समर्थांचा भक्ती मार्ग – भाग २ (श्रवण भक्ती)

समर्थांचा भक्ती मार्ग – भाग २ (श्रवण भक्ती)
श्री. अनिल वाकणकर
  • April 18, 2026
  • 1 min read

मागील लेखात आपण भक्ती म्हणजे काय याचा परामर्श घेतला. त्यामध्ये आपण भक्तीचे नऊ प्रकार आहेत हे पाहिले. या नऊ प्रकारांना नवविधा भक्ती असे म्हणतात. हा परमार्थाप्रत जाण्यासाठी नऊ पायऱ्यांचा सोपान आहे. शेवटच्या पायरीवर गेल्यावर साधकाला किंवा भक्ताला मुक्ती मिळते. किंवा यातील कोणत्याही प्रकारची भक्ती केली तरी मुक्ती मिळू शकते.  नवविधा भक्तितील पहिली पायरी किंवा पहिला प्रकार आहे, श्रवण भक्ती. समर्थांनी दासबोधामध्ये श्रवण या विषयावर ४-१, ७-८,९, १७-३ असे चार समास सांगितले आहेत. इतके श्रवणाचे महत्व आहे. किंबहुना समर्थांनी त्यांच्या सर्वच वाङ्मयात श्रवणाचे महत्त्व विशद केले आहे. या लेखात आपण १) श्रवण म्हणजे काय ? २) ते कसे करावे ? ३)काय श्रवण करावे ? ४) काय श्रवण करू नये, आणि ५) श्रवणाने काय प्राप्त होते ? या मुद्द्यांचा परामर्ष घेणार आहोत.

वास्तविक पाहता श्रवण म्हणजे सद्गुरूंचे/संतांचे/सज्जनांचे विचार ऐकणे आणि त्याप्रमाणे त्याचे अनुसरण करणे. परंतु सध्याच्या भोंदू बाबांच्या जमान्यात खरे संत मिळणे मुश्किल झाले आहे. अशावेळी सर्वसामान्य माणसाने श्रवण कसे करावे ? कीर्तनामध्ये सुद्धा व्यावसायिकपणा वाढलेला आहे. त्यामुळे त्यात देखील नि:स्वार्थी विचार ऐकायला मिळतातच असे नाही. यावर उपाय एकच आहे. संत, सज्जन, सदगुरू यांचे विचार असलेले ग्रंथ वाचावेत, परिशीलन करावेत आणि त्यामधील विचार आत्मसात करून त्यानुसार आपल्या आचरणात बदल करावा. समर्थ म्हणतात, 

 

ऐका परमार्थाचें साधन। जेंणे होये समाधान।

तें तू़ं जाण गा श्रवण। निश्चयेंसीं।।७-८-१।।”

आजकाल सद्गुरूंचे/संतांचे विचार ऐकण्याकरता अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामध्ये प्रत्यक्ष ग्रंथ वाचणे, प्रसिद्ध वक्त्यांचे प्रवचन, कीर्तन, निरूपण ऐकणे. याकरिता ध्वनिफित, ध्वनी चित्रफित हे पर्याय उपलब्ध आहेत. आपली श्रीसमर्थ रामदासस्वामी साहित्य शोध ही वेबसाईट त्याकरिताच वाहून घेतलेली आहे. याशिवाय असे अनेक युट्युब चॅनेल आहेत किंवा जरी गुगल वर सर्च केले तरीही आपल्याला असे अनेक ऑडिओ, व्हिडिओ पहायला मिळतात. परंतु हे सहज मिळणारे साहित्य पारखून घेतले पाहिजे. कारण त्याच्या आडून वाईट विचार प्रसारित करण्याचा सुद्धा सध्या प्रघात पडला आहे. म्हणूनच समर्थांनी काय ऐकावे आणि काय ऐकू नये या दोन्हींची यादीच दिलेली आहे. 

आता आपण श्रवण कसे करावे ते बघूया. नुसते ऐकणे किंवा वाचणे म्हणजे श्रवण नाही. समर्थ म्हणतात “निरूपणीं हे सदवृत्ति होते।स्थळत्याग होतां सवेंचि जाते। असे श्रवण उपयोगाचे नाही. श्रवण करणे म्हणजे सर्वांगाचे कान करून ऐकणे. मुक्ती मिळविण्याकरिता काय श्रवण करायचे तर, संत, सद्‌गुरु यांच्या मुखातून आलेले शब्द श्रवण करायचे आहेत. सत्संगात श्रवण करायचे आहेत. श्रवण म्हणजे नुसते कानाने ऐकणे नव्हे, तर त्या शब्दाचा अर्थ समजावून घेणे. त्या अर्थाचा ध्यास लागणे व त्या ध्यासाने साक्षात्कारापर्यंत पोहचणे. अशी ही परमार्थ साधना आहे. समर्थ म्हणतात, 

 

श्रवण मनन निजध्यास। प्रचितीनें बाणतां विश्वास।

रोकडा साक्षात्कार सायास। करणेंचि नलगे।।१०-९-३०।।

श्रवण, मनन, निदिध्यास, आणि साक्षात्कार यात प्रथम श्रवण एकचित्ताने करायचे आहे. एकचित्ताने श्रवण घडले तरच सद्‌गुरू, संत, ज्ञानी यांच्या शब्दांचा अर्थ ध्यानी येतो. बरेच ठिकाणी कीर्तनाला किंवा प्रवचनाला आलेले श्रोते आपापसात गप्पा मारतात, किंवा हल्ली मोबाईल चॅटिंग करतात. अशा दुश्चित्तपणाने केलेल्या श्रवणाला काहीच अर्थ नसतो. त्याचप्रमाणे चित्त जर दुसरीकडे असेल, किंवा संसारातील काही गोष्टींमध्ये असेल, तरीही दुश्चितपणे श्रवण घडले तर समाधान मिळत नाही. श्रवण भक्ती ही नवविधा भक्तीतील प्रथम भक्ती आहे. एकचित्ताने श्रवण करावे. शब्दांचे दिखाऊ कवच काढून टाकून, शब्दांच्या अंतरंगात शिरावे व त्या अर्थाशी ब्रह्म भावाशी एकरूप व्हावे. 

 

बोलिल्याचा अर्थ कळे । तरीच समाधान निवळे।

अकस्मात अंतरी वोळे । निःसंदेहता।।७-८-४०।।

आता आपण काय ऐकावे ते पाहूया. श्रवणभक्ती निरूपण(४-१) या समासातील ओवी क्रमांक ७ ते ३२ मध्ये काय काय ऐकावे याची मोठी यादीच दिली आहे. याच समासात समर्थ म्हणतात, 

 

ऐसें हें अवघेंचि ऐकावें । परंतु सार शोधून घ्यावें।

असार तें जाणोनि त्यागावें । या नाव श्रवणभक्ती।।४-१-२९।।

काय श्रवण करावे याचा विचार करताना आपल्या लक्षात येते की, समर्थांनी अद्वैत ग्रंथाला प्राधान्य दिलेले आहे. ते ग्रंथ म्हणजे काय याची व्याख्या सांगण्याकरता समर्थांनी ७-९ समासा मध्ये “या नाम ग्रंथ” हा चरण असलेल्या ओव्यांमधून ग्रंथ कोणाला म्हणावे ते सांगितले आहे. शेवटी ते म्हणतात, 

 

आतां असो हें बहुत।ऐकावा परमार्थग्रंथ।

परमार्थग्रंथेंविण वेर्थ | गथागोवी।।७-९-५९।।

म्हणोनि नित्यानित्यविचार।जेथें बोलिला सारासार।

तोचि ग्रंथ पैलपार।पाववी विवेकें।।७-९-६०।।

 

आता, काय श्रवण करू नये, याचा विचार पहाता; पुढील ओव्यांमध्ये त्याचे उत्तर मिळते. 

इतर जे प्रपंचिक।हास्य विनोद नवरसिक।

हित नव्हे तें पुस्तक।परमार्थासी।।७-९-२९।।

येक वगतृत्व श्रवणीं पडे।तेणें जालें समाधान मोडे।

केला  निश्चय विघडे।अकस्मात।।७-९-२।।

तें वगतृत्व त्यागावें।जें माईक स्वभावें।

जेथें  निश्चयाच्या नावें।सुन्याकार।।७-९-३।।

येक्या ग्रंथें निश्चय केला।तो दुजयानें उडविला।

तेणें  संशयोचि  वाढला।जन्मवरी।।७-९-४।।

ज्या श्रवणाने प्रपंचाविषयी आसक्ती वाढेल, संशय वाढतील असे श्रवण करून नये असे समर्थांचे म्हणणे आहे.  आता आपण श्रवण का करायचे ते पाहूय़ा. दासबोधात समर्थ म्हणतात, 

 

आतां श्रवण केलियाचें फळ।क्रिया पालटे तत्काळ।

तुटे संशयाचें मूळ।येकसरां।।१-१-२८।।

श्रवण केल्याने श्रोत्याचे सर्व संशय दूर होतात, त्यामुळे त्याच्या वर्तनात फरक पडतो. दशक ७ समास ८ मध्ये समर्थांनी श्रवणाने काय प्राप्त होते, अर्थातच श्रवण का करायचे याचे उत्तर दिले आहे. श्रवणाने अनेक गोष्टी साध्य होतात, हे त्यांनी या समासात तपशीलवार सांगितले आहे, जागे अभावी ते येथे सविस्तर देणे शक्य नाही. त्यातील दोन तीन वेचक ओव्या देऊन हा लेखन प्रपंच थांबवतो. 

 

श्रवणें घडे उपरती। बद्धाचे मुमुक्ष होती।

मुमुक्षाचे साधक अती। नेमेंसिं चालती।।७-८-३२।।

साधकाचे होती सिद्ध। आंगीं बाणतां प्रबोध।

हें तों आहे प्रसिद्ध। सकळांस ठाउकें।।७-८-३३।।

ठाईंचे खळ चांडाळ। तेचि होती पुण्यसिळ।

ऐसा गुण तत्काळ। श्रवणाचा।।७-८-३४।।

जो दुर्बुद्धि दुरात्मा। तोचि होये पुण्यात्मा।

अगाध श्रवणाचा महिमा। बोलिला न वचे।।७-८-३५।।”

अशा प्रकारे समर्थांनी सांगितलेल्या भक्तीमार्गातील पहिल्या पायरीचे म्हणजेच श्रवणभक्तीचे विवरण यथाशक्ती केले. पुढच्यावेळी कीर्तन भक्तीचा विचार करूया.  


।। जय जय रघुवीर समर्थ ।।

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Language