परमेश्वराची कृपा संपादन करण्यासाठी केलेला धावा म्हणजे करुणाष्टक धावा. गजेंद्राचा, द्रौपदीचा संकटमुक्त करण्यासाठी केलेला धावा आठवतो. आद्य शंकराचार्यांची अष्टके आठ श्लोकांचीच आहेत, पण समर्थांची काही अष्टके आठ श्लोकांची आहेत, तर काही नाहीत. समर्थांची करुणाष्टके म्हणजे भगवंताची करुणा भाकण्याकरिता रचलेली आर्त गीते आहेत. समर्थांच्या काही करुणाष्टकांत चौथ्या चरणाची पुनरावृत्ती आहे. ही चरणे मनावर आघात करतात व तो विचार मनावर कायमचा कोरला जातो.
“बुद्धी दे रघुनायका” हा चरण एक नाद, लय, निर्माण करतो. समर्थांच्या करुणाष्टकातील भाव, भावना, निराशा, अगतिकता व्यक्तीनिष्ठ नाही तर व्यापक समाजमनाची आहे. “प्रपंचसंगे आयुष्य गेले”, “सुदृढ झाली देहबुद्धी देही” हा समर्थांचा वैयक्तिक प्रश्न नाही, तर तो जनमानसाचा प्रश्न आहे. तो त्यावेळी होता व आजही आपण तो अनुभवतो आहे.
समर्थांच्या करुणाष्टकांची निर्मिती दु:खातून झाली. जन्म हाच दु:ख मूळ. मीपणाच्या जाणिवेचे दु:ख, त्रिविध तापाचे दु:ख, देहाच्या व्याधीचे दु:ख, साधकावस्थेतील दु:ख, अज्ञानाचे दु:ख, विरहाचे दु:ख, समर्थांनी पाहिले होते. भिक्षेसाठी गेले असताना घराघरातले दु:ख, व्यक्ती व्यक्तींचे दु:ख, समाजातील भयग्रस्त परिस्थिती त्यांनी प्रत्यक्ष पाहिली होती. दु:खाचे मूळ कारण अज्ञान. ज्ञान नाही म्हणून भरकटलेले लोक समर्थांनी पाहिले. अंध:श्रद्धा, साधनेचे अघोरी प्रकार, गैरसमजुती यामुळे लोक गांजलेले होते. “सुख सुख म्हणता दु:ख हे ठाकोनी आले” अशी त्यांची स्थिती समर्थांनी पाहिली होती. दु:खावर उपाय योजण्याची क्षमता नाही. दु:खाचे मूळ कारण ईश्वराचा वियोग व अज्ञान हे होय. “तुझिया वियोगे जीवित्व आले” असे समर्थ याचसाठी म्हणतात. समर्थांच्या काळात योग्य मार्ग दाखवणारा आध्यात्मिक नेता नव्हता, पारतंत्र्यामुळे लोक भयग्रस्त होते. सगुण निर्गुण श्रीरामाची उपासना कशी करावी ? याचे लोकांना ज्ञान नव्हते.
समर्थांना केवळ श्रीराम कृपाच हे दु:ख कमी करेल हा विश्वास होता. त्याच्या जवळ कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे. त्याच्याशी दास, सखा, मित्र, स्वामी असे नाते जोडावे. काया, वाचा, मनाने त्याचे व्हावे असे त्यांना वाटे व तशी प्रार्थना ते करुणाष्टकांतून करतात.
अनन्यता – समर्थांना “एका रामाशिवाय माझे कोणी नाही” अशी अनन्य भक्ती करणे आवडत असे. तोच तारणारा, तोच माझे सर्वस्व म्हणून “तुजवीण रघुनाथा वोखटे सर्व काही”, “तुजवीण रामा मज कंठवेना” असं ते म्हणतात. सामान्य जन मात्र प्रपंचात इतके गुंततात की, त्यांना ईश्वराची आठवण येत नाही, त्यांचा परमार्थ सवडीचा असतो.
संवाद – समर्थ सर्वस्वी श्रीरामाचे झाले म्हणून ते त्याच्याशी संवाद साधत. अशी एकाग्रता, तळमळ सामान्य माणसांमध्ये नसते. या संवादात “दुष्ट संहारिले मागे ऐसे उदंड ऐकतो । परंतु रोकडे काही मूळ सामर्थ्य दाखवी ।” हा हट्ट आहे. काया, वाचा, मनाने तुझा झालो म्हणून “हे लाज तुजला माझी” यात सख्यत्व आहे. संवादात एका रामाशिवाय ही कृपा कोणीही करू शकत नाही ही प्रांजळ कबुली आहे. माझ्या साधनेत काही कमतरता आहे का ? हा प्रश्नही ते विचारतात. “नव्हे कार्यकर्ता भूमिभार झालो” अशी व्यथा ते मांडतात. हा संवाद आतील मनाचा होता, ते हितगुज होते, देव-भक्ताचा एकांतात घडलेला हा संवाद होता. एका असामान्य, निष्ठावान, श्रद्धाळू, अनन्य भक्ताचे ते हितगुज होते.
भाषा – ईश्वराशी संवाद साधायला समर्थांसारखे संत योग्य शब्द योजना करतात. प्रभूचे अंत:करण वितळावे, करुण रसातून, प्रेमातून त्याचे लक्ष आपण वेधावे, आर्तता प्रगट व्हावी म्हणून शब्दांचे सामर्थ्य समर्थ प्रगट करतात. “तुजवीण करुणा हे कोण जाणेल माझी ? तुजवीण शीण होतो धाव रे धाव आता” यातील शब्द योजना पाहिली की त्यातील सामर्थ्य जाणवते. त्यातील एकही शब्द इकडचा तिकडे करता येत नाही. कारण त्यांची मांडणी नेमकी, नेटकी व प्रत्ययाची आहे.
भावावस्था – “श्रीराम आहेच” या मनाच्या अवस्थेला भाव म्हणतात. समर्थांमध्ये तो परिपूर्ण होता. पश्चात्ताप, कमतरतेची प्रांजळ कबुली, लोकांचे दु:ख कमी होण्याची तळमळ असलेला, हे लोक तुझेच; म्हणून स्मरण करुन देणारी तळमळ त्यात आहे.
अद्वैताची अवस्था – करुणाष्टकात श्रीराम व समर्थ यांची एकरूपता दिसते. “जेथे शब्दच निमाला, तेथे रामदास रामचि झाला” अशी अवस्था शब्दांतून प्रगट होते.
मागणे – “रघूनायका मागणे हेची आता”. कोमळ वाचा, विमळ करणी, प्रसंग ओळखी, धूर्तकळा, हितकारक ते, विद्यावैभव, शब्दमनोहर, अर्थारोहण, अलापगोडी अशा शब्दात समर्थ रामाकडे मागणे मागतात. त्यात वैयक्तिक स्वार्थ नाही. “मजविण तू मज दे रे राम” यात अद्वैताची परमोच्च अवस्था आहे.
आपण सज्जनगडावर जातो तेव्हा मनातले ताण तणाव, प्रापंचिक दु:ख विसरतो. ‘प्रभाते मनी राम चिंतीत जावा’ या विचारात उठतो. समर्थ समाधी व श्रीरामाचा अभिषेक पहातो. सायंकाळी करुणाष्टके म्हणतो तेव्हा आपली व्यथा, दु:ख श्रीरामासमोर मांडले म्हणून मन हलकं व शांत होते, उत्साह वाढतो, एकाकीपणा नाहीसा होतो. रात्री दासबोध वाचन, शेजारती होते. मनाला विश्रांती व समाधान मिळते; प्रसन्न वाटते.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।