आपण प्रथम स्थूल देहाचा विचार केला. आपण बघितले की आपला देह हे ब्याऐंशी तत्त्वांचे गाठोडे आहे. त्याला चेतना देणारा कोणीतरी आहे.
तो कोण ? तर आत्मा होय.
आत्मा देहामध्यें असतो । नाना सुखदुखें भोगितो ।
सेवटीं शरीर सांडून जातो । येकायेकीं ।। दा. १७ -६-१ ।।
या जीवात्म्याने सर्वप्रथम देहाचा आधार घेऊन या विश्वामध्ये उघड प्रवेश केला आहे. आता हा आत्मा कुठे असतो ? तर तो देहात असतो. तो सूक्ष्म आहे, दिसत नाही; पण असतो हे निश्चित. देह देवाचे मंदिर । आत आत्मा परमेश्वर । आता आपण सूक्ष्मदेहाचा विचार करणार आहोत. सूक्ष्म देहात अंत:करण, मन, बुद्धी, चित्त व अहंकार यांचा समावेश होतो. सूक्ष्मदेह समजण्यासाठी मन पण सूक्ष्मात शिरले पाहिजे. त्यासाठी श्रीसमर्थांनी मनाचे श्लोक म्हणजे मनोपनिषद रचले. आपल्याला या संसारात राहूनच आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचे आहे. श्रीसमर्थ दासबोधाच्या सहाव्या दशकात सांगतात की,
जो जनामधें वागे । परी जनावेगळी गोष्टी सांगे ।
ज्याचे अंतरीं ज्ञान जागे । तोचि साधु ।। दा. ६-१-१८ ।।
आपण पहातो की माणसाला जेव्हा आत्मज्ञान होते, तेव्हा स्थूल देहातील त्याच्या साऱ्या वासना, अहंकार नष्ट होतात. असे घडले की, असा माणूस काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, लोभ, स्वार्थ, मोह,भय, चिंता, प्रपंचाची आसक्ती या दोषापासून मुक्त होतो. त्याला मनन-चिंतनाने, साधनेने सूक्ष्मदेह कळलेला असतो. या सूक्ष्म देहाची पंचवीस तत्त्वे आता आपण बघूया. त्यांना अंत:करण पंचक असे म्हणतात. हे अंत:करण पंचक समजून घेण्यासाठी आपण ग्रंथराज दासबोधातील ओव्यांचा आधार घेऊ या.
निर्विकल्प जें स्फुरण । उगेंच असतां आठवण ।
तें जाणावें अंत:कर्ण । जाणती कळा ।। दा. १७-८-४ ।।
आपण उगीच बसलो असता सहज एखादी आठवण व्हावी/स्फुरण व्हावे. अंत:करणात स्फुरण झाले पण काम होईल की नाही, अशी स्थिती असणारे मन. कारण, मन हे कायम संकल्प-विकल्प करीत असते. या मनाला योग्य निर्णय करून देणारी बुद्धी विवेकाने निर्णय योग्य प्रकारे देते. अंत:करण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार या पाच तत्त्वांचा संबंध सतत अंतरात्म्याशी असतो. यांना मिळून सूक्ष्मदेह म्हणतात. हा सूक्ष्मदेह मुळात शुद्ध स्वरूप आहे. त्याला कशाचाही लेप नाही. तो निर्लेप, निर्गुण, निराकार असा आहे.
आत्मा आत्मपणें असतो । देहसंगें विकारतो ।
साभिमानें भरीं भरतो । भलतिकडे ।। दा.१७-७-२ ।।
मुळामध्ये पाणी हे स्वच्छ, शुद्ध, पारदर्शी असेच असते. पाण्याला रंग नाही किंवा चवही नाही. ज्या योनीतील जीवाशी त्या पाण्याचा घनिष्ठ संबंध येतो, त्याप्रमाणे त्या पाण्याचा गुणधर्म बदलत असतो. ज्या वनस्पतींमध्ये ते पाणी असते, त्याप्रमाणे ते पाणी आम्ल, तिखट, खारट, कडू अथवा गोड असते. स्वच्छ असणाऱ्या पाण्यावर संगतीचा परिणाम होत असतो. त्याचप्रमाणे प्रत्येक देहात असणाऱ्या जीवात्म्यावर देहादी संगतीचा परिणाम होतो, पंचभूतांचा परिणाम होतो तसाच तो निसर्गाचाही होतो. स्वकर्माचा, आहार-विहाराचाही परिणाम होतच असतो. आपण बघतो की पृथ्वीच्या पाठीवर असणारे स्वच्छ पाणी उसामध्ये रस स्वरूपात वाहू लागले, की त्या रसामध्ये अमृतासारखी मधुर गोडी असते. त्या गोडीपासून समाधान प्राप्त होते. याउलट तेच पाणी डोंगरातील विषारी वनस्पतीमध्ये, वृक्ष-वेलींमध्ये विष म्हणून वाढते. केरळमध्ये एका झुडपाला अगदी आंब्याच्या कैरीप्रमाणे फळे लागलेली पाहिली. विचारल्यावर कळले की ही फळे सुंदर दिसत असली तरी भयंकर विषारी आहेत. विष अनेकांच्या जीवनाचा घात करीत असते. पृथ्वीच्या पाठीवर असणारे सर्व जीवन पाणी म्हणूनच आहे. पण त्या पाण्यावर संगतीचा परिणाम होत असतो.
उत्तम संगतीचें फळ सुख । अद्धम संगतीचें फळ दुःख ।
आनंद सांडुनियां शोक । कैसा घ्यावा ।। दा.१७-७-१७ ।।
मनुष्याने आपल्या जीवनामध्ये जाणत्याची संगती धरून, सुखाच्या प्राप्तीचा प्रयत्न करावा. संगतीचा परिणाम एखाद्या जड वस्तूवर होतो, त्याचप्रमाणे चैतन्यावरही होत असतो. जड वस्तूला सुख अथवा दुःख, बरे अथवा वाईट हे काही कळत नाही. तसेच ते सांगताही येत नाही. पण जीवात्म्याला मात्र या सुखदुःखाचा अनुभव नेहमी येत असतो. हे सारे कशाच्या आधारे घडते ? तर मनामुळे घडते. आणि गंमत अशी आहे की मनाचे अस्तित्व भासमान आहे. श्रीसमर्थांनी तर आत्माराम या ग्रंथांमध्ये मनालाच माया म्हटले आहे. संत ज्ञानेश्वर तर मनाचे अस्तित्वच नाकारतात. ते म्हणतात,
वायां मन हें नांव । एऱ्हवीं कल्पनाचि सावेव ।
जयाचेनि संगें जीव- । दशा वस्तु ।। ज्ञा. १३-११० ।।
सतत कल्पना करीत राहिल्यामुळे शरीर तयार झाले व त्यात आत्म्याचे प्रतिबिंब पडून जीवदशा प्राप्त झाली. वासनेमुळे शरीर निर्माण होत रहाते. स्वामी विवेकानंद म्हणतात, “मन, विचाराच्या द्वारे शरीर तयार करते.” मन आणि विचार सारखे बदलत असतील, तर मग त्यातील कशाला आपले खरे अस्तित्व मानायचे ? मनाचे अस्तित्व सगळेच संत नाकारतात आणि अंत:करण पंचक केवळ मानसिक आहे. अंत:करण पंचक म्हणजे काही खरे अस्तित्व नाही. जाणिवेला अंत:करण असे म्हणतात. संतांच्या जीवनात अंतःकरणाचा सर्वात जास्त विकास आपण बघतो. आपण सूक्ष्म देहाचा विचार बघत आहोत. त्यासाठी आपण एक दृष्टांत बघूया. मुळात जल आहे म्हणून तरंग आहे. मुळात धातू आहे म्हणून सोने व अलंकार हे दोन्ही आहेत. तसा, अघटित घटना पण सर्व कर्ता जो ईश्वर आहे, म्हणून ही सृष्टी आहे. अद्वैत व द्वैत दोन्ही भेद शब्दच आहेत. पण अनंत शक्तिमान भगवंत आहे म्हणूनच सर्व भेद कल्पना उपजल्या. कार्य त्याचे साधन व कर्तुत्व यास त्या मूळ पुरुषाचीच अनंत, अचिंत्य प्रकृती मूळ माया आहे. या मूळ मायेची ही सर्व निर्मिती आणि हा सारा तिचाच खेळ आहे. मूळ माया आणि मूळ पुरुष एकच आहेत. व्यासादिक सर्वच ऋषींनी आपल्याला सांगून ठेवले आहे की, आत्मज्ञानाशिवाय मोक्ष नाही. मुख्य अविनाशी आत्मा ओळखणे महत्त्वाचे आहे. आत्मा हा साक्षी आणि वेगळाच आहे. आकाश जसे एकच तसा आत्माही एकच आहे. उपाधी भेदाने वेगळेपण भासते. संतांच्या मुखाने असे निरूपण ऐकून हे ज्ञान ज्या क्षणी होते, त्या क्षणीच मोक्ष होतो. ग्रंथराज दासबोधात श्रीसमर्थ म्हणतात,
ऐक ज्ञानाचें लक्षण । ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान ।
पाहावें आपणासि आपण । या नांव ज्ञान ।। दा.५-६-१ ।।
परमात्मभाव अखंड असतो, संलग्न असतो. सूक्ष्मदेह हा चिरंतन आहे. त्यासाठी आपण विवेकाने हे सर्व जाणून घेत आहोत. सूक्ष्म देहाचे चिंतन करीत असताना, एक गोष्ट आपल्या लक्षात आली की, आत्मा हा कृष्णाचा शाश्वत अंश आहे. तसा गीतेतील पंधराव्या अध्यायात श्लोक आहे –
ममैवांशो जीवलोके जीवभूत: सनातन: ।
मन:षष्ठानीन्द्रियाणि प्रक्रृतिस्थानि कर्षति ।। १५-७ ।।
माझा शाश्वत अंश जीव म्हणून या मर्त्य जगात जन्म घेतो. त्याला पाच इंद्रिये मिळतात. आणि सहावे इंद्रिय म्हणजे मन. हे सर्व भौतिक प्रकृतीत वास करतात. याच अध्यायाच्या पंधराव्या श्लोकात भगवंत स्पष्टपणे म्हणतात की, मी सर्वांच्या हृदयात निवास करतो. माझ्यापासून ज्ञान, स्मृती आणि मोह उत्पन्न होतो. खरोखर वेद आपल्याला जाणू इच्छितात. तो केवळ मीच आहे, मी वेदांताचा कर्ता आहे आणि वेदज्ञही आहे. हा सगळा विचार पाहिल्यावर आपल्या लक्षात येते की, विवेकाच्या जोरावरच या प्रकृतीचा निरास होऊ शकतो. देहबुद्धी कमी होते. आणि आत्मबुद्धी जागृत झाल्याखेरीज परमात्मा स्वरूप आकलन होत नाही. म्हणजे आत्मज्ञान आत्मसात होत नाही.
या कारणें ज्ञाना समान । पवित्र उत्तम न दिसे अन्न ।
म्हणौन आधीं आत्मज्ञान । साधिलें पाहिजे ।। दा. ५-४-३२ ।।
सकळ उपदेशीं विशेष । आत्मज्ञानाचा उपदेश ।
येविषईं जगदीश । बहुतां ठाईं बोलिला ।। ५-४-३३ ।।
हा आत्मज्ञानाचा उपदेश अंत:करणात रुजला तरच सूक्ष्मदेह आकलन होऊ शकेल.