हनुमंताची जन्मकथा फार अद्भूत आहे. इंद्राच्या दरबारात पुंजिकास्थला नावाची सुंदर अप्सरा होती. होती गुणी पण मनाने मात्र चंचल! एकदा दरबारात एका मुनींकडे पाहून ती अकारणच हसली. आता तपस्वी मुनीच ते! त्यांना तिचा थिल्लरपणा काही आवडला नाही. त्यांनी तिला रागाने शाप दिला. चंचळ स्वभावाची आहेस, तर आता वानरीच होशील. शाप ऐकल्यावर पुंजिकास्थला नरमली. तिने मुनींकडे क्षमेची याचना केली. तेव्हा मुनी म्हणाले, “माझ्या शापानुसार तुला वानरी तर व्हावेच लागेल, पण तू क्षमा मागते आहेस म्हणून, तुला सांगतो की, तू चिरंजीव पुत्राची माता होशील व त्याची माता म्हणूनच जग तुला ओळखेल.”
पुंजिकास्थला वानरी बनली, त्या वानरीचे नाव अंजनी. तिचा विवाह केसरी नावाच्या वानराशी झाला. केसरी हा सुमेरू पर्वताचा राजा होता. अतिशय पराक्रमी. दोघांच्या विवाहानंतर बराच काळ झाला तरी त्या दंपतीला संतान प्राप्ती झाली नाही. मग अंजनीने मतंग ऋषींच्या मार्गदर्शनाप्रमाणे वायूदेवता व भगवान शंकरांची आराधना सुरु केली. तिच्या तपस्येचा प्रसाद म्हणून “रूद्राच्या अकराव्या अंशापासून वायूची गती प्राप्त असलेला तेजस्वी पुत्र तुला मिळेल”, असा शिवशंकरांचा वर तिला मिळाला. योग असा विलक्षण आला की, त्याच वेळी राजा दशरथाने केलेला पुत्रकामेष्टी यज्ञात प्रत्यक्ष प्रकट झालेल्या अग्नीने राजाला पायसाचे दान केले. ते तीन राण्यांना वाटून द्यायचा होते. तसे पायसाचे दान कौसल्याराणी व सुमित्राराणी ह्यांना मिळालेही. कैकयीराणी तिचा वाटा घेणार तेवढ्यात सुर्कला नावाची शापीत अप्सरा घारीच्या रूपात घिरट्या घालीत होती, तिने पायसावर झडप घातली व त्या पायसाचा काही भाग घेऊन ती उडाली आणि अंजनीच्या ओंजळीत तिने तो भाग टाकला व ती शापमुक्त झाली!
इकडे वायुदेवतेने सांगितल्यावर अंजनीने तो पायसाचा भाग भक्षण केला. चैत्र महिन्याच्या पोर्णिमेला अगदी सूर्योदयालाच्या वेळी तिने एका सुंदर बाळाला जन्म दिला. हा महादेवाचा (रूद्राचा) अकरावा अंश मारूती. ह्या बाळाला जन्मजात कटीला सुवर्ण कासोटी होती. मस्तकावर मुकूट होता व हातात सुरेख काकणे होती. बाळाला भूक लागली होती. तेवढ्यात बाळाला उगवणारा सूर्य दिसला. त्याला ते लालचुटूक फळ वाटले. मग काय ? बाळाने उंच उड्डाणच केले व तो सूर्याच्या दिशेने झेपावला. त्याच वेळी ग्रहणकाळ असल्याने सूर्याला ग्रासायला राहूही आला होता. राहू व जन्मलेल्या बाळाचे भांडण जुंपले. राहूचे बाळापुढे काही चालेना. त्याने इंद्रदेवाची प्रार्थना केली. इंद्राने आपले वज्र मारूतीवर फेकले, ते मारुतीच्या हनुवटीवर आदळले व हनुवटी भंग पावली व मारूतीला नाव मिळाले हनुमंत !(हनुवटी भंग पावलेला)
बाल मारूतीच्या लीला अपूर्वच ! तो ह्या पर्वतावरून त्या पर्वतावर सहज उड्या मारी. इतरांनी शोधावा म्हणून झाडांच्या डेरेदार फांद्यामध्ये लपून बसे. सर्वजण शोधून दमत. मग हा एकदम मोठ्याने हसत “मी इथे आहे” म्हणत बाहेर येई. त्याला कुणी धरायला जाई, तर हा परत आकाशात झेप घेई. एका ठिकाणी स्थिर बसेल तर शपथ ! सारखी धावाधाव, पळापळ चाले. मोठमोठी झाडे तो सहज उपटून् टाकी. त्यांच्या मोडण्याचा कडाड आवाज येई. मग हा मोठ्याने हसे. त्याच्या गतीला तर सीमाच नव्हती. वाऱ्याच्या वेगाने धावत सुटे. कुठे कुठे विवरात लपून बसे. असा हा हूड, धावणारा, पळणारा, लपणारा, सर्वांना दमवणारा खोडकर बाल मारुती!
मारूतीच्या बाललीलेत, नुकत्याच जन्म घेतलेल्या मारूतीला सूर्यबिंब जणू फळच आहे असे वाटून ते खावेसे वाटते. तो लालचुटूक सूर्यबिंबाच्या दिशेने झेपावला असे वर्णन आहे. हे वर्णन मानवी बुद्धीला न पटणारे आणि शारीरिक क्षमतेला न झेपणारे असेच आहे. पण वैज्ञानिक सत्याचा आधार घेऊन या कथेचा उलगडा करता येईल. कसा ? तो पाहूया. मारूती म्हणजे मरूत, म्हणजेच वारा. क्षणात कुठेही आणि कसेही उडणे हे केवळ वाऱ्यालाच शक्य आहे. वाऱ्याचीही अफाट शक्ती मारूतीच्या रूपात आपल्यापुढे आली. सुर्याच्या जवळ जाताजाता तो बेशुध्द पडतो ? वातावरणाच्या बाहेरील निर्वात पोकळीत वारा पोहचू शकत नाही; परिणामी बेशुद्धी येते. हा त्या कथेमागचा वैज्ञानिक अर्थ आहे!
आपल्या पूर्वजांना निसर्गाची अफाट ताकद म्हणजे एक चमत्कार वाटला असावा. म्हणूनच निसर्गातील अग्नि, वारा, पर्जन्य आदि शक्तींना देवता स्वरूप देऊन त्यांच्या पराक्रमाच्या कथा गुंफल्या गेल्या असाव्यात. आजच्या विचारवंतांच्या मते आपल्या प्राचिन परंपरा, आपली दैवत यामागे निश्चित असा वैज्ञानिक दृष्टीकोन आहे, कार्यकारण भाव आहे. मात्र पूर्वजांनी त्याकाळच्या जनमानसाला झेपेल अशा भाषेत तो सांगितला आहे.
एक खरं की, या देवतांच्या सामर्थ्याचा उपयोग समाजाच्या उत्थानासाठी, प्रबोधनासाठी मोठ्या चातुर्याने करणारे श्रीसमर्थांसारखे आपले पूर्वज तेवढेच कल्पक व प्रगतीशील म्हणायला हवेत. श्रीसमर्थांचा तेरा मारुती स्तोत्रातून याचीच प्रचिती आपल्यासा सतत येत रहाते.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।