श्रीभीमरूपी स्तोत्र १ – भाग १

श्रीभीमरूपी स्तोत्र १ – भाग १
डॉ. सदानंद चावरे
  • September 27, 2025
  • 1 min read

मारुती व श्रीसमर्थ भेट “मारुतीचा गुण गौरव”

त्रयोदशाक्षरी राम मंत्राचा तेरा कोटी जप श्रीसमर्थ टाकळी येथे संगमावर करीत असताना मारुतीराय वानर रूपात येत असत. जप पूर्ण झाल्यावर अतिशय आनंदित होउन मारुतीरायांनी श्रीसमर्थांना आपल्या भीम रूपात म्हणजे विशाल स्वरूपात दर्शन दिले व आनंदाने उचलून घेतले, मिठी मारली. मारुतीचे भव्य दिव्य रूप पाहून श्रीसमर्थांना जी काव्य स्फ़ूर्ती झाली ती या स्तोत्रात आली आहे. पहिले चार श्लोक हे मारुतीचे गुण वर्णन करणारे आहेत. 

“भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती ।

वनारी अंजनीसुता रामदूता प्रभंजना ।। १ ।।”

मारुतीचे रूप अत्यंत विशाल व भव्य आहे. प्रत्यक्ष श्रीमहादेवाचा अवतार म्हणून महारुद्र व त्यातही एकादश रुद्राचा अवतार आहे. यात भव्यते बरोबरच भय उत्पन्न करणारे अचाट सामर्थ्य सुद्धा आहे. या अवतारात शक्तीरूपाने सहाय्य करण्यासाठी देवी पार्वती ज्याच्या शेपटीत शक्तीरूपाने राहिली असा हा अवतार. इंद्राच्या वज्राघाताने हनुवटी भंगलेला पण त्या वज्रासमान कठोर देह असणारा असा हा अवतार आहे. रावणाच्या वनाचा नाश करणारा म्हणून वनारी आणि अंजनी मातेचा पुत्र म्हणून अंजनीसुत असा हनुमान हा श्रीरामाच्या महान कार्यात सहाय्यक होणारा आहे. त्याचा दूत म्हणून कार्य अत्यंत चोख बजावणारा असा वायुपुत्र हनुमान आहे व तुफान वाऱ्यात जो वेग आवेग आणि बल असते तद्वत हा अत्यंत वेगवान हालचाल करणारा आहे. दूताला अत्यंत चतुर असावे लागते. कार्य करताना बंदी होण्याची शक्यता असते. दूताला पकडू नये असा संकेत आहे आणि तो सज्जन पाळतात. म्हणूनच युद्ध सुरु करण्यापूर्वी आपल्या देशातील दूतावासातील सर्वांना सुखरूप माय देशात पाठवले जाते. पण रावणासारखे दुरात्मे असले संकेत थोडेच मानतात ? ते दूताला बंदी बनवून त्याचे प्राण हरण करणे अथवा त्याला शारीर कष्ट देणे असे विकृत मार्ग अवलंबतात. दूताकडे आपली सुटका करून व शत्रूला संदेश पोहोचवून परत येण्याचे सामर्थ्य हवे. ते मारुतीराय व अंगद दोघांकडे होते. सुग्रीव व अंगद बलशाली होते पण मारुतीराय विवेकी होते आणि कुठलेही वेडे धाडस त्यांनी कधीही केले नाही. राजनीती, कुटील नीती जाणत असल्याने ते रावण, अहिरावण व महिरावण यांचे मनसुबे निष्प्रभ करू शकले आणि इंद्रजीताच्या मायेवर उपाय शोधू शकले . वनात अरण्यात दाट झाडी असते, सूर्य प्रकाश सुद्धा उतरत नाही व अंधार असतो. आपल्या मनात सुद्धा भाव भावना व विकार यांची दाटी जणू काही वासना विकारांचे जंगल असते. मारुतीला विनंती आहे की जसे रावणाचे अशोक वन उध्वस्त  केले तसे मनातील हे जंगल सुद्धा तू जाळून टाक.

“महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळे ।

सौख्यकारी शोकहर्ता  धूर्त वैष्णव गायका ।। २ ।।”

प्राण हरण करण्याच्या उद्देशाने प्रयोग केलेल्या इंद्रजीताच्या शक्ती प्रभावाने सर्व वानर सैन्य व राम लक्ष्मण मूर्च्छित होऊन पडले असताना म्हणजे मृत्यू समीप पोहोचले असताना हनुमान हे एकच असे महाबली होते की ज्यांच्यावर त्या शक्तीचा प्रभाव पडला नव्हता. जांबुवंताच्या आदेशानुसार द्रोणागिरी पर्वतावरील औषधी वनस्पती अतिशय त्वरेने आणून तो परत मूळ जागी नेऊन पोहोचवणे हे अशक्य कोटीतले काम करून स्वामी राम व लक्ष्मण तसेच समस्त वानर सेनेला त्यांचे प्राण मिळवून देणारा, संजीवन देणारा असा हा हनुमान लोकांची संकटे दु:खे निवारून सुख देणारा आहे. हनुमानाने कोणाकोणाचे दु:ख निवारण केले ? 

सुग्रीव राज्य हीन झाला होता. त्याला न्याय मिळवून देण्यासाठी सुग्रीव व रामराया यांची गाठ घालून दिली, पत्नी हरणाच्या शोकातून सीतेचा शोध घेऊन प्रत्यक्ष रामांचा शोक कमी केला. शक्ती लागून मूर्च्छित पडलेल्या लक्ष्मणाला जीवदान देऊन श्रीरामांना मोठ्या संकटातून  सोडवले. रामांची अंगठी देऊन राम सुटकेसाठी येत आहेत हे सांगून सीतामाईचा शोक कमी केला. गांजलेल्या देवांना लंका दहन करून दिलासा दिला. तो वैष्णव म्हणजे राम भक्त असून सतत वाणीने राम भक्तीचे मधुर गायन करणारा चतुर व अतिशय बुद्धिमान असा गायक आहे असे श्रीसमर्थ म्हणत आहेत. तसेच जिथे भक्तीने राम कथा सांगितली जाते तिथे मारुतीराय येतात अशी श्रद्धा आहे.  

“दिनानाथा हरीरूपा सुंदरा जगदंतरा ।

पाताळ देवताहंता भव्य सिंदूर लेपना ।। ३ ।।

लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना ।

पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ।। ४ ।।

हनुमंत हा अनाथांचा रक्षक आहे. जेव्हा देवांना रावणाने बंदी बनवले होते तेव्हा त्यांना कोणी वाली राहिला नव्हता व ते अतिशय दयनीय परिस्थितीत होते. हनुमंताने जाऊन लंका दहन केले तेव्हा देवांच्या सुद्धा सुटकेच्या आशा पालवल्या. रामाशी, विष्णूच्या अवताराशी एकरूप असा हनुमान समर्थांच्या मनाला प्रसन्न करणारा असा आहे. तो जगताच्या अंतरी स्थित आहे म्हणजे सकल जगाचा आत्मा आहे. अहिरावण व महिरावण या पाताळ स्थित राक्षसांचा संहार करून हनुमानाने राम व लक्ष्मण यांची सुटका केली. तो भव्य असून त्याने सर्वांगाला शेंदूर लेपन केले आहे. हा रंग वैराग्याचा रंग आहे. हनुमान हे अत्यंत विरक्त आहेत. जनरक्षक अखिल जगाचा कैवार घेणारा आणि वायुरूप असल्याने जणू सकल जगाचा प्राण असलेला हनुमान. त्याने वायू रोधून धरला तर सर्व त्रिलोक कासावीस होतात. तो सर्वांच्या प्राणाचे रक्षण करतो. त्याचे पुण्य थोर असून तो काया वाचा मनाने अत्यंत पवित्र पावन आहे. जे भक्त त्याची मनोभावे पूजा करतात त्यांना इच्छापूर्तीचे समाधान प्रसाद हनुमान देतात असे समर्थ सांगत आहेत.

“ध्वजांगे उचले बाहो आवेशे लोटिला पुढे ।

काळाग्नि काळरुद्राग्नी देखता कापती भये ।। ५ ।।

ब्रह्मांड माईले नेणो आवळे दंत पंगती ।

नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भृकुटी ताठिल्या बळे ।। ६ ।।”

हनुमानाचा रण आवेश समर्थ सांगत आहेत. सैन्याच्या पुढे विजयी ध्वज घेऊन मारुती आवेशाने आक्रमण करीत आहे. काळाग्नि काळरुद्राग्नी हे यमाचे दूत, त्यांनाही भयाने धडकी भरावी असा हा आवेश आहे. विश्वरूप दर्शन आठवावे असे वर्णन समर्थ करतात. ब्रह्मांडाचा घास घ्यायला सरसावलेला काल पुरुष विनाशासाठी दाढा करकरा वाजवीत पुढे येत आहे व क्रोधाने डोळ्यातून अग्नी ज्वाळा बाहेर पडत आहेत असे हे भयावह दृश्य आहे. अत्यंत क्रोध आल्यामुळे भुवया वक्र झाल्या आहेत. श्रीसमर्थ इथे हनुमानाच्या रौद्र रूपाचे वर्णन करीत आहेत. रावण व त्याची सेना जशी अत्याचारी झाली होती तशीच वेळ महाभारत काळी आली होती व समर्थ-शिवराय यांच्या काळात सुद्धा अत्याचारी अतिशय वाढले होते. रामदास स्वामी पुरश्चरण करीत होते तो काळ लक्षात घेतला तर श्रीसमर्थांनी श्रीरामाचे रौद्र रूप व हनुमानाचे रौद्र रूप समाजापुढे का ठेवले असावे हे ध्यानात येते. ते श्रीसमर्थांना स्वत:ला किती भावले होते व असा काही तरी अवतार व्हावा ही त्यांची किती तीव्र इच्छा होती ते या वर्णनातून लक्षात येते.

।। जय जय रघुविर समर्थ ।।

संदर्भ : सार्थ व सविवरण भीमरूपी स्तोत्रे (डॉ. सौ. सुनीती विजय सहस्रबुद्धे) 

Language