प्रपंचात आपण सुखी व्हावे म्हणून उपाय करतो. प्रपंचात देहाला, देहसुखाला, कर्तृत्त्वाला, भोगतृत्वाला फार महत्त्व असते. “बरे खावे बरे ल्यावे, बरे नेसावे” या बरोबरच “समस्ती बरे म्हणावे” या समर्थ रामदासांच्या वचनांप्रमाणे आपण प्रयत्न करतो. अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांचे आयाम व त्यांचा दर्जा विस्तारत जातो. दोन खोल्यांच्या घरापासून विस्तीर्ण बंगल्यापर्यंतचा, सायकल पासून स्वत:चे विमान असण्यापर्यंतच्या कक्षा रुंदावतात. यासाठी पैसा केंद्रस्थानी असतो. तो मिळवण्याचे मार्ग, सदाचारापासून हिंसक वृत्ती पर्यंत रुंदावतात. हे सर्व मिळवताना काळ झपाट्याने धावतो. श्रीमंत, खूप श्रीमंत व गरीब, खूप गरीब राहून समाजात ही दरी रुंदावत जाते. श्रीमंतांकडे पैसा जास्त झाला की त्याच्या विनियोगाची साधने वाढतात. सिनेमा थिएटर, तेथेच हॉटेल, मॉल, विमान प्रवास, देशाटन, पर्यटन, ए.सी सारखी घरात सुखाची साधने या सर्वांच्या कक्षा रुंदावतात. परदेशात रहाणे, तेथे पैसा ठेवणे भूषण वाटते. मुलांनाही मी इंजिनीअर, डॉक्टर होईन व परदेशात राहून खूप पैसा मिळवेन हे ध्येय वाटते. काही काळ हे चालते व आपण या सर्व आयुष्याचा गुलाम बनतो. मला हवं ते सुख मी कसंही मिळवू शकतो या अहंकाराला खत-पाणी मिळते. देहाच्या सुखासाठी असणाऱ्या साधनांमुळे आळस, निद्रा, वजन वाढते, व्यायामाचा अभाव, मनाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्याचे दुष्परिणाम लगेच दिसत नाहीत, म्हणून बेसावध रहातो.
परमार्थ मार्गात मात्र हे सर्व उपाय अपाय ठरतात. मी म्हणजे देह नाही, मी आत्मचैतन्य आहे. त्या पर्यंत पोहोचण्यासाठी देह एक साधन आहे, म्हणून देहाला सक्षम ठेवायचे पण त्याचे अवास्तव लाड करायचे नाहीत. देहाने मला साधनेसाठी हवे तसे सहकार्य करायचे, इंद्रियांनी माझे ऐकायचे, स्थिर ध्यानात स्थिर रहा म्हटले की रहायचे, मी त्याचा गुलाम नाही स्वामी आहे. देहातील क्षमतेचा पुरेपूर उपयोग करायचा व कष्टाची आवड वाढवायची.
माझा जन्म माझ्या हातचा नाही, मृत्यू केव्हा येईल माहित नाही, म्हणून जे आयुष्य आहे त्याच्या प्रत्येक क्षणी मी सत्कर्म करेन. गरजेपुरते ठेवेन व इतरांमधील आत्मचैतन्य ओळखल्याने सर्वांवर प्रेम करेन, त्यांच्या सुखाचा विचार करेन. देहाच्या बालपण, तारुण्य, गृहस्थाश्रम, वृद्धावस्था, व्याधी व मृत्यू या विकारांची जाणीव सतत ठेवेन म्हणून संचयी वृत्ती नसेल.
प्रपंचातील सर्व सवयी व उपाय यात अमुलाग्र बदल करणे यालाच, संत; मुमुक्षुचा नवा जन्म म्हणतात. वरील विवेचन लिहिण्याचे कारण म्हणजे कोरोनामुळे व्यक्तीत, समाजात, देशात व जगात उपाय अपाय ठरल्यामुळे, अमुलाग्र बदल; जीवनाच्या आणि व्यक्तीच्या प्रत्येक अंगात होत आहे, याची जाणीव निर्माण व्हावी यासाठी. नवा उपाय योजून तसे आयुष्य जगण्याचे प्रयत्न हा नवीन जन्मच आहे. लॉकडाऊनच्या काळात आमच्यात आत्मनिर्भरता सहजपणे आली आहे. मोलकरीण नाही, वाहनाने जाणे नाही, समाजात दांभिकपणे मिरविणे नाही. कृत्रिम हसणे, बोलणे नाही, स्वत:चे काम स्वत: करण्यात संकोच वाटत नाही. आत्मविचार, आत्मपरीक्षण, स्वयंमुल्यमापन, वाचन, चिंतन सहज होत आहे. कपाटातील ग्रंथ बाहेर आले. वाचन सुरु झाले. घराबरोबर, समाज रहातो त्या कॉलनीत; राज्यात व देशातही विचारांचे मंथन सुरु आहे. ते माझ्या मनातही होत आहे.
“आत्मनिर्भरता” या माननीय पंतप्रधानांच्या शब्दाने अनेक विचारांना गती मिळाली आहे. प्रत्येक राज्याला, माझे कुशल कामगार दुसऱ्या राज्यात का जातात ? मी त्यांना इथेच व्यवसाय देईन असे वाटू लागले आहे. मुंबईचा, आर्थिक; भौगोलिक; सामाजिक संरक्षणाचा; पर्यावरणाचा, लोकसंख्येचा समतोल पूर्णपणे ढासळला आहे. तो या तत्त्वाने कमी होईल. परदेशात जाण्याचे ध्येयही बोथट होईल. माझ्या देशातील सुजलाम-सुफलाम भूमी, वाहत्या नद्या, सूर्यप्रकाश, पर्वत मला खुणावत आहे. मी कष्ट करेन, मला जगण्यासाठी जे लागते ते इथेच निर्माण करेन. प्रत्येक व्यक्ती, गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश आत्मनिर्भर व्हावा. आपल्या देशात पाणी, हवा, जमीन, यात विविधता आहे. त्या त्या राज्यात वेगवेगळी फळे, भाज्या, इतर उत्पादने, कच्चा माल तयार होतो. तो तेथून, जिथे नाही त्या ठिकाणी नेण्यास दळणवळण आहे. घ्या व द्या, जगा व जगू द्या हे तत्त्व या मागे जोपासले जाईल व सांघिक भावना वाढीस लागेल. अनेकात एकत्व पहाताना, माझे राज्य व माझी मातृभूमी यांचे नाते वृद्धिंगत होईल. हे परिवर्तन आनंदाने, स्वेच्छेने, निर्भयपणे, अथक प्रयत्नाने व्हावे. इथे स्वार्थ अहंकार, भ्रष्टाचार, भेद राजकारण याला स्थान नसावे.
दासबोधात एक कहाणी आहे. “स्वानंदाने आश्रमात रहाणारा पणजोबा, छोटे घर बांधून निष्काम कर्म करणारा आजोबा, जग बदलते आहे; खूप प्रयत्न; खूप पैसा; वैभव वाढवणारा मुलगा; बाबांनी मिळवले त्यापेक्षा वेगळे काही करेन व जास्त मिळवेन म्हणणारा नातू व संपत्ती सर्व वैभव आहे म्हणून ऐष आराम, व्यसनात रहाणारा पणतू. म्हणजे पणतू, पणजोबांची आदर्श तत्त्वे धुळीस मिळवतो” असे होते. शुद्ध सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, अतिरेकी तमोगुण यांचा प्रवास असाच काहीसा आहे.
सध्या आपण रामायण, महाभारत पहात आहोत. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, आजचे कलीयुग यातील हे परिवर्तन आहे. रामायण काळापेक्षा महाभारत काळातील समाज व्यवस्था ढासळलेली आपण पहात आहोत. “मी मला हवं ते करेन, मला कोण अडवणार ! या वृत्तीला कोरोनाने मोठा धक्का दिला. त्यातून हतबलता, नैराश्य, उदासीनता, लाचारी, असहाय्यता येण्याचे कारण नाही. कारण महारोग, क्षय, हे रोग; कॅन्सरसारख्या व्याधी; भुकंपासारखी नैसर्गिक संकटे; परकीय आक्रमणे यावर आपणच मात केली आहे. आत्मा सुखस्वरूप, आनंदरूप, निर्भय आहे, त्याच्या जाणीवेत मी राहिलो तर मी तसाच होईन. कष्टाने अथक प्रयत्नाने नंदनवन उभारीन” हाच अपायावर उपाय आहे. खरी आत्मनिर्भरता हीच आहे.
काळाचा प्रभाव व प्रवाह न जाणणे, समोर कोणता प्रसंग आहे याचे भान नसणे, सामाजिक अंत:प्रवाहाची दखल न घेता बोलणे, वागणे, यांनी नुकसान होते. ही वेळ व्यथांचे उसासे, शोकाचे उमाळे, विरहाचे चटके, अपयशाचे व दर्पाचे फुत्कार, असुरक्षितपणाची अस्वस्थता, अपमानाच्या वेदना भोगण्याची नाही. न्याय, नीती, कर्तव्य व परिश्रम यांनी बंदिस्त आयुष्य जगण्याची आहे. सौजन्य, अध्ययन, उमेद, निर्धार, आरोग्य व समृद्धी, या जीवनसत्त्वांनी समर्थ व तेजस्वी युवा शक्ती जागृत व्हावी; संघटीत व्हावी ही आजच्या काळाची गरज आहे. आपापले कर्तव्य प्रत्येकाने प्रामाणिकपणे बजावताना मी आत्मनिर्भर आहे हा अनुभव जीवनात आनंद आणतो.
“उपाये परियाये दीर्घ प्रेत्न।विवेकबळें नाना येत्न।
करील तयाचें महिमान।तोचि जाणे।।१८-१०-३९।।”
।। जय जय रघुवीर समर्थ ।।