परमार्थामध्ये विदेहस्थिती अनुभवणे ही सर्वोच्च अवस्था मानली गेली आहे. यालाच मुक्ती किंवा मोक्ष असेही म्हणतात. जीवाचा संबंध जोपर्यंत दृश्य जगाशी व देहाशी असतो, तोपर्यंत जीव देहबुद्धीने बांधला गेलेला असतो. आत्मानात्मविवेकाने जेव्हा जीवाला आपण ब्रह्मस्वरूप आहोत अशी प्रचिती येते, तेव्हा जीव देहात असून विदेह अवस्था भोगतो. या अवस्थेचे वर्णन करताना श्रीसमर्थ म्हणतात –
ना तें साधन ना तें देह । आपला आपण निःसंदेह ।
देहीच असोन विदेह । स्थिती ऐसी ।। ७-७-६३ ।।
देहात असूनही विदेह अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी आधी बंधनातून मुक्त होणे आवश्यक आहे . बंधन कशाचे व कोणाला असते याचा विचार करीत असताना, आधी हे लक्षात घेतले पाहिजे की, बंधन व मुक्ती या जीवाच्या अवस्था आहेत त्या जिवंतपणीच अनुभवता येतात. ‘जन्म घेणे लागे वासनेच्या संगे’ या न्यायानुसार जीव वासनेमुळे जन्माला येतो. वासनापूर्तीसाठी अनेक विषय हवेहवेसे वाटतात. विषय म्हणजे काय? ‘विशेषेण सिणोती इति विषय:’ सुख मिळवण्यासाठी ज्याच्यावर अवलंबून रहावे लागते त्याला ‘विषय’ म्हणतात. विषयात सुख आहे अशी कल्पना असणे याला ‘विषयवासना’ म्हणतात.
सर्वसामान्य माणसाच्या वासना देहाशी संबंधित असतात. जसे, चांगले खायला मिळावे; महागडे कपडे; आलिशान गाड्या; घर असावे; समाजात मान असावा म्हणजे थोडक्यात सत्ता; संपत्ती; कीर्ती मिळाली की आपण सुखी होऊ असे मनुष्याला वाटते. आपल्या मनासारखे सगळे मिळाले नाही तर विकार उत्पन्न होतात. दुसऱ्याला मिळाले आणि स्वतःला मिळाले नाही कीमत्सर वाढतो. वस्तू- पदार्थांविषयी आसक्ती असेल तर लोभ वाढतो. मनासारखे घडले नाही की क्रोध निर्माण होतो. अशाप्रकारे शब्द, स्पर्श, रस, रूप व गंध इत्यादि विषय माणसाला जखडून ठेवतात. श्रीसमर्थांनी या करता एक सुंदर दृष्टांत दिलेला आहे, ते म्हणतात –
हस्त बांधीजे ऊर्णतंतें । लोभें मृत्य भ्रमरातें ।
ऐसा जो प्रपंचीं गुंते। तो येक पढतमूर्ख ।। २-१०-१५ ।।
ज्याप्रमाणे कोळ्याच्या जाळे विणण्याच्या धाग्याने हत्ती बांधला जाऊ शकत नाही, तसेच लाकूड पोखरण्याचे सामर्थ्य असलेला भुंगा कमळातील मकरंदाच्या लोभाने विषयासक्त झाल्यामुळे कमळात अडकून पडतो, त्याप्रमाणे मनुष्य जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत प्रबळ विषयसुखाच्या इच्छेमुळे देहबुद्धीच्या बंधनात अडकतो व परिणामतः सुखदुःख भोगतो, जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतो. या सगळ्या त्रासांपासून मनुष्याला मुक्ती हवी असते. परंतु ती कशी मिळेल हे ठाऊक नसते. त्यासाठी संतांची संगत धरली पाहिजे. संत लौकिक बंधनातून पूर्णपणे सुटलेले असतात, त्यांना देहाचे स्मरण उरलेले नसते; म्हणून ते खऱ्या अर्थाने स्वतंत्र असतात. त्यांचे स्वातंत्र्य कशावरही,कुणावरही अवलंबून नसते. अशा मुक्तावस्थेला पोहोचलेल्या सिद्धाचे तीन प्रकार सांगतांना श्रीसमर्थ म्हणतात –
सचेतन ते जीवन्मुक्त । अचेतन ते विदेहमुक्त ।
दोहिवेगळे ते नित्यमुक्त । योगेश्वर जाणावे ।। ७-६-४६ ।।
१) नित्यमुक्त २) जीवन्मुक्त ३) विदेह मुक्त. या पैकी नित्यमुक्त हे जन्मापासूनच मुक्त असतात. त्यांच्या सगळ्या वृत्ती संपूर्णपणे मावळलेल्या असतात. ते आपल्या देहासहित दृश्य जगातील कुठल्याच गोष्टीने बध्द होत नाहीत. त्यांच्या अंगी योगाचे अचाट सामर्थ्य असते म्हणून त्यांना योगेश्वर म्हणतात. उदा. आद्य शंकराचार्य, शुकमुनी, रामदास स्वामी, स्वामी विवेकानंद इत्यादि. असे ज्ञानी महापुरुष केवळ लोकोद्धाराचे कार्य करण्यासाठीच अवतार घेतात. त्यांनी केलेले कार्य अनेक काळापर्यंत लोकांना प्रेरणादायी ठरते.
जीवन्मुक्त अवस्थेमध्ये देहासंबंधी अज्ञान नाहीसे होते. साधक आपल्या खऱ्या स्वरूपाला जाणतो आणि अंतर्बाह्य मोकळा होतो. परंतु प्रारब्ध कर्मे शिल्लक असल्यामुळे देह सोडत नाहीत, उलट व्यक्ती, वस्तू व पदार्थांच्या संगात आसक्त न होता अलिप्तपणे आपली कर्तव्यकर्मे पार पाडतो. ज्ञानेश्वर माऊली त्याचे वर्णन करतांना म्हणतात-
तो शरीराचेनि मेळें । करू कां कर्में सकळें ।
परी आकाश धुये न मैळे । तैसा असे ।। ज्ञाने. १३-१०३२ ।।
बाह्यतः त्याचे जीवन चारचौघांसारखे चाललेले दिसते परंतु वृत्तीचा बाध झाल्यामुळे त्याच्याकडून धर्म-अधर्म घडत नाही, पाप-पुण्याचा लेप लागत नाही. “संचित, प्रारब्ध, क्रियमाण । अवघा झाला नारायण।” ह्या सर्वोच्च दशेला तो जाऊन पोहोचतो. संत एकनाथमहाराज व अलीकडच्या काळातील प.पू. वरदानंद भारती यांनी अश्या प्रकारे आपला प्रपंच व परमार्थ निर्लेपपणे करून दाखविला. जिवंतपणीच मुक्त होऊन देहभान विसरून गेले आहेत त्यांना विदेहमुक्त म्हणतात. जीवन्मुक्त व विदेहमुक्तामधील मुख्य फरक हाच की, जीवन्मुक्त सचेतन असतात म्हणजे प्रारब्ध कर्मे करीत असतात, तर विदेहमुक्त अचेतन असतात म्हणजे त्यांचे कर्म करणे थांबलेले असते. देहाशी संबंधित कुठलीही उपाधी ते सांभाळीत नाहीत. तसेच व्यावहारिक आचाराचेही त्यांना भान नसते. उदा. संत गजानन महाराज. उष्टयापत्रावळीवरची शीते खाऊन ते तृप्त झाले. कारण अन्न हेही ब्रह्म आणि खाणाराही ब्रह्मरूप ही त्यांची धारणा होती. मधमाशांनी अंगभर दंश केला तरी त्यांना देहदुःख जाणवले नाही हीच विदेही अवस्था होय. या अवस्थेमध्ये देह असून नसल्यासारखा होतो कारण कशाचाही संग तेथे शिल्लक नसतो म्हणून संगत्याग व विदेहस्थिती एकच आहे असे श्रीसमर्थ म्हणतात.
जय जय रघुवीर समर्थ