भक्तीशास्त्रामध्ये परमेश्वर प्राप्ती करता सहज, सुलभ असा नवविधा भक्तीचा राजमार्ग संतांनी सांगून ठेवला आहे.
श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् ।
अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ।।
सर्वसामान्य प्रापंचिक मनुष्य या आठ भक्तींपैकी आपल्याला जमेल ती, आवडेल त्या देवाची भक्ती करीत असतो. त्यामुळे भक्ती हे भगवंताच्या प्राप्तीचे अतिशय सोपे साधन आहे असा अनेकांचा समज असतो. परंतु तुकाराम महाराज म्हणतात –
“भक्ती तो कठीण सुळावरील पोळी ।निवडी तो बळी विरुळा शूर ।।”
भक्तीचा कठीणपणा सांगण्यासाठी तिला सूळावरच्या पोळीची उपमा दिली आहे. कारण भक्तीतील अनन्यता साधण्याकरिता मनाची चंचलता, जिवलगांविषयी ममत्व आणि प्रपंचातील आसक्ती सोडावी लागते. प्रापंचिक मनुष्य विषयात गुंतलेला असल्यामुळे त्याला भक्तीचा अनुभव घेणे महाकठीण आहे. त्याच्या भक्तीच्या कल्पनाही संकुचित असतात. आपण करतो तीच भक्ती योग्य व खरी अशा कल्पनेने मनुष्य जन्मभर स्वतःचीच फसवणूक करीत रहातो व शेवटी हाती काहीही लागत नाही. म्हणून नवविधा भक्तीच्या आठही पायऱ्या सोप्या वाटत असल्या तरी त्याची परिणती आत्मनिवेदन भक्तीत झाल्याशिवाय भक्तीचे वर्म कळत नाही. श्रीसमर्थांनी ‘भक्त’ शब्दाची व्याख्या ‘विभक्त नव्हे तो भक्त’ अशी केलेली आहे. म्हणजे भगवंतापासून जो वेगळा उरत नाही तो भक्त होय. भगवंत व भक्त यांचा परस्पर संबंध कसा असतो हे समजण्यासाठी भगवंताचे खरे स्वरूप जाणून घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे.
भगवंत हा मूर्ती पुरता मर्यादित नसून तो अनंत, अपार, सर्वत्र भरून असलेला, अविनाशी, आनंदरूप असा आहे. त्याला वेगळेपणाने पहाता येत नाही कारण इंद्रियांना तो दिसत नाही, मनाला भासत नाही आणि त्याची कल्पनाही करता येत नाही. तो अतीन्द्रिय असल्यामुळे व्यक्त होत नाही. तो उत्पन्नही होत नाही आणि कधी नाशही पावत नाही. तो जशाचा तसा अलिप्तपणे सर्वांना व्यापून उरतो. अशा निर्गुण, निराकार शाश्वत देवाचे स्वरूप कसे आहे हे सांगतांना श्रीसमर्थ म्हणतात-
“देवभक्तांचे मूळ । शोधून पाहातां सकळ ।
उपाधीवेगळा केवळ । निरोपाधी आत्मा ।। १२-३-२७।।”
जे इंद्रियांना दिसते ते सर्व दृश्य व अदृश्य जग नाशिवंत आहे, या वेगळा जो उरतो तो निरोपाधीक आत्माच खरा देव आहे. हा देव ओळखायचा कसा? तर खरा देव मीपणा दूर झाल्याशिवाय कळत नाही. यासाठी आधी ‘मी कोण’ याचा आपल्या अंतर्यामी शोध घेतला पाहिजे. जो देह म्हणजे ‘मी’ असे आपण समजतो, तो देह पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते व सत्त्व, रज व तम या तीन गुणांच्या मिश्रणापासून बनलेला आहे. तो सतत बदलणारा, मिथ्या व नाशिवंत आहे. अज्ञानामुळे जीवाला मी म्हणजे देहच आहे असे वाटते. या देहबुद्धीमुळे वासना उत्पन्न होऊन जीव दृश्य पदार्थ, व्यक्तींना मनाने चिकटतो व त्या बंधनात नकळतपणे बांधला जातो. देहाचे सुख तेच खरे सुख या भ्रामक जाणिवेने विषयसुख मिळविण्याकरता जीव दृश्य जगताकडे खेचला जातो आणि आपोआप स्वस्वरूपापासून दूर होतो. ज्या पंचभौतिक तत्वांचा मिळून देह बनलेला आहे ते पृथ्वी तत्त्व पाण्यात, पाणी तेजात, तेज वायूत, वायू आकाशात अशा पद्धतीने विलीन होतात आणि सगळ्यात शेवटी या सगळ्यांना व्यापून असणारा अविनाशी परमात्मा मात्र सदा, सर्वत्र, समत्वाने जशाचा तसाच शिल्लक राहतो.
या परमात्मस्वरूप भगवंताशी ऐक्य साधण्यासाठी ‘मी देह आहे’ हा अहंकार सोडावा लागतो, तो कशाने सोडता येतो? तर स्वतःला सर्वस्वी भगवंताला समर्पित करून सोडता येतो. यालाच आत्मनिवेदन म्हणतात. नि+विद् या धातूपासून निवेदन शब्द बनला आहे. आत्मनिवेदन हा नवविधा भक्तीचा आत्मा आहे. निवेदनाचे लक्षण सांगतांना श्रीसमर्थ म्हणतात-
“ऐका निवेदनाचें लक्षण । देवासि वाहावें आपण ।
करावें तत्त्वविवरण । म्हणिजे कळे ।।४-९-३।।”
मीपणा संपून भगवंताच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळून जाणे हेच निवेदनाचे मुख्य लक्षण आहे. आपल्या देहातील पंचभौतिक तत्त्वांचा निरास झाला की शेवटी देहबुद्धीने पोसलेला खोटा मी सर्वस्वी नाहीसा होतो व केवळ चैतन्यमय आत्मतत्त्वच शिल्लक राहते. व तेच माझे खरे स्वरूप आहे असा भक्ताला साक्षात्कार होतो.
“तत्वें तत्व जेव्हां सरे । तेव्हां आपण कैंचा उरे ।
आत्मनिवेदन येणें प्रकारें । सहजचि जालें ।। ४-९-९।।”
अश्याप्रकारे देवाला पाहायला गेलेला भक्त स्वतः देवरूपच होऊन जातो. ‘पाया पडू गेले तव पाऊलचि न दिसे’ अशी भक्ताची अवस्था होते. तेथे द्वैत पूर्णपणे संपून जाते. आत्मनिवेदनभक्तीमुळे संसारविरक्ती, सायुज्यमुक्ती व पाठीशी भगवतशक्ती असा तिहेरी लाभ साधकाच्या पदरी पडतो.
व्यवहारामध्यें भक्त व भगवंत हे दोघे देह रूपाने वेगळे दिसत असले तरी मी आणि निर्गुण निराकार भगवंत एकरूप आहोत असा विवेक जर भक्त सातत्याने करीत असेल तर तो मनाने भगवंतापासून कधीही दूर जात नाही. अश्याप्रकारे आत्मनिवेदनाने संपूर्ण संगत्याग झाला की अभेदभक्तीची अवस्था प्राप्त होते.
मी व माझे सगळे भगवंताला समर्पण करणे ही निवेदनाची पहिली पायरी होय. यासाठी वस्तू, व्यक्तींचा संग मनाने सोडावा लागतो. याला जड आत्मनिवेदन म्हणतात.
भगवंत हा सर्व चराचराला व्यापून असून तोच सृष्टीचा कर्ता आहे हे पक्के ध्यानात ठेवले की, मी म्हणून कोणी वेगळा उरत नाही. त्यामुळे मी कर्ता, मी भोक्ता हा अहंकार नाहीसा होतो. ही निवेदनाची दुसरी पायरी आहे. यालाच ‘चंचळ आत्मनिवेदन’ म्हणतात. जे जे दिसते ते सगळे माया निर्मित, स्वप्नवत आहे. ते दिसत असले तरी खरेपणाने टिकत नाही. म्हणून जे शाश्वत परमात्मतत्त्व आहे तेच तेव्हढे खरे आहे आणि ‘तेच तू आहेस’ असा उपदेश संत आपल्याला करतात. ही निवेदनाची शेवटची पायरी आहे.
सगळ्या नाशिवंत गोष्टींचा संगत्याग व आत्मनिवेदन या दोन्हीचे फळ म्हणजे समाधानाची प्राप्ती होय. म्हणून हे दोन्ही एकच आहेत असे श्रीसमर्थ म्हणतात.