भरत

भरत
श्रीमती नीला अभ्यंकर
  • March 27, 2026
  • 1 min read

रामायणामध्ये रामानंतर मुख्य चरित्र भरताचे आहे. याचे कारण लक्ष्मण ही रामाची सावली आहे. लक्ष्मणला स्वतःचे वेगळे व्यक्तिमत्व नव्हते, त्याने आपले असामान्य व्यक्तिमत्व रामात विलीन केले होते. राम लहान भावासाठी राज्य सोडून वनात गेला, परंतु रामापेक्षाही भरताचा त्याग मोठा आहे. राज्य गादी प्राप्त होऊनही रामासाठी भरताने त्याग केला. जणूकाही दोन भावांमध्ये त्याग-निर्लोभता यांची शर्यतच लागली आहे. अश्यातऱ्हेची शर्यत फक्त रामायणतच बघायला मिळते. जगात राज्याकरता भांडणे, खून, मारामाऱ्या पहायला मिळतात. परंतु इथे एक म्हणतो, “तू घे” आणि दुसरा म्हणतो, “छे, तू घे” भांडणातही केवढी दिव्यता!!

चारित्र्यनिष्ठा, कुलाभिमान आणि कर्तव्यनिष्ठा हे तीन गुण भरताच्या जीवनात आहेत. भरत आजोळहून परत आल्यावर बाबा गेल्याची वार्ता त्याने ऐकली. कैकेयीला जाऊन त्याने विचारले, “आई, बाबा जायच्या वेळी कोण कोण जवळ होते ?” ती उत्तर देते की ‘राम राम’ म्हणत ते गेले. ह्या उत्तरावरून भरत ओळखतो की त्यावेळी राम, लक्ष्मण आणि सीतावहिनी जवळ नव्हते. पुढे कैकेयी त्याला सांगते की, राम; लक्ष्मण आणि सीता यांना वनवासात पाठविण्यात आले आहे. भरत अत्यंत बुद्धिमान, विवेकी आणि भाऊक आहे. तरीही बाबा गेल्याचे अश्रू पुसून विचारतो की, रामाकडून एखाद्या ब्राह्मणाचा वध झाला का ? गोहत्या झाली का ? त्याने परस्त्रीकडे वाकड्या नजरेने बघितले का? कैकेयी रागाने ओरडून म्हणते, “अरे, कोणाबद्दल तू विचारतो आहेस? राम अश्या प्रकारचे अपराध कधीतरी करेल का? परस्त्रीकडे वक्र दृष्टीने बघेल का? हेच रामाचे वैशिष्ठ्य आहे.” पूजकाने स्तुती करावी ह्यात विशेष काय? पण जिने रामाला चौदा वर्षे वनवासात पाठविले तिचे हे उद्गार आहेत. 

भरताचं व लक्ष्मणाचं रामावर खूप प्रेम आहे. लक्ष्मणाचं प्रेम व्यक्तिनिष्ठ आहे. राम कसंही वागो तो माझा आहे हा लक्ष्मणाचा भाव. भरताचं प्रेम व्यक्तिनिष्ठ नाही. रामामध्ये सर्व प्रकारचे सद्गुण आहेत. राम धीरोदात्त आहे. तो परिपूर्ण आहे. या त्याच्या गुणांमुळे भरत रामाचा पूजक, सेवक आहे. भरताला आपल्या वंशाचा खूप अभिमान आहे. वरील पैकी एखादा अपराध जर रामाच्या हातून घडला असला तर लक्ष्मण रामाला सोडून गेला नसता. भरत मात्र रामापासून दूर गेला असता. खरं म्हणजे भरताला कोणी ओळखलंच नाही. दशरथ, कैकेयी, भरद्वाजमुनी, कौसल्या, गुह आणि लक्ष्मणापैंकी कोणीही नाही. फक्त राम आणि वसिष्ठांनी त्याला ओळखलं होतं. भरताने कैकेयीला विचारलं, आई, तुला वाटलंच कसं मी रामाला डावलून राज्याभिषेक करून घेईन. कौसल्येलाही भरत म्हणतो, “आई, मला राजा बनायचं नाही. मी रामाला आणायला चाललो आहे.” दुसऱ्या दिवशी भरताच्या महालाबाहेर सनई चौघडे वाजायला लागतात. भरत ते सर्व बंद करतो. दुसऱ्या दिवशी राज्यसभेत गेल्यावर भरत म्हणतो, हे सिंहासन दादाचं आहे. त्यावर  बसण्याचा अधिकार मला नाही. मी उद्या दादाला आणायला निघणार व त्याला परत आणून सिंहासनावर बसवणार. लोकांनी आनंदाने टाळ्या वाजवून जयजयकार केला.

निषादराज गुहाने भरताशी लढायची तयारी केली कारण भरत सैन्य घेऊन निघाला होता. उलट, जिथे रामाने चिक लावून जटा केल्या तसेच भरतानेही केले. पुढे भरद्वाजांनी त्यांच्या आश्रमात सर्वांसाठी जेवणाची, रहाण्याची उत्तम व्यवस्था केली होती. पण भरत मात्र जिथे राम झोपले होते त्या झाडाखाली सिताराम सिताराम म्हणत बसला होता. त्याची विरक्ती पाहून भरद्वाज म्हणाले “भरता, आयुष्यभर केलेल्या उपासनेचे फळ म्हणून मला रामसीतेचे दर्शन झालं व भगवंताच्या दर्शनाचं फळ म्हणून आज तुझ्यासारख्या भक्ताच दर्शन झालं.”  

सर्व प्रजानन, तीन माता, वसिष्ठ, दोन भाऊ, त्यांच्या बायका श्रीकामगिरी पर्वत चढू लागले. लांबून लक्ष्मणाने पाहिले व तो युद्ध करायला सज्ज झाला. रामाच्या सर्व लक्षात आले. राम म्हणाला, अरे, भरत मला मारायला किंवा लढायला नाही, न्यायाला आला आहे. रामाने परत यावे म्हणून भरताने खुप युक्तिवाद केला. हा युक्तिवाद वाल्मिकी रामायणामध्ये वाचण्यासारखा आहे. शेवटी ‘चौदा वर्षे भरताने राज्य करावे, रामाने आपल्या पादुका द्याव्यात’ असे ठरले. “कैकेयी मातेला, भरता; अपशब्द बोलू नकोस”, असे रामाने सांगितले. सगळे जण अयोध्येला परतले. नंदीग्रामात झोपडी बांधून, वल्कल नेसून, कंदमुळे खाऊन भरत रामासारखे जीवन जगू लागला. भरताने विचारलं, ह्या पादुकांचा राज्याभिषेक शास्त्रानुसार करता येतो का ? वसिष्ठ म्हणाले, आजोळहून परत आल्यापासून, मी तुला बारकाईने बघत आहे. तुला शास्त्र बघण्याची गरज नाही. तुझ्या आचरणाप्रमाणे शास्त्रं वागतील. रोज पादुकांचे यथासांग पूजन करून, प्रत्यक्ष राम सिंहासनावर बसले आहेत असे समजून, दिवसभराच्या झालेल्या घटना सांगायच्या. हा अयोध्येचा स्वामी सवल्कल जटाधारी असून वनवासी जीवन जगतोय. जो जितका महान त्याने उपभोगांपासून दूरच रहावे हीच मूळ भारतीय धारणा आहे.

दशरथ राजाच्या चारही मुलांची नावं वसिष्ठांनी ठेवली. पहिल्याचे राम तर दुसऱ्याचे भरत. चातकत्व व हंसत्व याचा संगम आपल्याला भरत चरित्रात बघायला मिळतो. आपल्या भक्तीत काही कमतरता वाटली तर भरताच्या चारित्र्याच चिंतन करावं. भरताचं चरित्र अनुकरणीय आहे. चौदा वर्षानंतर राम परतल्यावर रामाने हनुमानाला भरताकडे पाठवले व त्याचे भाव कसे आहेत याचे निरीक्षण करायला सांगितले. चौदा वर्षे पुरी झाल्यावर दोघांची जेव्हा भेट होते त्यावेळी राम कोणता व भरत कोणता हे ओळखताही येत नव्हते. कारण दोघेही तपस्वी, चारित्र्यनिष्ठ, कुलाभिमानी, संस्कृतीचे उपासक, कर्तव्यनिष्ठ. दोन शरीरे आत्मा एकच म्हणा ना ! चारित्र्याची भव्यता आणि भातृप्रेम यांच्यापुढे वाल्मिकींची लेखणी सुद्धा थिटी पडली…..! 

लक्ष्मण व भरत अतिशय प्रेमळ. दोघेही परम भक्त आहेत. एकाला संयोगाचे भाग्य तर दुसऱ्याला वियोगाचे. भरताने ईश्वरापासून दूर राहून निष्ठेने काम केले आहे. चौदा वर्षे नंदीग्रामात राहून ‘इदं न मम’ या वृत्तीने जीवन जगला आहे. 

आहे तितुके देवाचे।ऐसे वर्तणे निश्चयाचे।

मुळ तुटे उद्वेगाचे।येणे रिती।।

आपण भरताचा आदर्श जीवनात कायम ठेवला पाहिजे. निष्काम होऊन ईश्वरी कार्यात निर्लोभ अंतःकरणाने तुटून पडायला हवे. निर्लोभ अंतःकरणाने भरताने जीवनभर जे केले ते आपण शिकायला हवे. साधनेचे शिखर म्हणजे लक्ष्मण ते कदाचित आपल्याला जमणार नाही, पण आपल्याला भरताकडून खूप काही शिकता येईल. 

भारतात एकंदर तीन भरतांची पूजा – उपासना होते

१ . रामायणातील भरत 

२. महाभारतातील भरत म्हणजे दुष्यंतचा मुलगा. अत्यंत शूर. लहानपणी तो सिंहाचे दात मोजायला निघाला. ज्याच्यामुळे आपल्या देशाचे नाव भारत पडले.

३. भागवतातील जडभरत – अत्यंत विद्वान राजर्षी.

भरतामुळे रामायणाला शोभा आली आहे. भरत केवळ रामायणाचा नव्हे तर जगातील संपूर्ण सांस्कृतिक वाङ्मयाचा दागिना आहे. वाल्मिकींनी हा अनुपम आदर्श पुढच्या संस्कृती पूजकांसमोर ठेवला आहे. अश्या या बुद्धिमान, कर्तृत्ववान, शीलवान, गुणवान भरताला माझा नमस्कार. 

Language