समर्थ म्हणतात, मत्सर हा दोष भयंकर आहे. मत्सर हा शुद्ध गाढवपणा आहे. एखादी गोष्ट मला मिळूनही दुसऱ्याला मिळाली तरी माझा जळफळाट होत असेल तर तो मूर्खपणाचा कळस आहे. क्रोध हा रजोगुण आणि द्वेष हा तमोगुण आहे. क्रोध व द्वेष मत्सराचे चांडाळ भारवाहक आहेत. सत्वगुणाच्या सहाय्याने मत्सराचा मत्सर करावा. थोडक्यात मत्सरामुळे आपल्यामध्ये असणाऱ्या सर्व गुणांवर काळिमा पसरतो. उदा. पंचपक्वान्नाचे ताट भरले आहे पण त्यावर चिमूटभर विष पेरले तर काय होईल? प्राण कासावीस होईल. पणतीमध्ये तेलवात आहे पण ज्योतच नाही तर काय होईल? अंधार पसरेल. भलेही मी सर्वगुणसंपन्न आहे पण त्यावर मत्सराचे बीज पेरले तर काय होईल? हे समजून घ्या.
मला जीवनामध्ये कर्मयोग कळत नाही. मी दानधर्म करत नाही. माझ्याकडून योगसाधना घडत नाही. माझ्या भोगेच्छा कधीच संपत नाहीत. त्यामुळे त्याग कसा करायचा हेच उमजत नाही. अशावेळी मला ‘जगावे कैसे मरावे कैसे’ हे कसे समजेल ? तेव्हा समर्थ म्हणतात, हे मना ‘राम’ नामाचे स्मरण कर. रामाच्या स्मरणामुळे आपल्या आवडीनिवडी बदलतात. आपण नेहमी चांगले तेच निवडतो व आवडीने कर्म करून धन्य होतो. आपण समाधानी होतो कारण भगवंताच्या हाती सर्व विश्वाचे लगाम असतात. कर्ता-करविता ‘राम’ आहे ही भावना मनात जागवा. म्हणजे देहाची तसेच संसाराची चिंता नष्ट होते. ‘राम’ हा एकेरी शब्द अनादि-अनंत आहे. ही ‘राम’ नाम नौका भवसागर पार करण्यासाठी मदत करणार आहे. ह्या ‘राम’ नामाची ओळख १) शब्द, २) स्पर्श, ३) रूप, ४) रस, ५) गंध या पाच विषयांमुळे होते आणि हे विषय कान; त्वचा; डोळे; जीभ; व नाक या पाच ज्ञानेंद्रियांमुळे कळतात. पुढच्या श्लोकात समर्थ म्हणतात, बहूनाम या रामनामी तुळेना, रामरक्षेत राम-नामाचे महत्त्व वर्णन केले आहे.
“राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ।
सहस्त्रनाम ततुल्य रामनाम वरानने ।।”
एकच रामनाम हे सहस्त्र नामाच्या तोडीचे आहे. आज जसे विज्ञानाच्या कसोटीवर आपल्या मस्तकाभोवती असलेले आभावलय दृष्टीस पडते; तसेच विज्ञानाच्या कसोटीवर ‘राम’ उच्चारातून निर्माण होणारे स्पंदन, वेग, तरंग याचे मापन करता येते. यातून ‘राम’ हे एकेरी नाव सुद्धा सर्वश्रेष्ठ आहे हे सिद्ध होते. समुद्रमंथनाच्या वेळी भगवान शंकराने हालाहल प्राशन केले होते तेव्हा ‘राम’ नामाच्या औषधांनीच त्याचा दाह शांत झाला आणि म्हणून नीलकंठ नामानी तो प्रसिद्ध झाला. खरं म्हणजे शंकर देवाधिदेव आहे; महादेव आहे; विश्वनाथ आहे; रामेश्वर आहे. परंतु ‘राम’नाम भक्त आहे. म्हणूनच ‘राम’ नामाचा भावार्थ समजून घ्या. भाव याचा अर्थ श्रद्धा; विश्वास आणि अर्थ याचा अर्थ हेतू असा होतो. थोडक्यात, जयाचा भावार्थ जैसा । तयास लाभ तैसा ।।
एक गोष्ट सांगते, गंगेवर दोघेजण स्नानासाठी जातात. एक म्हणतो, गंगा म्हणजे H2O. दोन वायू एकत्र केले की झाली गंगा. दुसरा म्हणतो, गंगा भगवान विष्णूच्या पदकमलातून निघाली; शंकराच्या जटाजूटात राहिली; भगीरथ प्रयत्नांनी इथे आली. गंगावतरण झाले. अशी ही पवित्र गंगामाई आहे. दोघेही स्नान करतात. देहशुद्धीचे फळ दोघांनाही मिळतेच. परंतु दुसऱ्या भक्ताला सोबत चित्तशुद्धीचे फळ देखील मिळते. स्नान करून सूर्याला नमस्कार घालणाऱ्या दोघांना व्यायामाचे फळ मिळेल. परंतु जो उपासनेला दृढ चालवत नमस्कार घालतो त्याला आरोग्याबरोबर स्फूर्ती आणि प्रतिभा ही मिळेल. गोंदवलेकर महाराज म्हणतात, आनंद मिळावा म्हणून नाम घेऊ नका. आनंद वाटावा म्हणून नाम घ्या. व्याकरणदृष्ट्या आनंद मिळणे नामाचा परिणाम झाला. आनंद वाटणे नामाचा हेतू झाला. म्हणूनच कार्य करताना मनामध्ये सद्हेतू असावा हे उत्तम.
उत्तम नागरिक बनवण्यासाठी राष्ट्रभक्तीची ज्योत जना-मनात सतत तेवत ठेवण्यासाठी भारतमाता की जय; वंदे- मातरम ह्या नामाचे स्मरण आवश्यक आहे. नाहीतर आपण म्हणजे आपले राष्ट्र पुनश्च गुलामगिरीत जाईल. स्वातंत्र्यदिनाचा जयजयकार प्रत्येक नागरिकाच्या मनात रुजला पाहिजे. अंकुरला पाहिजे हे पटतंय ना ? चला तर मग रामाच्या अनुसंधानात राहायला शिका. म्हणूनच समर्थ रामदास म्हणतात,
चालता बोलता धंदा करिता । खाता-पिता सुखी होता ।
नाना उपभोग घेता । नाम विसरू नये ।।
समर्थ म्हणतात, “जीवा सोडवी राम हा अंतकाळी ।” अजून एक गोष्ट सांगते, गौतम बुद्धांनी निर्वाणाचा शोध लावला नाही. तपाचा; ध्यानाचा; समाधीचाही नाही. या गोष्टी आधीपासूनच होत्या. पण अंतिमत: तेथे पोचण्यासाठी मध्यम मार्गाचा शोध बुद्धांनी लावला. त्याचं नाव करुणा. करुणेचं मूल्य त्यांनी जाणलं, ते मृत्यूच्या जाणिवेने. त्यांनी मृत्यूला दुःखमय म्हटलं नाही. मृत्यू आहे म्हणूनच जिवंतपणाचा क्षण न् क्षण ज्ञानासाठी परिश्रम करण्यात घालवा व राग, द्वेष, मत्सर, लोभ, मोह, खोटेपणा यापासून दूर रहायला शिका असा त्यांनी उपदेश केला आहे. पुढे समर्थ म्हणतात “मुखी राम विश्राम तेथेचि आहे ।” त्यासाठी तुमच्या इष्ट देवतेचे स्मरण करा. चिंतन करा. समर्थ म्हणतात “मना पावना भावना राघवाची ।” हे ‘रामनाम’ परमात्म्याचे शब्दरूप आहे. या परमात्म्याची रूपे अनंत आहेत व नामेही अनंत आहेत. उदा. विष्णुसहस्त्रनाम. यातील प्रत्येक नाव मनात भावावयाचे; त्या अर्थाने सृष्टीत पहावयाचे व आपण त्याप्रमाणे व्हावयाचे. म्हणजे भावणे; पहाणे; होणे ही झाली त्रिपदा गायत्री. आपले संपूर्ण जीवन तीन त्रयी, त्रिमितीवरच आधारित आहे या अर्थाने आपण ‘राम कृष्ण हरी’ ला दंडवत घालू या. राम कृष्ण हरिचा जप करूया.
मूलमंत्र जपा तुम्ही भावाने जपा । राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा ।। १ ।।
काया वाचा मने भावाने स्मरा । राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा ।। २ ।।
सत्व-रज-तम भावाने जिंका । राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा ।। ३ ।।
ज्ञान-ध्यान-गान भावाने शिका । राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा ।। ४ ।।
सूर-ताल-लय भावाने बोला । राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा ।। ५ ।।
जात-पात-गोत भावाने टाळा । राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा ।। ६ ।।
आचार-विचार-उच्चार भावाने करा । राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा ।। ७ ।।
शक्ती-युक्ती-भक्ती भावाने पहा । राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा ।। ८ ।।
धर्म-अर्थ-कर्म भावाने जगा । राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा ।। ९ ।।
भावणे-पहाणे-होणे भावाने जाणा । रामकृष्ण हरि जय जय भावाने म्हणा ।। १० ।।