राम मंत्राचे श्लोक क्र. ७ – ८ – ९

राम मंत्राचे श्लोक क्र. ७ – ८ – ९
सौ. स्नेहल पाशुपत
  • August 3, 2025
  • 1 min read

तुझें बाळ तारुण्य गेलें निघोनी ।

कळेना कसे लोक जाती मरोनी ।

करिसी मुलाची स्वहस्तें क्रिया रे

हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ।। ७ ।।

सरळ अर्थ  – बाबारे, जन्माला आलो म्हणता म्हणता कधी बालपण जाऊन तारुण्यात पदार्पण केले आणि रसरसते तारूण्य ओसरून वृद्धत्वापर्यंत पोहोचलो कळलेच नाही. बरोबरीचे बरेचसे लोक, सगे-सोयरे कमी कमी होताना दिसत आहेत. ‘जात्यामधले दाणे रडती, सुपातले हसती । कळे न त्यांना मरण उद्याचे भाळीला अंती ।।’ कवीच्या या शब्दाची प्रचिती वरचेवर येते. दुर्दैवाने कोणाला आपल्याहून वयाने लहान असणाऱ्याचे क्रियाकर्मही करावे लागते. या घटनांवरून काहीच धडा घेणार नाही का ? म्हणूनच श्रीसमर्थ म्हणतात, ‘हरेराम हा मंत्र सोपा जपा रे’.

श्रीसमर्थांचा बोध – ‘मरे एक त्याचा दूजा शोक वाहे । अकस्मात तो ही पुढे जात आहे ।’ हा मृत्यूलोक आहे. जन्माला येणारा प्रत्येक जीव क्षणाक्षणाने मृत्यूच्या दिशेने जात असतो. अगदी जोरदार, मोठा, समारंभपूर्वक आपला वाढदिवस साजरा करताना आपण हे विसरतो की, आपण एकेक वर्षाने मृत्यूच्या अधिक जवळ जातो आहोत. ज्यांना आपण आपले मानतो, स्वकीय समजतो ते आप्त; इष्ट; सखे-सोबती या अनंताच्या प्रवासात कधीही साथ सोडून जातात. तेव्हा दुःख करत बसण्यापेक्षा, नामस्मरण करणे जास्त श्रेयस्कर असते. हे जगच मुळी मृत्यूची पाठशाला आहे. जन्म जरी पुर्वकर्मानुसार झाला असला तरी आपला मृत्यू   कसा व्हावा हे ठरवण्याचे स्वातंत्र्य नियतीने माणसाला दिले आहे. इथे जगायचे कसे ? या पेक्षा मरावे कसे ? हे शिकणारा यशस्वी ठरतो. परमार्थ साधनेने हे सामर्थ्य मिळते. म्हणूनच श्रीसमर्थ म्हणतात, ‘मरणाचे स्मरण असावे । हरीभक्तीस सादर व्हावे ।’ जन्माला आला, जगला आणि मेला, यापेक्षा रामभक्तीत/भगवद् चिंतनात व्यतीत केलेला काळ खऱ्या अर्थाने माणूस जगलेला असतो. तेव्हा, हरे राम हा मंत्र सोपा जपा रे हेच खरे.

दुराशा नको रे परस्त्री धनाची ।

नको तूं करूं नीचसेवा जनाची ।

पराधीन कैसा भला दिससी रे ।

हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे ।। ८ ।।

सरळ अर्थ  – परधन आणि परस्त्री  यांची अभिलाषा कधीही धरू नये. त्यासाठी बहुतेक वेळा ‘नीचसेवा’ अर्थात अगदी खालच्या स्तराला जाऊन केलेली सेवा, तसेच शूद्र लोकांची सेवासुद्धा करावी लागते, त्यामुळे पराधीनता येते. मन-बुद्धी गहाण ठेऊन जगण्यापेक्षा हरे राम हा मंत्र सोपा जपावा हेच उत्तम होय.

श्रीसमर्थांचा बोध – संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात – “परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ”. श्रीसमर्थ  म्हणतात – “कांचनाचे ध्यान परस्त्री चिंतन ।  जन्मासी कारण हे चि दोन्ही ।” कामिनी आणि कांचन म्हणजेच अर्थ आणि काम हे परमार्थ साधनातील दोन मोठे अडथळे आहेत. ज्यांना नरजन्माचे सार्थक करून घ्यावेसे वाटते, याच जन्मी मोक्ष मिळावा असे वाटते, त्या प्रत्येकाने जी पथ्ये पाळणे अत्यावश्यक आहेत, त्यात परद्रव्य आणि परस्री यांपासून दूर रहाणे हे प्रमुख आहे. मानवेतर प्राण्यांपेक्षा ‘मनुष्य’ वेगळा, नव्हे तर विशेष महत्वाचा आहे, याचे प्रमुख कारण भगवंताने फक्त आणि फक्त मनुष्यालाच विवेकशक्ती दिलेली आहे. ज्याच्या आधारे मनुष्य ज्ञान आणि वैराग्य प्राप्त करून घेऊ शकतो. श्रीसमर्थ म्हणतात, 

म्हणौनि नरदेह श्रेष्ठ । नाना देहांमध्ये वरिष्ठ ।

जयाचेनि चुके आरिष्ट । येमयातनेचे ।।

असे असताना माणूस मात्र विषय-विकारांच्या आहारी जाऊन “माझे ते माझेच, पण तुझे ते ही माझेच” म्हणत अतिलोभापायी, जे आपले नाही ते मिळवण्याचा हट्ट धरतो. नीती-मर्यादांचे उल्लंघन करतो. त्यासाठी नीचसेवा अंगिकारतो. म्हणजे करू नये ती कामे करतो. किंवा, आपली पत-प्रतिष्ठा, आत्मसन्मान विसरून फक्त पैसा मिळवण्याकरता शूद्रांचे दास्यत्व पत्करतो व आपले स्वातंत्र्य गमावतो. समाजात आपणच आपली छी-थू करून घेतो. श्रीसमर्थ म्हणतात, असे अपमानीत होण्यापूर्वीच अंतःकरणपूर्वक हरे राम हा मंत्र सोपा जपा रे.

मदे डोलसी बोलसी साधुवृंदा ।

कसें हीत तूं नेणसी बुद्धिमंदा ।

रिकामाचि तू गुंतशी  वाउगा रे ।

हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे ।। ९ ।।

सरळ अर्थ  – अहंकार, अभिमान, दंभ याने उन्मत्त होऊन, साधु-सज्जनांना उर्मटपणे टाकून बोलणे चांगले नाही. अशा माणसांना श्रीसमर्थ ‘बुद्धिमंद’ म्हणतात. साधे स्वतःचे हित सुद्धा या अहंकारी लोकांना कळू नये याचे त्यांना वाईट वाटते. त्यांची  समजूत काढताना श्रीसमर्थ म्हणतात , “बाबा रे, असे  नको ते रिकामटेकडे उद्योग करण्याऐवजी, साधे सरळ सोपे ‘हरेराम’ असे नाम मुखाने घेतले, तर तुझे कल्याणच होईल बरं.”

श्रीसमर्थांचा बोध – ज्याला आपण ‘मद’ म्हणतो त्याचे नेमके स्वरूप तरी काय आहे ? बघा हं! काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. यात मद आणि मत्सर, हे दोघे जुळे भाऊच आहेत. माणसाच्या या नैसर्गिक विकारांना अध्यात्म शास्त्रात षड्रिपू म्हटले आहे. या विकारांचा संग, म्हणजे दुःसंग होय. पण हे विकार तर परमेश्वराने दिलेले आहेत, तेव्हा त्यांचा उपयोग आहे हे नक्की. हे विकार कुठे, केव्हा, कसे आणि किती प्रमाणात वापरावे हे समजत नाही. स्वयंपाकात मिठाचे प्रमाण जसे, तसे हे विकार जरूर तेथे त्या प्रमाणात वापरणे अपेक्षित आहे. जिथे जिथे शक्तीचा साठा असतो तिथे मद-मत्सर डोके वर काढतात. कुणाकडे शारीरिक शक्ती असते, कुणाकडे मानसिक ताकद असते, कुणाजवळ  ज्ञानशक्ती, तर कुणाजवळ आर्थिक बळ असते. अशी शक्ती देवाचे देणे न मानता आपलेच कर्तृत्व आहे, असा भ्रम जेव्हा होतो तेव्हा मद-मत्सर माणसाला मदोन्मत्त बनवतात. त्यातही मद-मत्सर-स्वार्थ असा त्रिवेणी संगम होतो, तेव्हा त्याला प्रचंड धार येते व त्यातूनच असुरीवृत्तीचा उदय होतो. अशी व्यक्ती समोरच्यावर अकारण अन्याय, अत्याचार करू लागते. त्यामुळे समाजस्वास्थ्य बिघडते, त्याबरोबर स्वतःचेही स्वास्थ्य-समाधान-शांती हरवते, हे त्याला कळत नाही. अशा नादान व्यक्तींना श्रीसमर्थ कळवळ्याने सांगतात, हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे. 

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

Language