विरक्तें सदक्रिया प्रतिष्ठावी।विरक्तें निवृत्ति विस्तारावी।
विरक्तें नैराशता धरावी।सदृढ जिवेंसी ।।२-९-१०।।
दासबोधाच्या दुसऱ्या दशकाच्या नवव्या समासात श्रीसमर्थांनी विरक्त पुरुषाचे प्रत्ययकारी वर्णन केले आहे. त्यातील या दहाव्या ओवीत ते सांगतात, विरक्ताने सत्कर्मांना महत्त्व देऊन त्यांची स्थापना करावी. त्याने विरक्तीचा, वैराग्यवृत्तीचा, अनासक्तीचा प्रसार करावा. स्वतः निर्वासना, निष्कामता (येथे नैराश्यता असा शब्द श्रीसमर्थ उपयोजितात) आपल्या जीवाशी घट्ट धरून ठेवावी. विरक्ताची (खरे तर महंताची) आचारसंहिताच येथे श्रीसमर्थांनी स्पष्टपणे मांडली आहे. त्याची वृत्ती कशी असावी? तर, त्याने ‘निवृत्ती विस्तारावी’!
आधी वृत्ती म्हणजे काय ते पाहूया. समुद्राच्या काठावर आपण उभे राहिलो तर असे दिसते की, समुद्राच्या लाटा एका पाठोपाठ एक समुद्र काठापर्यंत येत रहातात, परतत रहातात. आपल्या मनाचेही तसेच आहे. एका विचारामागोमाग दुसरा, तिसरा, चौथा अशा विचारांच्या जणू काय लाटा मनाच्या काठापर्यंत येत रहातात. या विचारांनाच वृत्ती असे म्हणतात.
या विचारांच्या पाठोपाठ मनाने जाणे म्हणजे प्रवृत्ती व त्या विचारांच्या मागे न जाता आपल्या मूळ स्वरूपात स्थिर रहाणे ही निवृत्ती. सर्वसाधारण माणूस प्रवृत्तीनुसार वर्तन करतो. मनात अनेक इच्छा, कामना, वासना, ईशणा, आकांक्षा यांचे विचार अर्थात वृत्ती उसळत असतात. देहेन्द्रियांच्या सहाय्याने विविध विषयांचे सेवन करून सुखी होण्याकडे त्यांचा कल असतो. या वृत्तीची गंमत अशी की, एका वृत्तीचे समाधान होताच दुसरी वृत्ती/इच्छा समोर हजर होते. अग्नीकुंडात जसजशा समिधा टाकू किंवा तूपाचे हवन घालू तसतसा अग्नी अधिक प्रज्वलित होत जातो, तसे या वृत्तींचे असते. माणूस इच्छा तृप्त करीत सुखापाठी धावत रहातो व ते सुख पुढे पळत रहाते. या धावाधावीने प्रवृत्ती मार्गी व्यक्तिची अक्षरशः दमछाक होते. खरा साधक असणाऱ्या किंवा परमार्थमार्गाला लागलेला प्रवाशाने काय करावे ? आपले आचरण कसे ठेवावे ? मनाच्या वृत्ती उसळणारच, हे नक्की. अशा वेळी त्यांच्या मागे धावत न जाता स्थिरवृत्तीने त्यांच्याकडे पहाणे, त्याचे अवलोकन करणे गरजेचे. सुखदुःखाच्या लाटा उसळताहेत? उसळू देत. सुखाने हूरळून जायचे नाही वा दु:खाने कोलमडून जायचे नाही, असे मनालासतत पटवत रहायचे. आपली आराध्य देवता जी असेल तिला समर्पित रहायचे. सुख देणारा तोच आणि दुःख देणारा पण तोच ! त्याचेच अनुसंधान मनात अखंड ठेवायचे.
आहे तितुके देवाचे । ऐसे वर्तणे निश्चयाचे ।
मूळ तुटे उद्वेगाचे । येणे रीती ।।
ही धारणा मनात दृढ धरायची. त्यामुळे मन उद्विग्न होत नाही.
साधकाची कृती, त्याचे आचरण एखाद्या दाईसारखे असावे. लहान मुलाला सांभाळणारी दाई त्या बाळाला खाऊपिऊ घालते, न्हाऊ माखू घालते, अंगाई गीत गाऊन त्याला जोजवून झोपवते. आजारपणात त्याची काळजी घेते, सुश्रुषा करते, पण बाळाची आई आली की बाळाला आईच्या स्वाधीन करून ती बाजूला होते. अशी ‘दाईची’ भूमिका आपली प्रपंचाबाबत असावी. आपण या प्रपंचाचे विश्वस्त आहोत, मालक नाही. आपल्या वाटेला आलेले कर्तव्य चोखपणे बजावल्यावर त्यातून अलिप्त भावनेने मन काढून घ्यायचे ही शिकवण मनाला द्यायची. हा विरक्तीचा विचार दोनतीन दृष्टांतांनी स्पष्ट करता येतो.
हे ‘हवेपण’ मारुतीच्या शेपटा सारखे वाढतच जाते. एका स्त्रीला अपत्य नव्हतं. नवसा सायासानं मुलगा झाला. मग त्याचे बारसे, नंतर मौजीबंधन, मग शिक्षण, मग नोकरी, मग छोकरी, देवाकडची मागणी काही संपतच नाही. मन प्रपंचातून बाजूला होतच नाही. गोंदवलेकर महाराज एक छान उदाहरण सांगतात, एक माणूस रस्त्यावर असलेल्या एका खांबाला धरून मोठमोठ्याने म्हणत राहिला, बघा ना ! हा खांब मला सोडतच नाही. एक शहाणा माणूस थांबला अन् म्हणाला अरे वेड्या ! खांबाने तुला धरले नाही, तूच खांबाला धरून ठेवले आहेस. तो हात सोड म्हणजे तू मोकळाच आहेस. ‘प्रापंचिक’ माणसांचं असेच असते. प्रपंचाने आम्हाला धरलेले नाही, ज्या क्षणी प्रपंचाचा मोह सोडाल त्याक्षणी मुक्तता आहेच. पण नेमके हेच घडत नाही.
‘आवा चालली पंढरपूरा’ नावाची एक कविता आठवते. त्या आवाला तिची मैत्रिण खूप आग्रह करते. पंढरपूरला जाण्यासाठी आवा कशीबशी तयार होते. घरून निघताना सुनेला सूचनाच सूचना देते. सून म्हणतेही, सासुबाई तुम्ही निवांत जा मी सांभाळीन सर्व. पण आवाच्या डोक्यात विचारांचं थैमान, घरची काळजी काही जाईना. शेवटी वेशीपर्यंत गेलेली आवा परत घरी आली अन् म्हणाली, हीच माझी पंढरी ! आवाचं उदाहरण प्रकृतीवादी लोकांची मानसिकता नेमकी स्पष्ट करते.
आसक्ती, आशा, अपेक्षा, इच्छा, वासनांनी जो बांधलेला असतो तो मोकळा होतच नाही. म्हणून श्रीसमर्थ येथे समजवितात, आसक्ती सोडा, निरासक्त व्हा ! अपेक्षा नकोच, निरपेक्ष व्हा ! आशा सोडा नैराश्यता स्विकारा! तुम्ही असं कराल तरच सुखी व्हाल. हेच खरं वैराग्य. वैराग्य म्हणजे प्रपंचापासून पळ काढणं नाही तर, प्रपंचात राहून त्याची आसक्ती संपवणं. ही आसक्ती न सुटण्याचं मुख्य कारण म्हणजे माणूस स्वतःकडे कर्तेपणा घेतो. मी बंगला बांधला, मी गाडी घेतली, मी उत्तम प्रपंच केला, मी छान व्यवसाय केला. हे ‘मी’ पण जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बंधन आहेच.
मृत्यू केव्हा सामोरा येईल हे माहित नाही, म्हणून ‘मरणाचे स्मरण असावे’, असे श्रीसमर्थ आवर्जून सांगतात व पुढे म्हणतात ‘हरीभक्तीस सादर व्हावे’. बाबा बेलसरेही म्हणतात, “मीपण जाळोनियो जगी वागा”. बा. भ. बोरकरही म्हणतात, “मीपण ज्याचे पक्वफळापरी । सहजपणाने गळले हो । जीवन त्यांना कळले हो ।” अशी असावी विरक्ताची आचारसंहिता !
।। जय जय रघुवीर समर्थ ।।