श्रीरामप्रभूंचे चरित्र हा समस्त भारतीयांच्या विचारविश्वाचा, भावविश्वाचा केंद्रबिंदू ! आज पासून ८ दिवस आपण रामायणातील काही महत्त्वाच्या व्यक्तिरेखा पाहणार आहोत. त्यापैकी पहिले पुष्प ‘अयोध्या’ हे आहे.
अतिशय विस्तृत असा कोसल नावाचा प्रदेश शरयू नदीच्या तीरावर वसलेला होता. या प्रदेशात वैवस्वत मनूने हिरवीगार, समृद्ध व धनधान्याने संपन्न अशी सुप्रसिद्ध अयोध्या नगरी वसवली होती. ही नगरी १२ योजने लांब व ३ योजने रुंद होती. या नगरीत रोज संध्याकाळी सुगंधित पाण्याने रस्ते शिंपलेले असत. तसेच त्यावेळी स्वर्गीय अप्सरा विमानातून फुलांचा वर्षाव करीत. कमानदार प्रवेशद्वारे संगमरवरी असून सोन्या रूपाने मढविलेल्या दरवाजांवर मौल्यवान रत्ने जडवलेली होती. अजस्त्र तोफा व गोफणयंत्रे शहराच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी ठेवलेल्या होत्या. रस्त्याच्या दुतर्फा ७ मजली इमारती व मोठमोठ्या बाजारपेठा होत्या.
कोरीव काम केलेले सुंदर राजवाडे, फुलाफळांनी बहरलेली झाडे, सुरेख बागांमध्ये नगरवासी जन कर्णमधुर संगीत ऐकत बसलेले असायचे. संपूर्ण शहरात भाट, गायक, नर्तक भगवंताच्या कीर्तीचे गुणगान, नृत्य करीत असत. तलावात रंगेबिरंगी कमळे फुललेली असायची. कारंज्यातून सुगंधी तुषार बाहेर पडत असल्याने सर्व नगरवासियांना वाऱ्याने थंडावा मिळत असे. त्यामुळे उन्हाळ्यातही लोकांना त्रास होत नसे. मोर व क्रौंच पक्षांचा गुंजारव सर्वत्र ऐकू येत असे. पिण्याचे पाणी व झाडाझुडपांसाठी पाणी मुबलक असल्याने सृष्टी नेहमी सुजलाम सुफलाम दिसायची. रथी, महारथी, योद्धे हातात शस्त्रास्त्रे घेऊन या महान नगरीचे संरक्षण करायचे. अयोध्येकडे जाणारे रस्ते प्रवाशांनी नेहमीच गजबजलेले असत.
देशोदेशीचे राजे, राजपुत्र व्यापारासाठी; वार्षिक खंडणी भरण्यासाठी किंवा एकमेकांना भेटण्यासाठी अयोध्येत येत असत. या अयोध्या नगरीत दशरथ नावाचा राजा होऊन गेला. तो वेदोक्ता, दूरदर्शी, महाप्रतापी आणि नगरवासियांचा लाडका होता. इक्ष्वाकु वंशातील दशरथ राजा अतिरथी, यज्ञयाग केलेला, धर्मनिष्ठ, त्रैलोक्य विख्यात राजर्षी, शत्रूंचा नाश केलेला, मित्रांनी युक्त, जितेंद्रीय होता. द्रव्य आणि इतर धान्यादी संचय यांच्या योगाने इंद्र कुबेरांशी बरोबरी करणारा होता. त्याने धर्म, अर्थ आणि काम या त्रिवर्गाचे अवलंबन केले होते. तो सत्य वचनी असून त्याने अयोध्या नगरीचे पालन उत्तमरित्या केले. अत्यंत श्रेष्ठ असणाऱ्या रघुवंशात राजा दशरथ शोभून दिसत असे. या श्रेष्ठ राजधानीतील लोक बहुश्रुत, धर्मनिष्ठ, आनंदित, समाधानी, संतुष्ट, निर्लोभी आणि सत्यवादी होते. ऐहिक व पारमार्थिक फल प्राप्त न झालेले आणि गाई, अश्व, पशु व धनधान्य यांची समृद्धी नसलेले एकही कुटुंब या नगरीत नव्हते.
अयोध्येत विषयलंपट, दुष्ट, अविद्वान, नास्तिक असा कोणी आढळत नसे. तेथील सर्व स्त्रिया व सर्व पुरुष शील आणि आचरण यांच्या योगाने महर्षींप्रमाणे निर्मळ असून इंद्रियनिग्रही आणि आनंदी होते. प्रत्येक जण कानात कुंडले, हातात विविध अलंकार, गळ्यात माळा धारण करणारे, चंदनादी सुगंधी उटी लावणारे होते. ब्राह्मण प्रभृती, चारही वर्णातील लोक; देव आणि अतिथी यांचे पुजन करणारे कृतज्ञ; उदार; शूर आणि पराक्रमी होते. लोक दिर्घायु असून स्त्रिया, पुत्रपौत्र यांसह वर्तमान सर्वच धर्म व सत्य यांचा आश्रय करून राहणारे होते. असे अयोध्येचे वर्णन वाचल्यावर तत्कालीन समाज किती श्रेष्ठ, संस्कारसंपन्न, धर्मनिष्ठ, कर्तव्य परायण, ज्ञानसंपन्न, वैभवसंपन्न, शीलसंपन्न होता याची कल्पना येते.
१४ वर्षे राम वनवासात गेल्यावर अतिव दुःखाने राजा दशरथाने राम राम म्हणत प्राण त्याग केला. त्यावेळी भरताला त्याच्या मामाकडून परत आणण्यासाठी वसिष्ठ ऋषी गेले. भरताला वस्तुस्थितीची काहीच कल्पना नव्हती. त्याला दिसले की शेतात लोक काम करत नाहीत. उद्याने रिकामी पडली आहेत. लोक गायन वादनाचा आस्वाद न घेता आपापसात गंभीर चर्चा करीत आहेत. नेहमीचा आनंद उत्साह जाणवत नव्हता. अयोध्येत पक्षांचा किलबिलाट सतत असायचा पण आता सर्वदूर शांतता पसरलेली भरताने बघितली. रस्ते अस्वच्छ होते, दुकाने बंद होती, मंदिरे ओस पडली होती. लोक भरताबद्दल एकमेकांशी कुजबुजत होते. काहीतरी अघटीत घडले आहे हे अयोध्येतील वातावरणावरून भरताने ओळखले व तो कैकयी मातेच्या महालात गेला. अयोध्येतून राम निघून गेल्यावर भरताला अयोध्येचे जे दुःखी दर्शन झाले त्याने तोही दुःखी झाला. अयोध्येलाही रामाचा, दशरथाचा विरह सहन झाला नाही.
लंकेत रामाने रावणाचा वध केला, बिभीषण लंकेचा राजा झाला. बिभीषण रामाला विनंती करतो की तुम्ही आता अयोध्येला परत जाऊ नका, लंकेचा राजा व्हा. राम म्हणतात, बिभीषणा, मला सोन्याच्या लंकेचा मोह नाही. मला स्वर्गाचाही मोह नाही. मला माझी अयोध्या पहायची आहे. माझ्या मातांना, भरताला, शत्रुघ्नाला, त्यांच्या भार्याना भेटायचे आहे. अयोध्या माझी मातृभूमी आहे. स्वर्गाचे वैभवही अयोध्येपुढे तुच्छ आहे.
अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते।
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी।।
मातृभूमीवर किती प्रेम करावे ते राजाकडून शिकावे. कितीही शिका मोठे व्हा पण भारत भूमीला विसरू नका. इथे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितेची आठवण होते – ‘ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला’
त्रेतायुगातील हे अयोध्येचे वर्णन आपण पाहिले. पण कलियुगातही जगाच्या नकाशावर आज अयोध्या चमकत आहे. त्रेतायुगातील अयोध्या म्हणजे जेथे युद्ध नाही ती अयोध्या ! पण गेली अनेक वर्ष अयोध्येने खूप युद्धे पाहिली. रामाच्या मुक्तीसाठी अनेकांना आपला जीव गमवावा लागला. पण रामाच्याच कृपेने २२ जानेवारी २०२४ या सुवर्ण दिवशी ५०० वर्षांच्या वनवासानंतर भव्य मंदिरात रामाची प्रतिष्ठापना अयोध्येत झाली. आपल्या सर्वांसाठी ही खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. देशविदेशातील पाऊले अयोध्येत रामाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. अयोध्येचा कायापालट झाला आहे. शरयूचे घाट सुंदर बांधले आहेत.
सरयू तीरावरी, अयोध्या मनुनिर्मित नगरी
इक्ष्वाकू-कुल-कीर्ती-भूषण, राजा दशरथ धर्मपरायण
त्या नगरीचें करितो रक्षण, गृहीं चंद्रसा, नगरिं इंद्रसा, सूर्य जसा संगरी
रामाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली अयोध्या, जिथे शरयू नदीत राम आणि त्याची भावंड डुंबली असतील त्या पवित्र शरयूला मी साष्टांग वंदन करते.
।। जय श्रीराम ।।