सुंदर कांड (१)

सुंदर कांड (१)
सुमेधा बापट
  • July 18, 2026
  • 1 min read

याचा नायक हनुमंत! त्याने लंकेत प्रवेश केला, सीतेचा शोध घेतला,लंका दहन केले या सगळ्या पराक्रमाचे वर्णन यात आहे. हा सगळा पराक्रम सुंदर, लंका सुंदर ,सीता सुंदर यासाठीच हे सगळं सुंदर!! सीतेसाठी रामाने मारुतीरायाजवळ एक रामनाम असलेली सुंदर मुद्रिका दिली होती. अशा या सुंदरकांडात समर्थांचे आराध्य श्रीराम ,त्यांचा दास असलेल्या हनुमानाच्या पराक्रमाचे वर्णन आहे. सुंदर अशा सीतेचा शोध घेताना हनुमानाने केलेल्या अप्रतिम पराक्रमाची सुंदर कथा यात आहे. यामुळेच सीतेबद्दलची वार्ता श्रीरामांपर्यंत पोहोचली राम- लक्ष्मण,वानर सर्वांनाच आनंद झाला. आणि म्हणून ही सुंदर वार्ता.

समर्थांनी त्या काळाच्या मरगळलेल्या समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आणि त्यांना परकीय सत्तेबद्दल तीव्र क्रोध निर्माण करण्यासाठी म्हणूनच सुंदरकांड लिहिले असावे. समर्थांच्या या सुंदरकांडामध्ये हनुमंताचा फक्त पराक्रमच वर्णन केला आहे ते यासाठीच असावे. सुग्रीवाने वानरांचे गट करून त्यांना सर्व दिशांना पाठवले होते. सगळीकडून सीता सापडली नाही असे म्हणतच सगळे वानर समुद्रतीरावर जमले. सगळे खजिल झाले होते. म्हणू लागले…

न लागे सिताशुद्धि तेव्हा मरावे || पण हनुमंत म्हणतो

वीर हो स्थिर बैसा l तिन्ही लोक पाहून येतो तमासा ||

जांबुवंत त्याला म्हणतात – हनुमंता, तू कसा रे जाणार पण!! हा एवढा समुद्र आहे ना मध्ये!!! अनेक योजने उड्डाण करणारा मारुतीचा मात्र आपल्या शक्ती,बुद्धीवर विश्वास होता. त्याने उड्डाण केले. वाटेत जाताना अनेक अडथळे आले. पण काही त्याची परीक्षा पाहण्यासाठी आणि काही खरोखर अडचण निर्माण करायला. पण बुद्धी शक्ती आणि त्याला प्राप्त असलेल्या सगळ्या सिद्धी या सगळ्याच्या बळावर हनुमंत रावणाच्या लंकेच्या तटापाशी आले. तिथे पहारा होताच. मग अगदी लघु रूप धारण करून मारुतीराय लंकेत गेले. लंकेचे त्याने त्रिकूटावर बसून निरीक्षण केले. तिथले रस्ते, बाजार, जनजीवन सर्व काही पाहिले. त्याचबरोबर सैन्य किती आहे, त्याचं बल कसे आहे याचाही त्यांनी अंदाज घेतला. आपले परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणतात उत्तम राजदूत कोण? तर हनुमंत आणि श्रीकृष्ण!! मारुती लघुरूप घेऊन सर्वत्र हिंडत होता लंकेतील घरे, गोपूरे, धर्मशाळा, बंदीशाळा हे सगळं पाहिलं त्यांनी. बंदीशाळेतल्या देवाना पाहिले. त्यांना आला राग, मनामाजी आवेश तो थर्थरीला|| असं समर्थ वर्णन करतात. पण आत्ता सीतेला शोधायचे आहे हा त्यांचा निश्चय होता. डोळ्यासमोर दिसणाऱ्या घटनांमध्ये, मनात येणाऱ्या विचारांमध्ये वाहून जायचं नाही हेच यातून शिकायचंय आहे. बंदीशाळेतल्या देवांबद्दल समर्थ म्हणतात –

हिणासारीखे देव ते दीन जाले ||

नसे शक्तीं ना युक्ती पोटी गळाले ||

भयभीत ते कांपती दैन्यवाणे ||

समर्थांचा काळ विचारात घेतला तर हे देव म्हणजे समाजातील सज्जन, सत्वगुणी माणसे. पण तीच दीनवाणी झालेली होती. राज्य परक्याचे होते. तो परका म्हणजे रावण. समाजात योग्य पद्धतीने वावरायला शक्तीयुक्ति दोन्ही तर लागतच तरच प्रगती होते. उच्चपद, स्थान, प्रतिष्ठा श्रीमंती मिळते. सुंदर कांड लिहिण्याचा हेतू आपण इथे लक्षात घेऊ शकतो – जनतेला काय सांगायच आहे 

यातून — उठा, जागे व्हा,आपली मरगळ झटकून आत्मविश्वास जागा करा. मारुतीने आपला देह लोकांना दिसणार नाही फक्त शेपूट तेवढे दिसेल असे केलं होते. ते पुच्छच त्याने बरेच वाढवले आणि मग घराघरातून, अंतरगृहातून ते पुच्छ घालीत पाडापाडी करीत पाण्याची भांडी त्याने फोडून सगळे पाणी सांडून टाकले . त्याने पहिले की शेपटी सर्व वाटा अडवते आहे. मग त्याने सगळ्यांना बांधून उंच उडवून आपटले.गुरे, शटके , राक्षस यांनाही आपले पुच्छ त्यांच्या पायात घालून पाडले. जो कोणी मध्ये येईल त्याला पडत होता मारुती. आता प्रश्न असा पडतो की त्याच्या शेपटीत एवढी शक्ती आली कशी? तर मारुती हा ११ वा रुद्र तो तर ब्रह्मचारी मग पार्वती बरोबर कशी जाणार? मग ती शिरली शेपटीत आणि ती तर आदिशक्तीच! मग राक्षस आरडाओरडा करत परस्परांना हाका मारत होते .परंतु उपयोग होतच नव्हता. या प्रकाराने रावणाला वाटलेच पाहिजे की एकटा वानर एवढं करतो तर मग सगळी वानर सेना आली तर काय करेल? 

इतकी दहशत त्याने सर्वांच्या मनात बसवली. अंधार पडला तरी पुच्छ वळवळत सर्पाप्रमाणे धुडगूस घालतच होते. भय निर्माण करत होते. राक्षस, लंकेचे रहिवासी रावणाला जाऊन सांगू लागले म्हणू लागले या त्रिकूटाचलात अनेक सर्प अचानक आले आहेत. सर्पच आहेत की आणखी काही आहे ते मात्र काही कळत नाही. पण असे रावणाला सांगत असतानाच … 

सभा मंडपी पुच्छ तेथेची आले.

मारुतीने मग दिवे पाडीले दिवटे आपटीले ||

मग सर्वत्र अंधार झाला. पण रामकृपेने मारुतीला मात्र दिसत होते. मारुतीच्या पुच्छाने कोणाची वस्त्रे फाडली, कोणाला गुदगुल्या केल्या, कोणाचे मुख, कान, नाक छेदून टाकलं. सगळेच घाबरले .. मग मारुती वळला रावणाकडे . त्याचा मुकुट पाडला वस्त्रे फाडली ,आभूषणे तोडून चुरा केला.  जणू काही रावणाच्या सगळ्या वल्गनाना त्याने उत्तरच दिले. संपूर्ण सभा मंडपात हाहा:कार माजला. असंख्य राक्षस पुन्हा दिवट्या घेऊन आले पण सभेतील सर्वजण वस्त्रे फाटून गेल्यामुळे नग्न झाले होते. मग वस्त्रे आणली गेली. पण मनामाजी लज्जित कोणी न बोले || 

मग मारुती अशोक वनात गेला. सीतेला ओळखायचं कसं? त्याने तर आधी कधी पाहिले नव्हतं पण तिथे रावण आला होता आणि दोघांचा संवाद चालू होता . हनुमंताने झाडाच्या पानांमध्ये लपून  सगळा संवाद ऐकला त्यावरून ही सीताच आहे .रामाचे गुणगान गाते आहे आणि रावणाचा तिरस्कार करते हे त्यांने ऐकलं (आणि असंही सांगतात की तो आला तेव्हा सीता रामनामात दंग होती त्यामुळे आजूबाजूच्या वृक्षांमधूनही रामनाम ऐकू येत होता) आणि म्हणून त्याला सीता ओळखू आली. रावण परत फिरल्यावर हनुमानाने राम मुद्रिका सीतेसमोर टाकली,. सीतेने ती ओळखली , आनंद व्यक्त केला. मारुतीलाही आनंद झाला. त्याला भूक लागली होती. मग त्याने अशोक वनात सुंदर वृक्ष होते. ते फळांनी लगडलेले होते , त्याने वृक्ष हलवून फळ पाडली आणि ती खाल्ली. पण हलवताना झाडे उन्मळून पडली आणि सगळ्या अशोक वनाची वाताहात, नासधूस झाली. असंख्य राक्षस धावून आले. त्याला मारू लागले. 

मारिता भागले भग्न झाले ||

पुढे देखता जम्बुमाळी कुटीला|| बळे आखया आपटीला पिटीला ||

आखया म्हणजे अक्षय – रावणपुत्र आणि जम्बुमाळीं हा रावणाचा ज्येष्ठमंत्री. शेवटी रावणाने मारुतीचा हा हैदोस थांबवण्यासाठी ब्रह्मदेवाला बोलावलंय तो ब्रह्मदेवाला म्हणतो – म्हणे जाय रे आणि वेगी कपिला|| तया नाणीता शिघ्र ताडीन तुला || ब्रह्मदेवाने वनात येऊन मारुतीची स्तुती केली त्याला नमस्कार केला, आणि म्हणाला दयाळा कपि ये घडी शांत व्हावेl मारुती मग शांत झाला. शांतपणे रावणाच्या दरबारात आला.

(क्रमश:)

4.5 2 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
9 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Vijay lad
Vijay lad
1 month ago

छान माहिती

प्रदीप कपाळे
प्रदीप कपाळे
1 month ago

सुंदर च सुंदरकांड

सौ मगला अजित कवठेकर
सौ मगला अजित कवठेकर
1 month ago

*श्रीराम*🙏
सुंदर कांडातील सर्व *सुंदर* बाबतचे विवेचन सुंदरंच. पुढील विवेचनाबाबतची उत्कंठा वाढली आहे.
॥जय जय रघुवीर समर्थ॥🙏

मंजुषा केंभावी
मंजुषा केंभावी
1 month ago

अतिशय सुंदर ओघवती भाषा. पुढील भागाची आतुरतेने वाट बघत आहे. धन्यवाद ताई!

Shubhada Thite
Shubhada Thite
1 month ago

जय श्रीराम
मारुतीरायांनी केलेला पराक्रम, शत्रू गोटात जाऊन धडा शिकवला…… धुरंधर

Joshi prakash ramrao
Joshi prakash ramrao
1 month ago

सुंदरकांड बद्धल संपूर्ण माहिती मिळाली. सुंदरकांड खरोखच सुंदर आहे. 🙏🙏

Nayana Soman
Nayana Soman
1 month ago

खूपच छान माहिती

सुभाष साने
सुभाष साने
1 month ago

सुंदर कांडा चे छान विवरण.मारुती रायाचा शक्ती आणि युक्ती यांचा संगम व पराक्रम यांचं सुंदर वर्णन. पुढील भागाची वाट पाहत आहोत

Bhagyashri sane
Bhagyashri sane
1 month ago

सुंदर कांडाचा सुंदर विवेचन

Language