राजा दशरथाला चार मुले होती. कौसल्येचा राम, कैकेयीचा भरत आणि सुमित्रेचे लक्ष्मण व शत्रुघ्न. राम–लक्ष्मण जोडी होती तर, भरत–शत्रुघ्न जोडी प्रसिद्ध होती. या चारही पुत्रांची नावं महर्षी वसिष्ष्ठांनी ठेवली होती. ज्येष्ठ सुमित्रानंदनाचे नामकरण केले लक्ष्मण! ‘लक्ष्मीवान स लक्ष्मणः’ याचा अर्थ वाल्मिकींनी ज्यांच्याकडे लक्ष्मी आहे तो लक्ष्मण असा सांगितला. त्याच्याकडे एकच संपत्ती होती ती म्हणजे दास्यलक्ष्मी ! कैकर्य हीच लक्ष्मणाची संपत्ती. लक्ष्मी म्हणजे शोभा, ज्याचे जीवन केवळ कैकर्याने सुशोभित केले आहे. एका रामाशिवाय लक्ष्मणाने कशाचेही चिंतन केले नाही. जे रामाला अनुकूल ते लक्ष्मणाला अनुकूल. जे जे रामाला प्रतिकूल, ते मग कोणीही असोत, माता-पिता का असेनात ते लक्ष्मणाचे शत्रू! राम जेव्हा वनवासाला जायला निघाला तेव्हा लक्ष्मण पण बरोबर निघाला, तेव्हा रामाने लक्ष्मणाला सांगितले जा तुझ्या आईला विचारून ये. लक्ष्मण म्हणतो,
मातारामो मत्पिता रामचंद्रः !
रामाला वडिलांमुळे वनवासात जावे लागले आहे हे कळल्यावर तो म्हणतो “बाबांना तुरुंगात टाका.” रामानेच अयोध्येच्या सिंहासनावर बसले पाहिजे. वनवासात जाताना त्याला आपल्या बायकोला म्हणजे उर्मिलेला भेटावेसे देखील वाटले नाही. कुठलीही भक्ती माणसाला वेडी करते. देशभक्तांचे जीवन आठवा. लक्ष्मण म्हणजे रामाचा बहिश्चर प्राण आहे. लक्ष्मणाचे चरित्र भव्यदिव्य आहे. रामाबरोबर लक्ष्मणाचा कधी संघर्ष झाला नाही. विश्वामित्राने दशरथाजवळ केवळ रामाचीच मागणी केली होती. पण लक्ष्मण रामाबरोबर गेलाच. त्याला वेगळ्या निमंत्रणाची गरज नव्हती. माणसाला बोलवल्यावर त्याची सावली देखील सोबत येते तसेच रामाबरोबर लक्ष्मण येणारच. लक्ष्मण रामाचा उजवा हात होता. दोघांची जोडी खरी. रामात लक्ष्मण आलाच! रामाच्या राज्याभिषेकाच्या वेळी राम असे नाही म्हणत की “मी राजा होणार.” उलट राम म्हणतो की, “लक्ष्मणा तुलाच राज्य करायचे आहे.” किती ही उच्च भावना! लक्ष्मण मूर्च्छित झाल्यावर राम म्हणतो,
नहि मे जीविते नार्थः सीतया वाजयेन वा।
कोहिमे जीविते नार्थः त्वयिपंचत्वमागते।।
देशे देशे कलत्राणी देशे देशे च बांधवाः।
तं तु देशं न पश्यामी यत्र भ्राता सहोदरः।।
राम शब्द तर लक्ष्मण अर्थ. राम म्हणतो सीता मिळाली नाही तरी चालेल परंतु जर लक्ष्मण गेला तर माझा प्राण जाणारच. ‘यत्र भ्राता सहोदरः’ राम कौसल्येचा तर लक्ष्मण सुमित्रेचा असूनही राम सहोदरः म्हणजे एकाच आईच्या पोटी जन्मलेले असे म्हणत आहे. लक्ष्मण अतिशय पराक्रमी होता. राक्षसांना मारण्यात त्याचा मोठा सहभाग होता. रामाने रावणाला मारले ह्यात काही विशेष नव्हते, कारण रावणाचा अनेक वेळा पराभव झालेला होता. परंतु लक्ष्मणाने इंद्रजिताला मारले जो अजिंक्य होता. जीवनात इंद्रजिताने कधीही पराभव पाहिलेला नव्हता. अजिंक्य इंद्रजिताचा पराभव महापराक्रमी व बुद्धिमान लक्ष्मणाने केला होता. त्याची बुद्धी अती सूक्ष्म विषयाचा निर्णय करीत असे. राजधर्माच्या बाबतीतील त्याची भाषणे अतिशय श्रेष्ठ आहेत. चौदा वर्षाचा वनवास हा रघुकुळाला शोभणारा नाही त्यामुळे राजगादीच्या प्रतिष्ठेला धक्का बसणार आहे. दशरथाला कैदेत टाकावे आणि रामाला गादीवर बसवावे ही त्याची मनिषा होती. राम म्हणाला ही गोष्ट योग्य नाही, हे ऐकल्यावर बोलणे संपले मग नंतर प्रश्न नाही की विचार नाही. Not to question why? But to do and die!
खरोखर लक्ष्मणाच्या जीवनाचा अवर्णनीय, अद्भुत आणि अनुकरणीय आदर्श मानव जातीसमोर आहे. भरत सैन्यासह वनात आलाय म्हणजे नक्कीच हा रामाला मारायला आला असेल ना ! असे समजून लक्ष्मण धनुष्य बाण घेऊन भरताला मारायला निघतो. तेव्हा राम लक्ष्मणाला म्हणतो, “अरे, भरत मला मारायला नाही तर परत न्यायाला आला आहे, भाऊ कधी भावाला मारेल का ? तुला राज्य हवंय का ?” लगेच लक्ष्मण वरमतो. हीच गोष्ट त्याच्या हृदयाची श्रीमंती दाखवते.
लक्ष्मण अत्यंत कडक स्वभावाचा होता, परंतु त्याचबरोबर त्याच्याजवळ अंतःकरणाचे औदार्यही होते. अलौकिक चारित्र्य हा रघुकुलाचा परिपाक होता, प्रतिष्ठा होती. लक्ष्मणाचे चारित्र्य अत्यंत दैदिप्यमान आहे. सीतेचे दागिने ओळखण्याचा प्रसंग येतो त्यावेळी दुःखी झालेला राम लक्ष्मणाला विचारतो की सर्व दागिने सीतेचेच आहेत ना?
नाहं जानामि केयूरे नाहं जानामि कुण्डले।
नूपुरेत्वभिजानामि नित्यं पादाभिवन्दनात्।।
हे वाचल्यावर लक्ष्मणाविषयीची असलेली आपली आदर भावना द्विगुणित होते. अत्यंत पराक्रमी असूनही रामात स्वतः मिळून जाणे हा त्याचा मोठेपणाच आहे. सीतेला वनात सोडायचे काम रामाने लक्ष्मणावर सोपवले होते, लक्ष्मणाला ते मुळीच पटले नव्हते. सीता कायेने, मनाने शुद्ध आहे ह्याची लक्ष्मणाला खात्री होती. पण रामाची आज्ञा तो टाळू शकला नाही.
मारीचीच्या आवाजाने सीता बेचैन होते व रामाच्या मदतीला जा असे लक्ष्मणाला सांगते. लक्ष्मणाने मारीचीचा आवाज ओळखलेला असतो. सीता दुःखाच्या भरात अतिशय कठोर शब्द बोलते. सीता म्हणते, “तुम्हाला माझ्या रूपाची अभिलाषा आहे. तुम्ही गेला नाहीत तर मी माझी जीभ कापून मरून जाईन.” शेवटी नाईलाजास्तव मनाच्या विरुद्ध लक्ष्मण जातो. इकडे आड तिकडे विहीर अशी त्याची परिस्थिती होते.
शेवटचा प्रसंग, राम काल पुरुषाशी बोलत असतांना कोणी आत येऊ नये आणि आत आल्यास त्याला मृत्यू दंडाची शिक्षा होईल असे ठरले होते. त्यावेळी दुर्वास मुनी अयोध्येत येतात. त्यामुळे लक्ष्मणाला रामाच्या खोलीत जावेच लागते, कारण मी आल्याचा निरोप नाही दिला तर सगळी अयोध्या जाळून टाकेन असे मुनी म्हणतात. सिंहासनाची प्रतिष्ठा टिकविण्यासाठी रामाचा कंठ दाटून येतो. राम सांगतो, “हे लक्ष्मणा अयोध्या सोडून जा.” राम वसिष्ठ मुनींना म्हणतात, “मी बाबांचा, सीतेचा वियोग सहन केला पण मी लक्ष्मणाशिवाय जिवंत राहू शकणार नाही.” राम लक्ष्मणामागे शरयूत जातात.
लक्ष्मण म्हणजे रामाच्या कीर्तीध्वजाची काठी ! लक्ष्मणामुळेच रामरुपी ध्वज काठीवर फडकत आहे. लक्ष्मणच्या चरित्राचा विचार करीत असताना तर्क आणि प्रज्ञा काम करीत नाही. तर्क आणि बुद्धी ज्या ठिकाणी कुंठित होतील असे महान चरित्र लक्ष्मणाचे आहे. महर्षी वाल्मिकींनी रामाचे चरित्र चित्रण करून मानवासमोर संस्कृतीचे अतिशय उच्च ध्येय ठेवले आहे. तसेच ध्येयाप्रत पोचण्यासाठी लक्ष्मणासारखी उग्र साधना केली पाहिजे हे दाखवले आहे. लक्ष्मणासारखे असामान्य, अलौकिक आणि अपूर्व चरित्र जगाच्या इतिहासात कोणत्याही वाङ्मयात, कोणत्याही ठिकाणी मिळणार नाही. तीक्ष्ण बुद्धी असूनही स्वतःचे चरित्र रामात विलीन केले हाच लक्ष्मणाचा मोठेपणा. साध्य राम साधन लक्ष्मण त्याला माझा नमस्कार!