आपल्या भारतीय संस्कृतीत सप्त चिरंजीव मानले गेले आहेत.
अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः।
कृप: परशुरामश्चैव सप्तैते चिरंजीविनः।।
अश्वत्थामा, बलि, व्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य, परशुराम हे सप्त चिरंजीव आहेत. प्रत्येकामध्ये एकेका गुणाचा प्रकर्ष असल्याने त्यांना चिरंजीवित्व प्राप्त झालेले आहे. अश्वत्थाम्याला मात्र हे चिरंजीवित्व शापरुपात मिळालेले आहे.
हनुमंत हा प्रभू श्रीरामचंद्रांचा श्रेष्ठ भक्त आहे. अनेकानेक गुणांचा समुच्चय त्याच्यात आहे. श्रीरामप्रभू त्याच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत. म्हणूनच आपल्या अवतार कार्य समाप्तीचे वेळी त्याला, “मृत्युलोकातच अखंड वास्तव्य करून सर्व रामभक्तांचे रक्षण करावे”, असा आदेश दिला. हनुमंतानेही तो आदेश शिरोधार्य मानला. त्यामुळे जेथे जेथे रामकथा चालू असते तेथे तेथे हनुमंत सूक्ष्म रुपाने उपस्थित असतात. या श्रद्धा विश्वासाने त्यांचे आसन व्यासपीठाजवळ ठेवलेले असते.
श्रीरामांचा अवतार त्रेतायुगातला. पुढे द्वापार युगातही अर्जुनाचे सारथ्य भगवान श्रीकृष्णांनी केले तेव्हा रथावर मारुतीराय आरूढ झाले होतेच. त्यानंतरही त्यांच्या अस्तित्वाची प्रचीति रामभक्तांना आलेली आहे. गोंदवलेकर महाराज तर सांगत, “तुम्हाला रामाला जे मागायचे आहे ते हनुमंताजवळ सांगा, ते रामापर्यंत नक्की पोहोचेल.” श्रीसमर्थांच्या संपूर्ण जीवनात हनुमंताने त्यांच्यावर छत्र-छाया धरली होती. जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तेव्हा ते तेथे धावून आले आहेत. श्रीसमर्थ चरित्रात असे खूप दाखले आहेत. मारुतीरायांना अर्थात हनुमंताला या सर्वश्रेष्ठ दास्यभक्तीमुळे चिरंजीवित्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या दास्यभक्तीचे तेरा पैलू आपण पाहूयात.
१) सेवेची आत्यंतिक गरज असताना सेवाकार्य – सीतेचा शोध लावण्यासाठी सुग्रीवाने आपल्या वानरसेनेचे चार गट करून चार दिशांना त्यांना पाठवले. दक्षिण दिशेला निघालेल्या वानरसेनेला जटायूचा बंधू संपाती यांच्याकडून, सीतामाई सागराच्या पलीकडे असलेल्या रावणाच्या लंकेत अशोकवनात रावणाच्या सैंनिकांच्या पहाऱ्यात असल्याची माहिती कळली. पण मधला समुद्र ओलांडायचा कसा ? मोठाच प्रश्न होता. अशावेळी शांत बसलेल्या हनुमंतास जांबुवंताने त्याच्यापाशी असलेल्या प्रचंड सामर्थ्याची व योगज्ञानाची आठवण करून दिली आणि हनुमंत रामकार्य सिद्ध झाला आणि त्याने ते उत्तम प्रकारे पार पाडलेही.
२) मोहापासून अलिप्तता – रामकार्य करताना मध्ये काही मोहाची स्थाने येतीलही, त्यावर मात करता आली पाहिजे. हनुमंताने उंच झेप घेतली व तो गगनमार्गे निघाला. वाटेत सोन्याचा मैनाक पर्वत आडवा आला. चकाकणारं सोनं, पण हनुमंतांना सोन्याचा मोह झाला नाही. त्याने मैनाकाला आपल्या पावलांचा जोर देऊन समुद्राच्या आत ढकलले व तो पुढे निघाला.
३) अनेक संकटावर मात करण्याची निर्भयता – पुढे राहू-केतूंची माता सिहिंका ही हनुमंतांना मार्गात येऊन उताणी पडली. तिने बारा योजने मुख पसरले. हनुमंत तिच्या पोटात शिरला व तिचे पोट फाडून बाहेर आला. भक्ताने देखील वाटेत असे काही भयप्रद अडथळे आले तरी निर्भयपणे त्यातून बाहेर पडले पाहिजे.
४) दुष्टांना नामोहरम करण्याची क्षमता – हनुमंत लंकेच्या प्रवेश द्वारापाशी आला तेथे लंकिनी ही राक्षसी त्याला मारायला टपूनच बसली होती. हनुमंताने उग्ररुप धारण करून तिला मारले. भक्तिमार्गात भक्ताला त्रास देणारे दुष्टप्रवृत्तीचे लोक असतातच. पण त्यांना नामोहरम केले पाहिजे.
५) सेवा कार्यात बुद्धिमत्ता हवी – हनुमंत लंकेत शिरला. सीतामाईचा शोध घेऊ लागला. अखेरीस अशोकवनात एक वृक्षाखाली बसलेली सीता त्यांना दिसली. तिचे मुख म्लान दिसत असले तरी पण अविरत रामाचे स्मरण चालू होते. हनुमंताने मोठ्या चातुर्याने तिला रामकथा ऐकवली. नंतर तिला प्रभू रामचंद्रांची मुद्रिका दाखवून, तिला आपण रामदूत असल्याची खात्री पटवून दिली. नंतर तिने रामासाठी दिलेला निरोप व तिची खूण म्हणून दिलेला चूडामणी त्याने घेतला. तसेच प्रभु लवकरच येतील व आपली सुटका करतील असे सांगून सीमामाईला त्यांनी आश्वस्त केले.
६) नम्रता शालिनता – सीतेला भेटून हनुमंत परतला, पण स्वत:च्या तोंडाने आपली कामगिरी यशस्वी झाली हे त्याने सांगितले नाही. त्याने ब्रह्मदेवांना ते सारे वर्णन लिहिण्याची विनंती केली. भक्ताने असेच आपल्या आराध्यापुढे नम्र व शालीन असावे.
७) तत्परता – मेघनाथाने टाकलेले ‘शक्ती’ नावाचे अस्त्र लक्ष्मणाच्या मर्म स्थानावर बसले व तो खाली पडला. पहाता पहाता त्याचे शरीर काळे निळे दिसू लागले. राम अत्यंत दु:खित झाले. सुषेणवैद्याने हिमालयातील संजीवनी औषधीबद्दल सांगताच मारुतीराय त्वरेने उत्तरेकडे झेपावला. तो मनोवेगाने गेला व संजीवनी औषधी घेऊन मनोवेगानेच परतला. त्वरित केलेल्या संजिवनी उपचारांनी लक्ष्मणाचे प्राण वाचले. भक्त आपला आराध्याच्या सेवेला तत्पर हवा.
८) चातुर्य व युक्तीचा वापर – अहिरावण व महिरावणांनी राम व लक्ष्मणांना पाताळात नेले. तेव्हा हनुमंत योगबळाने तेथे पोहोचले. देवी मंदिरात तो देवीच्या मूर्तीमागे लपून बसला. अहिरावण महिरावण राम-लक्ष्मणांना बळी देण्यासाठी देवी मंदिरात आले तेव्हा मारुतीराय प्रकट झाले व त्याने त्या दोघांचा समाचार घेत त्यांना मारले व राम-लक्ष्मणांची सुटका केली.
९) सेवाकार्यात लौकिक गोष्टींना फाटा – हनुमंत द्रोणागिरी पर्वत घेऊन येत होता तेव्हा कालनेमी नावाच्या राक्षसाने त्याचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा खूप प्रयत्न केला. पण हनुमंत त्याला फसला नाही व मध्ये थांबला नाही. भक्ताने असेच लौकिकाला न भुलता निष्ठेने भक्ती करायला हवी.
१०) आरामाची सवय नको – द्रोणागिरी घेऊन येताना वाटेत अयोध्या लागली. भरताने आपली ओळख देत थोडी विश्रांती घेण्याचा आग्रह केला, पण ‘आराम हराम आहे’ हे मनाशी पक्के असल्याने हनुमंताने नम्रपणे नकार दिला व तो पुढे निघाला.
११ ते १३) भक्त निस्वार्थ असावा, निर्मत्सरी असावा, नम्र असावा, निर्लोभी असावा, निरपेक्ष असावा – अयोध्येला परतल्यावर बक्षिसादाखल दिलेला मोत्याचा हार हनुमंताने गळ्यात मिरवला नाही. तर प्रत्येक मोती फोडून तो तेथे आपल्या आराध्याचा शोध घेत राहिला. परंतु एकाही मोत्यामध्ये श्रीरामांचे दर्शन न घडल्यामुळे, अंतिमतः आपल्या छातीला छेद देऊन, त्याने तेथे विराजलेल्या श्रीराम-सीतेचं दर्शन घडवले ! असा होता सर्वश्रेष्ठ भक्त हनुमान ! याच भक्तीमुळे त्याला चिरंजीवित्व प्राप्त झाले होते.
जय हनुमान ! जय चिरंजीव हनुमान !
।। जय जय रघुवीर समर्थ ।।