नृसिंह पंचक

नृसिंह पंचक
डॉ. सदानंद चावरे
  • April 29, 2026
  • 1 min read

श्री समर्थ रामदास स्वामी विरचित  ‘नृसिंह पंचक’ हे भगवान नृसिंहांच्या उग्र रूपाचे वर्णन करणारे एक अत्यंत प्रभावी आणि वेगवान अनुप्रासिक स्तोत्र आहे. श्री समर्थांनी लिहिलेल्या स्फुट श्लोकात याचा समावेश आहे. हे पाच श्लोकांचे स्तोत्र असून, यात शब्दांच्या पुनरावृत्तीमुळे निर्माण होणारी  लय समुद्राच्या लाटांप्रमाणे वाटते, जे वाचताना जिभेला वळण लागते. या अनुप्रासाला ‘लाटानुप्रास’ म्हटले जाते. जेव्हा काव्यात किंवा वाक्यात एखादा शब्द किंवा शब्दसमूह एकाच अर्थाने पुन्हा पुन्हा येतो, पण त्याचा अन्वय (तात्पर्य/अर्थाचा संदर्भ) बदलल्यामुळे पूर्ण वाक्याचा अर्थ वेगळा होतो. हा एक शब्दालंकार आहे.  

या स्तोत्राला पार्श्वभूमी भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी नृसिंह भगवान खांबातून प्रगट झाले ही आहे. भगवंताचे रूप हे जसे सौम्य आश्वासक असते तसेच ते रौद्रही असते. श्रीराम भक्तवत्सल आहेत आणि त्यांचे रूप अतिशय सौम्य आहे पण रणावेश चढला की तेच राम स्वरूप उग्र होते. देवीरूपात  वात्सल्य  आहेच पण जेव्हा असुरांचे मर्दन करतात तेव्हा त्यांचे रूप उग्र कराल होते. विष्णूच्या अवतारात नृसिंह व परशुराम हे अवतार उग्र आहेत. शक्तीशाली क्रूर आणि उग्र अशा दानव, असुर आणि राक्षस यांच्याशी गाठ पडते तेव्हा सौम्य राहून चालत नाही असाच संदेश जणू या अवतारातून आपल्याला मिळतो.   

नरहरी नरपाळें भक्तपाळें भुपाळें।

प्रगट रूप विशाळें दाविलें लोकपाळें।

खवळत रिपुकाळें काळकाळें कळाळें।

तट तट तट स्तंभि व्यापिलें वन्हिजाळें।।१||

नरहरी हे कसे आहेत तर ते मानवांचे रक्षक आहेत त्यातही त्यांच्या भक्तांचे विशेष  रक्षक आहेत. धरणीला जेव्हा दुष्टांचा भार असह्य होतो तेव्हा तो कमी करायला ते अवतार घेतात. भू आणि भक्त रक्षक श्री नृसिंह भगवान त्यांच्या भव्य रूपात प्रल्हादाचा पिता राजा हिरण्य कश्यपू समक्ष प्रगट झाले. तट तट तट हा स्तंभाच्या कडाडून फुटण्याचा आवाज आहे. लाकूड जळताना तुटले की सुद्धा असा आवाज येतो.  स्तंभ पूर्ण भंग पावला आणि त्यातून अग्नीप्रमाणे दाहक असे नृसिंह भगवान प्रगट झाले. काळाचाही काळ म्हणजे महाकाळ  असलेल्या भगवंतांनी कळाळे म्हणजे विशाल व भीषण रूप धारण केले. प्रत्यक्ष पिता असूनही भक्ताशी  शत्रुवत व्यवहार करणा-या महा बलशाली , वर प्राप्त आणि जवळ जवळ अमरत्व प्राप्त झालेल्या असुर राजाचा  कर्दनकाळ बनून नृसिंह भगवान अवतरले. 

झळझळीत झळाळीं ज्वाळलोळें झळाळी।

लळलळीत लळाळीं लाळ लाळित लाळी।

हळहळीत हळाळीं गोळमाळा हळाळी।

कळकळीत कळाळीं व्योम पोळीत जाळीं।।२||

भगवंताची आभा कशी होती? तर ती अत्यंत दाहक आणि प्रकाशमान होती. झळाळी म्हणजे तेज, झळझळीत म्हणजे अत्यंत तेजस्वी. तेजाने तेजाळून उठणे यात स्वयं स्फूर्तता आहे. अती तीव्र प्रकाश !  धगधगीत आगीचा लोळ !  त्यात क्रोधाची दाहकता आहे. एखाद्या प्राण्याला भूक लागली की त्याच्या तोंडातून लाळ गळते आणि जणू भक्ष मिळावे म्हणून अधीर झाल्यावर तो जिभल्या चाटतो. नृसिंहाच्या जिभल्या चाटण्यात  विनाशाची सूचकता आहे. असा काळ पुरुष म्हणजे भगवान नृसिंह. त्यांचे निम्मे शरीर सिंहाचे आणि निम्मे नराचे होते. ना पशु ना नर. सिंहाचं क्रौर्य आणि रौद्र रूप समर्थ वर्णन करतात अत्यंत संतापलेला वनराज हल्ला करतो तसा हल्ला भगवंत दुष्ट हिरण्य कश्यपूवर करतात कारण त्याने भगवंत  भक्तावर अतिशय अन्याय केलेला असतो. 

हळहळीत हळाळीं गोळमाळा हळाळी :- हळहळीत म्हणजे उग्र/ उष्ण!  दाहक आणि विषारी अशी लाळ भगवान नृसिंहाच्या मुखातून गळत होती. कळकळीत कळाळीं म्हणजे अत्यंत कडक आणि भयंकर उष्ण ज्वाला जणू अवघ्या आकाशाची पोळी करून भस्म क्रेत आहेत. प्रचंड  दाहकता या रौद्र रूपात होती. हे वाचले की तीव्र आम्लाची आठवण होते. ते जाळते.

कडकडित कडाडीं कडकडाटें कडाडीं।

घडघडित घडाडीं घडघडाटें घडाडीं।

तडतडित तडाडीं तडतडाटें तडाडीं।

धडधडित धडाडीं धडधडाटें धडाडीं।।३||

ज्या स्तंभातून नृसिंह भगवान प्रगट झाले तो स्तंभ, कडकड असा भयानक आवाज करीत मोडला आणि त्याच्या कोसळण्याचा मोठा आवाज झाला. तो अर्थातच हृदयाचे ठोके चुकवणारा असा होता. स्तंभातून  तडतड आवाज करीत वन्ही धडाडून बाहेर आला. कडकड घडघड  तडतड आणि धडधड हे शब्द ध्वनी सूचक आहेत. मोडणे, घासणे, हृदयाचे ठोके वाढणे आणि अग्नी धडाडून उठला की त्याचा जो आवाज  होतो हे सारे दृष्टीसमोर नेमके उभे राहाते. 

भरभरित भरारी भर्भराटे भरारी।

थरथरित थरारी थर्रथराटे थरारी।

तरतरित तरारी तर्तराटे तरारी।

चर्चरित चरारी चर्चराटे चरारी।।४||

तरतरी म्हणजे चपळपणा. नृसिंहाच्या हालचाली भरारी प्रमाणे वेगवान होत्या कारण तो भक्त रक्षणासाठी तातडीने धावून आला होता. एखादा पक्षी आपल्या भाक्षावर झडप घालतो तशी हिरण्यकश्यपू  वर त्याला तयार व्हायला सज्ज व्हायला वेळ न देता मृत्यूने घातलेली झडप होती. तरतरून एखादे रोप जमिनीतून वर येते तेव्हा ते वाटेतील सर्व अडथळे फोडून बाहेर पडते. नृसिंह भगवान खांबातून तो भंग करून बाहेर पडले. त्यामुळे  हिरण्यकश्यपू आणि त्याच्या सेवक राक्षसांच्या  हृदयाचा थरकाप झाला. क्रोधाने आवेशात चालल्यामुळे तिथली धरणी हादरली असावी. जो थरार दुस-या चरणात आला आहे. हिरण्यकश्यपूला  मिळालेल्या वराचा विचार करून कृती अत्यंत वेगाने कार्यान्वित केली होती. चरचरीत हा  शब्द कापणे चिरणे ध्वनित करतो. भगवान नृसिंहाने हिरण्य कश्यपूचे पोट नखाने फाडले त्या दृश्याची भयानकता समर्थ या ध्वनी-वर्णनातून करीत आहेत.  

रजनिचर विभांडी दो करें पोट फोडी।

गडगडित गडाडी आंतडी सर्व काढी।

न धरित जन मानें लोक गेलें निदानें।

हरिजन भजनानें शांत केलें दयेनें।।५ ||

रजनीचर म्हणजे राक्षस हा त्याही स्थितीत शरण न येता  विभांड म्हणजे तंत्र विद्येत प्रवीण, वरप्राप्त असल्याने   प्रतिकारास सज्ज झाला.  नृसिंहाने  त्याला  अंकावर घेउन उंब-यात बसून कोणतेही शस्त्र न वापरता त्याचे पोट नखाने फाडले आणि त्याचा कोथळा  बाहेर काढला. क्रोधावेशात भगवंताने केलेला आवाज हा गडगडाट होण्यासारखा भयानक होता. यात संतापाने आलेला स्वर आहे, कृतीही विनाशकारी, भयानकच आहे. निदान म्हणजे आकलन. जे घडले त्याच्या भयानकतेमुळे पुढे काय घडेल, याचा लोकाना अंदाज बांधता न आल्याने ते सारे दूर पळाले. देवासमोर यायची कोणाची प्राज्ञा नव्हती. केवळ भक्त प्रल्हादाने देवाला भक्तीने आळविले आणि त्याची दया येउन भगवंत शांत झाले असे समर्थ म्हणतात. हे स्तोत्र दु:ख नाशक समजले जाते. या स्तोत्रात रौद्र, वीर आणि भयानक अशा तीन  रसांचा परिपोष झालेला आहे. त्यातील अनुप्रासामुळे स्तोत्राचे उच्चारण आपोआपच अतिशय जोश पूर्ण होते. समर्थांच्या शब्दकळेचे, उत्कट प्रतिभेचे आणि प्रासादिकतेचे दर्शन या श्लोक पंचकात घडते. 

|| जय जय रघुवीर समर्थ ||

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Language