समर्थांचा भक्तीमार्ग – भाग ५ पादसेवन भक्ती

समर्थांचा भक्तीमार्ग – भाग ५ पादसेवन भक्ती
श्री. अनिल वाकणकर
  • July 4, 2026
  • 1 min read

समर्थांचा भक्तीमार्ग या लेखमालेमध्ये आपण समर्थांनी सांगितलेला भक्तीमार्ग समजून घेत आहोत. आता या लेखांत आपण पादसेवन भक्ती विषयी जाणून घेऊ या. पादसेवन भक्तीची व्याख्या सांगताना समर्थ म्हणतात,

 “पादसेवन तेंचि जाणावें। काया वाचा मनोभावें | सद्गुरूचे पाय सेवावे। सद्गतिकारणें।।४-४-२।।

या नांव पादसेवन। सद्गुरुपदीं अनन्यपण। निरसावया जन्ममरण। यातायाती।।४-४-३।।”


मोक्षप्राप्तीसाठी कायावाचा मनोभावे अहंकार रहित होऊन सद्गुरूंच्या पायाशी बसून सद्गुरूंची सेवा करणे म्हणजे पादसेवनभक्ति होय. जन्ममरणाच्या फेर्‍यातून कायमची सुटका व्हावी, या हेतूने सद्गुरूपदी अनन्यशरण होऊन सेवा करणे म्हणजे पादसेवनभक्ति होय. सद्गुरूकृपेशिवाय हा भवसागर तरून जाण्याचा दुसरा मार्ग आढळत नाही, म्हणून तत्परतेने सद्गुरूपदी सेवा करावी. पादसेवन भक्ती ही नवविधा भक्ती मधली चौथी भक्ती आहे. दासबोधात समर्थांनी  यासाठी पादसेवन भक्ती निरूपण असा समास सांगितला आहे, त्यामध्ये ते म्हणतात, 

“जें अभ्यासें अभ्यासितां नये।जें साधनें असाध्य होये।

तें हें सद्‍गुरुविण काये।उमजों जाणे।।४-४-२०।।

याकारणें ज्ञानमार्ग।कळाया धरावा सत्संग।

सत्संगेंविण प्रसंग।बोलोंचि नये।।४-४-२१।।

सेवावे सद्गुरूचे चरण।या नांव पादसेवन ।

चौथे भक्तीचें लक्षण।तें हें निरोपिलें।।४-४-२२।।”

ज्याची संगत करावी त्याचे गुणदोष आपल्याला हमखास चिकटतात असा अनुभव येतो. म्हणून तर ‘ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला’ अशी म्हण मराठीत प्रसिद्ध झाली. ज्याला स्वानंदसुख हवे असेल त्याने, ज्याचे आचार, विचार, उच्चार भगवंताच्या प्रेमाने उचंबळून वहात आहेत अशा संताची संगत धरावी. सदासर्वकाळ जो भगवंताच्या दिव्य आनंदात डुंबत असतो, ज्याला प्राणीमात्रांविषयी असीम कळवळा असतो अशा संत-सद्गुरूची संगत माणसाने धरावी. या सद्गुरूपाशी निर्लेप आपलेपणाने आपला देह त्याच्या सेवेसाठी ठेवून, आपले मन त्या सद्गुरूकडून येणार्‍या सूचनांचे ग्रहण करण्यास सदैव तयार ठेवावे. या तीन गोष्टी एकत्र आल्या की दुर्मिळ अशी पादसेवन भक्ति घडते.

ज्याला स्वस्वरूपाचे ज्ञान करून घ्यायचे आहे, त्याने सत्संग धरला पाहिजे. दिवरात्र अभ्यास करून जे शिकायला मिळत नाही ते सत्संगामध्ये सहज आकलन होते. कारण येथे नुसती थिअरी नसते तर दैनंदिन जीवनात ते ज्ञान आचरणात आणले जाते. माणूस म्हणेल मी कठोर साधना करेन, तपस्या करेन आणि प्राप्त करेन ! परंतु गुरूप्रचिती शिवाय खरे ज्ञान प्राप्त होत नाही. फार तर तंत्र समजेल परंतु परिपूर्ण ज्ञान मिळणार नाही. याकरीता सद्गुरूंच्या सानिध्यात राहून, त्यांची सेवा करून, त्यांच्याशी प्रश्नोप्रश्न करून ते ज्ञान मिळवावे लागते. भगवद्गीते भगवंत म्हणतात, 

“तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया ।

उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः।।४-३४।।”

हे सर्व पादसेवन भक्तीनेच शक्य आहे. या श्लोकावर भाष्य करताना स्वामी स्वरूपानंद, अभंग ज्ञानेश्वरीत म्हणतात, 

“बरवें तें ज्ञान।प्राप्त व्हावें ऐसी। उत्कंठा मानसीं।असे जरी।।२८७।।

तरी सर्वभावें।भजावें संतांसी। माहेर ज्ञानासी। होती जे का।।२८८।।

तेथें सेवा हा चि।’दारवंठा जाण। करावा स्वाधीन।दास्यभावें।।२८९।।

तन-मन-जीवें।चरणीं लागावें। दास्य तें करावें।नम्रपणें।।२९०।।

विचारितां त्यांसी।मग ‘अपेक्षित। तें चि कृपावंत।सांगतील।।२९१।।

पार्था गुरुवाक्य।पडतां श्रवणीं। अखंड उन्मनी।आत्मबोधें।।२९२।।”


पादसेवन म्हणजे शब्दश: चरणसेवा असाच अर्थ घेता येणार नाही. अर्थात पादसेवन भक्तीमध्ये याचा भाग महत्त्वाचा आहे हे निश्चितच. पण हा फार वरवरचा अर्थ झाला. सद्‌गुरूंनी ज्या मार्गाने वाटचाल केली त्या मार्गाचे अनुसरण करून सद‌गुरू कृपेने परिपूर्ण होणे, याला पादसेवन भक्ती म्हणतात. काया, वाचा, मनोभावे सद्‌गुरूचे पाय सेवावे. कायेने सेवा करणे म्हणजे सद‌गुरूंच्या सहवासात राहून आपली देहबुदी सोडून देणे. देहभावाचे विस्मरण हे सर्वश्रेष्ठ कायिक पादसेवन आहे. सदगुरूंनी जो मंत्र दिला आहे त्या मंत्राचा सतत उच्चार करीत रहाणे याला वाचेने पाद‌सेवन म्हणतात. आपल्या वाणीने कुणाचेही अंत:करण न दुखावणे, कोणाचीही निंदा न करणे हे वाचिक पादसेवन होय. मनाने अखंड सद्‌गुरूंचे चिंतन करित रहाणे, मानसपूजेद्वारे सदगुरूंना सदेह रुपाने कल्पिणे व त्यांची सेवा करणे याला मनाने चरणसेवा म्हणतात. मनाने पादसेवन भक्ती कशी करायची याचे मर्म ज्ञानेश्वर महाराज सांगतात, 

“तू मन हे मीची करी।माझिये भजनी प्रेम धरी।

सर्वकाळ नमस्कारी।मज येकाते।।ज्ञा. ९-५१७।।”

सद्‌गुरुपदी अनन्यपण म्हणजे सद्‌गुरूंचे मन आणि शिष्याचे मन या दोन गोष्टी अस्तित्वात असता कामा नये. शिष्याने आपली इच्छा बाजूला सारून सद्‌गुरूंची इच्छा तीच आपली इच्छा समजावी. मन हे इच्छेचेच प्रतिक, ते सद्‌गुरूंच्या इच्छेत विलिन करावे. पादसेवन भक्तीने काय साध्य होते याचा विचार आता आपण करूया. सद्गुरू सद्वस्तूचे दर्शन घडवितात, असार माया व सार ब्रह्म यांचा सुस्पष्ट निवाडा करून परब्रह्माचा साक्षात्कार घडवितात. परब्रह्माचे निश्चित ज्ञान अंतःकरणात ठसवितात. जी सद्वस्तू डोळ्यांनी पहाता येत नाही, मनाला सद्वस्तू भासत नसल्यामुळे, सद्वस्तूचे मनाने आकलन होत नाही, ‘मी व माझे’ हा संगत्याग केल्याशिवाय ब्रह्मानुभव येत नाही. संग याचा अर्थच मुळी ‘वस्तूला मनाने चिकटणे’ असा आहे. संगत्याग म्हणजे दृश्य वस्तूंच्या बंधनातून मन मोकळे करुन त्या मनास सद्वस्तूशी चिकटवणे किंवा मनास भगवंताकडे वळवणे होय. 

संगत्याग म्हणजे भगवंताशिवाय मन इतर कोणत्याही वस्तूला न चिकटणे होय. ‘मी अनुभव घेतो’ ही जाणीव जोपर्यंत असते तोपर्यंत ज्ञाता आणि ज्ञेय यांच्या वेगळेपणामुळे दृश्याशी संबंध राहून संगत्याग होत नसतो. दृश्य विलीन होऊन ‘मी’ नाहीसा होतो. ज्ञेय आणि ज्ञाता दोन्ही नाहीसे होतात. या अवस्थेत ‘मी अनुभव घेतो’ ही जाणीव उरत नाही. हे फक्त जो स्वानुभवी आहे त्यालाच बरोबर कळेल, इतरांना तो शब्दांचा गोंधळ वाटेल, गथागोवी वाटेल. असा हा स्वानुभव सद्गुरूंच्या जवळ असतो. सद्गुरूंच्या संगतीत राहिल्याने तो अनुभव आपल्याला देखील यावा यासाठी ते आपल्याला मदत करतात. त्याचे गुपीत सांगतात. 

आपली मन, बुद्धी आणि इंद्रिये ही दृश्य विश्वात वावरत असल्याने जीव या सर्व दृश्य वस्तूंना चिकटलेला असतो, त्याचा संग त्याला लागलेला असतो. तो संग सुटल्याशिवाय आत्मसाक्षात्कार शक्य नसतो. संगत्याग आणि आत्मनिवेदन या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत असे म्हणता येईल. एकदा सदगुरूंना अनन्य भावाने शरण गेल्यावर, त्यांना देहबुद्धी सोडून पूर्णपणाने समर्पित झाल्यावर त्या शिष्याची चिंता सद्गुरूंना लागते. ते आपल्या शिष्याला हर प्रयत्नाने योग्य मार्गावर आणतातच. भगवद्गीतेत भगवंत म्हणतात, “अनन्याश्चिन्तयन्तो मां” सद्गुरू हे परमात्मस्वरूच असतात. म्हणूनच आपल्या शिष्याच्या योगक्षेमाची चिंता ते वहातात. याकरीता संत संग अर्थातच पादसेवन भक्ती महत्वाची आहे. 

 

पुढील लेखांत आपण अर्चन भक्तीचा विचार करूया. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पण.


।।जय जय रघुवीर समर्थ।।

3 3 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
मीरा इनामदार
मीरा इनामदार
22 days ago

अनिलदादा ,
गुरू मार्गाचे अनुसरण, अनन्य भाव, संग त्याग आणि अभंग ज्ञानेश्वरीतील संदर्भ देऊन पादसेवन भक्तीचे छान विवेचन..!

Language