स्थूळ सूक्ष्म कारण माहाकारण । ऐसे हे चत्वार देह जाण ।
जागृति स्वप्न सुषुप्ति पूर्ण । तुर्या जाणावी ।।
स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण असे चार देह आहेत. कारणदेह म्हणजेच अज्ञान होय.
आत्मानात्मविवेक करावा । करून बरा विवरावा ।
विवरोन सदृढ धरावा । जीवामध्यें ।। १३-१-१ ।।
साधकाने आत्मानात्म विवेक करावा. आपण जगात अनंत शरीरधारी प्राणी बघतो. विवेकाने हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या असे लक्षात येते, की प्राणी म्हणजे देह व आत्मा यांचा संयोग होय. देह हा दृश्य, जड व अनित्य आहे. म्हणजे हा स्थूल देह, जो आपण पहात असतो. आत्मा मात्र सूक्ष्म व नित्य असतो. कारणदेह हा अज्ञानाचा आहे. आपण जगामध्ये दोन प्रकारची माणसे पहातो. ज्ञानी माणसे आणि अज्ञानी माणसे. अज्ञानी माणसे ही आत्मविन्मुख असतात. मुमुक्षु, साधक हे आत्मसन्मुख असतात. भोगवादी विचारवंत जगाला संपूर्ण सत्य समजतात. भोगवादामध्ये माणसाच्या देहाला अति महत्त्व असते. हाच कारणदेह होय. कारण देहाच्या द्वारेच जगामधील सारे भोग भोगणे शक्य होते. देहासारखे दुसरे विलक्षण यंत्र नाही.
आपल्या देहाचा नीट उपयोग करून माणूस आत्मज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो. पण कारणदेह समजणारी माणसे अज्ञानी असतात. ग्रंथराज दासबोधातील पहिल्या दशकातील दहावा समास ‘नरदेह स्तवन’ हा आहे. ‘देह म्हणजे मी’ असे तो समजत असतो. कारणदेहाचा माणूस कसे वर्तन करतो ? हे आपण ‘दुश्चित निरूपण’ समासातून जाणून घेण्याचा प्रयत्न पुढे करणार आहोत.
स्थूलदेह प्रत्यक्ष कार्य करीत असतो. मनोमय असणारा सूक्ष्मदेह सतत संकल्प विकल्प करीत असतो. वासनात्मक असणारा लिंगदेह अज्ञान आवरणामध्ये असतो. आता अज्ञान कोणते आहे ? तर मी देह आहे हेच अज्ञान, म्हणजेच कारणदेह. तमोगुण, रजोगुण, सत्वगुण, शुद्धसत्व गुण आपण बघितले. स्थूल देहामध्ये तमोगूण असतो, तर मनोमय असणाऱ्या सूक्ष्म देहामध्ये रजोगुण असतो. आता शबलसत्व गुण हा कारण रूप असणाऱ्या अज्ञानात असतो. शुद्धसत्व गुण मात्र आत्मज्ञानाने अनुभवास येतो. कारण देहाच्या सुषुप्ती मध्ये अज्ञानात वासना रहात असते. आपल्या जन्म-मरणाच्या फेऱ्यात अडकण्याला, कारणदेह कारण आहे. वासनाच सगळ्या सुख-दुःखाला कारण आहे. ‘देह म्हणजेच मी’ असे समजण्याबरोबर आपण मनालाही ‘मन म्हणजे मी’ आणि बुद्धीलाही मी असे समजतो. प्रत्येक दिसणारी गोष्ट मला हवी असते, मला पैसा हवा असतो, तो कशासाठी तर उपभोगासाठी. पण मी तर यापैकी मन-बुद्धी काहीच नाही. पण ते अज्ञानामुळे कळत नाही. त्यासाठी त्यागमय जीवन जगणे खरे तर क्रमप्राप्त आहे.
प्रत्येकाजवळ व्यवहारी बुद्धी, कुशल बुद्धी, तैलबुद्धी असते. जो तो त्यांच्या त्यांच्या व्यवसायामध्ये पारंगत असतो. प्रत्येकाला आपल्या जीवनात सुखाचा काळ प्राप्त व्हावा, असे वाटत असते. मानवी जीवनात सत्शील व्यवहार करणे फार कठीण गोष्ट आहे. त्याचे कारण असे आहे की, मानवी जीवनात व्यवहार करताना, तो भेद बुद्धीनेच करावा लागतो. आणि जीवनात तसे प्रसंगही येत असतात. सुखी प्रपंच आणि समाधानी परमार्थ याची कधीतरी सांगड घालता येते. पण सुखी प्रपंच आणि समाधानी परमार्थ या दोन्ही गोष्टींची योग्य अशी तुलना करता येत नाही. कारण मनुष्याने स्वखुशीने प्रपंचाची बांधिलकी स्वीकारलेली असते.
“या संसारी सुख देखिले । ऐसे पाहिले ना ऐकले”
सर्वसामान्य मनुष्य प्रापंचिक बंधनामध्ये सापडला म्हणजे त्याला पारमार्थिक सुख दुर्गम ठरते. कारण माणसाच्या ठिकाणी दुश्चितपणा असतो. समर्थ म्हणतात, “दुश्चितपणामुळे मानवाच्या जीवनाची नासाडी होते.” कशी ? तर, त्यामुळे कार्याचा नाश होतो. माणूस सतत चिंता करीत असतो. सदैव काळजी लागते आणि कोणत्याही गोष्टीचे धाडस, स्मरण राहत नाही. मनाचा निश्चय नाही. कुठल्याच कार्यात यश नाही. त्यामुळे आत्महिताचाही क्षय होतो. ही सारी लक्षणे आपण बघितली की, कारणदेह म्हणजेच देहबुद्धी. थोडक्यात काय ? तर अंत:करणात भरून असणारे ईशनिर्मित असे एक अज्ञान किंवा अविद्येचे आवरण आहे असे मानतात. त्यामुळे आत्मस्वरूप आपल्या आत असूनही अज्ञानी माणसाला जाणवत नसते. ते जाणून घेण्याची त्याची इच्छा पण नसते.
“तुझे आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलासी” या अज्ञानालाच कारणदेह असे नाव आहे. गाढ झोपेत सर्वांना अनुभवास येणारे अज्ञान हाच शास्त्रात म्हटलेला कारणदेह. काही साधकांना एकांतात मन निर्विचार किंवा कोरे करताना मनातील सर्व संकल्प गेल्यावर, पोकळीचा म्हणजे काहीच नाही असा अनुभव येतो. तिला ‘शून्य अवस्था’ म्हणतात. हा अज्ञानाचा म्हणजेच कारणदेहाचा प्रत्यय असतो. अज्ञानामुळेच सृष्टी खरी वाटून त्यातून विक्षेप रूप म्हणजेच भेदरुपी विश्व, जागृती, स्वप्न या अवस्था भासू लागतात. त्यामुळेच त्याचे नाव ‘कारणदेह’ असे आहे. मूळ अज्ञान किंवा माया हेच कारणदेहाचे स्वरूप आहे. या देहाला अव्याकृत किंवा ईश्वर म्हणतात. ही ईश्वराच्या झोपेची म्हणजेच प्रलयाची अवस्था आहे. वासनांची अनंत बीजे कारणदेहाच्या आधाराने टिकून असतात. जाग येताच आपण त्या वासनांनुसार हालचाली करतो. विश्वाचा प्रलय होतो, तेव्हा सर्व जीव बीज रुपाने म्हणजेच ‘संस्कार’ रूपाने या कारणात दडलेले असतात. विश्व पुन्हा निर्माण होते, तेव्हा ते या बीजापासूनच निर्माण होते. शास्त्र सांगते की, जेव्हा सर्व जीवांच्या वासना फल देण्यास पक्व होतात, म्हणजे तयार होतात, तेव्हा परत विश्वाची उत्पत्ती होते. ‘ग्रंथराज दासबोधा’ तील कारणदेहाचा विचार आपण पहात आहोत. अज्ञानाला कारणदेह असे म्हणतात. मूळ अज्ञान किंवा माया हेच याचे स्वरूप आहे.
जेव्हां सद्गुरूंचा उपदेश या कारण जीवाला होतो तेव्हां, त्याचे अस्तित्व काय आहे ? आणि ते किती क्षणभंगुर आहे ? याचे आकलन जीवाला होते. ते झाले की जीवात्मा आणि परमात्मा यांचे ऐक्य होते. आपण बघितले की, हा कारणजीव मायेच्या जाळ्यात पूर्ण अडकतो. त्याचा देह हाच त्याला खरा वाटू लागतो. समर्थ म्हणतात, “देह मी वाटे ज्या नरा । तो जाणावा आत्महत्यारा ।।” हा कारणदेह अज्ञानामुळे वासना नदीच्या महापुरात उडी घेतो. तो बुडण्याच्या स्थितीत येईपर्यंत भान येत नाही. कारण तो स्वतः अज्ञानी असल्याने, गर्वाने फुगलेला असतो हेच खरे ! नश्वर देहाची किंमतच काय आहे ? हा अज्ञानी जीव जेव्हा ज्ञानाचा फाजील अभिमान बाळगतो, तेव्हा समर्थ त्याला विचारतात,
“थोडें जिणें अर्धपुडी काया । गर्व करिती रडाया ।
शरीर आवघें पडाया । वेळ नाहीं ।। १५-८-३५ ।।”
असंख्य योनींमध्ये हा जिवात्मा देह धारण करून रहात असतो. जसे लहान-सहान जीव-जंतू चिखलामध्ये, घाणीमध्ये जन्माला येतात; देह रुपाने त्या घाणीमध्येच वावरतात; आणि एक दिवस त्या घाणीमध्येच मरून जातात. अशा या बुद्धिहीन गलिच्छ जीवाला कोणते जीवन म्हणावे ? मनुष्याने या साऱ्या गोष्टी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या असतात. तरीही मनुष्य सावध होत नाही, ही खरी दुर्दैवाची गोष्ट आहे ! परमेश्वराने मनुष्याला विचारशक्तीचे सामर्थ्य दिले आहे. त्या विचारशक्तीचा विवेकाने उपयोग करून, आपल्या जीवनाचे सार्थक करून घ्यावे.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।