हे सप्तही येकरूप

हे सप्तही येकरूप
डॉ. सौ. साधना गोखले
  • September 20, 2025
  • 1 min read

नवविद्याभक्तींपैकी पादसेवनभक्ती श्रीसमर्थ स्पष्ट करीत आहेत. अध्यात्मशास्त्र हे अत्यंत गूढ आहे. परब्रह्म ही कल्पना अत्यंत सूक्ष्म आहे. ही कल्पना केवळ सद्‌गुरूच समजावून देतात. पूर्वसुकृतामुळे सद्‌गुरू प्राप्ती झाली की, काया, वाचा, मनाने सद्‌गुरूंची अनन्य भावाने सेवा करावी. पाद‌सेवन भक्तीत सेवा व शरणागती हे दोन भाव अनुस्यूत आहेत. ह्या भक्तीने खरे समाधान प्राप्त होते. या समाधानाच्या सात अवस्था वा सात संकेत श्रीसमर्थांनी येथे स्पष्ट केले आहेत. 

संगत्याग आणी निवेदन । विदेहस्थिती अलिप्तपण ।

सह‌जस्थिती उन्मनी विज्ञान । हे सप्तहि येकरूप ।। ४-४-८ ।।

यांची नावे भिन्नभिन्न असली तरी वास्तवात या सातही अवस्था एकच आहेत असे श्रीसमर्थ समजावितात. 

१. संगत्याग – परमात्मवस्तू अत्यंत सूक्ष्म आहे. बुद्धी, मन आणि इंद्रिये दृश्यात वावरत असल्यामुळे आणि यांच्या द्वारा जीव या दृश्य जगाला चिकटत असल्यामुळे, ते संपूर्ण सुटल्याखेरीज म्हणजेच संगत्यागाखेरीज आत्म स्वरूपाचा अनुभव येत नाही. एक संगत्याग साधला की, पुढचे सहा आपोआप येऊ लागतात.

२. निवेदन – माणसाचा अहंकार किंवा मीपणा म्हणजे बुद्धी, मन आणि इंद्रिये यांचे जणू गाठोडेच आहे. या गाठोड्यात आत-बाहेर सारे अनात्म दृश्य भरलेले आहे. तो ‘मी’ नाहीसा केला की, दृश्याचा नायनाट होतो. त्या ‘मी’ ला भगवंताच्या चरणी अर्पण करणे म्हणजे निवेदन. या दृष्टीनेच संगत्याग व निवेदन एकच आहे.

३. विदेहस्थिती – सामान्य माणसाची सदेहस्थिती किंवा देहबुध्दी फार प्रबळ असते. मी म्हणजे माझा देह, ही त्याची ठाम समजूत असते. सर्व जगातील दृश्यांचे केंद्र असलेला आपला देह त्याला अत्यंत खरा वाटतो व तो आपल्या देहावर खूप प्रेम करतो. ही देहासक्ती पादसेवन भक्ती करताना, प्रेमभक्तीत रंगून जाताना कमी होऊ लागते. एकवेळ अशी येते की, देहभान पूर्णच हरपते, देहाचा विसर पडू लागतो. अशावेळी स्वाभाविकच देहाचे प्रेम कमी होते, आणि हळूहळू नाहीसे होते. ही अवस्था अशी की, देह असून नसल्यासारखाच. देहबंधशून्य अवस्था ! हीच विदेहस्थिती ! येथे संगत्याग नसतोच. म्हणजेच संगत्याग, निवेदन, विदेहस्थिती एकच आहेत.

४. अलिप्तपणा – लिप्त म्हणजे लिंपणे, लेप देणे, माखणे किंवा व्यापणे. आपली मूळ अवस्था शुद्ध, पवित्र, पूर्ण आहे. मात्र अविद्येच्या प्रभावाने आपण ती मूळ स्थिती विसरतो. दृश्य विश्वाला खरे मानू लागतो. आपला जीव आत बाहेर दृश्याने व्यापला, माखला, दूषित झाला. दृश्य विश्वातच आपले सुख आहे, या भ्रमाने दृश्य वस्तू हव्याशा वाटू लागल्या. हे हवेसे वाटणे म्हणजेच वासना. खरं तर आपल्याला दृश्य वस्तू बाधक नसते, तर तिच्याबद्दलची वासनाच मन‌ाला बंधनात टाकते. पण भगवंताच्या भक्तीने रंगलेल्या भक्ताच्या मनात, भगवंताचे प्रेम एवढे ओथंबलेले असते की; तेथे वासनांना जागाच रहात नाही; त्या लटक्या पड‌तात. त्यांचा लेप जीवनाला होतच नाही. हेच अलिप्तपण. संगत्याग, निवेदन, विदेहस्थिती, अलिप्तपणा ‌ह्या सर्व एकच स्थिती होत.

५. सहजस्थिती – ‘सह जात सहजम् ।’ आपल्या बरोबरच जन्मलेले किंवा जन्मजात प्राप्त झालेले. नुकतेच जन्मलेले मूल मला हे हवे ते हवे असे काहीही म्हणत नाही. किंवा सुख मिळविण्याचा किंवा दु:ख टाळण्याच्या प्रयत्न करीत नाही. त्या स्थितीला ते सहजतेने स्वीकारते. ही सहजस्थिती. हे दृश जगत् मूलत:च भ्रमरूप असल्याने ते सुखरूप नाही वा दु:खरूप नाही. त्याला, मन जाऊन चिकटते व ते सुखाची किंवा दु:खाची कल्पना करते. पण ते मन जेव्हा भगवंताकडे लागते, तेव्हा ते दृश्य विश्वापासून दूर होते व सुख-दु:खाची कल्पना सोडूनच देते. दृश्यात गुंतलेले मन दूर होणे म्हणजेच संगत्याग, निवेदन, अलिप्तपण, विदेहस्थिती व सहजस्थती होय.

६. उन्मनी अवस्था – उद् + मनस = उन्मन. उद = उर्ध्वगती, श्रेष्ठत्व, पूर्णता, विकासणे, मुक्त होणे. मनस् = मन. सामान्य माणसाचे मन जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीन अवस्थातच वावरते. पण तीन अवस्थांमध्ये ते दृश्याने भरलेलेच असते. जागेपणी इंद्रियांच्या माध्य‌मातून जे जग आत घेतलेले असते तेच जग स्वप्नात अवतरते. तेच गाढ निद्रेत तात्पुरते लीन होऊन रहाते. जेव्हा मन भक्तीरसात डुंबू लागते, तेव्हा बाहेरच्या दृश्य जगाचा भाव कमी होऊ लागतो. मन सूक्ष्म होऊ लागते. ही सूक्ष्मता वाढत जाऊन, एका विशिष्ठ स्थितीत; मी देह नसून आत्मा आहे अशी प्रचिती येते. मनाची ही जी अवस्था तिला तुर्या (चौथी) अवस्था म्हणतात. ही जागृती, स्वप्न, सुषुप्ती पलीकडची अवस्था असते. यात एकीकडे स्वस्वरूपाचे भान असते, तर दुसरीकडे दृश्य जगाचे भान असते. मनाचा आणखी विकास झाल्यावर स्व-स्वरूपाला मीपणाने अनुभवणारा शुध्द मी सुद्धा लीन होऊन जातो. केवळ परमात्म स्वरूप उरते. येथे मनाचे ‘मीपण’ संपते. हीच उन्मनी अवस्था. या स्थितीत संपूर्ण विश्वच ईश्वररूप दिसू लागल्यामुळे, दृश्य विश्वाचा विलय होतो. म्हणून संगत्याग व सहजस्थिती ह्या एकच अवस्था.

७. विज्ञान – वि = विशेष आणि ज्ञा = जाणणे. विज्ञान = विशेष ज्ञान. परमात्म स्वरूपाचे अनुभवसिद्ध ज्ञान म्हणजेच विज्ञान. परमात्म स्वरूप अत्यंत सूक्ष्म असते. याला स्थूळ वा दृश्य स्पर्श करू शकत नाही. जोपर्यंत  जीव दृश्य जगताला चिकटलेला असतो तोपर्यंत तो परमात्मतत्त्वाला स्पर्श करु शकत नाही. दृश्याचा संपूर्ण त्याग = संगत्याग. संगत्याग व विज्ञान एकदमच प्रकट होतात. संगत्याग, निवेदन, विदेहस्थिती, सहजस्थिती, अलिप्तपण, उन्मनी अवस्था, विज्ञान या सातही अवस्था नावांनी भिन्न असल्या तरी आंतरिक अनुभूतीने त्या एकच आहेत. “सद्‌गुरू वाचोनी सापडेना सोय । धरावे ते पाय आधी आधी ।।” हा विचार पादसे‌वन भक्तीचा आत्मा आहे.

सद्गुरू सेवाच साधकाला अंतर्बाह्य बदलवीत असते. सद्गुरू शिष्याकडून योग्य ते कार्य करवून घेतात. त्याला निरहंकारी बनवितात. सद्‌गुरूंचा सहवास शिष्याला त्याच्या नकळत घडवीत असतो. त्याला आत्मचिंतनाची सवय लावुन, शिष्य नम्रतेकडे, विनयाकडे, लीनतेकडे  झुकू लागतो. मुख्य म्हणजे त्याच्या अहंकाराच्या नाशाला सुरुवात होते. उपरम, उपरति, चुकांची कबुली देण्याचे धाडस त्याच्यात येते. माझेच बरोबर ही वृत्ती नाहीशी होते. अर्थात त्यासाठी गुरूनिष्ठा, सत्यवचन, गुरूप्रीती वा गुरूबद्दलचा अनन्य भाव यासाठी अथक प्रयत्न करावे लागतात. सद्‌गुरूचा प्रसाद (कृपा) लाभला की, मग मात्र सद्गुरू त्याला परब्रह्मच बनवितात.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Language