बहू व्याप संताप तो मूळ पापा ।
गतायुष्य द्रव्यें न ये कोटि बापा ।
कळेना तुला कोणता तो नफा रे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ।। १० ।।
सरळ अर्थ – सामान्य माणूस आपली प्रगती ‘किती पैसा कमावतो?’ या वरून ठरवतो आणि मग पैसा मिळवण्यासाठी धावाधाव, प्रचंड व्याप, उलाढाली करत रहातो. येन-केन-प्रकारेन पैसा मिळवणे हेच उद्दीष्ट समोर असल्याने नीती-अनीती, भल्या-बुऱ्याचा फारसा विचार केला जात नाही. इथेच त्याच्या पापाचे मूळ सापडते. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सहजा-सहजी सापडत नाही. आतापर्यंत केलेले उद्योग व त्यापासून नेमका काय लाभ झाला हेही समजत नाही. गोंधळून जातो बिचारा. तेव्हा श्रीसमर्थ म्हणतात, वेळ हातात असतानाच ‘हरे राम हा मंत्र सोपा जपा रे’.
श्रीसमर्थांचा बोध – श्रीसमर्थ या श्लोकातून प्रापंचिकांना आहे त्या परिस्थितीत भगवंताचे अनुसंधान ठेऊन आनंदाने कसे जगावे, याचेच जणू धडे देत आहेत. सामान्यपणे व्यवहार करताना नफा-तोट्याचा विचार केला जातो. परमार्थात मात्र “हाट भरला प्रपंचाचा । नफा पहावा देवाचा ।” असे श्रीसमर्थ म्हणतात.
जन्माला आलेल्या प्रत्येकालाच कर्म करणे अनिवार्य आहे. मृत्यूनेच कर्माचा अंत होतो. ही मृत्युभूमी आहे तशीच कर्मभूमीही आहे. भगवंताच्या विस्मरणात केलेले प्रत्येक कर्म हे पाप समजावे. प्रपंच/व्यवहार करताना भगवंताच्या अनुसंधानात राहून केलेले कर्म अकर्म होते. या उलट विषय-विकारात वहावत जाऊन, पैशाला महत्त्व देत केलेले प्रत्येक कर्म पापाचे मूळ ठरते. भौतिक सुख हे मृगजळ आहे. त्याच्या पाठी धावणे सर्वनाशाला आमंत्रण देणे होय. चौऱ्यांशी लक्ष योनींचा फेरा पूर्ण करून पाप-पुण्य समसमान झाल्यानंतर हा दुर्लभ असा नरदेह मिळाला आहे. श्रीसमर्थ म्हणतात त्याप्रमाणे ‘घबाड’ हाती आले आहे. तेव्हा नरजन्माचे हित/फायदा कशातआहे हे ओळखता आलेच पाहिजे, नाहीतर पुनरपि जन्म-मरणाचे चक्रात अडकणे आलेच. असे होऊ नये हे वाटणे आणि त्यासाठी अंतःकरणपूर्वक प्रयत्न करणे यालाच ‘उपासना’ म्हणतात. नित्य उपासनेतून भगवंताच्या निकट पोहोचणे हाच नरदेहात येऊन केलेल्या व्यवहाराचा फायदा/ नफा होय. या साठीची जवळची वाट (शॉर्टकट) आहे ‘अखंड नामस्मरण’. म्हणूनच श्रीसमर्थ या श्लोकाच्या माध्यमातून सांगतात.. “हरे राम हा मंत्र सोपा जपा रे”.
तुझे आप्त द्रव्यार्थि नुस्तेचि होती ।
तनू हे चितेमाजी कीं बोळविती ।
असें जाणूनी हित काहीं करा रे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ।। ११ ।।
सरळ अर्थ – माणसाला देवापेक्षा जास्त भरवसा आपल्या आप्तस्वकियांचा असतो. श्रीसमर्थ येथे स्पष्टपणे वस्तुस्थितीची जाणीव करून देतात. नातलग सगळे ‘द्रव्यार्थी’ असतात. पैशासाठी स्वार्थापुरते जवळ येतात. मरणानंतर देह चितेत जाळून मोकळे होतात आणि लगेच विसरूनही जातात. हे लक्षात घेऊन आपण आपल्या हितासाठी ‘हरे राम हा मंत्र सोपा’ जपावा हेच उत्तम.
श्रीसमर्थांचा बोध – माझे-माझे म्हणवणाऱ्या आप्त स्वकीयांवर कितीही प्रेम केले, त्यांना आपले मानले तरी ते सोडून जाणार आहेत. सर्व सुखाचे सोबती असतात. प्रतिकूल काळ आला की सगळे दूर जातात. श्रीसमर्थ म्हणतात, “आवघी सोइरी सुखाची । हे तुझ्या सुखदुःखाची । सांगाती नव्हेती ।।” जे आपले समजुन आयुष्यभर त्यांच्यासाठी काबाड-कष्ट केले, भल्या-बुऱ्या मार्गाने पैसा मिळवला; ते जीवलग म्हणवणारे, पैसा-धन असेतोवर जवळ राहतात, प्रतिकुल काळात मात्र ‘वाल्याच्या’ नातलगांप्रमाणे सहजपणे दूर निघून जातात. हीच जगाची रीत आहे. तोपर्यंत अर्ध्याच्या वर आयुष्य कुटूंबासाठी खर्ची पडलेले असते. अशाप्रकारे जीवनातील अमुल्य वेळ रामभजनावीण माणूस वाया घालवतो. प्रत्येक माणसाने हे ओळखून आपला खरा स्वार्थ साधणे गरजेचे आहे. नरदेहाचे जे प्रमुख उद्दीष्ट, जे परमेश्वर प्राप्ती, त्यासाठी साधना-उपासना करणे गरजेचे असते. म्हणूनच श्रीसमर्थ म्हणतात, या दुर्लभ नरजन्माचे सार्थक करून घ्यायचे तर ‘हरे राम हा मंत्र सोपा जपा रे’.
कुटुंबीं स्त्रिया पुत्र ते दासदासी ।
बहु पोषिसी सोसूनी दुःखरासी ।
त्यजीं भार काबाड ओझें किती रे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ।। १२ ।।
सरळ अर्थ – कुटुंब म्हणजे आईवडील, पती-पत्नी, एक किंवा दोन मुले, शक्य असेल तिथे एखादी घरकाम करणारी बाई. हे झाले आजचे, त्यातही शहरातील कुटुंबाचे चित्र. श्रीसमर्थांच्या काळात याच्या उलट परिस्थिती होती. गृहस्थाश्रमात, एकत्र कुटुंब पद्धती होती. तेव्हा कुटुंबात घरोघरी नोकरचाकरासह किमान दहा-पंधरा तरी माणसे असायची. त्या सगळ्यांचा पालनकर्ता कुटुंबातील कर्ता पुरूष असायचा. सगळ्यांचा चरितार्थ चालवणे त्या एकट्याची जबाबदारी मानली जात असे. अत्यंत कष्ट, दुःख,सोसून हे करावेच लागत असे. श्रीसमर्थ म्हणतात, ‘हरे राम’ हा साधा सोपा मंत्र अखंड जपला, तर करावे लागणारे काबाडकष्ट नक्कीच सुसह्य होतील.व अंतरी समाधान लाभेल.
श्रीसमर्थांचा बोध – आपला प्रपंच/संसार ही माझी जबाबदारी म्हणून त्यासाठी माणूस प्रचंड कष्ट करतो. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती. फार चैनीची साधने नसली तरी घरातील माणसांव्यतिरिक्त, नोकरचाकर, गोधन, कुत्री-मांजरे अशी खाणारी तोंडे भरपूर होती आणि कमावणारा एकमेव कुटुंब प्रमुख होता. आज काळ बदलला, परिस्थितीत बदल झाला. नवरा-बायको दोघेही कमवत असले तरी गरजा वाढल्याने कितीही मिळवले तरी पैसा पुरेनासा झाला. रात्रंदिवस राबणे काही थांबले नाही. त्याबरोबर सोसावे लागणारे दुःखही कमी झालेले नाही. श्रीसमर्थ म्हणतात तसे, माणूस कुटुंबाचा ‘काबाडी’ तेव्हाही होता, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. जोपर्यंत हे संसाराचे ओझे स्वतःहून झटकत नाही, उतरवून ठेवत नाही तोपर्यंत ते मानगुटीवर असतेच. त्यातूनच प्रयत्नपुर्वक थोडा वेळ भगवंता साठी काढायचा असतो. प्रपंचात रिकामा वेळ कधीच मिळणार नाही. ‘समुद्रातील लाटा थांबल्या की मी पाण्यात उतरेन’ असे ते म्हणण्यासारखे आहे. म्हणूनच श्रीसमर्थ या श्लोकातून सांगतात की, ते काल्पनिक ओझे थोडे बाजुला ठेऊन आत्महितासाठी “हरे राम” हा साधा सोपा मंत्र नित्य जपावा व आपले कल्याण करून घ्यावे.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।