संत रामदास स्वामी यांच्या रचना – भाग दोन

संत रामदास स्वामी यांच्या रचना – भाग दोन
सौ.स्वरूपा कुलकर्णी
  • April 17, 2026
  • 1 min read

श्रीसमर्थांनी रामरायाची अत्यंत करुणपणे ज्यातून आळवणी केली ती करुणाष्टके पाहूयात.

अनुदिनिं अनुतापे तापलो रामराया।

परम दिनदयाळा नीरसी मोहमाया।

अतिचपळ मन माझे नावरे आवरीतां।

तुजविण शिण होती धांव रे धांव आतां।

संसारी माणसाला परमार्थ करत असताना ज्या अनंत अडचणी येतात त्याचे यथार्थ वर्णन श्रीसमर्थ करतात. संसारात मनुष्य ताप अनुभवत असतो. मन तर कधीच साथ देत नाही. आत्ता पूजा करत आहे म्हणता म्हणता, कधी विषयचिंतनात लागेल सांगताच येत नाही. मनाची ही धरसोड वृत्ती, चपळपणा श्रीसमर्थ पक्का जाणतात. म्हणूनच रामाला शरण जाऊन अत्यंत काकुळतीने प्रार्थना करतात, रामाला आपली दारूण परिस्थिती सांगतात व ही मोहमाया दूर कर व मला यातून बाहेर काढ असे म्हणतात.

भजनरहित रामा सर्वही जन्म गेला।

स्वजनजनधनाचा व्यर्थं म्यां स्वार्थ केला।

रघुपति मति माझी आपलीसी करावी।

सकळ त्यजुनि भावें कास तुझी धरावी।।

पुढे श्रीसमर्थ म्हणतात, सामान्य माणसाची अवस्था किती बिकट असते? तो रामाचे भजन-मनन करू शकत नाही. खरे सुख कशात आहे हे न कळल्यामुळे सतत खोट्या प्रपंचातच तो रमतो. हे पाहून श्रीसमर्थ कळवळून रामाला म्हणतात, हे रघुत्तमा, माझी मती/माझी बुद्धी तुझ्याठायी स्थिर कर आणि तुझीच एकनिष्ठपणे कास धरावी असे काहीतरी कर. मी तुला शरण आहे.

विषयजनित सूखें सूख होणार नाहीं।

तुजविण रघुनाथा वोखटे सर्व कांहीं।

रविकुळटिळका रे हीत माझे करावें।

दुरित दुरी हरावें स्वस्वरूपीं भरावें।।

श्रीसमर्थ येथे संसारी, विषयी/भोगी जीवाला उद्देशून सांगतात की, मानवी जीवनाचे मुख्य ध्येय परमेश्वर प्राप्ती आहे. त्यासाठी सतत विवेक व संयम धरून वागावे लागते. कारण, सर्वात मोठे आत्महित म्हणजे आत्मदर्शन होय. त्यासाठी विषयवस्तूंचे प्रेम त्याज्य आहे व केवळ परमात्मवस्तूला शरण जाणे ही आपली खरी मिळकत आहे. तीच खरी प्राप्ती आहे. श्रीसमर्थ यापुढील श्लोकात रामरायाला कळवळून विनवणी करतात की, माझी; म्हणजेच भक्ताची बुद्धी नेहमी तुझ्याठायी असू दे, भरकटू देऊ नकोस. कारण, जिथे तुझे रूप नाही, नाम नाही, भजन नाही, तिथे काहीच नाही. केवळ शीण आहे. हा तुझा खेळ तुझेच रूप प्रगट करतो. म्हणूनच, माझे मन फार आतुर झाले आहे. जर तुझी कृपा नाही झाली तर माझे प्राण रहाणार नाहीत आणि या मनाचे समाधान होण्यासाठी एकदा तरी भेट, अशी ते रामरायाला करुण प्रार्थना करतात. आपल्या अद्भूत शब्दसामर्थ्याने श्रीसमर्थ रामरायाला शरण जाऊन करुण प्रार्थना करुणाष्टकात करतात.

तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो’, ‘रघुनायका मागणे हेचि आता’, ‘बुद्धि दे रघुनायका’, ‘उदासीन हा काळ कोठे न कंठे’, ‘रघुनायका काय कैसे करावे’, ‘तुजवीण रामा मज कंठवेना’ अशी भाववस्थेतील करुण प्रार्थना, याचना श्रीसमर्थ आपल्या जगज्जीवन परमदयाळू भगवंताकडे करतात. त्यांच्या मनीचे करुण भाव थेट दगडालाही पाझर फोडणारे आहेत. राम हा अतिशय दयाळू देव असल्याने भक्तांच्या अंतरंगातील भावातिरेक तो पटकन सम‌जतो आणि धावत भक्तांच्या भेटीला येतो. हेच श्रीसमर्थांनी दाखवून दिले आहे. रामरायाच्या अगाध प्रेमाची ही प्रचिती भक्तास आल्याशिवाय रहात नाही, हे करुणाष्टक वाचताना आपोआप लक्षात येते. 

श्रीसमर्थांनी चौपदी रचल्या. त्यात रामरायाकडे काही मागणे मागितले आहे. श्रीसमर्थांसारख्या संताने कायम देवाकडे स्वतःसाठी काही न मागता कायम प्रापंचिकासाठी मागणे मागितले आहे. जसे, आईला संकटात कायम आपल्या लेकराचीच जास्त काळजी असते तसेच श्रीसमर्थांनाही संसारात गोते खाणाऱ्या जीवाविषयी विशेष तळमळ आहे. त्यातूनच या चौपदी ते गातात. 

कोमळ वाचा दे रे राम।विमळ करणी दे रे राम।।धृ.।।

प्रसंग ओळखी दे रे राम।धूर्तकळा मन दे रे राम।

हितकारक दे रे राम। जनसुखकारक दे रे राम।

अंतरपारखी दे रे राम।बहुजनमैत्री दे रे राम।

विद्यावैभव दे रे राम।उदासीनता दे रे राम।

मागों नेणें दे रे राम।मज न कळें ते दे रे राम।

तुझी आवडी दे रे राम।दास म्हणे मज दे रे राम।।

श्रीसमर्थ अत्यंत लाडिकपणे जसे बाळ आईला काहीतरी मागणे मागते, अशाप्रकारे बाळाच्या हिताचे सर्वकाही रामाकडे मागत आहेत. रामाकडे मागणी मागतानाही त्यांची चौकस वृत्ती तसेच बुद्धीमत्ता विशेष जाणवते. संसारात रहाताना कशाची जरुरी आहे हे ते जाणतात. त्यातूनच या चौपायीत रामाकडे कोमल वाणी, विमल कौशल्य, प्रसंग ओळखी, धूर्तपणा, चतुराई, हीतकारक गोष्टी, जनांना सुखावणारं (ते दे), अंतरंगाची ओळख व पारख करण्याची क्षमता, खूप जणांशी मैत्री, विद्येत प्रविणता, उदासीन वृत्ती (सर्वात राहूनही अलिप्त), जे मला योग्य आहे ते कळत नाही तेही दे रे राम असे मागणे मागतात. शेवटी म्हणतात, तुझ्याविषयी आवड निर्माण होऊ दे. मी रामदास, तुझ्याकडे मागणे मागतो अशी करुण प्रार्थना; याचना श्रीसमर्थ लीनपणे रामाकडे करतात. 

दासबोध – हा श्रीसमर्थांचा प्राण आहे. यात निर्गुण निराकार परब्रह्म याच्याकडे वाटचाल करताना काय काय पायऱ्या येतात त्यापासून ते अगदी बद्ध ते सिद्धापर्यंत विश्लेषणात्मक वर्णन केले आहे. राम ही सगुण देवता मानून त्याची मनोभावे भक्ति करावीच पण तो मुळात  निर्गुण निराकार परब्रह्म आहे हे जाणून घ्यावे. असा मुख्य उपदेश यात आलेला आहे. यात ज्ञान व भक्ती दोन्हींचा अपूर्व संगम आहे. प्रतिकांपासून विद्वानांपर्यंत ज्ञान देणारा दीपस्तंभ म्हणजे दासबोध. आत्माराम या ग्रंथात पूर्णपणे निर्गुण निराकार परब्र‌ह्माची ओळख करून देण्यात आली आहे. श्रीसमर्थांनी रामायणही लिहिले आहे. अत्यंत रसाळ व राम प्रीतीने भरलेले असे ते वाचताना डोळे भरुन येतात. श्रीसमर्थांनी रामाकडे ‘कल्याण करी रामराया’ ही कळवळीची प्रार्थना केली आहे. 

कल्याण करी रामराया।जनहीत विवरी।।धृ.।।

तळमळ तळमळ होतचि आहे।हे जन हातिं धरी।।

अपराधी जन चुकतचि गेले। तुझा तूंचि सांवरी।।

कठिण त्यावरी कठीण जाले।आता न दिसे उरी।।

कोठें जावें काय करावें। आरंभिली बोहरी।।

दास म्हणे आम्हीं केले पावलों।दयेसि नाही सरी।।

या अत्यंत  प्रेमभावाने, समर्पित भावाने श्रीसमर्थ रामरायाला साकडे घालतात. हे रामा, सर्वांचे कल्याण कर असे कळवळून विनवतात. श्रीसमर्थांचे साहित्य म्हणजे परमात्म मिलनासाठी आत्म्याची पूर्ण तयारी करून घेणारी, आनंद देणारी प्रेमगंगाच आहे, हे खरेच.  
।। जय जय रघुवीर समर्थ ।।

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Language