समर्थांचे सामर्थ्य

समर्थांचे सामर्थ्य
सौ. अनिता मुळे
  • November 15, 2025
  • 1 min read

अत्यंत बालवयामध्ये केवळ प्रभूरामचंद्राच्या दर्शनाची आस हृदयाशी बाळगत एक मुलगा घरदार, संपत्ती, आईवडील, भावंडे यांचा त्याग करतो काय आणि पुढे त्याच्या हातून अतुलनीय कार्य घडते काय!!  आसेतूहिमालय पसरलेल्या शतखंडित भारतवर्षाच्या एकत्रीकरणामध्ये अतुलनीय योगदान देणाऱ्या श्रीरामाचे दास, हनुमंतस्वरूप श्रीसमर्थ रामदासांचे कार्य सर्वांना ठाऊक आहे. “आधी केले मग सांगितले” अशा पद्धतीने धर्माचरण कसे करावे, हे श्रीसमर्थांनी स्वतःच्या कृतीतून दाखवून दिले. 

 

श्रीसमर्थ रामदास हे एक आध्यात्मिक योद्धा असल्याचे त्यांच्या कार्यातून दिसते. भारत भ्रमण करताना त्यांची गुरु गोविंदसिंग यांच्याशी भेट झाली व त्यांचे विचार पालटले व त्यांनी धर्मकार्याचा उपयोग प्रतिकाराच्या मार्गाने धर्मरक्षणासाठी करण्याचे सुरु केले. अतिशय गांजलेला समाज स्वतःच्या धर्माचे आचरण करताना घाबरून दीन झाला होता. तेव्हा, समाजाचे संघटन करून त्यांच्यामध्ये स्वत्त्व जागृत करणे गरजेचे होते. गावोगावी हनुमंत मंदिरे स्थापन करून सर्व तरुण वर्गाला व्यायाम, सूर्यनमस्कार यासाठी एकत्र करून त्यांच्यामध्ये शक्तीची उपासना जागवली. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या राज्यक्रांतीला समाजक्रांतीची जोड देवून धर्मक्रांती घडविली व त्यासाठी मावळ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम श्रीसमर्थांनी केले. स्त्रियांचे शील रक्षण करण्यासाठी सक्षम फौज बनविली. गावोगाव फिरून हनुमान मंदिरे व मठ स्थापन केले. योग्य नेतृत्वगुण असलेले महंत स्थापन करून लोकजागृतीचे बीज रोवले. 

 

समाज धर्मवेडा होता तेव्हा, रामनवमीचा उत्सव सुरु केला. शस्त्रधारी श्रीरामांप्रमाणे प्रत्येकाने शस्त्र बाळगून प्रतिकार करावा, श्रीरामांचे सर्वगुण अंगीकारावे असे पटवून दिले. अध्यात्मिक मार्गातून लोकसंघटन केले. ‘जय जय रघुवीर समर्थ’ अशी गर्जना करणाऱ्या रामदासांनी घरोघर जावून मनाच्या श्लोकांद्वारे जीवन कसे जगावे याचा बोध केला व सर्वसामान्यांत स्वाभिमान जागवला. विवेक व प्रयत्न हे दोन अनमोल गुण अंगिकारले की मनुष्य प्रगती करतो हे सर्वांना पटवून दिले. श्रीसमर्थांनी मठातील महंतासाठी एक आचारसंहिता तयार केली. जी “दासबोध” ग्रंथात आहे. 

 

जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दासबोधात आहे. त्यातील वीस दशक दोनशे समास पाहिल्यास प्रत्येक मनुष्याने संसार करता करता परमार्थ कसा करावा हे त्यांनी दाखवून दिले. समाजाविषयी अपार तळमळीतून श्रीसमर्थानी विपुल वाङ्मय निर्मिती केली. दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके, भीमरूपी स्तोत्रे, अनेक आरत्या लिहिल्या. गणपतीची सुखकर्ता दुखहर्ता आरती आणि अशा अनेक आरत्यांमधून समाजात धैर्य, आत्मविश्वास वाढविला. श्रीसमर्थांची शिकवण म्हणजे कर्म, उपासना, ज्ञान, विवेक, भक्ती, प्रयत्न व सावधानता यांच्याद्वारे सर्वसामान्य मनुष्याने प्रयत्नपूर्वक व विवेकाने आचरण केल्यास त्याचे योग्य व्यक्तीमत्व तयार होते. लोकांनी साक्षर व्हावे यासाठी श्रीसमर्थांनी खूप प्रयत्न केले. मुसलमानी राजवट व बाबा, फकीर, संन्यासी यांच्यामध्ये जखडलेल्या मनुष्याच्या अंधश्रद्धेचे रूपांतर श्रद्धेत केले. सर्वसामान्य मनुष्य वासना, पैसा, स्त्रीसुख यातच सुख मानत असतो. मनुष्याने संसार करता करता परमार्थ कसा साधावा हे श्रीसमर्थ सांगतात. संसारातील प्रत्येक कर्म हे वासना न ठेवता भगवंतास अर्पण केल्यास परमेश्वर प्राप्त होईल, मोक्ष प्राप्त होईल, हे त्यांनी पटवून दिले. 

 

आसक्तीच्या आहारी गेलेल्या मनुष्याला श्रीसमर्थानी मनाच्या श्लोकांमधून मार्गदर्शन केले. “देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी” या ओळीतून समर्थांनी कसे जगावे हे सांगितले. अतिशय दुर्लभ नरदेह प्राप्त करून आपल्या भक्तीने जीवनाचे सार्थक करावे असे श्रीसमर्थ सांगतात. कोदंडधारी रामाप्रमाणे सज्जनाने शब्दरूपी शस्त्र आणि अस्त्राचा वापर विवेकाने करावा. आजच्या काळात जगभर शस्त्रांच्या जोरावर दहशतवाद वाढतो आहे. प्रत्येकाने शस्त्रसज्ज असावे. रामदासांनी शक्तीचा बोध  देऊन स्वाभिमान टिकवण्यासाठी शस्त्र धारण करणे कसे आवश्यक आहे हे पटवून दिले. मूर्ख माणूस देह म्हणजेच मी असे मानतो. या शरीराचा परमार्थासाठी साधन म्हणून उपयोग केला तर जीवनाचे सार्थक होते, याचे समर्थन केले.

 

श्रीसमर्थानी मन, मेंदू आणि मनगट यांचे जीवनातील महत्त्व ओळखून समाजाला क्रियाशीलतेचा जागृत मंत्र दिला. ते प्रयत्नांना परमेश्वर मानणारे प्रयत्नवादी संत होते. श्रीसमर्थानी चारशे वर्षापूर्वी मृतप्राय समाजाला आपल्या ओजस्वी वाणीतून जागृत केले. जीवनविषयक मूल्ये, परिस्थितीचे आकलन, वर्तन, आत्म-परीक्षण असे असंख्य पैलू श्रीसमर्थ वाङ्मयात दिसतात. सामान्य मनुष्य श्रद्धेच्या, भक्तीच्या द्वारे ईश्वर; आत्मा; आत्माराम सर्व जाणून घेऊ शकतो. माणसाच्या आयुष्यात सद्गुरु महत्त्वाचे असतात. “यत्न तो देव जाणावा” हे ब्रीदवाक्य श्रीसमर्थांनी स्व-आचरणातून समाजास दाखविले. अशा श्रीसमर्थ रामदास स्वामींना माझा दंडवत. 

 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

 

Language