समर्थांचा भक्तीमार्ग लेख ३ रा (कीर्तन भक्ती)

समर्थांचा भक्तीमार्ग  लेख ३ रा (कीर्तन भक्ती)
श्री. अनिल वाकणकर
  • June 6, 2026
  • 1 min read

आतापर्यंतच्या लेखांत आपण भक्तीविषयी विवरण पाहिले. त्यानंतर दुसऱ्या लेखांत श्रवणभक्ती विषयी जाणून घेतले. आता या लेखांत आपण दुसरी भक्ती, कीर्तन भक्ती समजून घेऊया. समर्थ संप्रदायामध्ये कीर्तनाला प्रथम स्थान दिले आहे. संप्रदायाच्या चतु:सूत्रीमध्ये म्हटले आहे, 

मुख्य हरिकथा निरूपण । दुसरें तें राजकारण ।

तिसरें ते सावधपण । सर्वविषईं || ११-५-४ ||

कीर्तन या विषयावर दासबोधामध्ये ४-२, १४-४, १४-५ असे तीन समास सांगितले आहेत. 

नामदेव महाराज म्हणतात, नाचूं कीर्तनाचे रंगीं । ज्ञानदीप लावूं जगीं || …. तुकाराम महाराज म्हणतात, जेथें कीर्तन हें नामघोष | करिती निर्लज्ज हरीचे दास | सकळ वोथंबले रस | तुटती पाश भवबंधाचे ||२|| 

पंचसमासी मधील भक्तिसाधन या समासामध्ये समर्थांनी कीर्तन भक्तीची व्याख्या आणि उद्देश सांगितला आहे. 

सगुण सर्वोत्तमाचें ध्यान । करावें गुणानुवादकीर्तन ।

हरिकथानिरूपण । करीत जावें || या नांव दुसरी भक्ती ||

कीर्तन भक्तीमध्ये नारदमुनींना आदर्श मानले गेले आहे. कीर्तनामध्ये सर्वसाधारणपणे नारदीय कीर्तन हा प्रकार जास्त प्रसिध्द आहे. त्या खालोखाल वारकरी संप्रदायामधील कीर्तन प्रसिध्द आहे. स्वत:च्या जीवनात बदल घडावा या पवित्र हेतूने श्रवण केले, म्हणजे एकचित्ताने अवधान देणे शक्य होते. एकचित्त याचा अर्थ सांगणारा व ऐकणारा या दोघांचे चित्त एकमेकांशी मिळावे लागते. मनात सांगणाऱ्याबद्दल आदर असावा. वक्त्याला देखील श्रोत्याच्या मनात भगवंताबद्दल प्रेम, भक्त्ती निर्माण होईल अशी तळमळ असावी. ऐकणारा, सांगणारा हे दोन घटक सर्वात महत्वाचे असून अध्यात्मविद्येची फळश्रुती या दोघांवरच अवलंबून आहे. गुरुमुखातून जेव्हा नित्य श्रवण घडते, जो आनंद आपल्याला प्राप्त झाला, तो सहजच इतरांनाही प्राप्त व्हावा, असे वाटणे यातच कीर्तनभक्तीचा उगम होतो, प्रवेश होतो. 

भरपूर श्रवण झाले, त्या श्रवणाचा मला फायदा झाला, तर तो दुसऱ्या कोणाला तरी सांगावा असे वाटणे आणि त्याप्रमाणे तो आपल्या वकुबाप्रमाणे सांगायचा प्रयत्न केला, तर ती कीर्तन भक्ती होते. कीर्तन करणे म्हणजे अगदी साथसंगतीसह कथा सादर करणे नव्हे! परमपूज्य आक्कांनी त्यांच्या ‘दासबोध माझे माहेर’ या छोट्या पुस्तकांत नवविधा भक्ती साधेपणाने आणि सहज कशी करावी ते सांगितले आहे. सहजस्फूर्तपणाने भगवंताचे गुणगायन, त्याच्या जोडीला भगवंताच्या लीला सांगितल्या तर ते कीर्तन होते, असे त्या म्हणतात. परंतु, मला ज्ञान मिळाले, माझे त्या ज्ञानाने कल्याण झाले, तर ते ज्ञान दुसऱ्याला द्यावेसे वाटले व ते दिले, ऐकणाराने ते घेतले किंवा नाही हा भाग अलाहिदा. परंतु समर्थांनी म्हटल्याप्रमाणे, 

आपण येथेष्ट जेवणें । उरलें तें अन्न वाटणें ।

परंतु वाया दवडणें । हा धर्म नव्हे ।।१२-१०-१ ।। किंवा

तैसें ज्ञानें तृप्त व्हावें । तेंचि ज्ञान जनास सांगावें ।

तरतेन बुडों नेदावें ।।बुडतयासी ।।१२-१०-२।।

कीर्तन हे भगवंताच्या प्रसन्नतेसाठी, श्रोत्यांच्या मनात भगवंताबद्दल प्रेम उत्पन्न होईल त्यासाठीच करावे. 

लाज सांडून जनाची । आस्था सांडून धनाची ।

नीच नवी कीर्तनाची । आवडी धरावी ।।१४-५-१६ ।।

कीर्तन निस्पृहपणे करावे, पैशासाठी किंवा लोकांना खूष करण्यासाठी किंवा फक्त मनोरंजन करण्यासाठी कीर्तन करू नये. 

मन ठेऊन ईश्वरीं । जो कोणी हरिकथा करी ।

तोचि ये संसारीं । धन्य जाणा ।।१४-५-३७।।

असे भगवंताच्या ठिकाणी मन लावून कीर्तन करणारा या संसारात, जगात, धन्य समजावा, कारण कीर्तनाने त्याच्या ठिकाणी असणारे अनेक दोष नाहीसे होतात. मुखात हरिनाम असते. कीर्तनात मन भगवंतमय होऊन जाते. कीर्तनाने एकाग्रता साधते, सगळे लक्ष भगवंताकडे असते, भगवंताबद्दल विश्वास निर्माण होतो, पवित्र होतो, भगवंताचा निश्चय होतो, अनेक प्रकारचे संदेह नाहीसे होतात, अशा प्रकारे कीर्तनाने दोष नाहीसे होतात. 

उत्तम कीर्तन कसे करावे, त्याची रचना कशी असावी, कथानक कसे असावे, एकूणच कीर्तनाचा आराखडा कसा करावा याचे सविस्तर मार्गदर्शन समर्थांनी केलेले आढळते. त्या मार्गदर्शनाचा लाभ नवीन कीर्तनकारास तर होईलच, परंतु जे अनेक वर्षे कीर्तन करतात त्यांना देखील या समासाचे मनन केले तर काहीतरी नवीन मिळत राहील. समर्थांनी पुढील मार्गदर्शक मुद्दे या समासात सांगितले आहेत.

१. भगवंताच्या निरनिराळ्या सगुणरुपांचे, त्यांच्या अवयवांचे, त्यांच्या आभूषणांचे वर्णन कीर्तनात करावे. 

२. आपण भगवंताच्या कोणत्या अवतार मूर्तीसमोर कीर्तन करतो आहोत याचे भान ठेवून त्या अवताराच्या कथा सांगाव्यात.

३. भगवंताचा अतुल पराक्रम, त्याचे यश, त्याची किर्ती, त्याचा प्रताप याचे वर्णन कीर्तनात असे करावे की ते ऐकून श्रोत्यांचा भगवंताविषयीचा भाव जास्त वाढेल. 

४. कथा सांगताना त्यामध्ये सुसंगती असावी. कथेच्या दरम्यान शब्दांवर कोटी करावी, भगवंताच्या नामाचा गजर करावा, त्या नामस्मरणांत श्रोत्यांना टाळ्या वाजवत सहभागी करुन घ्यावे. कथेच्या दरम्यान त्या कथेला, त्या प्रसंगाला अनुसरुन काल्पनिक कथा, सत्य कथा सांगाव्यात. 

५. कीर्तनादरम्यान टाळ, मृदंग, गायन, नृत्य, तानाबिना यांचाही समावेश करावा मात्र कथेचे सूत्र सुटणार नाही याची काळजी घ्यावी.

६. कथा सांगताना करुणरसाचा पूर वाहील असे पहावे. त्यायोगाने श्रोते कथेमध्ये पूर्ण रंगून जातील असे बघावे. कथेमध्ये सात्विक भाव वाढेल अशी कथा सांगावी. कीर्तनामध्ये सर्व रस असावेत परंतु ते सात्विक रसाला बाधा आणणार नाहीत इतपत असावेत. त्या सर्व रसांमुळे कथेची गोडी वाढावी परंतु त्यामुळे कथेला बाधा येता कामा नये. 

७. गायन कलेचे ज्ञान असावे. 

८. चारित्र्य शुद्ध असावे, कीर्तन करताना स्त्रियांचे वर्णन करू नये. 

९. कीर्तनकाराने आपले ज्ञान अद्ययावत ठेवावे. 

१०. मुख्य म्हणजे भगवंताविषयी कीर्तनकाराला प्रेम असावे.

समर्थांनी कीर्तन कसे नसावे हे देखील स्पष्ट केले आहे, ते म्हणतात, कीर्तन करताना सगुणाच्या प्रतिपादनामध्ये निर्गुण आणू नये. आपल्या समोर बसलेल्या श्रोत्यांचे गुणदोष काढू नये. आपली शांत आणि संयमी वृत्ती सोडू नये. समाजाला जे प्रिय असेल त्याऐवजी हितकर असेल ते बोलावे. कीर्तनकाराने आत्मप्रौढी करू नये. कीर्तनात स्त्रियांचे अवाजवी वर्णन करू नये. कीर्तनात रागदारी, नृत्य हे सर्व असावे परंतु त्याच्या आहारी जाऊन त्यालाच प्राधान्य देऊ नये.  

समर्थ संप्रदायातील कीर्तन भक्तीचे अप्रतिम उदाहरण म्हणजे समर्थशिष्या संत वेण्णास्वामी. उदात्त कीर्तनसेवेतून वेण्णास्वामी सद्‌गुरुचरणी लीन झाल्या. पूर्णविराम पावल्या. त्याचप्रमाणे समर्थांचे पहिले शिष्य उध्दवस्वामी देखिल कीर्तनभक्तीमध्ये अग्रगण्य होते. स्वत: मारूती त्यांचे कीर्तनात टाळ वाजवीत नाचत होते. समर्थ त्यांच्या स्फुट अभंगामध्ये म्हणतात, 

ज्याचे पाय हो नमावे | त्याचे कीर्तन हो ऐकावे ||१||

दुजियांसी सांगे कथा | आपण वर्ते त्याची पंथा ||२||

कीर्तनाचे न करी मोल | जैसे अमृताचे बोल ||३||

सन्मानिता नाही सुख | अपमानिता नाहीं दुःख ||४||

किंचित दिले दातयाने | तेहि घेत आनंदाने ||५||

ऐसा आहे हरिदास | लटके न वदे रामदास ||६||

अशा तऱ्हेने सद्गुरूंच्या आशिर्वादाने आणि प्रेरणेने सादर केलेली ही लेखन सेवा सद्गुरूंना समर्पित..

||  जय जय रघुवीर समर्थ ||

3.6 8 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
anand joglekar
anand joglekar
1 month ago

लेख आवडला

सुनिता बिवलकर
सुनिता बिवलकर
1 month ago

खूप सुंदर! दासबोधातील ओव्यांचा दाखला देत कीर्तन भक्ती छान समजावून सांगितली आहे. अगदी मुद्देसूद आदर्श! धन्यवाद 🙏🌹🙏

Language