गुरूशिष्य स्नेहबंध

गुरूशिष्य स्नेहबंध
सौ. कादंबरी रानडे
  • July 28, 2026
  • 1 min read

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः।।

व्यासाय विष्णूरूपाय व्यासरूपाय विष्णवे। नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नम:।। 

आषाढ शुद्ध पौर्णिमा अर्थात गुरूपौर्णिमा. “मुनिनामप्यहं व्यासः” “मुनीजनांमध्ये मी व्यास आहे” भगवंतांनी ज्यांस आपले रूप म्हटले आहे आणि जे सप्तचिरंजीवांपैकी एक आहेत अशा महर्षी वेदव्यासांचा हा अवतरणदिवस. आजच्या पवित्र योगावर महर्षी वेदव्यासांना वंदन करून ‘गुरूशिष्य स्नेहबंध’ या भावोत्कट चिंतनास गुरूतत्वाचे अधिष्ठान लाभावे अशी प्रार्थना करूया. गुरूशिष्य हे दोन वेगळे शब्द नाहीत इतक्या घट्ट स्नेहबंधाने ते एकरूप झालेले आहेत. गुरूशिष्यांचा विषय आला की ओघानेच श्रीराम-समर्थ, समर्थ-कल्याण, रामकृष्ण परमहंस-स्वामी विवेकानंद, श्रीकृष्ण-अर्जुन ज्यांनी गुरूशिष्य नात्यातली वीण अधिकाधिक मजबूत केली, अशा प्राचीन पवित्र गुरूपरंपरेसमोर नकळत नतमस्तक व्हायला होते. 

‘गुरू’ दिसायला सहजसोपा दोन अक्षरी शब्द. परंतु त्याची व्याप्ती विचारातीत आहे. गुरू नावाच्या अमृताच्या समुद्रात क्षणमात्र बुडलो तरी प्रतिभा कवी होऊन प्रसवू लागेल अशी गुरू शब्दाची थोरवी आहे. 

“गुरू म्हणिजे अक्षरे दोन|

परि अमृताचा समुद्र जाण||

तयामाजी बुडताची क्षण|

कवी होय परियेसा||” 

‘गुरू’ शब्दाचा अर्थ जितका शोधावा तितका अधिक गहन होत जाणारा आहे. “तत्वं गृणाति इति गुरूः|” जो तत्व जाणतो तो गुरू. 

“गकार म्हणजे सिद्ध जाण| रेफः पापस्य दाहकः|| उकार विष्णूरव्यक्त|”(संदर्भ-गुरूचरित्र)

 ‘ग’ म्हणजे सिद्ध.(गणेशतत्व), रेफः म्हणजे ‘र’ कार हा पाप नष्ट करणारा आहे. (अग्नीतत्व) आणि दोन्ही अक्षरांच्या मागुन येणारा ‘उ’कार म्हणजे प्रत्यक्ष विष्णूचे अव्यक्त रूप आहे. जो स्वतः सिद्ध आहे. शिष्याच्या मनातील विकार नष्ट करण्याचे सामर्थ्य ज्यात आहे, जो जीवशिवाचे ऐक्य घडवतो तो गुरू. गुरू शब्दाचा आणखी अर्थ गुरूगीतेत आला आहे.

 “गु-शब्दस्त्वन्धकारः स्यात् रु-शब्दस्तन्निरोधकः|अन्धकारनिरोधित्वात् गुरुरित्यभिधीयते।। (संदर्भ-गुरुगीता) 

‘गु’ अक्षर अंधःकाररुप आहे तर ‘रू’ हे अक्षर अंधःकार मिटवून प्रकाश देणारे आहे. मनातील विकारांचा अंधःकार नष्ट करून स्वस्वरूपाच्या जाणीवेचा प्रकाश देतो तो गुरू.  

जीवनाच्या सुरूवातीपासून अस्तापर्यंत गुरू पथदीप म्हणून सतत आपल्या सन्निध असतो. गुरू विविध रूपांनी व्यक्त होत असतो. गुरूविना नुसते श्वास घेणेही संभव नाही. आहेपणाची जाणीव करून देतो तो गुरू.

 “साईखेडियाचे बाहुले| चालविते या सूत्राचेनि चाले|| तैसा माते दावी बोले| स्वामी तो माझा||”

 ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, कळसुत्री बाहुलीस मनात येईल तसे चालवावे, तसा माझा चालविता धनी माझा स्वामी आहे. जन्मास आल्यावर आपला पूर्ण सांभाळ करणारी माता हीच पहिली गुरू असते. जसजसे मोठे व्हावे तसतसे आजूबाजूला अनेक जणांकडून नवनवीन शिक्षण मिळू लागते. जितके शिष्यत्व स्वीकारू तितके गुरू शिकवू लागतात. इतर विद्या दृश्यामधील असल्याने गुरूची निवड करणे सोपे असते. परंतु अध्यात्मिक मार्ग सूक्ष्म, अदृश्य असल्याने सद्गुरूंची निवड करणे कठीण असते. म्हणूनच येथे मोठ्या प्रमाणात फसवणूक आढळते. म्हणूनच श्रीमत् दासबोधातील पाचव्या दशकात ‘गुरूलक्षण’ समासात सद्गुरूंची लक्षणे सांगण्याआधी सद्गुरू कोण नाहीत हे सविस्तर सांगितले आहे. “चमत्कार तेथे नमस्कार” हा माणसाचा सहज स्वभाव ओळखून भोंदूबुवा करामती दाखवून लोकांस भुलवतात.  कामिनी कांचनाच्या अधीन होऊन काही गुरू शिष्यापुढे लाचार होतात. त्यांचाही समाचार श्रीसमर्थांनी घेतला आहे.

“जो गुरू भीडसारू| तो अद्धमाहून अद्धम थोरू| चोरटा मैंद पामरू| द्रव्यभोंदू||” (दा. ५.२.२५) 

अध्यात्म हे डोळे झाकून न करता डोळसपणे करण्याचे शास्त्र आहे. श्रीसमर्थ “रोकडी प्रचिती घेत पुढे जात राहा”, “सावध साक्षपी दक्ष राहा”, “अखंड सावध राहा” असे जे पुनः सांगतात ते यासाठीच.  या अनुषंगाने खरा गुरू कोण असतो हे सांगणारे सुभाषित आठवते. 

“बहवः गुरुवः लोके शिष्यवित्तापहारकः| दुर्लभस्य गुरूर्लोके शिष्यचित्तापहारकः||”

म्हणजेच, बहुतेक गुरू शिष्याचे वित्त हरण करतात. खरा गुरू खरंच दुर्मिळ असतो जो शिष्याच्या चित्तातील दोष हरण करतो. म्हणूनच शिष्य म्हणून स्वीकार करण्याआधी गुरू शिष्याची परीक्षा पाहातो. तसेच गुरूवर निःसंदेह विश्वास ठेवण्यासाठी गुरुचीही परीक्षा पाहा असे उदारपणे सांगणारे आपले अध्यात्म आहे. विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसांची अनेकवेळा परीक्षा घेतली आहे. 

“गुरुता शिष्यता वापि तयोर्वत्सरवासतः” (संदर्भ-सारसंग्रह) 

यानुसार एक वर्षभर गुरूशिष्य प्रत्यक्ष सन्निध राहून एकमेकांस पारखत असत अशी गुरूपरंपरेची रीतच होती.

कोणतीही कला, विद्या शिकवायला गुरू हवाच. परंतु परम अर्थापर्यंत पोहोचवणारे मोक्षदाते ते सद्गुरू. 

सद्गुरूला देण्यासारखे काहीच नसते. त्याला पैसा नको, अलंकार नकोत, उंची वस्त्र नकोत, दासदासी नकोत, कोणतेही ऐहिक सुख सद्गुरूंना लागत नाही, त्यांना कशाचीच उणीव नसते. कोणती अपेक्षाही नसते. सद्गुरूंना आम्हाला विषयवासनेतून सोडवायचे असते. आम्हाला विरक्त व्हायला शिकवायचे असते. यात काही नाही हे आमच्या मनात ठसवायचे असते. मग त्यांना कसली इच्छा असणार? 

जीवमात्रांचा उद्धार व्हावा हीच एक इच्छा असते. 

“तुका म्हणे आता राहिलो उपकारापुरता| बुडत हे जन न देखवे डोळा||” असा करुणासमुद्र सद्गुरूपाशी असतो.

“भवव्याघ्रें घालूनि उडी।गोवत्सास तडातोडी।

केली देखोनि सीघ्र सोडी।तो सद्गुरु जाणावा ।।” (दासबोध ५.२.११)

गाय म्हणजे ईश्वर. वासरू म्हणजे जीव. वाघ म्हणजे अशाश्वत संसार. वास्तविक जीव निरंतर ईश्वरापाशी असावयास पाहिजे. परंतु अविद्या जीवावर अशी काही झडप घालते की त्यातून सुटायला ते लहानसे वासरू (जीव) अक्षम असते. त्या वाघाच्या जबड्यातून सोडवतो आणि गायवासरांची भेट घडवतो तो सद्गुरू असतो. खरेच, जीवास अविद्येतून सोडविण्यासाठी प्रसंगी जीवाचे भोग, यातना सद्गुरू भोगतात. आपल्यासाठी ते किती खाली उतरतात! हे समजून घ्यायला हवे. 

सत्शिष्य होण्यासाठी सद्गुरूंवर पूर्ण विश्वास, संपूर्ण शरणागती आणि मोक्षाची तीव्र इच्छा ही प्रधान लक्षणे अंगी असावी लागतात. लहान मुल जसे आई सांगेल ते सर्वस्वी खरे मानते व तिच्यावर सर्वस्वी अवलंबून राहाते. तसेच सत्शिष्याने सद्गुरूशी वागायला हवे. मोठेपणी अशी निरागस बालबुद्धी साधणे परमार्थात अतिशय महत्वाचे आहे. 

“मुख्य सच्छिष्याचें लक्षण ।

सद्‍गुरुवचनीं विश्वास पूर्ण ।

अनन्यभावें शरण ।

त्या नांव सच्छिष्य ।।“ (दा.५.३.१९)

 विषयी वैराग्य उपजले तयासीच ज्ञान झाले. बहुतेक शिष्यांच्या मनात असे पूर्णत्व नसते. आ. सुनील दादा चिंचोलकर याविषयी म्हणतात, “अनुग्रह घेण्याची घाई करण्यापेक्षा आपण सत्शिष्य होण्याचा प्रयत्न करावा.” सत्शिष्याला सद्गुरू लाभला नाही तर तो वाया जातो, सद्गुरूला सत्शिष्य भेटला नाही तर त्याला सत्शिष्य करण्यासाठी फार श्रम करावे लागतात. सद्गुरूला सत्शिष्य लाभला तर समर्थ शिवरायांसारखा प्रताप स्वराज्य घडवतो आणि रामकृष्ण विवेकानंद जगाला आपलेसे होतात.

गुरूशिष्य स्नेहबंध असा निर्मळ, शाश्वत आहे. तो एकदा जुळून आला तर युगप्रवर्तक ठरतो. तो एकदा जुळून आला तर पाच शाह्यांची आक्रमणे  पचवून सुराज्य आणतो. अशी ही महान गुरूपरंपरा आजच्या भरकटलेल्या जगाला सन्मार्गी लावू शकते. आपली भारतभू विश्वगुरू बनून “वसुधैव कुटुम्बकम्” चा उपदेश करून अवघ्या जगाचे मन विशाल करेल, यासाठी आपण भारतीयांनी आपली ही महान परंपरा जगासमोर आणली पाहिजे. विश्वकल्याणाची आस धरून गुरूपदी लीन होऊया. 

“अखंड मंडलाकारं व्याप्तं येन सचराचरं| तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः॥”

||जय जय रघुवीर समर्थ||

5 2 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
9 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Vrinda Joglekar
Vrinda Joglekar
1 month ago

खूप छान
जय जय रघुवीर समर्थ

Jyoti dilip thombare
Jyoti dilip thombare
1 month ago

जय सद्गुरु

Anagha Nakwa
Anagha Nakwa
1 month ago

खूप छान

Surekha Dilip Mahajan
Surekha Dilip Mahajan
1 month ago

गुरू शिष्य एकरूप झाले‌ तर ते युगप्रवर्तक होऊ शकतात.खूपच छान उदाहरणांनी सांगितले ताई 🙏🙏

ज्योत्स्ना निरंतर
ज्योत्स्ना निरंतर
1 month ago

खूप छान

Aparna Wangikar
Aparna Wangikar
1 month ago

जय जय रघुवीर समर्थ.
माझा चालविता धनी माझा स्वामी आहे…
आता सद्गुरु वर्णवेना….
सुरेख चिंतन.

सौ. मीनल नं. वैद्य.
सौ. मीनल नं. वैद्य.
1 month ago

आज समाजात जी गुरु व त्यांचे महाला सारखे आश्रम आणि त्यात चाललेले गैरव्यवहार हे सर्व बघता, समर्थांनी दिलेली शिकवण अत्यंत महत्वाची आहे. गुरुशिष्य म्हणजे काय ? ते नाते किती दृढ व गहन आहे, स्नेहबंधाचे आहे, हे आपण उत्तम प्रकारे मांडले आहे.

Sharayu Pendse
Sharayu Pendse
1 month ago

गुरू शिष्याला स्विकारताच शिष्य व गुरू समानच होतात. शिष्य उर्ध्व विकासाची मार्ग क्रमणा करु लागतो. काय करायचे हे शिष्याला माहित नसते तर गुरू हताला धरुन नेत असताना काहीच अडथळे शिष्याला अडवत नाहीत, कमतरता गुरू शिष्याला सक्षम करीत दूर करतात. अनेक जन्माच्या पुण्याईने सत् गुरू ची प्राप्ती होते. सहप्रवस अनुभव अद् भूत असतो हे एकनाथी भागवत वाचताना एकनाथ महाराज श्रोत्यांना वारंवार सांगत असतात.

Nayana Soman
Nayana Soman
1 month ago

खूपच छान उदाहरणे सांगितली आहेत

Language