समर्थ रामदासांचे लोकशिक्षण

समर्थ रामदासांचे लोकशिक्षण
श्रीमती. सीमाताई रिसबूड
  • February 5, 2026
  • 1 min read

श्रीसमर्थ दासबोध दशक १ समास १ मध्ये म्हणतात, “आतां श्रवण केलियाचें फळ | क्रिया पालटे तत्काळ |” याचा अर्थ, शिक्षण म्हणजे विचारात व वर्तनात झालेला बदल होय. अध्यात्म ग्रंथ श्रवण करून त्याप्रमाणे साधना करणे याला श्रीसमर्थ ‘अभ्यास’ म्हणतात. महंताने अभ्यास करून, स्वत: अनुभव घेऊन, तसे वर्तन करून मग लोकांना शिकवावे हा त्यांचा आग्रह होता. दासबोध दशक १४ समास ४ मध्ये बावन्न मातृकांचा विषय आहे. ५२ मातृकांचे अधिष्ठान पंचभूते व षट्चक्रे आहेत. मातृकांमधून शब्द तयार होतो. विचारांनी भरलेले शब्द दृश्य स्वरुपात असतात व शब्दात अर्थ दडलेला असतो. शब्दाचा संबंध शरीराशी असतो. परा, पश्यन्ती, मध्यमा व वैखरी वाणीतून शब्द बाहेर पडतो. श्रीसमर्थांच्या शब्दात जोश, सामर्थ्य, वीररस, भक्ति याचे दर्शन घडते. अस्मानी सुलतानीच्या अत्याचाराने गांजलेल्या भयग्रस्त समाजाला “धीर्धरा धीर्धरा तकवा | हडबडूं गडबडू नका”, “उत्कट भव्य तेंचि घ्यावें | मळमळीत अवघेंचि टाकावें |” या शब्दांनी धीर दिला व महत्त्वाकांक्षी जीवनाची प्रेरणा मिळाली. शब्दानंतर अर्थ कळतो, तो शब्दाच्या उच्चारातच दडलेला असतो. अर्थाचा शब्द मनाशी असतो. शब्द व अर्थाचे रूपांतर, अनुभवात व प्रत्यक्ष वर्तनात होते. आध्यात्मिक अनुभव शब्दाने सांगतात पण अनुभव आल्यावर शब्द व अर्थ मागे पडून मौनाची स्थिती प्राप्त होते. 

ज्ञानदेवांप्रमाणे श्रीसमर्थांचे वाङ्मय मराठी भाषेत आहे. देशाटनात श्रीसमर्थ १६ भाषा शिकले, म्हणून उर्दू; हिन्दी भाषेतही त्यांनी लिखाण केले. लोकांना शिकवताना प्रथम अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षा याबाबत त्यांच्या अडचणी श्रीसमर्थ प्रथम जाणून घेत व त्यावर उपाय सांगत. “मानत मानत शिकवावे” ही त्यांची पद्धत होती. नेमके बोलावे व तात्काळ उत्तर द्यावे यासाठी स्वत: ज्ञानी होणे व अनुभव घेणे याला त्यांनी प्राधान्य दिले. त्या काळात “लेकुरें उदंड जालीं | तों ते लक्ष्मी निघोन गेली” हा कुटुंब नियोजनाचा तसेच “मेळविती तितुकें भक्षिती | ते कठीण काळीं मरोन जाती” हा बचतीचा विचार त्यांनी लोकांना सांगितला. बलोपासनेचे महत्त्व, सदा दात घासोनी तोंडा धुवावे ही शारीरिक स्वच्छतेची सूचना श्रीसमर्थांनी केली, त्याचा उपयोग आजही आपण करत आहोत.

श्रीसमर्थ साक्षरता प्रसाराचे ‘आद्य प्रवर्तक’ होते. लेखन, वाचन, अर्थांतर सांगणे ही त्यांची लोक शिक्षणाची पद्धत होती. “दिसामाजी कांहि तरी ते ल्याहावे | प्रसंगी अखंडित वाचीत जावे” हा नियम त्यांचे महंत काटेकोर पाळत. श्रीसमर्थांच्या शिष्यांच्या दासबोधाच्या हस्तलिखित प्रती आजही पाहायला मिळतात. अक्षर कसे असावे, लेखन क्रिया कशी करावी याविषयी दासबोधात एक समासच आहे. श्रीसमर्थांच्या लेखनात शब्द, भाषा मांडणी याची साखळी दिसते. 

श्रीसमर्थांनी लोक शिक्षणात स्त्रियांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. त्या काळात स्त्रियांना पळवून नेणे, भ्रष्ट करणे, अशा प्रकारांमुळे स्त्रिया असुरक्षित होत्या. अशा भीषण काळात श्रीसमर्थांनी वेणाबाई, अंबिकाबाई, आक्काबाई, यांच्यासारख्या मोठी परमार्थिक योग्यता असणाऱ्या उत्तमोत्तम शिष्या तयार केल्या. यांत  वेणाबाईंच्या शिष्या बयाबाई यांचाही समावेश होतो. वेणास्वामी मिरज मठाच्या मठाधिपती होत्या तर श्रीसमर्थांच्या निर्याणानंतर ४० वर्षे आक्कास्वामींनी चाफळ व सज्जनगड ही संस्थाने समर्थपणे चालवली. श्रीसमर्थांनी त्या काळात ही स्त्री शिक्षणाची चळवळ उभी केली.

श्रीसमर्थांनी उदासीन, आळशी, विवेकहीन, असहाय जनतेला आशावादी; प्रयत्नशील; विवेकी बनवले. लोकांना शरीर व मनाने बलवान बनविण्यासाठी श्रीसमर्थांनी लोकशिक्षणाची चळवळ उभी केली. श्रीसमर्थांचे ११०० मठ म्हणजे अध्यात्मिक विद्यापीठे होती. श्रीसमर्थांचे महंत नाना मते, घातक रूढी, परंपरा, पाखंडे, हा मतमतांचा गलबला मोडून नीतीची; धर्माची; उपासनेची; कर्मयोगाची शुद्ध कल्पना जनतेला समजाऊन देत. शिक्षण देताना लोकांची अंत:करणे सांभाळत, त्यांच्यातील दुरावा नष्ट करत. महंताचे लिहिणे, वाचणे, अर्थ सांगणे, वक्तृत्व, माणसांची पारख आणि नि:स्वार्थीपणा याकडे श्रीसमर्थ लक्ष ठेवत. तीक्ष्ण बुद्धीच्या मुलांना युक्ती-बुद्धीने सक्षम करून नवे महंत तयार करत. महंतांनी अशी शिस्त लावावी की, तो नसताना सुद्धा हे कार्य चालू राहील. अशा कार्यामुळेच समर्थ संप्रदायाचा विस्तार झाला. 

श्रीसमर्थांची शिक्षण पद्धती औपचारीक व अनौपचारीक होती. भिक्षेच्या वेळी व्यक्तीला भेटणे, त्याच्याशी संवाद साधणे, कुटुंबाचे निरीक्षण करणे या गोष्टी होत असत. प्रवचन कीर्तनाच्या वेळी समूहाचे शिक्षण होत असे. संवादाचे माध्यमही श्रीसमर्थ वापरत. दासबोध हा गुरु शिष्यांचा संवाद आहे. पूर्वारंभ गाथेत संवादच आहे. संवादामुळे व्यक्तीमध्ये  चांगल्या प्रकारे परिवर्तन होते. बहूजन समाजाला “मुलाचे चालीनें चालावें” या पद्धतीने श्रीसमर्थ शिकवत. सामान्य माणसांसाठी बाराखडी शिक्षण पद्धतीने त्यांनी लोकांच्या मनात शिक्षणाविषयी प्रेम निर्माण केले. श्रीसमर्थांच्या लोकशिक्षणामुळे, समाज  यशस्वी प्रपंच करून परमार्थाकडे लागला. एकमेकांवर प्रेम करू लागला. लोकांना स्वधर्म व स्वातंत्र्याचा विचार कळला. वाचन, लेखनामुळे विचार व विवेक शक्ती वाढली. खरा कर्ता राम या भावनेत लोक व्याप व वैभव वाढवून भक्तीच्या समाधानाचा आनंद भोगू लागले. 

“प्रथम लिहिणें दुसरें वाचणें | तिसरें सांगणें अर्थांतर |

आशंकानिवृत्ती ऐसी चौथी स्थिति | पांचवी प्रचीति अनुभवें |

साहावें तें गाणें सातवें नाचणें | ताळी वाजवणें आठवें तें |

नवां अर्थभेद दाहावा प्रबंद | आक्रावां प्रबोध प्रचीतीसीं ||”

 

|| जय जय रघुवीर समर्थ ||

Language