श्रीसमर्थ रामदासस्वामी यांचे आराध्य दैवत म्हणजे प्रभूश्रीरामचंद्र. श्रीसमर्थांच्या श्रद्धेमुळे, नामनिष्ठेमुळे रामनाम त्यांच्या नसानसात भिनल्यामुळे आणि त्यांच्या अलौकिक कार्याची प्रेरणा सुद्धा प्रभूश्रीराम असल्यामुळे सहाजिकच “क्रिया करून करवावी” नुसार श्रीसमर्थांनी सामान्य जनांनाही नाम साधनेस प्रवृत्त केले. त्याकाळी एकमेकांना भेटल्यावर जोहार म्हणण्याची पद्धत होती. श्रीसमर्थांनी छत्रपती शिवाजीमहाराजांना नामाचे महत्त्व सांगून, पटवून देऊन, जोहार ऐवजी राम राम म्हणण्याची पद्धत रूजवली. राम नामाचे महात्म्य किंवा रामनामाची फलश्रुतीही भक्तांच्या संदर्भासह श्रीसमर्थांनी राम गुण या करुणाष्टकात वर्णन केली आहे. राम नामाचे महत्त्व सांगताना भगवान शंकर,अहिल्या, शबरी आणि राक्षससंहार यांचे वर्णन श्रीसमर्थ वारंवार करीत असतात. विशेषतः शंकरासारखा देवही नेहमी रामनाम घेतो याचे श्रीसमर्थांना खूप आश्चर्य वाटते. म्हणून ‘श्रीराम राम हे म्हणा’ हे करुणाष्टक खास त्याचसाठी वाहिलेले आहे. राम राम का म्हणायचं ? याचं महत्त्व श्रीसमर्थांनी या करुणाष्टकातून सांगितलं आहे ते महादेवांनीही सांगितलं आहे.
“सुरेंद्र चंद्रशेखरु।अखंड ध्यातसे हरु।
जनांसि सांगतो खुणा।श्री राम राम हे म्हणा।।१।।”
समुद्रमंथनातून निघालेले हलाहल विष पचवण्यासाठी देवाधिदेव महादेव यांनी मस्तकी चंद्र धारण केला, पण रामनामाच्या जपाने ते शांत झाले. म्हणून स्वतः शंकरजी लोकांना रामनामाचे महत्त्व सांगून श्रीरामाचे नामस्मरण करायला सांगतात.
“महेश पार्वतीप्रती।विशेष गूज सांगती।
सलाभ होतसे दुणा।श्री राम राम हे म्हणा।।२।।”
महेश म्हणजे स्वतः महादेव, देवी पार्वतीला एक विशेष राम नामाचं रहस्य सांगतात. राम नाम घेतल्याने साधकास दुप्पट लाभ होतो. म्हणून महादेव त्यांना श्री राम राम हे म्हणायला सांगतात.
“विषें बहूत जाळिलें।विशेष अंग पोळलें।
प्रचीत माझिया मना।श्री राम राम हे म्हणा।।३।।”
महादेव सांगतात हलाहल विषाच्या प्राशनाने माझ्या संपूर्ण शरीराचा दाह सुरू झाला. सगळ्या अंगाची लाही लाही सुरू झाली. तेव्हा मी श्री राम नाम घ्यायला सुरुवात केली. आणि हे पवित्र श्री राम नाम घेतल्यामुळे तो होत असलेला दाह शांत झाला. माझ्या मनाने राम नामाचा हा अनुभव घेतला आहे. तुम्ही देखील रामनामाचे नामस्मरण करा म्हणजे संकटावर मात कराल. रामनाम लिहिल्याने पाषाण तरू शकतात, मग आपण तर माणसे आहोत. हा भवसागर तरुन जायचा असेल तर रामनामाच्या नामस्मरणाशिवाय तरणोपाय नाही. विशेष म्हणजे ते सोपे आणि सुलभ आहे.
“विशाळ व्याळं व्यस्त की।नदी खळाळ मस्तकीं।
ऋषीभविष्यकारणा।श्री राम राम हे म्हणा।।४।।”
श्रीदेवाधिदेव महादेव यांच्या गळ्यामध्ये मोठा नाग आहे. त्यांच्या मस्तकावर जटे मध्ये खळखळ आवाज करीत वहाणारी गंगा आहे. वाल्मिकी ऋषींनी रामाचे भविष्य सांगून रामनामाचे महत्त्व सांगितले. ते रामनामाचे महात्म्य प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी श्रीरामाचे नामस्मरण केले पाहिजे.
“बहुत प्रेत्न पाहिले।परंतु सर्व राहिले।
विबूधपक्षरक्षणा।श्री राम राम हे म्हणा।।५।।”
हलाहल विष प्राशनामुळे होणारा दाह थांबवण्यासाठी महादेवांनी चंद्र, नाग, गंगा यांचा स्वीकार केला. पण हे सगळे प्रयत्न निकामी ठरले. राम नामाशिवाय महादेव शांत झाले नाहीत. देवांचा पक्ष कैवार घेऊन त्यांना बंदीवासातून सोडवणाऱ्या श्रीरामाचे नामस्मरण केलेच पाहिजे.
“अपाय होत चूकला।उपाय हा भला भला।
नसे जयासि तूळणा।श्री राम राम हे म्हणा।।६।।”
विषप्राशनामुळे जो अपाय होत होता, तो रामनामामुळे टळला; म्हणून रामनामाचा उपाय हा सर्वात चांगला आणि खात्रीचा आहे. ज्या रामनामाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही त्या श्रीरामाचे तुम्ही नामस्मरण करा.
“विरांमधे विरोत्तमु।विशेष हा रघोत्तमु।
सकाम काळ आंकणा।श्री राम राम हे म्हणा।।७।।”
रघुकुलातील श्रीराम हे पराक्रमी आहेत. आपण त्यांच्या पराक्रमाच्या यशोगाथा ऐकलेल्या आहेत. रावणासारख्या बलाढ्य शत्रूला पराभूत करून बिभिषणाला लंकेचे राज्य दिले. म्हणजे दुष्ट शक्तींचा नाश करून सज्जन शक्तीला त्यांनी बळ दिले. ते वीरांमध्ये विरोत्तम आहेत. रघुकुलात देखील ते सर्वोत्तम आहेत. एवढेच नाही तर काळ देखील त्यांच्या अंकित आहे. त्या रामाचे सकामतेने नामस्मरण केले तरी ते लाभदायक आहे.
“बहूत पाहिलें खरें।परंतु दोनि आक्षरें।
चुकेल येमयातना।श्री राम राम हे म्हणा।।८।।”
समुद्रमंथनातून बाहेर पडलेले हलाहल विष महादेवाने प्राशन केले. सर्वांगाला दाह होऊ लागला. खूप यातना होऊ लागल्या. तो दाह शमविण्यासाठी, चंद्र; नाग; जटेतून वहाणारी गंगा या तिन्ही गोष्टी धारण केल्या. पण दाह शांत झाला नाही. मग राम ही दोन्ही अक्षरे कंठी धारण करताच म्हणजे मध्यमेने राम नामाचा जप करताच सर्व दाह शांत झाला. मरणप्राय वेदना संपल्या. राम नामाचे हे महात्म्य, प्रभाव व फलश्रुती लक्षात घेऊन भगवान शंकर स्वानुभवे ठासून सांगतात “श्री राम राम हे म्हणा.” हनुमंत हा अकरावा रुद्र असून, भगवान शंकराचा अवतार समजला जातो. श्रीरामांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी रामाचे दास्य करावे,ही भगवान शंकराची कामना, त्यांनी हनुमंत अवतारात पूर्ण केली हा भाव. श्रीरामांच्या नामस्मरणामुळे यमयातनेतून सुटका होते म्हणून श्रीरामाचे नामस्मरण करायचे आहे.
“मनी धरुनि साक्षपें।अखंड नाम हे जपे।
मनांतरी क्षणक्षणा।श्रीराम राम हे म्हणा।।९।।”
भरकटणाऱ्या मनाला आवरण्यासाठी प्रयत्नपूर्वक श्रीरामांचे नाम घेऊन अखंड जप करावा, मनात प्रत्येक क्षणी श्रीरामांचेच नाम असावे. या अखंड जपासाठी म्हणून श्रीरामाचे नामस्मरण करा.
“देहे धरूनि वानरी।अखंड दास्य मी करीं।
विमुक्त राज्य रावणा।श्री राम राम हे म्हणा।।१०।।”
महादेव म्हणतात मी वानररूप होऊन हनुमंताच्या रूपाने श्रीरामाचे अखंडपणे दास्य करीत आहे. रावणाचा वध करून लंकेचे राज्य मिळवण्यासाठी मी श्रीरामांना मदत केली. ही सेवा करणे श्रीराम कृपेमुळे शक्य झाले. म्हणून तुम्हीही श्रीरामाचे नामस्मरण करा. या दहा करुणाष्टकांमधून रामनामाचे महत्त्व आणि आपण ते कसे घ्यावे याचे वर्णन श्रीसमर्थांनी केले आहे. अशी ही करुणाष्टके आपल्याही मनात राम नाम घेण्याचा भाव निर्माण करतातच.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
खरंच समर्थ किती चपखल उदा. देऊन *रामनामाचा*
महिमा सांगत आहेत. हा प्रचार आहे का? तर नाही. मग इतकी तळमळ त्यात आहे! कोणासाठी तर लोकांच्या कल्याणासाठी. संतांना माऊली का म्हणतात ते वरील निरुपणातून प्रकर्षाने जाणवले. ” ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रिती”
रामनामाचं महात्म्य अनेक उदा.तून छान सांगितलं
मेधाताई.
जय श्रीराम
मेधाताई , रामनामाचे महत्व अनेक उदाहरणे देऊन छान सांगितले आहे.
राष्ट्राच्या कल्याणार्थ
जय जय रघुवीर समर्थ
लोकांना रामनाम महत्त्व समजावे म्हणून जोहार ऐवजी राम राम म्हणण्यास सांगितले आणि शिवजी राजांनी तसे करण्यास जनतेला सांगितले खरंच सहजतेने नाम कसे घ्यावे हे समर्थांनी या उदाहरणातून दाखवून दिलेला आहे रामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी हे सर्व केले म्हणून समर्थ काळात रामनामाचा पताका गगनावरी गेला होता.
राम नामाचे महत्त्व महात्म्य अतिशय सहज, सुंदर रीतीने सर्वांसमोर मांडल
रामनामाचं महत्व समर्थांनी छान सांगितले आहे. त्याचे सोप्या भाषेतील निरूपण भावले.
🌹॥ जय जय रघुवीर समर्थ ॥🌹🙏🙏
खूप छान मेघाताई,,राम नामाचे श्रेष्ठत्व कलियुगात तर फार आहे,लोकांना वेळ नाही,कर्मकांड करायला वेळ नाही,तरी राम नाम हे कलियुगात वरदान आहे,हे गोंदवलेकर महाराजांनी सुद्धा स्पष्ट केले आहे,