहे असा संदेश समर्थ देतात. त्यांच्या या उपदेशाचे पालन हिंदवी स्वराज्यात कटाक्षाने झाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा म्हणून पेश केलेल्या सुभेदाराच्या सुनेची कशी सन्मानाने पाठवणी केली ही कथा इतिहासात प्रसिद्ध आहे. विवरण अप्रतिम झाले
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
समर्थांनी स्त्री शक्ती चा आदर केला. स्त्री मुळेच कुटुंब, समाज, राष्ट्र सुसंस्कृत होते हे त्रिकालाबाधित सत्य समर्थांनी वेळोवेळी सांगितले… एक नवा दृष्टीकोन अभ्यासायला मिळाला. 🙏