फर्शपाणी म्हणजे ज्याच्या हातात परशु आहे असा श्रीगजानन, यंत्रपाणी म्हणजे शस्त्रधारी आणि मोक्षपाणी म्हणजे मोक्षदायक. चापपाणी म्हणजे धनुष्य बाण हाती घेतलेले सद्गुरू श्रीराम. चक्रपाणी म्हणजे सुदर्शन चक्र हाती धारण करणारे श्रीविष्णू, त्रिशूलधारी श्रीशंकर, दंडपाणी व हरिमूलपाणी म्हणजे दंड आणि पारिजातक वृक्ष ज्याने हाती धरला आहे अशा श्रीकृष्णाला श्रीसमर्थ नमन करीत आहेत.
श्रीकृष्णाने सत्यभामेसाठी पारिजातक वृक्ष स्वर्गातून आणला आणि तिच्या परसात लावला पण त्याची फुले मात्र रुक्मिणी मातेच्या अंगणात पडत अशी एक कथा आहे. दोन राण्यांमध्ये असलेला सूक्ष्म सवती मत्सर दूर करायला श्रीकृष्णाने ही योजना केली. पारिजातकाचे फूल हे धवल विमलत्वाचे प्रतीक. आयुष्य थोडेच पण आसमंत सुगंधी करणारे, समर्पित जीवन कसे असावे याचा आदर्श म्हणता येईल. साधक आपले तन-मन-धन ईश्वर चरणी प्राजक्ताच्या फुलाप्रमाणे अत्यंत निर्मल मनाने अर्पण करतो असा संकेत या कथेतून असावा असे मला वाटते.
टाकळी येथील वास्तव्यात वय १२ ते २४ या काळात पुरश्चरण सुरु असताना व देशभ्रमण करीत असताना करुणाष्टके रचली गेली, असे आ. स. भ. कै. सुनील दादा चिंचोलकर यांनी ‘सार्थ करुणाष्टके’ या विवेचनात्मक ग्रंथात म्हटले आहे. ही काल निश्चिती महत्त्वाची आहे. श्रीसमर्थांनी नमन करताना जी दैवते निवडली आहेत त्यात त्यांचे शस्त्र सज्ज असणे याला महत्त्व दिले आहे. त्या शस्त्रांचा वापर सद्रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या नाशासाठी झाला हे महत्त्वाचे आहे. श्रीसमर्थ ज्या काळात हे लिहितात त्या काळातील सामाजिक व राजकीय दुरावस्था ध्यानात घेता, श्रीसमर्थांनी दैवत व त्याची लक्षणे अत्यंत विवेकाने निवडली होती असे वाटते. काळाची गरज पहाता त्यांना ते अत्यंत उत्कटपणे वाटले असणार. ‘उत्कटता’ हा करुणाष्टकात आढळणारा महत्त्वाचा भाव आहे. ‘अत्यंत तळमळ’ हा दुसरा गुण आहे आणि ‘थेट भगवंताशी साधलेला संवाद’ हा तिसरा गुण करुणाष्टकात आढळतो.
“नमूं आदिमाता नमूं योगमाता।नमूं वेदमाता नमूं विश्वमाता।
नमूं भक्तिमाता नमूं मुक्तिमाता।नमूं सज्जनांची कृपा ज्ञानमाता।।२।।”
श्रीसमर्थ हे अद्वैत, वेदांती भक्तिमार्गी आहेत. आदिमाता पार्वती, योग आणि वेदांची देवता सरस्वती, विश्वमाता, भक्तिरूपी माता, मुक्तिमाता, सज्जन लोकांवर ज्ञानाची कृपा करणारी ज्ञानमाता; यांना श्रीसमर्थ नमन करतात. साधक आणि दैवत यांचे नाते ‘बालक आणि आई’ असे असते. तीच त्याची काळजी घेते. अडचणी निवारते. निगुतीने मार्ग दाखवते. मूल कसेही असले, कसेही वागले तरी एक आईच असते, जी त्याच्या कल्याणाचीच कामना करते. श्रीसमर्थांनी वर्णन केलेल्या देवता साधकाच्या आध्यात्मिक प्रगतीची सर्वतोपरी काळजी घेतात.
“नमूं योगरूपी नमूं ज्ञानरूपी।नमूं संतरूपी नमूं ध्यानरूपी।
नमूं दिव्यरूपी नमूं विश्वरूपी।नमूं येकरूपी गुरु सस्वरूपी।।३।।”
योगी, आत्मज्ञानी संत, ध्यानमार्गी दिव्य विभूती, जे विश्वाशी तादात्म्य पावले आहेत, स्वरूपाशी अद्वैत स्थिती झालेले, परमात्म्याशी तदाकार झालेले सद्गुरू, यांना श्रीसमर्थ नमन करतात. या साऱ्यांचे मार्गदर्शन, साधना यशस्वी होण्यासाठी मिळत असते. सद्गुरू आणि सद्शिष्य हे तर साधनेच्या प्रगतीत एकरूपच होतात. शिष्याला हवे ते सारे मार्गदर्शन सद्गुरू देतात. ‘संत आणि सद्गुरू’ हे भूलोकातील प्रत्यक्ष अनुभव येणारे देवच होत !
“नमूं संतयोगी नमूं सिद्धयोगी।नमूं भक्त ज्ञानी विवेकी विरागी।
नमूं आत्मनिष्ठा नमूं योगनिष्ठां।नमूं सर्वश्रेष्ठां वरीष्ठां वरीष्ठां।।४।।”
संत योगी (एकनाथ, नामदेव, तुकाराम महाराज, ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराज), सिद्ध योगी (चांगदेव, शंकर महाराज, नाथ संप्रदाय), ज्ञानी, विवेकी, वैराग्यशाली, ईश्वर निष्ठ, योगावर निष्ठा असणारे व जे ज्ञानामुळे श्रेष्ठ आहेत त्या सर्वांना नमन आहे. ही विवेकी शिष्याची विनम्र भूमिका आहे. सद्गुरूंपाशी असलेल्या उत्तम गुणांची ही पूजा आहे. श्रीसमर्थ ज्ञान, विवेक आणि वैराग्य यांना खूप महत्त्व देतात. नुसते ज्ञान अहंकारी असू शकते. नुसते वैराग्य हेंकाडपिसे असू शकते; पण त्याला विवेकाची जोड असली, की ज्ञान आणि वैराग्य दोन्ही संतुलित रहाते. ‘निष्ठा’ ही मोठी ताकद आहे. योगमार्ग असो वा ज्ञानमार्ग; त्यात टिकून रहायला निष्ठा आणि आत्यंतिक विश्वास महत्त्वाचे ठरतात.
“मनीं चिंतितां राम विश्राम वाटे।जगज्जाळ जंजाळ हे सर्व तूटे।
तुटे काळजी काळ जिंकावयाची।फुटे वृत्ति अर्थांतरी जावयाची।।५।।”
श्रीसमर्थ म्हणतात, “मनात रामाचे चिंतन केले, की मन अपूर्व शांततेचा अनुभव करते. संसारात खूप गुंतागुंत असते. त्यात आपले मन अडकते. हे मायेचे जाळे आसक्तीने, मोहाच्या धाग्यांनी विणलेले असते. त्यातून आपली सोडवणूक करून घेणे, संसाराच्या तापापासून सुटका, राम नामाने साध्य होते. इतके हे प्रभावी साधन आहे. रामाची कृपा झाली की संसार पाश, बंधन तुटते. त्याच्याशी चित्ताने एकरूप झाल्यावर काळाची म्हणजे मृत्यूची भीती उरत नाही.”
शब्दाच्या आत अर्थ दडलेला असतो. तो शोधायाला सूक्ष्म दृष्टी लागते. परमात्मा आपल्याच अंत:करणात आहे ही अनुभूती यायला ‘वृत्ती अंतर्मुख होणे’ गरजेचे आहे. ती वृत्ती रामाच्या कृपेने उदयास येते, किंबहुना यावी, म्हणून या कडव्यात श्रीरामांना नमन केले आहे.
।।जय जय रघुवीर समर्थ।।
उत्तम चिंतन….
||जय जय रघुवीर समर्थ||
🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ.विवेचन खुप सुंदर अप्रतिम असेच आहे
विवेक व ज्ञान याची जोड वैराग्य सोबत आवश्यक आहे,वैराग्य ऐकटे असेल किवा ज्ञान ऐकतटे असेल तर अहंकार येतो,तर वैराग्य ऐकतटे असेल तर हेकडपीसे होते किती छान सांगितले आहे समर्थानी .
विवेकाची जोड असेल तर वैराग्य व ज्ञान दोन्ही संतुलित राहते .अश्या प्रकारे सदानंद दांदा चं नी नमन छान सांगितले आहें 🙏🏼
खुपच सुंदर चिंतन ,मनन करायला लावणारे आहे. कितीही माहिती असले व ऐकले असले तरी मन सारखे त्या संसारातील चिंतांमध्येच गुंतलेले असते. त्याला सतत जाणीव करुन द्यावी लागते, बाबा हे सगळे निवारणारा तो राम आहे. कर्ता करविता तोच मग तू चिंतन कर व चिंतेतून बाहेर पड. संत साहित्य सतत आपल्यात हा बदल घडवून आणते. किती उपकार आहेत संतांचे व त्याचे निरुपण आपल्यापर्यंत झिरपवणाऱ्यांचे!. धन्यवाद
खूपच छान विवेचन
जय जय रघुवीर समर्थ