राम मंत्र श्लोक १९-२०-२१

राम मंत्र श्लोक १९-२०-२१
सौ. स्नेहल पाशुपत
  • January 5, 2026
  • 1 min read

“नसे सत्य कांहीं दिस दों दिसांचे

तुला लूटिती चोरटे लोक साचे ।

स्त्रिया पुत्र कामा न येती तुला रे ।

हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ।। १९ ।।”

 

सरळ अर्थ – या दृश्य जगात शाश्वत सत्य असे काहीच नाही. स्थित्यंतर/बदल हा निसर्गाचा नियम आहे. क्षणोक्षणी प्रत्येक वस्तूमात्र बदलत असते. या क्षणी सत्य साक्षात समोर असलेले असत्य ठरते, नाहिसे होते. जो पैसा, धन वेळेला उपयोगी पडेल म्हणून काबाडकष्टाने साठवला, तर ते प्रसंगी चोर-दरोडेखोर लुटून नेतात. तशीच वेळ आली की ‘आपले’ असणारे स्त्री-पुत्र इ. जीवलग सुद्धा मदतीला येत नाहीत. मुखी नित्य नाम असेल तरच काही हितकर होते. म्हणूनच अखंड ‘हरे राम हा मंत्र सोपा’ जपावा.  श्रीसमर्थांचा बोध – श्रीमद् आदिशंकराचार्य आपल्या “भज गोविन्दम्” या स्तोत्रातून हेच समजावून सांगतात. “का ते कान्ता कस्ते पुत्रः” आपल्याला आपल्या नातलगांचा खूप आधार वाटतो. आज परिस्थिती बदलली आहे. सगे-सोयरे, नातेवाईक आपले वाटत नाहीत. पण अगदी जवळचे आई-वडील, कन्या-पुत्र, पति-पत्नी, इ. कुटुंबीय तर फक्त माझेच असतात ना ? मात्र ते सुद्धा काही मर्यादेपर्यंतच आपले असतात. आज थोडे आजूबाजूला बघितले तर लक्षात यायला वेळ लागत नाही की, वाल्या कोळ्याची गोष्ट पुराणापुरती मर्यादित नाही तर वास्तव आहे. आज माणसाच्या स्वार्थाने चरमसीमा गाठली आहे. आपले म्हणवणारेच आपल्याला लुटायला बसले आहेत. नव्हे, मागील हिशोब पूर्ण करण्यासाठीच ते ‘संबंधी’ झालेले असतात. परमार्थाची वाटचाल करणाऱ्यांनी तरी हे ओळखून जगाचा भरवसा धरू नये. अंतरात एकच ठसवावे.

 

“राम येक माता राम येक पिता ।

राम सर्व भ्राता सहोदर ।।

त्यासाठीच श्रीसमर्थ सांगतात, ‘हरे राम हा मंत्र सोपा जपा रे.”

“नको तू कदापी करूं तीर्थयात्रा ।

तनू दंडिनी क्षीणता सर्व गात्रा ।

करी ग्रस्त आयुष्य तू कोण सारे ।

हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे ।। २० ।।”

सरळ अर्थ – चारशे वर्षांपूर्वी आजच्यासारखी प्रवासाची सुलभ साधने नव्हती. तीर्थयात्रा करणे जिकरीचे काम होते. अनेकदा लोक घरा-दारावर तुळशीपत्र ठेऊन प्रवासाला निघत. कारण, सुखरूप घरी परत येण्याची शाश्वती नव्हती. यातना आणि त्रास सोसणे म्हणजेच यात्रा असे मानले जाई व ते खरेच होते. म्हणून श्रीसमर्थ म्हणतात, अशा खडतर प्रवासाचे कष्ट, देहदंड सोसून किती पुण्यलाभ होणार ? त्याऐवजी शुद्ध अंतःकरणाने घरीच बसून निष्ठेने नाम घेतले तर जास्त बरे. तेव्हा हरे राम हा मंत्र सोपा जपा रे.

श्रीसमर्थांचा बोध – पुरश्चरण, जपानुष्ठान पूर्ण झाल्यावर बारा वर्षे तिर्थाटणाच्या निमित्ताने संपूर्ण भारतवर्ष आसेतूहिमाचल पादाक्रांत करणारे श्रीसमर्थ येथे म्हणतात, “नको तु कदापि करू तीर्थयात्रा” असे का ? श्रीसमर्थांचा तीर्थयात्रेचा हेतू आणि इतरांचा हेतू यात महदंतर आहे. तीर्थयात्रा करून पुण्यप्राप्ती एवढीच सर्वसामान्याची आदरयुक्त भावना असते. पूर्वीच्या काळी प्रवास करणे अत्यंत कठीण असे. वाटेत घनदाट जंगल, वन्य श्वापदांची भीती, त्याबरोबर चोर-दरोडेखोर, लुटारू यांची दहशत होती. मध्यम वयात गृहस्थाश्रमातील कर्तव्याची पूर्ती झाल्यावर वानप्रस्थ स्वीकारून एकमेकांच्या सोबतीने लोक तीर्थयात्रेला जायचे. तेव्हा किती काळ लागेल याची निश्चिती कोणीच देऊ शकत नव्हते. आज परिस्थिती अमुलाग्र बदलली आहे. आजच्या विज्ञानयुगात दळणवळणाची, अनेक सुखकर साधने उपलब्ध आहेत. पैसा खर्च केला तर प्रवासात, जेवण्याखाण्याच्या मनाप्रमाणे सोयी मिळतात. देवदर्शन, त्यासाठीचा भक्तिभाव असतोच असे नाही. तीर्थाटनाच्या नावाखाली ते पर्यटनच होते. खरोखर त्यातून पुण्यप्राप्ती होऊन मोक्षमार्गाला लागतो का ? हा ही एक प्रश्नच आहे. यामुळे शरीराला कष्टच जास्त होतात. सगळ्यांच्याच अंतःकरणात खरोखर ईश्वर प्राप्तीची ओढ, तळमळ असेलच असे नाही. केवळ रूढी, परंपरा, सगळे निघालेत म्हणून जायला पाहिजे. या आणि अशा विचाराने केलेली यात्रा पुण्यदायी असू शकते का ? अनेक संशय/विकल्प मनात ठेऊन केलेला प्रवास म्हणजे फुकटचा शीणच होतो. त्याने आत्महित कसे साधणार ? न पेक्षा घरीच निवांत बसून एकाग्र मनाने जप केला तर निश्चितच भावभक्तीच्या दिशेने पुढे पाऊल पडणार आहे. ईश्वरी अनुसंधान, जप, नामसाधन सोडून; प्रवासात, वेळ आणि शक्ती वाया घालवण्यापेक्षा सुलभ असे नामसाधन करणे श्रेयस्कर ठरते. म्हणूनच येथे श्रीसमर्थ म्हणतात ‘हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे’

“तुला येम पाशीं करी बद्ध जेंव्हा ।

सखा कोणता सोडवी सांग तेंव्हा ।

यमाला कदापि दया ते न ये रे ।

हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे ।। २१ ।।”

सरळ अर्थ – ज्यावेळी मृत्यू येतो तेव्हा कोणीही अगदी जीवाचा जीवलग, किंवा सत्ताधीश अधिकारी सुद्धा त्याला अडवू शकत नाही. ठरल्या वेळी ठरल्या क्षणी ‘तो’ येतोच. आणि तेथे कुठलीही विनंती, मागणी, लाच अशी कोणतीही मात्रा लागू पडत नाही. यमाला दयामाया नाही. म्हणूनच ‘हरे राम हा साधा सरळ सोपा मंत्र’ नित्य जपावा व आपले कल्याण साधावे.

श्रीसमर्थांचा बोध – जन्माला येणारा प्रत्येक जीव मृत्यू  बरोबर घेऊनच येत असतो. प्रत्येकाला मृत्यू  येणार हे निश्चित असते. फक्त मृत्यूची वेळ ठरलेली असली तरी, ती कोणालाही निश्चितपणे माहित नसते. यदाकदाचित तज्ञ ज्योतिषाने वेळ सांगितली किंवा आधुनिक  वैद्यकशास्त्राने वेळेची आधी कल्पना दिली तरी ते मरण टाळण्यासाठी कोण काय करू शकते? वाट पहाण्याशिवाय ज्योतिषी, वैद्य, सत्ताधीश असले तरी काहीही करू शकत नाही. श्रीसमर्थ दासबोधात लिहितात –

राजा असतां मृत्य आला । लक्ष कोटी कबुल जाला ।

तरि सोडिना तयाला । मृत्य कांहीं ।। १२-८-३२ ।।”

एकदा आला की, मृत्यू पळभराची सवड देत नाही. त्याच्यासमोर लहान-थोर, भला-बुरा, राजा-रंक, शूर-भित्रा भेद नाही. सर्वांवर मृत्यूचा तडाखा सारखाच बसतो. तेव्हा मरण निश्चित आहे. तर जाण्यापूर्वी मिळालेल्या संधीचे सोने करावे. आपल्या जन्माचे सार्थक करावे. त्यासाठीचा सर्वात सोपा आणि सुलभ मार्ग म्हणजे नामस्मरण करणे. या घोर कलियुगातील भगवंताचा अवतार म्हणजे नामावतार होय. त्याची मनोभावे आराधना करावी. हे ओळखून ‘हरे राम मंत्र  सोपा जपा रे’ असे श्रीसमर्थ  आपल्याला या श्लोकातून सांगत आहेत. 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Language