समर्थ वाङ्मयातील समर्थांची पत्रे हा प्रकार आपण पाहणार आहोत. हा एक वाङ्मय प्रकार आहे. पत्रलेखन हा वाङ्मय प्रकार आपल्याकडे फार जुना आहे. शकुंतलेने दुष्यंत राजाला लिहिलेले पत्रं प्रसिद्ध आहे. समर्थांनी सर्व प्रकारच्या वाङ्मयाला स्पर्श केला आहे. गद्य, पद्य, ओव्या, अभंग, सवाया, चौपदी, भारुड, करुणाष्टके, दाम यमक असे अनेक प्रकार समर्थांनी हाताळले आहेत. समर्थांची ग्रंथसंपदा मोठी आहे. गोविंदगिरी महाराज सांगतात, समर्थांनी ४६,००० ओव्यांची रचना केलेली आहे. गेल्या पाच हजार वर्षात एवढी मोठी वाङ्मयसंपदा कोणीच निर्माण केलेली नाही. समर्थ महान व कर्तृत्ववान आहेत. समर्थांचे लेखन ही एक सामाजिक चळवळ आहे. बऱ्याच मोठ्या कर्तृत्ववान लोकांचा पत्रव्यवहार पुढे समाजाकरता ग्रंथरूपात प्रसिद्ध केला जातो, जो पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शक व त्या वेळेचा इतिहास याची साक्ष देणारा ठरतो.
समर्थांनी ११०० मठ व अनेक देवळे स्थापन केली, त्या सगळ्या मठाधिपतींशी त्यांचा संपर्क होता. त्याकाळी सांडणीस्वार ही सेवा करीत किंवा समर्थांचे शिष्य सर्व दूर पसरले होते, त्यांच्या हाती पत्रं पोहोचवली जात. सध्या त्यातील फार थोडी पत्रं उपलब्ध आहेत. या पत्रांचं संकलन सुनील दादा चिंचोळकर यांनी केलं आहे, त्या पुस्तकाच्या आधारे आपण हा वाङ्मय प्रकार बघू. समर्थांच्या पत्रांचे सुनील दादांनी तीन भाग पाडले आहेत. कौटुंबिक, राजकीय, सामाजिक. आपण समर्थांची व्यक्तिगत पत्रं बघणार आहोत, यातील पहिले पत्रं कौटुंबिक या प्रकारातील. पहिलं पत्रं त्यांनी आपल्या मातेस लिहिलेलं आहे. ते पत्रं बघूया.
सकळ गुणांचा निधी । निर्गुणाची कार्यसिद्धी । विवेकाची दृढबुद्धी । तुझेनि गुणें ।। १ ।।
तूं भवसिंधूचे तारूं । तूं भक्तांचा आधारू । तूं अनाथाचे अवसरू । वैष्णवी माया ।। २ ।।
तूं भावार्थाची जननी । तूं विरक्तां संजीवनी । तूं परमार्थाची खाणी । भजनशीळ ।। ३ ।।
तूं सर्व सुखांची मूस । तूं आनंदरत्नांची मांदूस । तुझेनि चुकती सायास । संसारींचे ।। ४ ।।
तूं परमार्थाविषयीं अग्रगण्य । सद्गुरु दासाचें मंडण । समाधानाची खूण । अंतरीं वसे ।। ५ ।।
सत्संगासी सादर । भक्तिमार्गासी तत्पर ।धूर्त कुशळ अति सादर । परोपकारी ।। ६ ।।
श्री गुरुभजनीं तत्पर ।स्वामिकृपा निरंतर ।म्हणोनी शुद्ध क्रियेचा उद्धार ।तुमचे ठायी ।।७ ।।
आत्मचर्चेसीं मुगुटमणी । अत्यंत सादरता निरूपणीं । बोलणें अमृतवाणी । मृदुवचनीं ।। ८ ।।
विवेकनिधी केवळ । अंतर शुद्ध निर्मळ । ज्ञानदीप प्रबळ । तुमचे ठायीं ।। ९ ।।
क्रियाशुद्धी निर्मळ मन ।निरभिमानी परम सज्जन ।निरंतर अनुसंधान । अंतरीं वसे ।।१० ।।
भावार्थाचें आगरू । प्रबळ शांतीचा सागरू ।पाहतां उपमे मेरू । तोही उणा ।। ११ ।।
हे समर्थांनी मातोश्रींस लिहिलेले पत्र आहे, आता त्याचा अर्थ बघू. या पत्राचे वेगळेपण जाणवते. यात मातेला नमस्कार, खाली स्वतःची सही असा कोणताच प्रकार नाही. अकरा ओव्यांचं हे पत्रं आहे. यात पहिल्या ओवीत समर्थ सांगतात, तू सकळ गुणांचा निधी.. जे सगळे गुण तुझ्यात आहेत, विवेकाची दृढबुद्धी म्हणजे तू अत्यंत विवेकशील आहेस, तो विवेकच माझ्यात आला आहे.
दुसरे ओवीत समर्थ आपल्या मातेला वैष्णवी माया म्हणतात, म्हणजे मूळ माया. ह्या ठिकाणी मातेला मूळ मायेची उपमा दिली आहे कारण माझ्यासारख्या संताची तू माय आहेस, म्हणून जणू काही तू मूळ माया आहेस. मूळ मायेत जसे सगळे गुण असतात, ते उत्तम असतात, तसेच माझ्यात आले आहेत. त्याच्यापुढे समर्थ म्हणतात, तू सर्व सुखांची मूस आहेस, म्हणजेच परमार्थातले जे सुख आहे, आत्माराम भेटण्याचे जे सुख आहे, ते सुख मला तुझ्यामुळे प्राप्त झाले आहे. त्या सुखामुळे संसाराची दुःखे मला जाणवत नाहीत. ती दुःखे आपोआप नाहीशी होतात.
त्याच्या पुढच्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, परमार्थाविषयी अग्रगण्य म्हणजेच परमार्थात जे परब्रम्हाला जाणून घेण्याचे उद्दिष्ट असते, ते तू पूर्ण केले आहेस, म्हणून तू पूर्ण समाधानी आहेस. यामुळेच असेच समाधान मलाही प्राप्त झाले आहे. सत्संगाशी सादर भक्तीमार्गाशी तत्पर.. म्हणजेच तू सदैव भक्तिमार्ग अनुसंधानात असतेस. सत्संग म्हणजेच कीर्तन, प्रवचन, अभ्यास यांचा तू सतत आस्वाद घेतेस. ग्रंथवाचन, नामस्मरण यामध्ये तू रममाण असतेस. परोपकारी म्हणजेच सतत दुसऱ्यांना मदत करण्याकरता तत्पर असतेस, म्हणूनच अतिशय आनंदात व समाधानात असतेस. गुरूभजनी तत्पर स्वामीकृपा निरंतर.. या ओवीत समर्थ, माता अखंड श्रीरामाच्या भजनात तल्लीन झाली आहे असे सांगतात. तसेच श्रीरामांची तिच्यावर पूर्ण कृपा आहे म्हणूनच तिचा उद्धार म्हणजेच मुक्ती तिला श्रीरामांकडून प्राप्त होणार आहे.
आठव्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, अत्यंत सादरता निरूपणी म्हणजेच कोणी विचारायला आलं तर त्याला परमार्थाविषयी उत्तम मार्गदर्शन करणे, बोलणं अतिशय मृदू असणे, आदराचं असणे असं तुझं मार्गदर्शन सगळ्या लोकांना लाभतं. विवेकनिधी केवळ अंतर शुद्ध निर्मळ.. म्हणजेच अतिशय सामान्य परिस्थितीत जरी तू आहेस, हा विचार पैशाच्या दृष्टिकोनातून झाला, तरी तू अत्यंत विवेकी आहेस. अतिशय आत्मनात्म विवेक करून तू या संसारात रहातेस. त्यामुळेच तुझे मन अतिशय शुद्ध आहे, त्यामुळेच अंतरात्म्याचे ज्ञान तुझ्याजवळ प्रकट झाले आहे. शेवटच्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, भावार्थाचे आगरू प्रबळ शांतीचा सागरू.. म्हणजेच भावार्थ आणि शांती एकत्रपणे तुझ्यात नांदते. परमार्थाचा खरा शुद्ध भाव, भक्ती तुझ्यात प्रगट झाली आहे. त्यामुळेच अनुपम अशी शांती, स्थिरता व एकाग्रता तुझ्याजवळ आहे आणि म्हणूनच उपमेसी मेरू, तुला कशाचीच उपमा देता येणार नाही. जशी मूळ मायेला कशाचीच उपमा देता येत नाही ती हे सारे निर्माण करू शकत नाही, त्यापासून वेगळी असते, भासते, जाणवते पण दिसत नाही, तसेच सगळे गुण माझ्या मातेमध्ये आहेत असे समर्थांना या पत्रातून मातेबद्दल सांगायचे आहे.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।