आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ज्ञान आणि विज्ञान एकत्र वाटचाल करीत आहेत. जेव्हा आपली पुढची पिढी ए आय ला विचारेल, दासबोध काय सांगतो? तेव्हा त्या पिढीला अचूक आणि प्रमाणित ग्रंथांच्या आधारे ज्ञानसंपन्न आणि सक्षम बनवण्याची जबाबदारी आपली आहे.
आजच्या काळात लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण स्मार्ट मोबाइल फोन लिलया आणि सहजरित्या वापरतात. एखादा प्रश्न पडला की काय केले जाते? तर कोणी पुस्तक शोधत नाही, कोणाला फोनही करत नाही, तर सरळ मोबाईलवर ए आय ला प्रश्न विचारले जातात. किंवा चॅट जीपीटी, जेमिनी या किंवा अशा इतर ए आय साधनांचा वापर केला जातो.
विद्यार्थी अभ्यासासाठी ए आय वापरतात, नोकरी करणारे लोक कामासाठी त्याची मदत घेतात, देशविदेशात राहणारे अनेक मराठी भाषिक दासबोध किंवा समर्थ रामदास स्वामींच्या शिकवणीबद्दल जाणून घेण्यासाठी ए आय कडे वळतात. यामध्ये काही चूक किंवा गैर नाही, आजच्या काळात ज्ञान मिळवण्याचा हा एक सहज सोपा मार्ग आहे.
परंतु महत्वाचा प्रश्न असा की, ए आय मार्फत मिळालेल्या प्रश्नांची उत्तरे कितपत खरी आहेत ? हे पडताळून बघता आले पाहिजे किंवा जर कोणी ए आय ला विचारले, दासबोधात क्रोधाबद्दल काय सांगितले आहे? भीतीवर मात कशी करावी? नेतृत्व आणि स्वयंशिस्त, विवेक, वैराग्य, साधना, याविषयी समर्थांचे मत काय आहे? तेव्हा ए आय नेमके काय सांगते? ए आय उत्तरे देते परंतु ती अचूकच असतील असे नाही, ही एआय प्रणाली विलक्षण आहे, पण ती सर्वज्ञ नाही. ती विद्वानांसारखे सत्य जाणत नाही, ती उपलब्ध मजकुरातील नमुन्यांच्या आधारे सर्वात संभाव्य उत्तरे तयार करते, ती उत्तरे बहुतेक वेळा योग्य असतात पण कधी कधी ती चुकते, चुकीचा संदर्भ देते, साहित्याची सरमिसळ करते, तर कधी अस्तित्वात नसलेले वचन, ओव्या तयार करते, आणि ही चूक अत्यंत आत्मविश्वासाने ठामपणे सांगितली जाते आणि वाचक त्यावर विश्वास ठेवतात.
याचा परिणाम म्हणजे पुढच्या पिढीपर्यंत किंवा वाचकांपर्यंत चुकीचे संदर्भ, बनावट ओव्या जातील, हेच चुकीचे संदर्भ सामाजिक माध्यमांद्वारे म्हणजेच व्हाट्सअप, युट्युब इत्यादी मार्फत पुढे पुढे पाठवले जाईल, पसरवले जाईल. हे सर्व खरे की खोटे याची पडताळणी, तपासणी कोणीही करत नाही आणि अशा प्रकारे काही वर्षांनी मूळ वांग्मय मागे पडून, सत्य मागे पडून, असत्य किंवा खोट्या गोष्टी हळूहळू प्रचलित होऊन, त्या गोष्टीच परंपरेचा भाग बनून प्रमाणित मानल्या जातील आणि त्याच ग्राह्य धरल्या जातील.
हे सर्व संभाव्य धोके टाळण्यासाठी दासबोध ए आय ( समर्थ साधक असिस्टंट ) या उपकरणाचा जन्म झाला आहे. दासबोधाची प्रामाणिकता जपणे ही केवळ तांत्रिक गरज नाही तर ती सांस्कृतिक, अध्यात्मिक जबाबदारी आहे. हे दासबोध ए आय केवळ फक्त दासबोधावरच आधारित आहे. याचा उद्देश दासबोधातील समर्थांची शिकवण, विचार प्रत्येकापर्यंत अचूकरित्या पोहोचवणे हा आहे. हे दासबोध ए आय, स्वतःचे विचार, स्वतःची मते, कल्पनाविलास न मांडता विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे प्रमाणित दासबोधाच्या ग्रंथातच शोधते आणि योग्य ओव्या निवडून, त्याचा अर्थ स्पष्ट करून, त्यासोबत दासबोधातील ओव्यांचा संदर्भ देखील देते. त्यानुसार आपण मूळ ग्रंथातील ओवी वाचू शकतो त्याचा अर्थ पडताळू शकतो आणि स्वतःचे चिंतन करू शकतो.
हे दासबोध ए आय, अगदी पहिल्यांदा दासबोध हातात घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, अभ्यासक, साधक समर्थांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणारे संशोधक या सर्वांसाठी खुले आहे. केवळ दासबोध ग्रंथावरच आधारित असल्याने दासबोधाबाहेरील प्रश्न विचारल्यास दासबोध ए आय उत्तरे देत नाही तर ते स्पष्टपणे सांगते की हा विषय माझ्या कार्यक्षेत्रात नाही.
प्रत्येक युगात त्या त्या काळातील सर्वोत्तम साधनांचा उपयोग केला गेला, पूर्वी हस्तलिखिते होती, त्यानंतर छपाईचे तंत्र आले, ग्रंथालये उभी राहिली. आजचा जमाना हा ए आय चा जमाना आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर मानवाने आकाशाला गवसणी घातली आहे. साधने बदलली परंतु समर्थांचे ज्ञान तसेच राहिले. ज्ञानाचे महाद्वार या दासबोध ए आय ने आपल्यासाठी उघडले आहे.
एखाद्या साधकाने विचारलेल्या प्रश्नास मूळ ओव्यांसह उत्तर मिळाले तर तो साधक पुढे संपूर्ण दासबोध वाचेल, गुरूंच्या सानिध्यात जाईल, साधना करील, चिंतन करील आणि परमार्थाचा अधिकारी होईल. हीच या दासबोध ए आय च्या प्रयत्नामागील आशा आहे. दासबोध ए आय हे दासबोधाची जागा घेण्यासाठी नाही, ते गुरूंची किंवा स्वाध्यायाची जागा घेण्यासाठीही नाही, ते फक्त एक मार्गदर्शक आहे जे नवीन पिढीला दासबोधापर्यंत योग्य मार्गाने पोहोचवते.
भविष्यकाळात अजून तंत्रज्ञान विकसित होईल, ए आय अजून कितीही प्रगत झाले तरी समर्थ रामदास स्वामींचे विचार मात्र तसेच राहतील….. कालातीत…. प्रामाणिक आणि प्रत्येक जिज्ञासू साधकासाठी सहज उपलब्ध होणारे. हीच दासबोध एआय मागची प्रेरणा आहे. आणि याच ध्येयाने प्रेरणेने प्रेरित होऊन हे दासबोध ए आय ( समर्थ साधक असिस्टंट ) विकसित करण्यात आले आहे.
श्री ओंकार सबनीस आणि सौ अवनी सबनीस यांच्या मूळ इंग्रजी ब्लॉगचा स्वैर अनुवाद.
दासबोधाची प्रामाणिकता जपणे ही तांत्रिक गरजेप्रमाणे सांस्कृतिक व आध्यात्मिक जबाबदारी ! माहितीपूर्ण लेख !
अवनि व ओंकार यानी खरच खुप मोठ काम केल आहे. हस्तलिखीत दासबोध कल्याणाने लिहीला आधुनिक युगाच्या पर्वात दासबोध ए आय चे लेखकनिक सौ. अवनी व ओंकार आहेत.
अप्रतिम….. Ai वापरताना साधकांनी प्रामाणिक पणा मात्र जपला पाहिजे. स्व अभ्यासाला प्राधान्य देऊन Ai चा योग्य वापर केला पाहिजे 🙏🙏
खरंतर नव्या पिढीतील या अवनी आणि ओंकारचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. खूप सुंदर लेख लिहिला अपर्णाताई.
जय जय रघुवीर समर्थ….
खूप छान अनुवाद 👌👏
इतक्या लहान वयात अवनी आणि ओंकार यांनी अध्यात्म आणि आधुनिकता एकत्र करण्याचा केलेला हा प्रयत्न खरोखरच अत्यंत कौतुकास्पद आहे.
स्वैर अनुवादही छान झाला आहे.