“रघुनायका सारिखा देव नाहीं |
क्रिया पाहतां चोखडी सर्व कांहीं ||”
धर्माचे आचरण, वेदोक्त ज्ञान, विज्ञानाचा अभ्यास, सगुण–निर्गुण रामोपासना या गोष्टींचा जिथे साकल्याने विचार होतो त्याला संप्रदाय म्हणतात. संप्रदाय म्हणजे ‘सम्यक प्रदान’. यात सर्व विचार करून नियम, रीती नक्की करून गुरुकडून शिष्याला ज्ञान दिले जाते. संप्रदायात निश्चितपणे आखलेला मार्ग, चाकोरी, नियम, व्रते, साधना यांचा समावेश असतो.
समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या संप्रदायाला समर्थ संप्रदाय, श्री संप्रदाय, राम संप्रदाय, महाराष्ट्र धर्म, स्वरूप संप्रदाय अशीही नावे आहेत. आपल्या देशात आठव्या शतकापासून सुरू झालेली आक्रमणे, अत्याचार, १६ व्या शतकापर्यंत बरीच स्थिर झाली होती व वाढली होती. समर्थांनी हे देशाटनात अनुभवले, व मूळापासून त्याच्या उच्चाटनासाठी; हरवलेल्या धर्माची स्थापना; उद्ध्वस्त समाज कार्यरत करणे; गमावलेले स्वत्व लोकांच्या मनात निर्माण करणे या सगळ्यासाठी समर्थ रामदासांनी “स्वरूप संप्रदाय” स्थापन केला.
स्वरूप संप्रदायाची परंपरा – आदिनारायण- महाविष्णू-हंस-ब्रह्मदेव- वसिष्ठ-श्रीराम- रामदास अशी आहे. केंद्रस्थान – अयोध्या मठ, दैवते – जानकीदेवी; श्रीरघुनाथ; मारुती आणि तुळजा भवानी ही असून श्रीराम भक्ती व हनुमंताची उपासना या संप्रदायात सातत्याने होते. मठ – ११०० असून, ११०० मठपती व अनेक शिष्य या संप्रदायात होऊन गेले. या संप्रदायाची तीर्थस्थाने जांब, टाकळी, चाफळ, शिवथरघळ व सज्जनगड ही होत.
संप्रदायाचे चार स्तंभ – १. हरीकथा निरूपण, २. राजकारण, ३. सावधपण , ४.साक्षेप व आक्षेप फेडणे, हे आहेत. उत्सव – रामनवमी, हनुमान जयंती हे मोठ्या प्रमाणावर साजरे होतात.
संप्रदायाची पाच वैशिष्ट्ये – १. शुद्धउपासना, २. विमलज्ञान, ३. वैराग्य, ४. गुरु परंपरा, ५. संत परंपरा.
संप्रदायाची वीस लक्षणे – १. लेखन, २. वाचन, ३. अर्थांतर, ४. शंकानिरसन, ५. प्रचिती, ६. अर्थभेद, ७. गाणे व कीर्तन, ८. टाळी वाजवणे, ९. नृत्य, १०. प्रबंध, ११. प्रबोध प्रचिती, १२. वैराग्य, १३. विवेक, १४. लोक राजी राखणे, १५. राजकारण, १६. एकाग्रता, १७. प्रसंग जाणणे, १८. उदासीनता, १९. सर्वांशी समानता, २०. रामोपासना
स्वरूप संप्रदाय – स्वरूप म्हणजे सत्य, ज्ञान व आनंद याचे एकत्व. ब्रह्मबोध, ब्रह्मस्थिती किंवा आत्म्याची सत्ता होय. स्वरूपानुभव हे ज्ञानी पुरुषाचे प्रधान लक्षण आहे. परमार्थात त्याला सर्वोच्च स्थान आहे. मनाचा श्लोक ७७ मध्ये “करी रूप स्वरूप सर्वा जीवांचे” यात जीवाचे मन सूक्ष्मात गेले की ते भगवत् रूप होते व ते त्याला सर्व प्राणी मात्रात दिसते यालाच “निर्गुण रूप दर्शन” म्हणतात. स्वरूपानुभव आलेला साधक अनासक्त, देहातीत, व्यापक, अलक्षब्रह्मा – ब्रह्माशी लक्ष लावलेला, परब्रह्माशी अनन्य असतो. सकळ धर्मामध्ये स्व-स्वरूपी रहाणे हा उत्तम धर्म आहे. आठव्या दशकात स्वरूप स्थितीचे चांगले विवेचन आहे. स्वरुपात रहाताना साधक स्वरूपच होऊन जातो. घळीतल्या काकड आरतीत “उठी रे गोपाळा उघडी स्वरूप लोचना” असा चरण आहे. हे ज्ञानचक्षु आहेत. २१ समासीत समर्थ शिष्याला म्हणतात “तू, नि:संग; निर्मळ; आत्मस्वरूप आहेस.” यातील “मी” ची जाणीवही निर्विकल्प समाधीत नाहीशी होते. प.पू. गोंदवलेकर महाराज त्यांच्या ११ डिसेंबरच्या प्रवचनात म्हणतात “भगवंताला सर्व देण्यापेक्षा ‘स्व’ द्यायला शिका. एकदा ‘स्व’ दिल्यावर आपल्या मालकीचे काहीच रहात नाही व मी भगवंताचा आहे ही जाणीव मात्र मनामध्ये कायम राहाते”. प. पू. स्वरूपानंद स्वामी (पावस) म्हणतात “उदारा जगदाधारा देई मज असा वर, स्व-स्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर” स्वस्वरूपाचा विचार समर्थ अद्वैत तत्वज्ञानामुळे करतात. या विचाराचे अधिक चिंतन दासबोध ९–२–९, ७–६–४७, ७–१०–२९, ९–८–१६, दशक ८, मनाचे श्लोक १४५, ७७, १७३, व आत्माराम १-४, २-३४, ३-७, ३४, ३५, ५-१६ या समासांमध्ये आढळून येते.
समर्थ संप्रदायाची माहिती, त्याची वीस लक्षणे, सर्व रामदासी; दासबोध अभ्यासार्थी व सांप्रदायीकांनी अभ्यास करून आचरणात आणायला हवी. संप्रदायाच्या उभारणीसाठी व समर्थ रामदासांच्या विचारांच्या प्रचार प्रसारासाठी प्रयत्न करायला हवेत, कारण हे कार्य व विचार कालातीत आहेत. आजही त्यांची गरज आहे. समर्थ रामदासांचे चरित्र असामान्य व अलौकिक आहे. त्यांनी निर्माण केलेला संप्रदाय हिंदू धर्म संस्कृतीचा मानबिंदू आहे. त्याचे भवितव्य उज्वल करणे आपल्या हातात आहे. कल्याण स्वामी म्हणतात,
“धर्मस्थापना स्थापियेली | न्याय नीतीने भक्ती वाढविली |
संत मंडळी ते निवाली | बहू दास ज्याचे भूमंडळी |
जन्मजन्मांतरी पुण्य कोटी | बहु संचित होते गाठी |
योगीरायाची झाली ज्यास भेटी | त्यास कल्याण होय सृष्टी ||”
|| जय जय रघुवीर समर्थ ||