आपण श्रीसमर्थांनी शिष्यांना लिहिलेली पत्रं बघणार आहोत. श्रीसमर्थांचे पहिले पत्र पंचवटीच्या रामोपासकांना आहे. या पत्रात देखील पत्राची प्रस्तावना नाही किंवा शेवटी सही केलेली नाही. श्रीसमर्थ टाकळीला उपासनेकरता बारा वर्ष राहिले होते, तेव्हा ते पंचवटीला म्हणजेच नाशिकला काळाराम मंदिरात प्रवचन, कीर्तन ऐकण्यासाठी जात. तसेच जवळच रहाणाऱ्या ब्रह्मवृंदांकडून वेद, उपनिषद, रामायण, महाभारत, पुराण, गीता, इ. ग्रंथ घेऊन अभ्यास करत. या सगळ्यांना उद्देशून श्रीसमर्थांनी हे पत्र पाठवले आहे. श्रीसमर्थांच्या बरोबरीचे, उपासना करणारे; त्यांच्यापेक्षा मोठे; ज्येष्ठ मंडळी या सगळ्यांना उद्देशून हे पत्र आहे. आता पत्र बघू.
“जनस्थान गोदातटी।परमपावन पंचवटी।
जेथे पडली कृपादृष्टी।रघोत्तमा रामाची।।१।।
तेथील राम उपासक।त्यांच्या सेवकांचा सेवक।
तुम्हांमध्ये मी येक रंक।सरते करावे।।२।।
तुम्ही निकट देवापासी।आणि मी पडलो दुरदेशी।
कृपाळुपणे रघुनाथाशी।माझी करुणा भाकावी।।३।।
म्हणावे ते अनाथ।समर्था तू दीनानाथ।
म्हणावे ते पतित।तू पतित पावनु।।४।।
म्हणावे ते परम किंकर।देवा तूं करुणाकर।
म्हणावे ते निराधार।आधार इच्छी।।५।।
सत्यमिथ्या तुझा म्हणावी।तयाची चिंता असो द्यावी।
ऐसी हे करुणा करावी।नाना प्रकारी।।६।।
तुम्हां दासांमध्ये मी हीन।माझे कोट्यावधी अवगुण।
परंतु आहे अनन्य।सेवक रघुनाथाचा।।७।।
पुढें म्यां ऐसेचि असावे।माझे मन न पालटावे।
इतुके देवाशी मागांवे।तुम्ही बंधुवर्गी।।८।।
प्रत्यही माझा नमस्कार।देवाशी करावा निरंतर।
मजकारणे शरीर।इतुकें कष्टवावे।।९।।
बालवृद्ध नरनारी।सकळ भक्त कुमार कुमारी।
समस्तांसी नमस्कारी।कृष्णातीरवासी।।१०।।
शुद्ध उपासना विमल ज्ञान।वीतराग आणि ब्राह्मण्यरक्षण।
गुरुपरंपरेचे लक्षण।शुद्ध मार्ग।।११।।
ऐसे हे पंचधा बोलीले।इतुकें पाहिजे यत्ने केले।
म्हणिजे सकलहि पावले।म्हणे दासानुदासा।।१२।।”
हे पत्र बरेच मोठे आहे. श्रीसमर्थ आपली कृतज्ञता या पत्रातून व्यक्त करतात. बारा वर्ष जे उद्बोधन त्यांना ऐकायला मिळाले व जो अभ्यास करताना त्यासाठी ज्यांनी मदत केली, त्या सगळ्यांचे व तेथील काळाराम यांच्याबद्दल श्रीसमर्थांच्या मनात अत्यंत आदरभाव, प्रेम व भक्ती, विश्वास व शरणागती आहे. म्हणूनच या पत्रात ते हे सर्व व्यक्त करतात. आता पत्र बघू.
जनस्थान नाशिकला जनस्थान म्हणण्याची जुनी पद्धत आहे. रामायणामध्ये या भागाला जनस्थान असे म्हटले आहे. परमपावन पंचवटी या जनस्थानामध्ये गोदावरी काठी जे काळारामाचे मंदिर आहे त्याला पंचवटी असे म्हणतात. श्रीसमर्थ म्हणतात, या पंचवटीवर रघुत्तमाची कृपादृष्टी आहे. रामायण काळात असा उल्लेख आहे की या भागात श्रीराम, लक्ष्मण व सीतेसह काही दिवस राहिले आहेत. त्यांची पर्णकुटी या भागात होती व तेथे त्यांनी वास्तव्य केले होते. आपल्याला ही रामकथा माहिती आहे.
दुसऱ्या ओवीमध्ये श्रीसमर्थ म्हणतात, अशा रामाचे जे उपासक आहेत, म्हणजेच तेथे नित्यनेमाने प्रवचन, कीर्तन, अभ्यास करणारे, दर्शनाला येणारे हे सगळे त्या रामरायाचे सेवक आहेत व ते श्रेष्ठ आहेत कारण त्यांना रामरायाचे नित्यनेमाने दर्शन होते.
तिसऱ्या ओवीमध्ये श्रीसमर्थ म्हणतात, तुम्ही सगळेजण भाग्यवान आहात, कारण तुम्ही देवाजवळ रहाता. मी मात्र कृष्णातीरी दूर येऊन पडलो आहे. याचाच अर्थ श्रीसमर्थांनी चाफळला रामरायाची स्थापना केल्यानंतर हे पत्र नाशिकला पाठवले असावे. त्यात पुढे श्रीसमर्थ म्हणतात, माझ्या वतीने तुम्ही रामरायाला नमस्कार करा व त्यांना माझी दया येऊ दे, माझ्यावर त्यांनी कृपा करावी अशी प्रार्थना तुम्ही करा.
चौथ्या ओवीमध्ये श्रीसमर्थ म्हणतात, रामरायाशिवाय मी अनाथ आहे. तो मात्र सगळ्यांना सांभाळून घेणारा दीनांचा नाथ आहे. त्याने मला सांभाळून घ्यावे. मी पतित आहे म्हणजे मी हीनदीन नाही. तो मात्र पतितपावन आहे म्हणून त्याने माझ्यावर कृपा करावी.
पाचव्या ओवीमध्ये श्रीसमर्थ म्हणतात, श्रीराम करुणाकर आहेत म्हणजेच सगळ्यांवर दया करतात. त्यांनी माझ्यावरही दया करावी. मी निराधार आहे, मला कोणाचा आधार नाही. मी रामरायांच्या आधारावरच जगतो आहे म्हणून त्यांनी मला पावन करून घ्यावे.
सहाव्या ओवीमध्ये श्रीसमर्थ म्हणतात, सत्यमिथ्या तुझा म्हणावी.. म्हणजे मी वारंवार तुला शरण येतो, तूच माझा तारणहार आहेस, असे वारंवार तुला सांगतो. हे खरे आहे, त्याला खोटं म्हणू नको आणि माझी चिंता तू कर, म्हणजेच मला चिंतामुक्त कर. मला कशाचीही चिंता वाटणार नाही अशी भक्ती तू मला दे.
सातव्या ओवीमध्ये श्रीसमर्थ म्हणतात, दासामध्ये मी हीन.. म्हणजे मी अतिशय खालच्या स्तराचा भक्त आहे. माझ्यापेक्षा अनेक उत्तम भक्त तुम्हाला असतील, तरीही तुम्ही माझ्यावर कृपा करा; कारण मी तुमचे अनन्य लेकरू आहे, सेवक आहे. म्हणून सेवक भावाने मी तुमची भक्ती करतो.
आठव्या ओवीमध्ये श्रीसमर्थ म्हणतात, माझे मन न पालटावे.. म्हणजे मी अखंड तुझ्या सेवेतच रहावे, तुझीच भक्ती करावी, नामस्मरण करावे. यापासून मी दूर जाऊ नये, मी तुला सोडू नये अशी तू माझ्या मनाची अवस्था ठेव. मला सतत तुझ्या अनुसंधानात राहू दे.
नवव्या ओवीमध्ये श्रीसमर्थ परत पंचवटीतील भक्तांना विनंती करतात. तुम्ही माझ्या वतीने त्या रामरायाला वारंवार साष्टांग दंडवत घाला, माझ्याकरता तुम्ही एवढे कष्ट घ्या. मी येऊ शकत नाही तरी तुम्ही माझ्यावतीने रामरायाला नमस्कार करा व विनंती करा.
दहाव्या ओवीत श्रीसमर्थ म्हणतात, नरनारी, वृद्ध, बाल सगळेच जण या रामरायाच्या दर्शनाला येत असतील, पण मी मात्र करंटा झालो. मला त्याचे दर्शन होत नाही. मी येथे दूरवर कृष्णातीरी येऊन पडलो आहे, तरी तुम्ही माझ्या वतीने रामरायाची क्षमा मागा.
शेवटच्या ओवीमध्ये श्रीसमर्थ म्हणतात, शुद्ध उपासना विमल ज्ञान.. म्हणजेच निष्काम उपासना करत रहाणे व अनन्य भावाने त्या रामरायाला शरण जाणे हेच भक्तीचे खरे लक्षण आहे. यालाच ब्राह्मण म्हणजे ज्याला ब्रम्ह जाणून घेण्याची इच्छा आहे, त्या दृष्टीने जो आचरण करतो आहे, तो ब्राह्मण. त्याचे रक्षण म्हणजेच परमात्म्याला जाणून घेण्याकरता केलेली उपासना. ही गुरुपरंपरा आहे, म्हणून आपण सगळेजण या शुद्ध मार्गाने जाऊया. शेवटी श्रीसमर्थ म्हणतात, वारंवार प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे, मी त्या रामाचा दास आहे, सेवक आहे. सेवक या भावनेतून मी आपणाला ही विनंती करतो आहे.
खरे तर श्रीसमर्थांना रामरायाचे दर्शन, परमात्मा अनुभूती आलेली होती. टाकळीला त्यांची उपासना पूर्ण झाली होती, तरीही वारंवार सगळे उत्तम गुण, रामाचं दर्शन, रामरायाच्या मंदिराची स्थापना सगळे झालेले असूनही, हे सगळे गुण असतानाही श्रीसमर्थ अनन्य भाव आपल्याकडे घेतात. सेवक भावाने ते रामरायाची उपासना करतात व इतरांना त्याचा मोठेपणा देतात. मी अत्यंत हीनदीन आहे, मला काहीच समजत नाही, मी लहान आहे असा सेवकभाव यातून दिसून येतो. खरे तर त्या वेळपर्यंत श्रीसमर्थांची कीर्ती संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेली होती, तरीही त्यांची नम्रता व लहान होण्याची वृत्ती बघून आपल्याला भारावून जायला होते.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।