समर्थ रामदास स्वामींचे आराध्य दैवत आहे श्रीराम! श्रीरामांवर त्यांनी नऊ आरत्या रचल्या आहेत. त्या प्रत्येक आरतीमधील आशय वेगळा आहे. त्या व्यतिरीक्त सद्गुरु श्रीरामांवर एक आरती आहे. त्याचप्रमाणे श्रीदेव म्हणून श्रीरामांवर आरती आहे. तसेच दासभक्तीचे आदर्श प्रतिक श्री हनुमंतरायांवर एक आरती आहे.
हनुमंतांच्या आरतीची सुरवात द्रोणाचल उचलून आणला त्या कथेने केली आहे. यातुन त्यांना हनुमंत हा शक्तीमान, दिलेले काम काहिही करून, जीवाचा आटापीटा करून पूर्ण करणारा होता, हे दाखवून त्याचा आदर्श सर्वांनी ठेवावा हे सांगीतले आहे. तसेच आला गेला कामाला बहुताला भधून आपण सर्वांच्या त्याच्यासारखे उपयोगी पडले पाहिले हे ते सुचवू इच्छितात. म्हणजे यष्टी, समष्टी यांचा विचार केला पाहिजे हाही उपदेश यातून ते देताता. यष्टी = व्यक्ती तर समष्टी मध्ये कुटुंब, समाज, राष्ट्र, वसुधा व संपूर्ण ब्रह्मांड यांचा समावेश आहे. रामकथा सांगून आली. मग श्रीरामांची आरती. रामदास स्वामींनी ती रचुन अगदी स्वत:चा आनंद प्रगट केला आहे. आपल्या डोळयासमोर त्यांनी त्यांचे निकटवर्तिय कुटुंब उभे केले आहे. ते आपल्या या दैवताचे वर्णन करताना पूर्ण तल्लीन झाल्याचे भासते. श्रीराम सुध्दा कुटुंबवत्सल होते. त्या कुटुंबात भक्तगणांचा समावेश होता हे या आरतीतून दृष्टीपथात येते. त्या शामसुंदर श्रीरामांविषयी ते म्हणातात, शामसुंदर शोभे त्रिदश कैवारी । त्यांच्या दक्षिणेकडे शेषनागाचा अवतार लक्ष्मण तर वामांगी सीता सुंदरी आहे. भरत, शत्रूघ्न, माता कौसल्या हे डोळे भरून पहात आहेत. पुढे मारूतीराया हात जोडून बसला आहे. सर्व भक्तगण, टाळ, मृदंग, नगारा व इतर अनेक वाद्ये घेऊन नामघोष करीत आहेत. टाळ्यांचा सुध्दा सुमधुर ध्वनी दुंजन करीत आहे. आणी हे सर्व ऐकून पाहून रामदास अगदी आनंदी झाले आहेत. अशीही शांतरसात वाहून जाणारी ही आरती आहे.
पुढे समर्थ श्रीरामांना आता उठण्याची वेळ झाली आहे. आपल्या उठण्याची वाट पहात आहेत. सर्वजणन तुमच्या दर्शनासाठी उत्सुक आहेत. हे सांगत आहेत ते वर्णन करतात की, जनकराजांची कन्या म्हणले सीता सोन्याच्या थाळीत दिवा ठेऊन आरती घेऊन सज्ज आहे. उठ रे बाळा असे कौसल्यामाता सांगत आहे. तुझे मुखकमल पाहण्यासाठी, दर्शनासाठी कोण कोण आले आहेत ते पहा. विवेक संपन्न वशिष्ठ सद्गुरू आले आहेत. साधुसंत, मुनी, यती, ब्रह्मवृंद, योगी तिष्टत आहेत. ते प्रेमादराने तुझा जयजयकार करत आहेत. जीवाशिवाचे ऐक्य असते तसे तुमचे ऐक्य असणारे भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण हे उम्मन होऊन आपल्या दर्शनाची प्रतिक्षा करत आहेत. त्याच रांगेत सात्विक गुणसंपन्नअसा सुमंत प्रधानही ऊभा आहे. नगरगण जमा झाले आहेत. वायुपुत्र हनुमान चरणाची धुळ मस्तकी लावण्यासाठी तिष्टत ऊभा आहे. आणि मग ते श्रीरामांचे वर्णन करतात, ते म्हणतात तू दीनबंधू आहेस, दयाळू कृपाळू, भक्तवत्सल आहेस, तेव्हा आता दर्शन दे. तुझे ते कमलनयन माझ्याकडे स्थिर कर. तू जगजीवन आहेस, तू आनंदरूप होऊन भक्तांना दर्शन दिले तसे मला दे.
शेवटच्या पांचव्या व सहाव्या कडव्यात खूप मोठे तत्वज्ञान दडले आहे. तू माझ्या जीवाचा जिव्हाळा आहेस तू दिनांचा कैवारी आहेस, दयाळू आहेस मग माझ्यावर कृपा कर. कारण तू भक्त वत्सल आहेस. तू आनंदरूप होऊन दर्शन दिले आहेस. स्वये आनंदरूप होऊनी । भक्ता दर्शन दिधले ।। रामा तू जगजीवन आहेस. यातून ते सांगू इच्छितात की, त्यामुळे आमची श्रध्दा वाढते. आमच्या अंत:करण प्रेमभावना जागृत होते आणि हाच भक्तीचा प्रारंभ होण्याचा क्षण आहे. ऋग्वेदात सांगितले आहे की, मानवाला अंत:करणात प्रेम भावना निर्माण होतात, त्याच्या मधे ध्यानप्रधानता येते. या सृष्टीची निर्मिती, पालन पोषण भरण व नियमन, संहार करणारा तो परमात्माच आहे. म्हणून त्या परमात्म्याच्या अवतारात श्रीरामांना सद्गुरु रामदासांनी राम तू जगज्जीवन म्हटले आहे.
पुढे ते जेव्हा स्वयं आनंदरूप होऊन भक्तांना दर्शन देतोस असे म्हणतात. तेव्हा तैतिरीय उपनिषदातील ब्रह्मानंदवल्ली मध्ये मानवी आनंदाचे स्वरूप स्पष्टपणे विशद करून सांगितले आहे, त्याची आठवण होते. दासबोधात पहिल्या दशकातील पहिल्या समासात त्यांनी अभ्यासलेल्या ग्रंथांची यादी आहे. त्यात एकोणिसाव्या ओवीत उपनिषदे अभ्यासिली याचा उल्लेख आहे. तैतिरीय उपनिषदातील आनंदवल्ली या विभागातील आठव्या अनुवाकातील (अध्यायातील) दुसरा मंत्र तर जणू मानवी आनंदाची व्याख्या, गाभा प्रकट करणारा आहे. उन्नतीसाठी लागणारी पात्रता, अधिकार या मध्ये स्पष्टपणे सांगितला आहे. उत्कट व भव्य महत्वाकांक्षा हा पहिला गुण, या गुणावरच आयुष्याची सर्व इमारत उभारली जाते. या गुणात काही कमीजास्त झाले तर मानवी जीवनक्रम निस्तेज होतो. दूसरा गुण मनाचा खंबीरपणा नसेल तर महत्वाकाक्षेचा व्हावा तसा उपयोग होत नाही. पुढचा गुण शशिरबळ. हे तर सर्वात महत्वाचे आहे. महत्वाकांक्षा, दृढता, बलसंपन्नता या अनुक्रमे बुध्दी, मन आणि शरीर यांच्या शक्ती असून त्यांची पूर्तता करणे हे या साधकाचे पहिले कर्तव्य आहे. यास जर तेजस्वी विद्या व ओजस्वी शील यांची जोड मिळाली की, खरे मनुष्यत्व प्रकट होते. हीच उन्नतीची पहिली पायरी म्हणून यास मानुष आनंद म्हणतात.
अशा चढत्या क्रमाने पुढील ८ पायऱ्या ओलांडत्या की, ब्रह्मानंद प्राप्त होतो. ब्रह्मानंद म्हणजे त्या परमात्म्याचे दर्शन घडणे होय. इतका खोल अर्थ राम जगजिवन । स्वये आनंदरूप होऊन । भक्ता दर्शन दिधले ।। असा आहे. म्हणजे श्रीरामांच्या नामाने, शक्तीने, दर्शन घेण्याने आनंद प्राप्त होतो. हे या ठिकाणी भक्तांना सांगू इच्खितात.
या सगळ्या वरून आपल्या हे लक्षांत येते की, समर्थच्या आरत्यांमधून तत्वज्ञान / सृष्टीची उत्पत्ती, स्थिती लय, ब्रहमाचे स्वरूप, ईश्वराचे गुण विशेष, आढळते. तसेच नीति, विवेचन, भक्तीमार्ग, उपासना मार्ग, इत्यादिचा ही मार्ग आढळतो. त्यांच्या आरत्यांमध्ये काव्यसौंदर्य आहे. कल्पनासौष्ठव आहे. तसेच त्यांचे स्वतःचे कणखर, कधी कोमल व्यक्तीमत्व प्रकट झाले आहे. यात सामाजिकतेचे भान सुध्दा आढळते.
प्रसन्न आणि पवित्र वातावरणात देवताची प्रफुल्ल मूर्ति, दीप ओवाळून त्या प्रकाशात पाहताना आणि त्याच वेळी आरतीचे पद्य तोंडाने म्हणताना तादाम्य साधता येते. भक्तात एकाग्रता उत्पन्न होते. असा प्रभाव या आरत्यांचा आहे.
समर्थांच्या आरत्यांच्या रचना ही स्फुट रचना असल्याने आणि ती पद्यरूपात उत्तम छंदात बांधलेल्या असल्याने त्या पाठांतरास सुलभ आहेत. हेच त्यांच्या आरत्यांचे वैशीष्ठ आहे.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।