कोणत्याही समाजाचे संघटन, संरक्षण, संवर्धन,भौतिक व अध्यात्मिक वैभवाचे जतन हे शासनाद्वारे पूर्ण होत असते. शासनकर्त्यांनी देशाची सर्वांगीण प्रगती साधणे व देशाला वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवणे हे कार्य करावे ही लोकांची अपेक्षा असते. देशाटनात समर्थांनी लोकस्थिती, भयग्रस्त समाज, पारतंत्र्याचे परिणाम पाहिले व अनुभवले, म्हणून “पहिले ते हरिकथा निरूपण । दुसरे ते राजकारण । तिसरे ते सावधपण व चौथा साक्षेप” या खांबांवर त्यांनी आपला संप्रदाय उभा केला. अध्यात्मिक साधनेमुळे, मूळ मायेपासून निर्माण झालेल्या या चराचर विश्वात पशुपक्षी, वनस्पती, प्राणी, माणसे यात चैतन्यरूप अंतरात्मा आहे व तो शुद्ध जाणिवेच्या रूपात प्रगट होतो हे ज्ञान होते. समर्थांमध्ये ही जाणीव विशाल होती म्हणून त्यांना चराचरात राम रूप दिसले व सामाजिक जगदोद्धाराची चळवळ प्राणीमात्रांच्या सुखासाठी त्यांनी ‘राजकारण’ या शब्दातून उभी केली. तिला भगवंताचे अधिष्ठान होते म्हणून सामर्थ्य होते.
समर्थांच्या कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेत जनतेचे आरोग्य व आर्थिक स्थिती चांगली रहावी, त्यांना शिक्षण मिळावे, विद्या, शास्त्र, कला यांची समाजात वाढ व्हावी; जनतेला न्याय मिळावा व दंड करण्याची वेळच येऊ नये; आश्रमात राहून साधना, तपश्चर्या, अभ्यास करणारे संत; ऋषीमुनी यांना संरक्षण मिळावे या गोष्टींचा समावेश होता. “ऐसा पाहिजे की राजा कैपक्षी परमार्थी.” राजा राज्यसंस्थेचा प्रतिनिधी असावा. तो, जनतेचा सेवक; नि:स्वार्थी; पराक्रमी व अलिप्त असावा. प्रजाहित दक्षता, राज्य स्थापना व धर्मस्थापना हे त्याचे ध्येय असावे. प्रजेच्या सुखासाठी व राज्याच्या विकासासाठी त्याने अखंड प्रयत्न करावे. दुष्टांचा संहार, बंड पाखंडे मोडून काढणे, शत्रूला नामोहरम करणे, देशातील सीमा व समुद्र यांचे रक्षण सैन्यामार्फत करणे हे राजाचे कर्तव्य आहे. राजाने धर्मसत्ता व भक्तिमार्गाची प्रतिष्ठा वाढवावी, प्रजेला आत्मज्ञानाचा मार्ग दाखवावा. ईश्वराचे अनुसंधान सांभाळावे. ‘हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा’ या भावनेत अनासक्त वृत्तीने राज्य कारभार पाहावा.
शक्तीची उपासना – समर्थांच्या काळात त्यांना शरीर सामर्थ्याला फार महत्त्व द्यावे असे वाटले. शक्तीमुळे स्वसंरक्षण व राष्ट्र संरक्षण होते. सत्तेला शक्ती व युक्ती दोन्हीही आवश्यक आहेत.
महाराष्ट्रधर्म – समर्थांच्या राजकारणात राष्ट्रधर्म व महाराष्ट्र धर्माला प्राधान्य होते. “अवघे जन मिळवावे । धर्मकार्यासी लावावे । महाराष्ट्र धर्म स्थापावे । प्रतिष्ठा स्वराज्य ।।” हा त्यांचा विचार होता. स्वराज्य व सुराज्य निर्मितीसाठी त्यांनी अठरा पगड जातींना एकत्र केले. अभक्तांचा क्षय व्हावा, नष्ट; चांडाळ व पापींना शासन व्हावे, अन्याय व अत्याचाराला प्रत्युत्तर मिळावे यासाठी सर्वांनी हातभार लावणे महत्त्वाचे होते. मंदिरे सुरक्षित रहावी, धार्मिक आचाराचे स्वातंत्र्य असावे, विद्या व कला यांची वाढ व्हावी, वैभव संपन्न जीवनाकडे लोकांची वाटचाल व्हावी, म्हणून त्यांनी द्रष्टेपणाने अविरत “आनंदवन भुवनाचे” स्वप्न पाहिले. या एका ध्येयपूर्तीसाठी जे सामूहिक प्रयत्न त्यांनी केले तेच त्यांचे राजकारण होय. लोकांना राजी राखावे, त्यांचे अंत:करण सांभाळावे. नष्टाला नष्ट योजावे, सशक्ताला नाना बुद्धी शिकवाव्या, महंताने महंत करावे व देशभर मठ व महंत कार्यरत असावे या पद्धतीने समर्थांनी सामूहिक शक्ती उभी केली. “बुडाले सर्वही पापी हिंदुस्तान बळावले” या त्यांच्या वचनात संघर्षाचा तीक्ष्णपणा व विजयाचा आत्मविश्वास जाणवतो.
सावधपणा – समर्थांनी स्वराज्य स्थापनेच्या कार्यासाठी सावधपणा व गुप्तपणा याला महत्त्व दिले. “इशारतीचें बोलतां नये । बोलायाचें लिहूं नये, संकेतें लोक वेधावा, कांटीनें कांटी झाडावी, मुख्य सूत्र हातीं घ्यावें । करणें तें लोकांकरवीं करवावें” या पद्धतीने त्यांनी कार्य केले. शिवाजी महाराजांचा आग्र्याहून परतीचा प्रवास, अफजलखानाचा वध या सर्व प्रसंगात गुप्तता होती. समर्थांच्या कार्याचा पुरावा या गुप्ततेमुळे मिळत नाही.
श्रीराम व हनुमान यांचा आदर्श – राष्ट्रधर्म जागवण्यासाठी समर्थांनी श्रीराम व हनुमंत ही आराध्य दैवते लोकांसमोर ठेवली. श्रीराम चरित्रातून मानवता, संघटित प्रयत्न, नीती न्यायाचे राज्य, कर्तव्यनिष्ठा, निस्वार्थी प्रेम व सर्वांना आपलेसे करण्याची कला शिकता येते. हनुमंताच्या जीवनातून ब्रह्मचर्य, अचाट शरीरबळ, निर्भयता, बुद्धिचातुर्य व सेवेचे समर्पित जीवन दिसते. समर्थांच्या मठातून श्रीराम व हनुमंताच्या उपासनेमुळे लोकांच्या मनावर बळाचे व निर्भयतेचे संस्कार झाले व कल्याणकारी राज्याची संकल्पना लोकांमध्ये रुचली. समर्थांचे महंत स्वतःच्या चारित्र्याने, कर्तुत्वाने व उपासनेच्या प्रभावाने प्रभावी लोकनेता म्हणून कार्यरत होते.
समर्थांच्या ’राजकारण’ शब्दाभोवती आदर्श समाज रचनेचा वेध घेणारा तत्ववेत्ता आपल्याला दिसतो. त्यांचे स्वतंत्र रामराज्याचे स्वप्न म्हणजे “एका मंत्रदृष्ट्या ऋषीचे भावरम्य चित्र” म्हणून डोळ्यापुढे येते. आज आपण भक्तीची मांदियाळी व अयोध्या येथे साकार झालेले राम मंदिर पहात आहोत. याची अव्यक्त बीजे त्या स्वप्नात दडलेली असावीत.
“राज्य जालें रघुनाथाचें । भाग्य उदेले भक्तांचे ।।१।।
कल्पतरू चिंतामणी । कामधेनूची दुभणी ।।धृ।।
परीस झाले पाषाण । अंगीकार करी कोण ।।२।।
नाना रत्नांचे डोंगर । अमृताचे सरोवर ।।३।।
पृथ्वी आघवी सुवर्णमय । कोणीकडे न्यावे काय ।।४।।
ब्रह्मादिकांचा कैवारी । रामदासाचा अंतरी ।।५।।”
।। जय जय रघुवीर समर्थ ।।