ज्येष्ठ बंधूंना लिहिलेले पत्र

ज्येष्ठ बंधूंना लिहिलेले पत्र
सौ. दीप्ती बापट
  • September 21, 2025
  • 0 min read

आपण समर्थांची कौटुंबिक पत्रे पहात आहोत. यातील हे पत्र समर्थांनी परत आपल्या ज्येष्ठ बंधूंना लिहिले आहे. या पत्राकरिता मी आ. समर्थव्रती सुनीलदादा चिंचोळकर यांच्या छोट्याशा पुस्तिकेचा आधार घेतला आहे.

सकळ तीर्थाचे सार । सत्यस्वरूप निर्विकार ।

तुमचे चित्त तदाकार । निरंतर ।। १ ।।

विमळ ब्रह्मपरायण । सगुण भक्ती संरक्षण ।

विशेष वैराग्य लक्षण । तुमचे ठायी ।। २ ।।

मुक्त क्रियेचा अनादरू । स्वधर्मकर्मी अत्यादरू ।

आग्रहनिग्रहाचा विचारू । तोहि नसे ।। ३ ।।

नसे कामनेचा लेश । जयंत्या पर्वांचा हव्यास ।

अंतरी आवडे विशेष । हरिकथा निरूपण ।। ४ ।।

तुमचे देह सार्थकाचे । सर्वदा परोपकाराचे ।

भगवंते निर्मिले बहुतांचे । समाधान ।। ५ ।।

तुमचेनी वाग्विलासे । बहु पाखंड नासे ।

संशयातील प्रकाशे । विमल वस्तू  ।। ६ ।।

सन्मार्गींचा कैपक्षी । अनमार्ग करणे अलक्षी ।

लोक पावती प्रत्यक्षी । समाधान ।। ७ ।।

दक्षता आणि चातुर्यता । वित्पन्नता आणि लीनता ।

उत्तम गुण सर्वज्ञता । तुमचे ठायी ।। ८ ।।

तुमचे स्वरूप वर्णवेना । म्हणोनि देहाचि वर्णना ।

युक्त आयुक्त मित्रजना । क्षमा केली पाहिजे ।। ९ ।।

समर्थांनी या पत्रात परत आपल्या ज्येष्ठ बंधूंचे गुणगान केले आहे. ते निर्गुणी उपासनेत कसे रत आहेत व आत्मबोधाच्या सर्वोच्च पायरीवर पोहोचले आहेत, याचेच वर्णन या पत्रात केले आहे. सकळ तीर्थांचे सार.. ही पहिली ओवी. यात समर्थ म्हणतात, सगळ्या तीर्थांचं सार किंवा सगळ्या देवांचे भजन हे जसं एकाच सद्गुरूच्या चरणाशी पोहोचतं, तसंच तुम्ही सद्गुरु पदापर्यंत पोहोचलेले आहात. म्हणूनच तुमचं चित्त, मन, बुद्धी सदैव त्या रामरायाशी तदाकार असते. पुढच्या ओवीत त्याचं लक्षण सांगताना विमल ब्रह्म म्हणजेच निर्गुण निराकार आणि शुद्ध असणाऱ्या परब्रह्माशी आपण तदाकार झाले आहात, तरीही आपण सगुण भक्ती नित्य नियमाने करता. यातही वैराग्य, विरक्तता, अलिप्तता हे गुण विशेष आहेत.

स्वधर्मकर्मी अत्यादरु.. म्हणजेच आपल्या स्वधर्माबद्दल आणि स्वकर्मांबद्दल आपण जागरूक आहात. या ठिकाणी स्वधर्म म्हणजे मनुष्य जन्मात आलो आहोत, म्हणून अंतरात्म्याला जाणून घेणे हे आपले स्वकर्म व स्वधर्म आहे. तसेच प्रपंचात आहोत म्हणून प्रपंचाची जबाबदारी, समाजाची जबाबदारी, लोकांना जागरूक करणे ही सगळी जबाबदारी म्हणजेच स्वधर्म. या दोन्ही अर्थाने त्यांचे जेष्ठ बंधू त्या धर्माचे पालन उत्तम रीतीने करत होते, म्हणून समर्थ त्यांना अत्यादरू म्हणतात. नसे कामनेचा लेश.. म्हणजेच वैराग्य एवढे प्रखर आहे की, कोणतीच कामना, इच्छा, वासना निर्माण होत नाही. सगुण अभ्यास, निर्गुणाची उपासना याव्यतिरिक्त कोणतीच भावना मनामध्ये येत नाही. सतत अंतरात्म्याशी जुळलेले रहाणे हेच त्यांना आवडते, हेच या ओवीतून लक्षात येते. 

हरीकथा निरूपण.. सगुण अभ्यासाबरोबर, जमलेल्या लोकांना हरीकथा सांगणे; आचरणाचा योग्य मार्ग दाखवणे; मार्गदर्शन करणे; नामस्मरणाला लावणे; उपदेश करणे हेच त्यांना आवडते. बहुत पाखंड नासे.. या ओवीत समर्थ सांगतात, पाखंड म्हणजे त्या काळच्या ब्राह्मणांनी धर्माच्या नावावर उभा केलेला बागुलबुवा, ज्याला उल्लंघून जाण्याचा समाजाला धीर नव्हता. ब्राह्मण सांगतील ती पूर्व दिशा हाच समाजाचा न्याय होता. आपण ज्ञानेश्वर माऊलींबद्दल या गोष्टी बघितल्या आहेत. त्यांच्या मातापित्यांना देहांताचे प्रायश्चित्त त्याच कारणाने दिले गेले होते, तरीही या चार भावंडांची शुद्धी करून घेतली नाही; याला पाखंड म्हणतात. तर, तुम्ही प्रवचनाद्वारे; कीर्तनाद्वारे लोकांना या पाखंडापासून दूर करता, सत्य धर्म काय आहे; योग्य आचार काय आहे हे स्पष्टपणे सांगून अंधश्रद्धा बाजूस करता, असेच समर्थांना यातून सुचवायचे आहे.

लोक पावती प्रत्यक्षी समाधान.. हा तुमचा स्पष्ट, सहज, सोपा, आचरणास सहज असणारा भक्तिमार्ग पाहून लोकांना समाधान प्राप्त होते. अतिशय सोपे असणारे नामस्मरण आपण सगळ्यांना सांगता. समर्थांनीही त्यांच्या दासबोधात नामस्मरणालाच महत्त्व दिले आहे. तेच त्यांचे बंधूपण करतात, असेच समर्थांना सुचवायचे आहे. दक्षता आणि चातुर्यता.. प्रपंचात रहाताना सर्व प्रकारची कर्मे करावी लागतात. ती करताना त्यात चूक होणार नाही, कोणाचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी लागते. यासाठीच तत्परता, चातुर्य आवश्यक असते. तुमचा लोकसंग्रह उत्तम असल्याने तुम्ही ही दक्षता नेहमीच घेता. असे सगळे उत्तम गुण तुमच्यात आहेत. 

तुमचे स्वरूप वर्णवेना.. या शेवटच्या ओवीत समर्थ म्हणतात, तुमचं मूळ रूप जे आहे म्हणजेच आत्मरूप जे आहे त्याचं वर्णन करता येत नाही. तुमच्यातल्या विविध उत्तम गुणातून ते सांगण्याचा मी प्रयत्न केला, परंतु अंतरात्मक त्याहीपेक्षा मोठे आहे, श्रेष्ठ आहे. म्हणून शेवटी देहाच्या माध्यमातून व देहाच्या कृतीतून तुमचं वर्णन करावं लागलं. अधिक काही कमी जास्त सांगितलं असेल तर क्षमा करावी. यातून श्रेष्ठींची पारमार्थिक उंची लक्षात येते. समर्थही तसेच आहेत, असे या दोन बंधूंचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. जरी फार काळ ते एकत्र राहिले नाहीत, तरी मनापासून ते एकमेकांशी जुळलेले आहेत. 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Language