“कोपला रुद्र जे काळीं । ते काळीं पाहवेचि ना ।
बोलणे चालणे कैचें । ब्रह्मकल्पांत मांडिला ।। १ ।।”
शिव कोपला की कल्पांत होतो. दक्ष राजाच्या यज्ञाच्या प्रसंगी पतीचा अपमान/उपमर्द सहन न झाल्याने देवी सतीने अग्नी प्रवेश केला तेव्हा अत्यंत क्रोधीत होऊन शिवाने तांडव केले. जणू कल्पांत आला अशी भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली. शंकर ही देवता तिच्या विनाशकारी शक्तीसाठी प्रसिद्ध आहे. कोपला रुद्र म्हणजे या शिवाच्या अकराव्या रुद्राचा अंश अवतार मारुती जेव्हा कोपला तेव्हा काय परिस्थिती उत्पन्न झाले त्याचे वर्णन समर्थ या मारुती स्तोत्रात करीत आहेत. देवतांचे सौम्य रूप आपल्याला भावते, आवडते आणि सहन होते. रौद्र रूप मनात धडकी भरवते. भगवंताचे विराट विश्व रूप पहाताना अर्जुनाची अवस्था कशी झाली होती ? पहावेचिना अशीच होती म्हणून तर भगवंता, आपल्या सौम्य रूपात आपण यावे अशी विनंती अर्जुनाला करावी लागली आणि देवानेही ती मान्य केली.
मारुतीराय का बरे एवढे कोपले ? रागावले ? तर रावणाने उच्छाद मांडला होता. वैदिक धर्म संकटात होता. उपास्य देव सारे रावणाच्या कैदेत हाल अपेष्टा भोगत कनिष्ठ कार्य करीत होते. देवतांची ही अवस्था, तर सामान्य माणसांचे काय सांगावे ? देशोदेशीच्या रूपवान स्त्रिया त्याने आपल्या अंत:पुरात आणून बंदी केल्या होत्या. रावण विद्वान होता, शिव भक्त होता पण अन्य असुरांसारखाच त्याला अनावर मोह होता आणि शक्तीचा अहंकार होता. प्रत्यक्ष जगदंबेला/सीतामाईला हरण करून बंदी बनवण्याचा घोर अपराध रावणाने केला होता. देवता या पूजनीय असतात हे विसरून त्यांची विटंबना केली होती. हे सारे मारुतीरायांनी लंकेत फिरून पाहिल्रे आणि त्यांच्या तळ पायाची आग मस्तकी गेली.
समर्थांनी देखील १२ वर्षे देश फिरून पाहिला आणि देवा-धर्माची दुरवस्था, समाजाची दैन्य अवस्था पाहिली होती. मारुतीची लंकेत जी मनाची अवस्था होती तीच समर्थांची भारत फिरताना झालेली होती. या भाव अवस्थेत हे स्तोत्र समर्थ रामदास स्वामीना स्फुरले हे ध्यानात घेतले की, समर्थांच्या शब्दांना एवढी धार का आहे, त्यातून स्फुल्लिंगे का बाहेर पडत आहेत हे ध्यानात येते. रावणाचे वन उध्वस्त करणारे मारुतीराय आणि त्यांच्या शेपटीला चिंध्या बांधून पेटवून दिल्यानंतरचे मारुती राय आणि प्रत्यक्ष रणांगणातील मारुतीराय हे अत्यंत क्रोधायमान अवस्थेत होते. हा सात्विक संताप होता. अन्यायाचा बदला घ्यायची त्यांची भूमिका होती. तेच स्फुल्लिंग तोच सात्त्विक संताप देशातील तरुण मनात फुलावा असाही हेतू समर्थांचा हे स्तोत्र लिहिताना असावा. समर्थ म्हणतात की, मारुतीचे हे रूप पहाणे अतिशय भय उत्पन्न करणारे होते. कोणाच्या मनात ? तर ज्यांनी अन्याय केला किंवा अन्यायाची पाठराखण केली त्यांच्यासाठी ल. सीतामाई, बिभीषण यांना मारुतीरायांच्या क्रोधाचा त्रास झाला नाही; कारण ते राम भक्त होते आणि त्यांना राम नामाची कवच कुंडले होती. मारुतीरायांने लंकेत जे आरंभले तो सर्वनाश होता, जणू ब्रह्माचा कल्पांत ओढवला होता व सारी लंका त्या विनाशाच्या कराल काळ मुखात जात होती.
“ब्रह्मांडाहूनि जो मोठा । स्थूळ उंच भयानकु ।
पुच्छ तें मुरडिले माथां । पाऊल शून्य मंडळा ।। २ ।।”
मारुतीचे हे विश्वाला व्यापून उरणारे उग्र रूप कसे होते ? ते अतिशय भव्य, उंच आणि उग्र होते. त्याने आपली शेपटी मस्तकाजवळ आणली होती तर पाऊल सूर्य बिंबापाशी होते, एवढे ते विशाल होते. जसे भगवान श्रीकृष्णाचे विराट दर्शन हे कृष्ण अवतारापेक्षा किती तरी विशाल होते तसेच हे मारुतीचे व्यापक रूप समर्थ वर्णन करतात. ते मारुती अवतारापेक्षा खूप मोठे जाणवते. ते केवळ देहाचे विस्तारणे नाही तर ते परब्रह्म स्वरूपाचे, त्याच्या सर्व शक्ती सामर्थ्यानिशी व्यक्त होणे असते.
“त्याहून उंच वज्रांचा । सव्य बाहो उभारिला ।
त्यापुढें दुसरा कैंचा । अद्भूत तुळणा नसे ।। ३ ।।”
हनुमानाचा वज्रासमान हात सूर्य बिंबापेक्षा उंच होता असे समर्थ म्हणतात तेव्हा ते विशाल रूप विश्वाच्या मर्यादा ओलांडून कितीतरी मोठे आहे असे समर्थ सांगत आहेत. त्या हाताचा आघात विलक्षण संहार करणारा होता. हनुमानाच्या पुच्छाने लंकेचा विध्वंस केला. त्याचा हात व त्यातही गदाधारी हात हा त्याच्या विलक्षण सामर्थ्याचे प्रतीक मानावे लागेल. हे अद्भुत रूप अतुलनीय असेच आहे.
“मार्तंडमंडळा ऐसे । दोन्ही पिंगाक्ष ताविले ।
कर्करा घर्डिल्या दाढा । उभे रोमांच ऊठिले ।। ४ ।।”
मारुतीरायांच्या नेत्रात क्रोध म्हणजे जणू अंगार पेटला होता व त्याची तुलना सूर्य बिंबाच्या दाहकतेशीच करता येणे शक्य आहे. तसेच करकरा वाजणारे दात हे क्रोधाच्या तीव्रतेचा अंदाज देतात. ते ऐकून अंगावर काटा येत होता असे समर्थ सांगत आहेत. हे सारे दुष्टांच्या हृदयात धडकी भरवते तर सज्जन आणि जे दुर्जनांच्या त्रासाने गांजलेले आहेत त्यांना आशेचा किरण दाखवणारे ठरते.
“अद्भूत गर्जना केली । मेघचि वोळिले भुमीं ।
तूटले गिरीचे गाभे । फुटले सिंधू आटले ।। ५ ।।”
हनुमानाची गर्जना मोठी विलक्षण आणि भयानक होती. जणू गर्जना करून प्रचंड मेघ भूमीकडे वोळले म्हणजे वळाले. मेघांची दिशा बदलू शकेल इतकी ती गर्जना प्रभावी होती. आपली दैवते ही पंचभूतांना वळवू शकतात इतकी प्रभावी असताना आपण मात्र हात-पाय गाळून अन्याय सहन करणे योग्य नाही, असा संदेश समर्थ या स्तोत्रातून देत आहेत. त्या गर्जनेच्या स्पंदनांमुळे पर्वतांचे कडे तुटत होते तर सागराचे जल आटत होते. आपण काही वर्षांपूर्वी हिमाचल प्रदेशात झालेले भूस्खलन आणि प्रचंड जल वर्षाव यांचा विनाशकारी अनुभव घेतला आहे, आणि म्हणून या वर्णनाचा अर्थ आपल्याला लागू शकतो.
“अद्भूत वेश आवेशें । कोपला रणकर्कशू ।
धर्म संस्थापनेसाठीं । दास तो ऊठिला बळें ।। ६ ।।”
हनुमानाचा हा रण आवेश कुठल्याही वैयक्तिक कारणासाठी नाही. तो पुन्हा धर्म नीती यांची स्थापना करण्यासाठी आहे. श्रीराम आणि हनुमान यांच्या कार्याचा हा हेतू समर्थ या श्लोकात सांगत आहेत. हनुमान रणभूमीवर चालताना ती हादरत होती. हे धक्के रावणाच्या अन्यायी राजवटीला होते. नीती-धर्म यांना सोडून वागण्याला होते. अहंकार, कामी वृत्तीला आव्हान होते. म्हणून हा कोप, हा क्रोध वंदनीय आहे. सज्जन लोकांचे रक्षण आणि दुर्जन-आसुरी प्रवृत्तीच्या लोकांचे निर्दालन हे श्रीराम आणि श्रीहनुमान यांच्या अवताराचे कारणच होते.
“यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत ।
अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्म्यानं सृजाम्यहम ।
परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम ।
धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ।।”
या भगवंताच्या आश्वासनांची आठवण हे स्तोत्र वाचताना/अभ्यासताना होते.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
संदर्भ :- सार्थ व सविवरण भीमरूपी स्तोत्रे (डॉ. सौ. सुनीती विजय सहस्रबुद्धे)